राज्यात सर्व ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र हिरवाईचा साज चढला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाचा पालखी सोहळा पंढरपुरात काल मोठ्या आनंदाने पार पडला.
कल्याण (पूर्व) येथील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणारी नूतन ज्ञान मंदिर ही मराठी माध्यमाची शाळा गेली १८ वर्ष दिंडी आणि विठू रायाचा पालखी सोहळा आयोजित करीत असते, हीच परंपरा कायम ठेवत या ही वर्षी हा पालखी सोहळा विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला. या पालखीत विद्यार्थी, शिक्षक मोठया उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत आले होते. सोबतच लेझीम ढोल-ताशांच्या गजरामध्ये विठुनामाचा गजर करत पालखीने शाळेतून प्रस्थान केले. तत्पूर्वी मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी गागरे यांनी पालखीची विधिवत पूजा केली. शाळेचे पर्यवेक्षक श्री रा.टी. पाटील हे या पूजेत सहभागी झाले होते. शाळेसाठी आरोग्यदायी शिक्षण तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी साकडे घातले गेले. शाळेच्या प्रागंणात एक रिंगण पूर्ण करून पालखीने विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान केले.
ढोल-ताशांच्या तालावर लेझीम खेळणारे विद्यार्थी पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून नागरिक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. हा सोहळा पंढरपुरातील वारीची आठवण करून देणारा आणि स्मरणात राहणारा असा झाला.
विठूनामाचा गजर करत विद्यार्थी पालखीसोबत टाळ-मृदुंगाच्या ताला मध्ये तल्लीन होऊन गेले होते. कोणी जनाई, कोणी तुका, कोणी नामा बनून या पालखीत सहभागी झाले होते. विठ्ठल रुक्माईचा वेश परिधान केलेले विद्यार्थी सगळ्यात उठून दिसत होते.
मंदिराच्या प्रांगणात रिंगण पूर्ण करून विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. मंदिरात केलेल्या अभंग किर्तनाने भक्तजनांना मंत्रमुग्ध केले.
शाळेच्या सांस्कृतीक प्रमुख सौ सुषमा मोटघरे तसेच सौ यशोदा आव्हाड तसेच विद्यार्थ्यांन कडून लेझीम शिकवणारे व सराव करून घेणारे श्री गोकुळ गवळे व श्री दळे श्री कोळी यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले.
सौ गाडगे यांची टाळ नृत्याची संकल्पना ही नाविन्यपूर्ण होती. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गागरे मॅडम यांचा स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ कल्याण (पूर्व) तर्फ शाल श्रीफळ तसेच व विठ्ठल रुक्माई ची प्रतिमा देऊन त्यांचाही सत्कार केला.
कल्याण (पूर्व) पालक तसेच नागरिक हे नूतन ज्ञान मंदिर या शाळेच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच आषाढी एकादशी निमित्त शाळेला शुभेच्छा दिल्या आणि विठ्ठलाच्या पालखीचे दर्शन घेतले.
— लेखन : आस
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800