सज्जन हो……
आज अश्विन शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा……
या कोजागिरी पौर्णिमेस शरद पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा, रास पौर्णिमा अशी विविध नावे प्रचलित आहेत.
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देहरूपी घट शक्ती, लक्ष्मी व बुद्धी रुपी भगवतीच्या पायाशी स्थापन करून तिच्याकडून नवचैतन्य घेऊन जीवनातील नवनवीन चेतना, नवे स्फुरण, नवा उन्मेश, नवा आनंद, नवा उत्साह, नवा पराक्रम व नवीन भावात्मक सहजीवन प्राप्त करण्याचा या जागरण महोत्सवातून आपण प्रयत्न करीत असतो. अश्विनाच्या शुक्ल पक्षात चांदण्यांच्या स्निग्ध धवल तेजाने उजळून न्हाऊन निघणारी प्रत्येक रात्र क्रमशः अधिक तेजस्वी, शीतल, शांत व अल्हाददायी होत जाते. आकाशात चंद्र एकेका कलेने वाढतो तसं तसं हे शरदाचं चांदणं मानवी मनावर गारुड करायला सुरुवात करते.
★चंद्राच्या सोळा कला : — भारतीय प्राचीन विविध ग्रंथात चंद्राच्या सोळा कलांची नावे खालीलप्रमाणे दिलेली आहेत……
१)अमृत २)मनदा ३)पुष्प ४)पुष्टि ५)तुष्टी ६)ध्रुती ७)शाशनी ८)चंद्रिका ९)कांती १०)ज्योत्स्ना ११)श्री १२) प्रीती १३)अंगदा १४)पूर्ण १५)अमृता १६)पूर्णामृता.
१)अन्नमया २)प्राणमया ३)मनोमया ४)विज्ञानमया ५)आनंदमया ६)अतिशयनी ७) विपरिनाभिनी
८) संक्रमिणी ९) प्रभवी १०)कुंथीनी ११) विकासिनी १२) मर्यादिनी १३)सन्हलादिनी १४)अल्हादिनी १५) परिपूर्ण १६)स्वरूपवस्थिता.
१) श्री: २) भू: ३)कीर्ती ४)इला ५)लीला ६)कांती ७)विद्या ८)विमला ९)उत्कर्षिनी १०) ज्ञान ११)क्रिया १२)योग १३)रवी १४)सत्य १५)ईषणा १६)अनुग्रह.
१)प्राण २)श्रद्धा ३)आकाश ४)वायू ५)तेज ६)जल ७)पृथ्वी ८)इंद्रिय ९)मन १०)अन्न ११)वीर्य १२)तप १३)मंत्र १३)कर्म १४)लोक १६)नाम.
एरवी रोज एकेका कलेचे तेज घेऊन प्रकाशित होणारा चंद्रमा कोजागिरीस मात्र सर्व सोळा कलांनी युक्त होऊन पुर्ण चंद्रमा होऊन सृष्टीस अमृताने न्हाऊ घालत असतो.
★को जागर्ती…….? अश्विनातल्या या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे नामाभिधान प्राप्त झाले आहे. कोजागिरी हा शब्द “क: + ओज + जागर” या तीन शब्दांच्या संधीतून बनलेला आहे. क: म्हणजे ब्रम्हानंद, ओज म्हणजे तेज, प्रकाश, प्रभा, आनंद आणि आगर म्हणजे साठा, समुद्र, महानिधी, ठेवा असा याचा अर्थ होतो. श्रीमद्भगवद्गीतेत दहाव्या अध्यायात भगवंताने आपल्या विभूती सांगत असताना “नक्षत्राणां अहम शशी” म्हणजे “नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे” असे सांगून या चंद्राला विभूतीमत्त्व दिले आहे.
” चंद्र मी गगन रंगी। तारां माजी ”
असे श्री ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात. असा तेजाचा,आनंदाचा, ब्रह्मानंदाचा हा महोत्सव, भारतीय संस्कृतीचा मूलगामी विचार मांडणारा अतिशय प्राचीन उत्सव आहे.
★ नित्य नवा दिवस जागृतीचा : — भारतीय संस्कृतीत
“जागृती” या विषयास अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. “उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत “……! असा आमचा औपनिषदिक संदेश आहे. हाच संदेश विश्व बंधू स्वामी विवेकानंदांनी आपला जीवन संदेश म्हणून स्विकारला, आचरला व आम्हास दिला. ही कोजागिरी आपल्याला “जागरण” शिकवते. या रात्री नियती आणि विशेषत्वाने “लक्ष्मी” चंद्र मंडळातून भूतली उतरून आम्हा सर्वांना प्रश्न विचारते……
“को जागर्ती”…..? कोण जागा आहे ?
खरे म्हणजे रात्री न झोपता जागणे हा जागण्याचा पूर्ण अर्थ नाहीये. जागण्याचा खरा अर्थ आहे आत्मभान असणे, स्व स्वरूपाची जाणीव होणे, काँशस असणे, अलर्ट असणे, व्यवहारीक शब्दात सांगायचे झाले तर प्रॅक्टिकली आपण नेमके काय आहोत कुठे आहोत, हे समजून घेणे म्हणजे “जाग्रुती “……!
आज जागरण करणाऱ्यांना लक्ष्मी किंवा नियती “समृद्धी” देते अशी आपली सांस्कृतिक मान्यता आहे. पण केवळ डोळे उघडे ठेवून जागणे एवढाच येथे जागणे या शब्दाचा मर्यादित अर्थ नाही.
“पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काल”
अशि सम्रुध्दी मिळण्याची ही पूर्व अट आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू इच्छिणाऱ्या “उत्कर्ष शील” साधकाने हे सतत लक्षात ठेवले पाहिजे. जगद्गुरू तुकोबाराय आपणास याची यथार्थ जाणीव देताना म्हणतात…..
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।
अंतर्बाह्य जग आणि मन ।।
काही विशेष कार्य करू इच्छिणाऱ्यास असा अंतर्बाह्य आणि रात्रंदिन संघर्ष करावा लागतोच. या संघर्षात
“वयं राष्ट्रे जाग्रयाम पुरोहित:” (आम्ही राष्ट्रीय हित जपणारे जागरुक योध्दे आहोत) असे त्तपर उत्तर देणारे सजग प्रहरी नागरिक आज देशाला हवे आहेत. या संघर्षात निश्चित पणाने विजय मिळवायचा असेल तर…..
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश
नित्य नवा दिवस जागृतीचा ।।
आपल्या मनोव्यापारांवर, उपभोगां वर अंकुश ठेवून आपल्या सर्व अंगभूत शक्तीचा वापर करून ध्येय प्राप्ती करणे म्हणजेच जागृती असा याचा अर्थ आहे. असे सतत सजग, जागृत असलेल्यांचे आई-वडील धन्य होतात अशी तुकोबारायांची स्पष्टोक्ती आहे……
आपुलिया हिता जो असे जागता
धन्य माता पिता तयाचिया ।।
आपल्या आई-वडिलांना ज्यातून धन्यता प्राप्त होईल अशी जागृती कोणत्या सुपुत्रास आवडणार नाही ?
उठ जाग मुसाफिर भोर भई
अब रैन कहा जो सोवत है ।
जो सोवत है सो खोवत है
जो जागत है सो पावत आहे ।।
म्हणून, आजची ही कोजागिरी पौर्णिमा आपणास सतत जागृतीचा, सावधानतेचा, कार्यप्रवणतेचा, उद्यमशिलतेचा व पौरूष संपन्न आनंदी जीवन जगण्याचा संदेश देते आहे.
★ रास पौर्णिमा : — आजच्याच रात्री गोकुळात यमुनेच्या काठी परमात्मा श्री गोपाल कृष्णांनी गोकुळातील सर्वगोपिकांच्या सह “महा रास उत्सव” साजरा केल्याचा श्रीमद् भागवत महापुराणात उल्लेख आहे. आपल्या “भारतीय संस्कृती” या ग्रंथात साने गुरुजींनी या रासपौर्णिमेचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे…….
शरद ऋतु उदय चंद्राचा।
वनी वृंद उभा गवळणींचा ।
सुगंध सुटत पवनाचा ।
ये वास मलयागिरी वरचा ।।
अशी ती प्रसन्न वेळ होती. ह्रदयाकाशात शरद ऋतू पाहिजे. हृदयात वासना विकारांची वादळे आता नाहीत. आकाश स्वच्छ आहे. शरद ऋतूमध्ये आकाश निरभ्र असते. नद्यातील खळबळ खाली बसून पाणी शंखा सारखे स्वच्छ होऊन खळखळ वाहत असते. आपले जीवन असे झाले पाहिजे. आसक्तिचे ढग जमा होता कामा नयेत, अनासक्त रीतीने केवळ ध्येयभूत कर्मातच जीव रंगून गेला पाहिजे. शुद्ध आचार, शुद्ध विचार रात्रंदिवस होत राहिला पाहिजे.
शरद ऋतू आणि शुक्लपक्ष आहे. प्रसन्न पूर्ण चंद्र उगवला आहे. चंद्र म्हणजे मनाची देवता, चंद्र उगवला आहे म्हणजे मनाचा पूर्ण विकास झाला आहे. अंतकरणात सद्भाव फुलला आहे. सुंदर विचारांचे स्वच्छ चांदणे पडले आहे. अनासक्त ह्रदयाकाशात शीलाचा चंद्र शोभत आहे. अशा वेळेस सार्या गोपी, साऱ्या मनः प्रवृत्ती कृष्णा भोवती जमतात.
हृदयात व्यवस्था लावणारा, गोंधळातून सुंदरता निर्माण करणारा तो शामसुंदर कोठे आहे ? अशी त्यांना तळमळ लागते. त्या “ध्येय गोपाळाची” मुरली ऐकावयास साऱ्या वृत्ती अधीर होतात. हे एकदा ठरले म्हणजे मग चिखल असो वा काटे असो वा विषय असो त्याच्याकडे साऱ्या जीवाची ओढ लागली पाहिजे. कृष्णाची मुरली ऐकताच सर्वांनी धावत आले पाहिजे, फेर धरला पाहिजे, हातात हात घालून नाचले पाहिजे, अंतर्बाह्य एकता आली पाहिजे. हृदय शुद्ध आहे, प्रेमाचा चंद्र फुलला आहे, साऱ्या वासना संयत झाल्या आहेत, एक ध्येय स्पष्ट दिसत आहे, आसक्ती नाही, द्वेष मत्सर मालवलेले आहेत, अहंकार शमला आहे, दंभ दुरावला आहे, अशा वेळेस गोकुळात मुरली सुरू होते. त्या संगीताची गोडी कोण चाखेल ? या जीवनात संगीत सुरू होते त्या संगीताची गोडी कोण वर्णील ?
★ नवान्न पौर्णिमा : — आपल्या सर्व प्राचीन सणावारांमध्ये भारतीय संस्कृतीने नेहमी दोन परंपरांचा स्वीकार, सन्मान व अंगीकार केल्याचे आपल्या लक्षात येईल. त्यातील पहिली परंपरा म्हणजे “ऋषी संस्कृती” व दुसरी परंपरा म्हणजे “कृषी संस्कृती”. संपूर्ण सृष्टी सुद्धा नवनवोन्मेषशालिनी होऊन बहरून आलेली असते. काय देऊ ?आणि किती देऊ? असे तिला वाटत असते.
भरभरून बरसून पाऊस निघून गेलेला आहे, आकाश निरभ्र झालेलं आहे, घरं आणि गोदामं शेतमळ्यातील धनधान्याने भरलेली आहेत. परिपक्वतेच्या पिवळ्या तकाकी ने तिचे सर्वांग “तप्त सुवर्णमय कांती सम” चमकत असते. म्हणून तर तिला ऋषींनी श्रीसुक्ता मध्ये
” हिरण्यवर्णा” असे म्हटलेले आहे.
संपूर्ण सृष्टी विविध रंगाच्या, आकाराच्या, सुगंधाच्या, फुलांनी व विविध चविच्या, रसाच्या व अंगभूत गुणांच्या फळांनी बहरून आलेली असते. त्या भोवती फुलपाखरे, भुंगे अतिशय गर्दी करतात आणि एक वेगळेच संगीत त्यातून निर्माण होतं. पक्षांच्या भरारी मध्ये सुद्धा एका नवीन चेतनेचं वारं संचारलेलं आपल्याला बघायला मिळतं. पृथ्वी, जल, आकाश आणि अंबर हेसुद्धा चहूबाजूने रसरसून आलेलं असतं. आपली घरं भरण्यासाठी शेत मळ्यातली “धान्यलक्ष्मी” आतुर झालेली असते.
★ जिथे राबती हात तेथे हरी : — कृषी संस्कृतीच्या माध्यमातून शेत शिवारात रमणाऱ्या, राबणाऱ्या कृषीवलांचा सन्मान करण्यासाठी त्या “धान्यलक्ष्मी” ला आपण घरामध्ये आणतो, साठवतो. दसरा या सणाच्या दिवशी भारतातील काही प्रांतातून निसर्गाने दिलेली ही नूतन धान्यलक्ष्मी वाजत-गाजत मिरवणुकीने समारंभपूर्वक शेतातून गावात आणण्याचा वैशिष्ट्यपूर्ण समारंभ संपन्न होत असतो. नवीन धान्याचे पूजन करून, धान्याच्या कोठारास पूजुन, नव धान्याचे अंकुर शिरपेच करून डोक्यावरून धारण करून त्याबद्दल वाटणारी अंतरिक भावना व्यक्त करण्याचाही हाच दिवस आहे. घरामध्ये आलेल्या या नवीन धान्याचाच स्वयंपाक करून त्याचाच नैवेद्य या अष्टलक्ष्मी ना दाखवून तोच प्रसाद सर्वांनी सेवन करावयाचा असतो. भारतीय विचार दर्शनाने : — १)आदी लक्ष्मी २)धान्य लक्ष्मी ३)धैर्यलक्ष्मी ४)गजलक्ष्मी ५)संतानलक्ष्मी ६)विजयलक्ष्मी ७)विद्यालक्ष्मी व ८)धनलक्ष्मी….. या आठ प्रकारच्या लक्ष्मींची उपासना करावयास सांगितली आहे.) अशा प्रकारे भारतीय संस्कृतीने भारतीय विचार परंपरेने कृषिसंस्कृतीचा ही सन्मान केलेला आहे.
★ कोजागिरी पौर्णिमा : — नवरात्रोत्सवात शक्ती जागरणा बरोबरच शारदेच्या आवाहना पासून साधकाच्या अंतर वृत्ती मध्ये ज्ञानोत्सवाला सुरुवात होते. आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या शारदेच्या आवाहनाचा हा मंगलमय सोहळा एका अर्थाने पूर्णत्वास जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापनेपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवातिल ज्ञान, शक्ती व लक्ष्मी जागरणाच्या या उत्सवाला खऱ्या अर्थाने “सर्वजन व्यापक नागरी स्वरूप” येतं ते कोजागिरी पौर्णिमा या दिवशी. समाजातील सर्वच घटक आपापल्या जीवनात केलेला श्रमांचा परिहार व्हावा म्हणून या कोजागिरी पौर्णिमेचे निमित्त करून चंद्राच्या चांदण्याच्या मांडवात, आपल्या घराच्या गच्चीवर किंवा उघड्या मैदानात एकत्र येऊन नृत्य, संगीत, काव्य, विनोद, मनोरंजन, विविध प्रकारचे खेळ अशा पद्धतीने कार्यक्रम करून ही कोजागिरी पौर्णिमा अंतकरणात साठवितात.
अशा वेळेला अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आपल्या संपूर्ण प्रभे सह आपल्या “अमृत वर्षी पूर्ण कले सह” मानवी मनाला अधिक विकसित, अधिक समृद्ध, अधिक व्यापक, अधिक निर्मळ व अधिक आनंदी करण्यासाठी आकाशात येऊन सृष्टी बरोबरच आपल्या मनाचाही ताबा घेतो.
भारतीय साहित्य जगतातील महा कवींनी भारतीय स्त्री वया चंद्राचं भावा-बहिणीचं नातं रेखाटलं आहे. म्हणून लहान मुलांना मामा पेक्षा सुद्धा कित्येकदा चांदोमामा जास्त जवळचा वाटतो. ज्या भगिनींना औक्षण करण्यासाठी आपला बंधू उपलब्ध नसतो त्या भगिनी चंद्राला औक्षण करुन भावाला ओवाळण्याच्या आनंद मिळवीत असतात, येवढा हा चंद्र आमच्या सांस्कृतिक, काव्यात्म व भावजीवनात एकरस झालेला आहे.
या दिवशी आकाशात असलेला पूर्ण चंद्र (म्हणजेच सुपरमून ) आपल्या सर्व सोळा कलांच्या सह आज अमृत वर्षा करीत असतो, अशी आपली भारतीय मान्यता आहे. खगोलशास्त्राच्या दृष्टीने संपूर्ण वर्षात कधी नव्हे तो चंद्र पृथ्वीच्या एवढ्या जवळ आलेला असतो. एवढं लख्ख चांदणं या पूर्वी कधीही अनुभवण्यास मिळत नाही. हे चंद्राचं शुद्ध, धवल, शीतल, चांदणं सर्वांगाने अनुभवावं, जीभेने त्याचे माधुर्य चाखत, चित्त वृत्तीतून त्याचा सुगंध हुंगावा आणि समुद्राच्या गाजे वर स्वार होऊन ही अपार शांती सर्व इंद्रियांच्या माध्यमातून साठवून अंतरतृप्त व्हावं असाही ही पौर्णिमा साजरी करण्याचा एक आगळावेगळा प्रकार आहे.
★ सर्वं नादात्मकं जगत् : — भारतीय अध्यात्म शास्त्राने मोक्ष प्राप्ती हा परम पुरुषार्थ मानलेला आहे. ज्ञान, कर्म, भक्ती व योग या चार महामार्गाने मोक्षप्राप्ती जेवढी सुलभ आहे तेवढीच संगीत साधनेनेही मोक्षप्राप्ती अधिक सुलभ आहे, अशी या संगीत साधनेस मान्यता दिलेली आहे. संपूर्ण “विश्वच नादमय” आहे. आपले हृदय सुद्धा एका विशिष्ट लयीत एका विशिष्ट नादातच संचालन करीत असते. या लईतून व नादातूनच जीवन संगीत निर्माण होते. फक्त आपले त्याच्याकडे लक्ष नसते इतकेच. हि भगवती शारदा या कोजागिरीच्या निमित्ताने आपणास निसर्गातून प्राप्त होणाऱ्या या जीवन संगीताचा आनंद घेण्याची दृष्टी देते.
वाऱ्याचं घोंघावणं, त्याची मंजुळ झुळुक, वादळाचा झंजावात, जंगलातल्या माळरानावर ऊन्मुक्तपणे वाऱ्यावर झुलणाऱ्या रानगवताची सळसळ, आकाशातून पडणाऱ्या पाऊस धारांची रिपरिप, मेघांचा गडगडाट, वाहणाऱ्या झऱ्याचा खळखडळाट, नद्यांची कलकल, सागराची गंभीर गाज, पक्षांचा चिवचिवाट, गाईंचा हंबरणं, पिंपळाचं सळसळणं, या सगळ्या गोष्टी नादब्रम्हा च्या असंख्य रूपांची आपल्याला जाणीव देतात. भगवान मंगलमूर्ती गजाननांच स्तवन करणाऱ्या श्री गणपती अथर्वशीर्षात श्री अथर्वण ऋषींनी भगवंताशी जुळण्याचा सुलभ मार्ग म्हणून नादाचाच संकेत केला आह. ते म्हणतात “नाद: संधानं”…….! (नादाने संधान साधा.)
★ हर सुर मे बसे हे राम : — माणसाच्या मुखातून बाहेर पडणारा आवाजही एक प्रकारे वैखरी संगीतच आहे. हा नादच गायनात परिवर्तित होतो. नादाचा हाच अविष्कार आपणास तंतुवाद्यात किंवा विविध तालवाद्यात किंवा शिशिर वाद्यांमध्ये जाणवतो.
भगवान गोपाल कृष्णाने आपल्या मृदू मृदुल ओठांवर धारण केलेली वंशी म्हणजे बासरी, भगवती शारदा देवीने हातात धारण केलेली वीणा किंवा भगवान शंकरांनी धारण केलेला डमरु, भगवान विष्णूंनी धारण केलेला शंख ही सर्व वाद्ये आपणास भारतीय अध्यात्म शास्त्रातील संगीताच्या अपार शक्तीची जाणीव करून देतात. त्रिभुवनाला मोहिनी घालणारी भगवान गोपाल कृष्णांची बासरी जिच्यामुळे तो “वंशीधर” झाला. तो मुरलीधर म्हणूनही प्रसिद्ध झाला. तसेच भगवती शारदा “वीणा वादिनी” म्हणूनही प्रसिद्ध झाली. सर्व साहित्यिक जगताची आद्य उपास्य देवता म्हणून या शक्ती भगवती शारदेला मान्यता देण्यात आलेली आहे.
संपूर्ण विश्व हे चैतन्य स्वरूप आहे व ते सत् चित आनंदरूप आहे ,असे भारतीय अध्यात्म शास्त्राचे म्हणणे आहे. एका अर्थाने चैतन्य म्हणजेच ऊर्जा म्हणजेच एनर्जी हेच ईश्वराचे स्वरूप आहे. निर्गुण निराकार भगवंताला या चैतन्य बुद्धी च्या माध्यमातून माणसाने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहित्य जगतातील शब्द, नाट्य, संगीत, वाद्य, नृत्य या सर्व कला ज्या मानवी मेंदूच्या अलौकिक प्रतिभेतून स्फुरतात त्या प्रतिभा या शब्दाची मिमांसकानी व्याख्या करताना असे म्हटले आहे……
“नव वस्तू निर्माणक्षमा शक्ती: प्रतिभा: ”
त्यांनी केलेली ही व्याख्या किती सर्वस्पर्शी आहे हे आपल्या लक्षात येईल .चित्र-शिल्प, काव्य, नाट्य, संगीत या साऱ्यांची निर्मिती मानवाच्या भावविश्वातुन झाली आहे. नित्य नवनवीन सृजनशील प्रतिभा लाभल्यामुळे या क्षेत्रातील साधकांनी आपलं वेगळं द्रष्टेपण व संस्कारांची ओळख सांगणारी ठेवण या माध्यमांच्या निर्मितीतून उभी केल्याचंही आपल्या लक्षात येईल.
“संगीत है वो शक्ती हर सुर मे बसे है राम ।
रागी जो गाये रागिनी तो रोगी को मिले आराम।।”
असे उगाच कां म्हंटले आहे? भारतीय अध्यात्मामध्ये संगीत कलेला ” गांधर्व वेद ” असे म्हटलेले आहे. समर्थ सुद्धा ” धन्य ते गायनी कळा ” अशा शब्दात या गांधर्व वेदाचा गौरव करतात. भगवती शारदा या सर्व संगीताची उद्गाती व मूलस्रोत आहे, अशी साधक जगामध्ये मान्यता आहे. किती रूपांनी या भगवतीने साधकांवर कृपा करावी? ” निष्कलंक सौंदर्याची अभिजात चंदेरी प्रतिमा म्हणजे भगवती शारदा ” असंच तिचं वर्णन अनेक महापुरुषांनी केलेआहे. तिच्या हाती वैराग्याचा कमंडलू आहे, भक्तीची जपमाळ आहे, ज्ञान प्रतीक असलेला सद्ग्रंथ म्हणजे पुस्तक आहे आणि संगीताचे सूचन करणारी वीणा सुद्धा तिने धारण केलेली आहे. त्या ब्रह्म विणेच्या मध्यम, पंचम, षड्ज गंधारातून विश्वामध्ये वावरणारी ती रसिकप्रिया, “विश्वमोहिनी” आहे असेही शास्त्रात वर्णन आहे.
जीवन म्हणजे केवळ दुसर्याची केलेली तंतोतंत नक्कल नव्हे तर जीवन हा एक अखंड आनंद प्रवाह आहे. या अखण्डानन्द प्रवाहाच्या जीवनातूनच कला निर्माण होते व या कलेतून जीवनात आनंद निर्माण होतो असे ते दोघं एकमेकांमध्ये समरस झालेले आहेत.
ज्या कलेच्या दर्शनानं, श्रवणाने, स्पर्शाने, अनुभूतीने एकाच वेळी सर्व इंद्रियांची, मनाची, आत्म्याची तृप्ती होते ती सर्वश्रेष्ठ कला होय असे श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा प्रकारच्या श्रेष्ठ कलांची आपणाकडुन उत्तरोत्तर श्रेष्ठ निर्मिती होवो आणि भारतीय कला क्षेत्र साहित्य, चित्र, शिल्प, काव्य, नाट्य,नृत्य आणि संगीत यांनी समृद्ध व्हावे असं वाटणाऱ्या प्रत्येक रसिक व कलाप्रिय माणसाने शारदोत्सवातील व विशेषतः कोजागिरी पौर्णिमेतील हा संदेश समजून घेणे अतिशय आवश्यक आहे.
★ जीवन आनंदाचे गाणे : — कोजागिरी पोर्णिमा म्हणजे केवळ खाणं-पिणं, मौजमजा, किंवा हलके-फुलके बैठे खेळ इतपतच मर्यादित न राहता ती ज्ञानप्राप्तीसाठी, उपभोगासाठी,श्रुंगारासाठी,(महर्षी वात्स्यायनाने या पौर्णिमेला ” कौमुदी जागर उत्सव ” म्हटले आहे. ) कला साधण्यासाठी केलेला एक अव्याहत ” सामाजिक यज्ञ ” आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा आनंद घेण्यासाठी गीत-संगीत, व्याख्यानमाला, कलाप्रदर्शन, यात्रा महोत्सव, देशाटन, (महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील कुपवाड जवळील श्री कोपेश्वर मंदिर हे बाराव्या शतकात निर्माण झालेले व जागतिक वारशात समाविष्ट झालेले अप्रतिम शिल्पकलेचा उत्तुंग नमुना असलेले एक महादेव मंदिर आहे. येथे स्वर्ग मंडपम नावाचा एक सुंदर शीला मंडप बांधण्यात आला असून, तो वरील दिशेने मोकळा आहे. वरच्या दिशेस एक प्रचंड मोठे वर्तुळाकार गवाक्ष ठेवण्यात आले आहे.फक्त कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री या गवाक्षा च्या खाली उभे राहून वर बघितल्यास या मंडपाचा हा वरील भाग पूर्ण चंद्रामुळे झाकला जातो. म्हणूनच या मंडपाला स्वर्गमंडप असे म्हटलेले आहे, रसिकांनी याचा जरूर लाभ घ्यावा.) शिल्प रसग्रहण या सगळ्या गोष्टींची स शास्त्र ओळख करून घेण्याची आवश्यकता आहे. अशी गोडी चाखण्यासाठी आपण किमान मनाने तरी पुलिंद काठी शरद पौर्णिमेच्या रात्री कृष्ण बासुरी ऐकावयास गेले पाहिजे. मनामध्ये या कृष्ण बासुरी ची एक मधुर स्मृती झंकारत राहणे म्हणजेच खरी रास पौर्णिमा……!
आपल्या व्यक्तिगत सुखाच्या व आनंदाच्या कोशातून बाहेर पडल्यास कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय,व वैश्विक जीवनामध्येही शरदाच्या या आनंददायी नवनवोन्मेश शाली व ब्रह्मानंदाशी नाळ जोडणार्या विशाल कला विश्वाचे दर्शन आपणास झाल्याशिवाय राहणार नाही. तसे ते आज कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपणास होवो व ज्या सुखासाठी, आनंदासाठी, स्थैर्यासाठी, आरोग्यासाठी आपण सारे धडपडतो ते सुख, स्थैर्य, आनंद, समृद्धी व रसिक वृत्ती आपणांस प्राप्त होवो या मंगलमय शुभकामनां सह……..
……….प्रतिसादाच्या प्रतीक्षेत, धन्यवाद….!
स्नेह प्रार्थी,

।।।© अक्षर योगी।।।
राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य,
ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज