सावकाराने पुढे केलेल्या कर्जाच्या वहीत, जांभळ्या शाईने भिजलेल्या अंगठ्याचे ठसे उमटणारी पानं वाढतच होती. पण कर्ज कमी होईना.
तो घरी गेला अंधारल्या खोलीत कंदिलाची बारीक वात टीमटीम करत होती. त्याने टोपली खालचा दोर हातात घेतला आणि वटवृक्षाकडे निघाला. तेवढ्यात त्याने बघितलं, ती आपल्या छोट्या छोट्या हातांनी वह्या, पुस्तकं दप्तरात ठेवत होती. एक कोरी वही काढून त्यावर तिने आपलं नाव लिहिलं. त्याने ते निरखून बघितलं. हे अक्षर आपल्या कर्जाच्या वहीतले काही अंगठे जरूर पुसतील एवढं त्याला कळलं असावं, आणि हातात घेतलेला दोर त्याने टोपली खाली झाकला कायमचा, आणि न्याहळत बसला जांभळ्या शाईने भिजलेला अंगठा….
अशी इवल्याश्या हातातली लेखणी आणि पाटी त्या जांभळ्या शाईत बुडालेल्या अंगठ्याला नवजीवन देऊन गेली.
एक आशेची पालवी निराशा दूर सारून मार्गस्थ होण्यास मदत करते. आत्महत्येची मानसिकता निर्माण होण्यास भरपूर कालावधी लागतो. त्या दरम्यान या विचारापासून परावृत्त होण्यासाठी काही सकारात्मक घटना घडणं आवश्यक असतं. आत्महत्येमागे नैराश्य, असहाय्यता आणि जीवन व्यर्थ असल्याची भावना असते. यामागे वैद्यकीय कारणंही असतात.
एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येणं किंवा त्याने आत्महत्येची कल्पना करणं, याला मानसोपचारात ‘सुसाइड आयडिएशन’ म्हणतात.
मनात आत्महत्येची कल्पना येण्यास एकच कारण कारणीभूत नसतं. आत्महत्या करण्या सारखं टोकाचं पाऊल घेण्याआधी घडलेली घटना केवळ निमित्तमात्र असू शकते. त्याक्षणी, जीवन संपवणं हा एकच मार्ग त्या व्यक्तीला दिसतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, साल 2019 मध्ये 77 टक्के आत्महत्या अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशात घडल्या आहेत.
शुभ्र झरे ओसंडून वाहत होते पण, धीराने. मास्तर आकाश पटावर आयुष्याच्या इतिहासाची दृश्य नव्याने बघत होते. नाजूक चिमण्या किणकिण करत जरा लांबूनच आठवणींचे स्वर छेडत होत्या. किती गणितं चुकली होती कळतं होतं पण वजाबाकी करायला आता अंक उरले नव्हते. स्पर्शाची ऊब जरूर होती पण हाताची साथ सुटली होती. घट्ट पकडाव्याश्या वाटलेल्या क्षणांनी कधी निरोप घेतला कळलंच नव्हतं…सहचारिणी सोडून गेली.
नोकरीतून रिटायर झालेले शंभू मास्तर समुद्र किनारी आले होते त्या भर वेगाने येणाऱ्या आणि आपल्या सोबत सगळं वाहून नेणाऱ्या लाटांच्या कुशीत सामावून जाण्यासाठी…. आपला जीवन प्रवास संपवण्यासाठी. पण समोरून त्यांच्या शाळेचा एक चिमुकला विद्यार्थी तिथे आला आणि त्यांना म्हणाला, “मास्तर तुम्ही शिकवला होता ना उगवता सूर्य काढायला मला जमला तो आता, बघा ना” त्याच्या वहितला उगवता सूर्य बघून मास्तर भानावर आले आणि त्या दोघांनी मिळून त्या उगवत्या सुर्यात रंग भरायला घेतले…
आत्महत्येचा विचार म्हणजे, तात्पुरती मानसिक अवस्था आहे. त्या वेळी त्या व्यक्तीला आधाराची गरज असते. त्यामुळे कोणी आत्महत्येच्या संदर्भात काही बोलून दाखवत असेल, तर त्याच्यावर मानसोपचार करण्यास सांगा. त्या व्यक्तीला मोकळेपणाने बोलण्यास तयार करायला हवे.
निर्णय चुकले परिस्थिती की मीच चुकत गेले माहीत नाही पण जीव ओतून सर्व पणाला लावून देखील कोणाच्या अधे मध्ये नसून देखील “आपली माणसं” असे नुसते लेबल लावूनच भेटली ती ‘माणसं’ आपली झालीच नाही कधी. तुम्हाला बोलले नाही पण निभावताना जीव गुदमरात होता. किती वेळा स्वतःची उलट तपासणी केली. किती वेळा उगाचच त्रास करून घेतला पण उत्तर न भेटता आणखी प्रश्न हात धरू लागले ….मग सगळं असच राहणार आहे हे स्वीकारून घेतलं आणि स्वतःलाच संपवून घ्यावं असं मनात आलं……
कॉलेजमध्ये शिकणारी मुग्धा आपल्या मानसिक विवंचनेत गुरफटत जात होती आणि स्वतः शी झगडत होती…..यातून तिला बाहेर निघण्यासाठी कोणी जवळचं हवं होतं बोलायला.
जगभरात दरवर्षी सात लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात. पण, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक लोक वेगवेगळ्या पद्धतीने आत्महत्येचा प्रयत्न करतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, पंधरा ते एकोणवीस वर्ष या किशोरवयीन वयोगटात आत्महत्या हे मृत्यूचं चौथ्या क्रमांकाचं प्रमुख कारण आहे.
डिप्रेशन किंवा नैराश्य, मानसिक स्थितीत चढ-उतार, सतत चिंता किंवा अस्वस्थता ज्या गोष्टीत आनंद वाटत होता. पण आता त्या गोष्टीत रस नसणं, सतत मनात नकारात्मक विचार, भविष्याबद्दल चिंता आणि निगेटिव्ह कल्पना.
आपलंच काहीतरी चुकतेय अशी स्वतः ला कमकुवत समजण्याची भावना आत्मविश्वास कमी करत जाते. या कारणातून व्यक्ती नकारात्मकतेकडे वळत जातो.
स्वतःला सतत सकारात्मक कार्य आणि विचाराकडे प्रवृत्त करत राहणं. जी काही परिस्थिती निर्माण होते ती संपूर्ण आयुष्य नाही त्याचा केवळ एक लहान भाग आहे आणि ती परिस्थिती बदलणार असते, याची जाणीव ठेवून पुढे चालत राहायचं आहे. असे विचार स्वतः मध्ये रुजवात राहणं गरजेचं आहे.
सकारात्मक विचारांचा झरा आपल्या आतूनच उगम पावत असतो त्याचा शोध बाहेर घेऊ नये. बाहेरून त्यांचं संगोपन होण्यास पोषक वातावरण देखील आपल्यालाच निर्माण करावं लागतं. कोणाशी तरी मनमोकळे बोलत रहावं.
एक आरसा असा असावा ज्याच्यापुढे आपली खरी प्रतिमा आपण बघू शकू आणि ती स्वीकारू शकू. हेच सकारात्मक मानसिक बळ आणि उर्जा आपल्याला हे अनमोल जीवन आणखी सुंदर पद्धतीने जगण्यास प्रवृत्त करत राहणार.

– लेखन : डॉ. राणी खेडीकर, बालमानस तज्ञ
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800