Thursday, March 13, 2025
Homeकलाजर्मन विश्व - ७

जर्मन विश्व – ७

“वॉल्फगांग अमाडेउस मोझार्ट”

वॉल्फगांग अमाडेउस मोझार्ट हे अठराव्या शतकातील पश्चिमी संगीत इतिहासातील एक प्रभावशाली संगीतकार. अवघ्या ३५ वर्षांच्या जीवनात त्यांनी ६०० हून अधिक संगीत रचना करून पश्चिमी संगीत क्षेत्रात अमुलाग्र योगदान दिले आहे. विविध शास्त्रीय शैलींमध्ये स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनांनी यांनी आपला ठसा उमटवला आहे. “न भूतो न भविष्यति” असे यांच्या बद्दल म्हटले तर वावगे ठरणार नाही.

वॉल्फगांग अमाडेउस मोझार्ट हे जगभरात जर्मन संगीतकार आणि पियानो, व्हायोलिन वादक म्हणून प्रसिद्ध असले तरीदेखील हे जर्मनीचे रहिवासी नव्हते . जर्मनीच्या दक्षिणेला असलेल्या ऑस्ट्रिया नावाच्या लहानशा देशातील साल्झबर्ग शहरात २७ जानेवारी १७५६ रोजी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लेओपोल्ड मोझार्ट हे स्वतः संगीतकार आणि व्हायोलिन वादक होते. त्यांनीच वॉल्फगांग व त्यांची मोठी बहीण मारिया आन (नान्नीर्ल) यांना बालपणापासूनच संगीताचे धडे दिले. आश्चर्य म्हणजे वडील हे त्यांचे एकमेव शिक्षक होते. त्यांनीच संगीत भाषा आणि बाकी शैक्षणिक विषय असे सगळेच शिकवले.

वॉल्फगांग ह्यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच पेटी व व्हायोलिन वर संगीत रचना करण्यास सुरुवात केली आणि लोकांसमोर सादरीकरण देखील केले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी पहिली सिम्फनी रचली. असे म्हणतात की त्याचे सांगितिक भाषेत लिखाण त्यांच्या वडिलांनी केले होते. मुलाचा संगीत क्षेत्रातील कल, गती आणि कौशल्य पाहून वडील लेओपोल्ड यांनी स्वतःच्या रचना करणे थांबवले.

लेओपोल्ड १७६३ पासून वॉल्फगांग आणि मारिया आन यांना घेऊन युरोप खंडातील वेगवेगळ्या देशांमध्ये फिरस्तीवर गेले. तिथे त्यांनी देवाचा अद्भुत चमत्कार असलेल्या आपल्या दिव्य बालकांचे (child Prodigy) अनेक कार्यक्रम घडवून आणले, ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी व पैसा दोन्ही मिळाले. तीन वर्षांच्या या प्रवास दौऱ्यात ते फ्रान्स, इंग्लंड मध्ये योहान क्रीस्टीयान बाख, इटली मध्ये जोसेफ हायडन यांना भेटले. अशा तत्कालीन लोकप्रिय असलेल्या संगीतकारांकडून प्रेरणा घेऊन वॉल्फगांग ह्यांनी सिम्फनीज, ऑपेरा संगीत तसेच वायोलिन कॉन्सर्ट आणि पियानो सोनाटा अशा विविध संगीत प्रकारांची रचना केली.

मोझार्ट यांनी साल्झबर्ग मध्ये संगीतकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली असली तरी देखील ठीकठिकाणी प्रवास केल्यामुळेच त्यांना नावलौकिक प्राप्त झाला. व्हिएन्ना मधील १७८१ ते १७९१ हे दशक म्हणजे त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ मानला जातो. याच काळात त्यांनी तीन महत्त्वाच्या ऑपेरांची रचना केली. द मॅरेज ऑफ फिगरो ( The Marriage of Figaro), दोन जिओवानी ( Don Giovanni) आणि कोसी फॅन तूते ( Cosi fan tutte). या रचना तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऐकू शकता.

https://youtu.be/8OZCyp-LcGw?si=mqVC6s-xWk_bc4yV
The Marriage of Figaro

https://youtu.be/jyjVCbTo5F0?si=CPOAAGA2lG3E_RaD
Don Giovanni

https://youtu.be/AEramVQ3_Xw?si=1wZh-9BrQyocbcHN
Cosi fan tutte

व्हिएन्ना येथेच त्यांनी अत्यंत उच्च दर्जाच्या मानल्या जाणाऱ्या दोन सांगीतिक रचनांची निर्मिती केली. त्या म्हणजे मास इन सी मायनर (Mass in C Minor) आणि पियानो कॉन्सर्ट २१ (Piano Concerto 21).

मोझार्ट यांचा ५ डिसेंबर १७९१ रोजी व्हिएन्ना मध्येच एका विशिष्ट प्रकारच्या तापाने मृत्यू झाला असे म्हणतात, पण त्यांच्या मृत्यूचे खरे कारण अजूनही अज्ञातच आहे. त्यांच्या शेवटच्या काही वर्षात त्यांनी अत्यंत सुंदर अशा रचनांची निर्मिती केली आहे. क्लॅरिनेट कॉन्सर्ट, सिम्फनी क्र. 40 इन G मायनर, लेकरीमोसा अशी त्यांची नावे आहेत. शेवटच्या काही महिन्यात त्यांनी “द मॅजिक फ्लूट” (The Magic Flute) नावाने एका ऑपेराची रचना केली. अत्यंत गाजलेल्या या ऑपेराची कथा आणि संगीताचा काही भाग तुम्ही इथे पाहू ऐकू शकता.

मोझार्ट यांच्या संगीताबद्दल असे म्हटले जाते की ते नाटकातील पात्रानुरूप असे. पात्राच्या कायिक अभिनयाला साजेसे आणि त्याचवेळी पात्राच्या मनाचा ठाव घेणारे ते असे. पाश्चात्य देशांमध्ये मोझार्ट च्या संगीतरचनांची तुलना शेक्सपियरच्या कलाकृतींशी केली जाते. ज्याप्रमाणे शेक्सपियर सगळीकडे सामावून राहिलेला आहे, त्याचप्रमाणे मोझार्टचे संगीत देखील नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन सिरीज तसेच हल्लीच्या काळातील व्हिडिओ गेम्स मध्ये देखील आढळते. ३५ वर्षांच्या अत्यल्प जीवनकाळात इतक्या प्रचंड प्रमाणात संगीतरचना केल्याने ते अजरामर झाले आहेत. आजमीतिलाही संगीत क्षेत्रातील एक विलक्षण दिव्य व्यक्तिमत्व म्हणून वॉल्फगांग अमाडेउस मोझार्ट हे नाव प्रेमाने, आदराने आणि कृतज्ञतेने घेतले जाते.
क्रमशः

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित