“मॅक्स म्युलर“
नमस्कार मंडळी. मागच्या भागात आपण जर्मन दिग्दर्शक विम व्हेंडर्स आणि त्यांचे चित्रपट या विषयी वाचले. त्या भागाचे औचित्य म्हणजे, त्याच दिवसापासून मुंबईतील रिगल सिनेमात विम व्हेंडर्स यांच्या चित्रपटांचा महोत्सव सुरू होणार होता. त्याप्रमाणे तो झाला. पहिल्या दिवशीचा चित्रपट आणि त्यानंतरचा त्यांचा प्रेक्षकांशी झालेल्या दिलखुलास संवादानंतर जेव्हा मी त्यांना आपले पोर्टल, त्यावर सुरू असलेली जर्मन विश्व लेखमाला आणि त्याच दिवशीच्या भागात ते आणि त्यांचे चित्रपट
असे सर्व काही दाखविल्या नंतर आनंदाने त्यांनी माझ्या गळ्यात हात घालुन खूप कौतुक केले. स्वतःहूनच आमच्या दोघांचा फोटो काढू या असे सांगून फोटो काढून घेतले.
अर्थात हे सर्व श्रेय आहे, लेखिका प्रा आशी नाईक यांचे आणि त्यांना छान लिहिलंय प्रतिसाद देत असलेल्या आपणा सर्वांचे. “जर्मन विश्व” वाचत वाचत आपलेही विश्व समृद्ध करू या आणि आजच्या भागात थोर मॅक्स म्युलर यांच्या विषयी जाणून घेऊ या.
– संपादक
भारत देश, भारतीय संस्कृती, भारतीय ज्ञान आणि जगातील प्राचीनतम भाषा संस्कृत यावर नितांत प्रेम करणारे जर्मन अभ्यासक म्हणजे मॅक्स म्युलर. त्यांचे पूर्ण नाव फ्रेडरिक मॅक्स म्युलर असे आहे. संपूर्ण जगभरात संस्कृत पंडीत आणि भाषातज्ञ म्हणून ते ओळखले जातात.
६ डिसेंबर १८२३ रोजी पूर्व जर्मनीमधील देसाऊ या शहरात मॅक्स म्युलर यांचा जन्म झाला. ते चार वर्षांचे असतानाच त्यांचे वडील विल्हेल्म म्यूलर यांचे निधन झाले. आई एडलहेड यांनी त्यांचा सांभाळ केला. लाईपझिग विद्यापीठात त्यांनी १८४१ ते १८४३ मध्ये अरबी, ग्रीक, फारसी, लॅटिन आणि संस्कृत या भाषांचे अध्ययन केले. त्यांनी पीएचडी ही सर्वोच्च पदवीही संपादन केळी. आपण सगळे जे हितोपदेशातील गोष्टी वाचून मोठे झालो त्याचे त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी इंग्रजी मध्ये भाषांतर केले.
त्यानंतर त्यांनी बर्लिनला आणि नंतर फ्रान्समधील पॅरिस विद्यापीठात संस्कृतचा आणि तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. ब्युरनुफ नावाच्या फ्रेंच अभ्यासकाने त्यांना वैदिक ग्रंथांच्या अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले व सायण भाष्यासह ऋग्वेदाची भाषांतरित आवृत्ती तयार करण्याची प्रेरणा दिली. याचा परिणाम म्हणून २३ वर्षीय म्युलरने वेद विषयक संशोधनाला वाहून घ्यायचे निश्चित केले.
मॅक्स म्युलर १८४८ मध्ये हस्तलिखितांचा अधिक अभ्यास करण्यासाठी कायमचे लंडनला गेले. ध्येयपूर्तीसाठी त्यांना परिस्थितीशी झगडावे लागले. ईस्ट इंडिया कंपनीतील त्यांचा मित्र बनसेन यांनी सभाष्य ऋग्वेदाच्या प्रकाशनाची आर्थिक बाजू सांभाळली. परंतु त्याकाळात देवनागरी लिपीत लिहिलेला मजकूर छापू शकेल असा एकही छापखाना युरोपमध्ये नव्हता. मॅक्स म्युलर यांनी देवनागरी लिपीत अक्षरे लिहून त्यांचे खिळे तयार केले आणि प्रचंड मेहनतीने सायण भाष्यासह ऋग्वेदाच्या पहिल्या आवृत्तीचा पहिला भाग १८४८ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केला. शेवटचा सहावा भाग १८७३ मध्ये प्रकाशित झाला.

मॅक्स म्युलर यांना १८५० मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात अध्यापनाची संधी मिळाली. तेथे ते तुलनात्मक भाषाशास्त्र तसेच धर्मशास्त्र हे विषय शिकवत. ऑक्सफर्ड विद्यापीठात कार्यरत असतानाच त्यांनी आखलेली ‘सक्रेड बुक्स ऑफ ईस्ट’ ही निवडक प्राचीन ग्रंथांच्या इंग्रजी अनुवादाची योजना १८७९ ते १९०४ या काळात सफलतापूर्वक पूर्ण केली. या योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथांचे इंग्रजी अनुवाद पन्नास खंडांत प्रकाशित केले गेले. या ग्रंथमालेने संस्कृत, प्राकृत, पाली, अवस्थी, पर्शियन, अरबी, चिनी या भाषेतील संशोधनाचा पाया घातला.

मॅक्स म्युलर यांनी रचलेले अन्य ग्रंथ म्हणजे एनशन्ट संस्कृत लिटरेचर (१८५९), लेक्चर्स ऑन दि सायन्स ऑफ लँग्वेज (दोन भागात प्रकाशित १८६१ आणि १८६४), चिप्स फ्रॉम ए जर्मन वर्कशॉप (चार भाग १८६७ ते १८७५), इंट्रोडक्शन टू सायन्स ऑफ रिलिजन (१८०३), बायोग्राफी ऑफ वर्ड्स (१८८८), गिफोल्ड लेक्चर्स (चार भाग १८८८ ते १८९२), सिक्स सिस्टिम्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी इत्यादी. त्यांच्या या अफाट ग्रंथसंपदेकडे बघता लक्षात येते की त्यांनी वेद, दर्शन, धर्मशास्त्र, साहित्य अशा विविध अंगांनी संस्कृत वाङ्ममय अभ्यासले आहे.
देववाणी संस्कृत आणि भारतीय संस्कृती यांचा इतक्या मोठ्या कालावधीपर्यंत आणि इतका सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांच्या मनात भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल एक विशिष्ट प्रतिमा तयार झाली होती. त्यांची अशी धारणा होती की भारत एक पवित्र भूमी असून भारतीय अत्यंत सात्विक, धार्मिक आणि अध्यात्मिक प्रवृत्तीचे आहेत. त्यांची ही धारणा मोडू नये, त्यांच्या मनातील ही प्रतिमा तशीच अबाधित राहावी, तिला धक्का पोहोचू नये म्हणून त्यांनी भारताला कधीही भेट दिली नाही. त्यांच्या उच्च आणि उदात्त विचारसरणीतून प्रतिबिंबित झालेले त्यांचे लेखन, ग्रंथ, शोधनिबंध वाचताना मात्र त्यांची भारताविषयी भारतीय विद्येविषयी असलेली आस्था नक्कीच जाणवते.
अशा या भारत प्रेमी जर्मन प्राच्यविद्यापंडिताला मानवंदना देण्यासाठी आणि जर्मनी व भारत यांच्यामध्ये सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी जर्मन सरकारने भारतात मॅक्स म्युलर नावाने भवने निर्माण केली आहेत. ही भवने पुणे, मुंबई, ठाणे, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता या शहरांमध्ये कार्यरत आहेत. तेथे जर्मन भाषेचे शिक्षण दिले जाते व त्याच बरोबर जर्मन संस्कृती समजून घेण्यासाठी काही कार्यक्रम आयोजित केले जातात, चित्रपट दाखवले जातात व जर्मन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येतात. जर्मनी मधील ग्योथ इन्स्टिट्यूट बरोबर ह्या सलग्न असून येथे जर्मन भाषा शिकून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र मिळवता येते. ह्याबद्दल अधिक माहितीसाठी आपण खालील वेबसाईट पाहू शकता.
https://www.goethe.de/en/index.html
मॅक्स म्युलर बद्दल गेल्या काही वर्षातील संशोधन असे सांगते की ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कामावर ठेवले होते. स्वधर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यात काही गैर नाही असे वाटून मॅक्स म्युलर ह्यांनी ते काम स्वीकारले. नंतर मात्र भारतातील ज्ञान परंपरा मोडणे, शिक्षण पद्धत बदलणे तसेच वेदांचे चुकीचे भाषांतर करून जगभरात भारताचे नाव खराब करणे आणि भारताला कॉलोनी बनवणे हे मुख्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मॅक्स म्युलर ह्यांचा वापर करून घेतला असे दिसते. २८ ऑक्टोबर १९०० रोजी ऑक्सफर्ड मध्ये त्यांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नीला त्यांनी लिहिलेली पत्र जेव्हा जगासमोर आली तेव्हा वरील बाबीचा खुलासा झाला आणि त्यांनी केलेल्या कुकर्माचे पुरावे देखील मिळाले. ब्रिटिशांनी भारताची वाट लावली हे तर सत्य आपल्याला ज्ञात आहेच. तसे करण्यासाठी त्यांनी अनेक लोकांचा वापर करून घेतला त्यातले एक मॅक्स म्युलर असे कदाचित म्हणता येईल. मात्र त्यांनी वेदादी ग्रंथांचे भाषांतर चुकीचे केले की बरोबर हे तपासून बघण्यासाठी आपण स्वतः वेद, उपनिषदे, मनू स्मृति अशा आपल्या ग्रंथाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मॅक्स म्युलर सारख्या अनेक पाश्चिमात्य विद्वानांनी आपल्या ग्रंथाचे नक्की कसे अर्थ लावले आणि त्याचा जागतिक स्तरावर काय परिणाम झाला हे जाणून घेण्याची उत्सुकता माझ्या बरोबरच तुम्हा सर्वांना देखील असेल अशी आशा करते. याविषयावर अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करू शकता.
https://youtu.be/9beSkYZBQ0U?si=CiUHV3gv4rdWNbNC
क्रमशः

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप सुंदर माहिती अगदी मोजक्या शब्दात मांडता त्यामुळे वाचताना छान वाटत. खूप स्तुत्य उपक्रम.