जाऊ झाडांच्या मनात, काय काय दिसे तिथे
झाडे सांगती कानात, फक्त सृजन हो येथे..
झाड म्हणाले म्हणाले, जरा कुरवाळ मला
घेऊनिया कवेत मी, हात हाती दिला त्याला…
झाड हालले डुलले त्याने घेतली गिरकी
माया हवी वाटते ग, आम्हा तुमच्या सारखी
तुम्ही फुलतां फळता तसे आम्ही ही फुलतो
नाही वाचा बघा फक्त सारे लुटूनच देतो…
तुम्हा साठी आहे जन्म सारे तुमच्याच साठी
सरणातही सोबती आणि आधाराला काठी
पाळणाही आमुचाच जोजवितो बालपणी
पाना पासून नि मुळे आम्ही आहो सर्वगुणी…
तुम्हासाठीच औषधे तुम्हासाठीच सावली
उगाळून देते कुणी घुटी बाळाला माऊली
तरी सपासप घाव रक्तबंबाळ करती
अशी कशी उफराटी आहे माणसाची नीती..
प्राणवायु देतो आम्ही आणि फुलूनी आनंद
हिरवाईने नटली धरा आनंदाचा कंद
आम्हा वाचून भविष्य नाही माणसास पहा
आम्ही धरतोच छत्र तुम्ही आनंदात रहा…
नका वर्मी घालू घाव आम्ही अमृताचे पेव
आम्हावरी मधमाशा ठेवतात मध ठेव
आम्ही तुमच्याच साठी खत होऊन मुरतो
आणि तुमच्याच साठी जन्म पुन्हा नवा घेतो…

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800