“चंद्रिका कामथ”
“शिकणं ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे“ असं म्हणणाऱ्या चंद्रिका कामथ.. त्या कायम नविन नविन गोष्टी शिकत राहतात. शिकलेल्या गोष्टीत नाविन्य आणत राहिल्या. कल्पनाशक्तीचा वापर करून काहीतरी नवीन, अनोखे आणि मौल्यवान निर्माण करण्याची क्षमता स्वतः मध्ये त्यांनी आणलीच, पण अनेक कार्यशाळा घेऊन इतरांमध्ये सुध्दा आणण्याचा प्रयत्न त्या करत करीत असतात. म्हणून तर आज कलाविश्वात त्यांचे नांव झाले आहे.
चंद्रिका कामथ यांनी १९८४ साली सोफिया पॅालिटेक्निक मधून टेक्सटाईल डिझायनरचा डिप्लोमा केला. स्क्रिन प्रिंटींग आणि रंगकाम हा त्यांचा खास विषय होता. त्या गुणवत्ता यादीत आल्या आहेत होत्या. त्यांना शिवणकामाची आवड होती. म्हणून दोन वर्षांनी त्यांनी शिवणकाम आणि ड्रेस डिझायनिंगचा अभ्यासक्रम केला. त्यात प्रविण्य मिळवले. १९९२ मध्ये त्यांनी इंडो अमेरिकन सोसायटीचा इंटेरिअर डिझाईनिंगचा कोर्स केला. २०१३ मध्ये आईएसबी हैद्राबाद इथून त्यांनी “महिला उद्योजक विकास प्रोग्रॅम” हा खास एमबीए अभ्यासक्रम यशस्वी रित्या पूर्ण केला.
चंद्रिका कामथ ह्या तीस वर्षांहून अधिक काळ टेक्सटाइल आर्टिस्ट, महिला उद्योजक, होम डेकोरेटर, कल्पक शिक्षक ह्या नात्याने कलेच्या दुनियेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी शिकून आपले या क्षेत्रातले ज्ञान अद्ययावत ठेवले आहे.

कलाक्षेत्रात काही करायचे असल्यास ”पेशन्स आणि पॅशन्स” हवे” हे म्हणूनच त्या अधिकार वाणीने सांगू शकतात. त्या अनेक वर्षे रचना स्कूल, सोफिया पॅालिटेक्निक मध्ये टेक्सटाईल डिझायनिंग शिकवत होत्या. पार्ल्याच्या मनिबेन नानावटी वुमेन्स करियर डेव्हलपमेंट सेंटरमध्ये, मालाडच्या एसएनडीटी कॅालेजमध्ये, निर्मलानिकेतन, सासमीरा, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन डिझाईन, भांडूपच्या पवार पब्लिक स्कूल इतरही अनेक ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतल्या आहेत. टिचर्स ट्रेनिंग कोर्सेस, फॅशन डिझायनिंग चे कोर्सेस घेतले आहेत. वेगवेगळ्या वयोगटासाठी त्या कार्यशाळा घेतात. हेलन केलेर संस्थेच्या, मूक बधिर मुलांसाठी त्यांनी १ वर्षांचा नाविन्यपूर्ण, अर्ध वेळ असा अभ्यासक्रम घेतला. पुनर्वापर, कचऱ्यातून कलाकृती ह्या संकल्पनेवर आधारित काही वस्तू बनवायला शिकवून त्यांना स्वावलंबी बनवले. गणपतीत आणि दिवाळीत महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्ता ह्यांच्या तर्फे सणांसाठी योग्य अशा कार्यशाळा घेतल्या, ज्या अतिशय लोकप्रिय झाल्या.

मागच्यावर्षी त्यांनी अशीच नवरात्रीत ९ दिवस नऊ प्रकारच्या पारंपरिक पध्दतीने साड्या नेसण्याची कार्यशाळा घेतली होती. त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता. पिडिलाईट ह्या प्रसिध्द संस्थेशी त्या जोडलेल्या होत्या आणि त्यांच्या अनेक उत्पादनाच्या प्रसारात व इतर प्रॅाजेक्ट मध्ये त्या सहभागी होत्या. आर्ट आणि क्राफ्ट चे शाळेतील अभ्यासक्रम ठरविण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग आहे. तसेच फेवि-आर्ट मासिकात, इतर अनेक पुस्तकात त्यांचे नेहमीच लेख, कृती, डिझाईन इत्यादी असते. त्यांनी फक्त भारतातच कार्यशाळा घेतल्या असे नाही तर श्रीलंका, बांगला देश, दुबई, जकार्ता, इंडोनेशिया, इजिप्त आदी देशातही कार्यशाळा घेतल्या आहेत.

चंद्रिका कामथ यांनी किती विविध प्रकारचे काम केले आहे हे पाहून अचंबित व्हायला होते.त्यांना त्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अनेक सन्मान मिळाले आहेत. २०१३ मध्ये आईएसबी हैदराबाद येथे गोल्डमन साष द्वारा महिला उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत त्यांना उत्कृष्ट व्यवसाय नियोजनाबद्दल पुरस्कार प्राप्त झाला आहे.
प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांच्या कला स्पर्धांमध्ये त्यांना परीक्षक किंवा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात येत असते.

चंद्रिका कामथ ह्यांनी दूरदर्शन, झी मराठी, मी मराठी, ई मराठी, साम मराठी यांसारख्याच नाही तर इजिप्त टेलिव्हिजनवर देखील कला विषयक अनेक कार्यक्रम सादर केले आहेत. इतकेच नव्हे तर मुंबई आणि दिल्ली येथे टीव्ही अक्टर्स आणि फॅशन डिझायनर्ससाठी ‘सेलेब्रिटी’ वर्कशॉप्स आयोजित केले आहेत.

शायना एन.सी. द्वारा डिझाइन केलेल्या आणि हेमंत त्रिवेदी द्वारा डायरेक्ट केलेल्या ‘कॅन्सर पेशन्ट्स असोसिएशन’ चॅरिटी फॅशन शोमध्ये विशेष साड्या त्यांनी रंगविल्या होत्या.

२०१० आणि २०११ मध्ये काला घोडा येथील प्रतिष्ठित फेस्टिव्हलमध्ये त्यांनी भाग घेतला होता. A.I.R. FM द्वारा ‘टेक्स्टाईल डिझाईनिंग’ आणि ‘डिझाईनिंग क्रिएटिव्हिटी’ विषयावर आणि रेड FM द्वारा ‘इंपॉर्टन्स अँड इफेक्ट ऑफ कलर्स’ विषयावर टॉक-शोमध्ये त्यांना आमंत्रित केले होते. ‘बेसिक फॅब्रिक पेंटिंग टेक्निक्स’ या विषयावर त्यांनी पुस्तक लिहिले आहे. थीम बेस्ड फॅशन शोमध्ये विविध बुटिक्ससाठी फ्रीलान्सर म्हणून काम केले.

‘Benzer’, ‘Litolier’, ‘Kalaniketan’, ‘Palav’ यांसारख्या प्रतिष्ठित शॉप्ससाठी हँड पेंटेड साड्या, ड्रेसेसच्या व्होलसेल/रिटेल मार्केटिंगसाठी कॉन्ट्रॅक्टवर त्यांनी काम केले आहे. घरगुती ग्राहक आणि लीलावती हॉस्पिटल, फाऊंटन हेड बुक स्टोअर, क्रॉसवर्ड, यू टीव्ही यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांसाठी त्यांनी अंतर्गत सजावटीचा भाग म्हणुन चित्रे साकारली आहेत.

आपल्या कलेचा वापर चंद्रिका ताईंनी समाजकार्यासाठीही उपयोग केला आहे. २०२० पासून त्या सेव्ह स्क्रॅप & सेव प्रोजेक्टशी निगडीत आहेत. या प्रकल्पाचा उद्देश हा कापलेले कापड वाया जाऊ नये हा आहे. अशा कापडापासून त्या ब्लँकेट्स, बॅग्स आणि कुशन्स बनवतात. या वस्तू त्या वृद्धाश्रम, रस्त्यावरील मुले, बेघर व्यक्तिंना भेट देत असतात. सुमारे १५० ब्लँकेट्स बनवून त्यांनी कॅन्सर पेशन्ट्स असोसिएशन, स्मित फाउंडेशन आणि असिसी भवन चर्च (गोरेगांव) इथेही दिली आहेत.
पिशव्यांवर डिझाईन काढणे, हातांनी पर्स शिवणे, कापडाचे, मण्यांचे दागिने बनविणे, मोझॅक फ्रेम्स बनविणे, मधुबनी पेंटींग, ब्लॅाक पेंटींग ह्या सारखा चंद्रिकाताईंच्या कार्यशाळा लहान मोठ्या सर्वांनीच आनंदाने पूर्ण केल्या आहेत.

हातात ब्रश आल्यावर चंद्रिताताई अशा तन्मयतेने डिझाईन्स, चित्रे काढतात की पहात रहावेसे वाटते. अतिशय शांततेने, प्रेमाने त्या शिकवतात. म्हणूनच त्या लोकप्रिय आहेत. त्यांच्या हातून अशाच अनेक चांगल्या कलाकृती घडाव्यात, समाजकार्य घडावे यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ या !

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

धन्यवाद कैलाश
नमस्कार, चंद्रिका कामत मॅडमचा माझा संपर्क पिडिलाइट कंपनीच्या टीचर्स ट्रेनिंग कोर्स आणि वन स्ट्रोक पेंटिंग कलाकार्य शाळा या निमित्ताने झाला. चंद्रिका मॅडम यांचे शिकवणे खूप छान, सहज आणि सोप्या पद्धतीने होते. त्यांची शिकवण्याची पद्धत तसेच समजून सांगण्याची पद्धत खूपच छान होती. वेळप्रसंगी त्या प्रेमाने किंवा रागवून शिकवतच होत्या. सर्वांना शिकवलेलं कळाले आहे आणि तयार झालेले वस्तू स्वतः पाहून त्या शाब्बासकी पण देत.
विशेषतः पिडिलाइट प्रॉडक्ट साठी त्यांची आपुलकी खूप होती… आपल्या कामाची जबाबदारी त्या खूपच चांगल्या पद्धतीने पार पाडत होत्या. मुंबईत राहत असल्यामुळे आणि उत्तम व उत्कृष्ट गोष्टींसाठी त्या सतत शोधात असायच्या म्हणूनच त्यांच्या सर्व वस्तू, कपडे, साड्या वर लागणारे साहित्य उत्कृष्ट दर्जाच्या असायचे.
चंद्रिका मॅडम, तुमच्या कला साधनेला सलाम…. उत्तम दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
कैलास धायगावे.
पुणे.