Saturday, February 21, 2026
Homeयशकथाजिचं तिचं आकाश :19

जिचं तिचं आकाश :19

“डॅा. मेधा शेटे”

“जिथे कमी, तिथे आम्ही” ही उक्ती ज्यांच्या बाबतीत लागू होते त्या डॅा. मेधा शेटे ह्या “वैद्यकीय सेवा ही समाज सेवेसाठीच असते”, असे मानत आलेल्या आहेत. डॉक्टर होताना त्यांनी घेतलेली शपथ त्या प्रत्येक क्षणी जगत आल्या आहेत.
हल्ली फार कमी डॅाक्टर, त्यांनी घेतलेल्या शपथेप्रमाणे वागताना दिसतात, त्यामुळे तर डॅा.मेधा शेटे ह्यांचे त्यागमय जीवन खूपच उठून दिसते.

मेधाताईंचे वडिल; दिगंबर गोपाळ काळे हे समाजकार्य करायचे. त्या संस्कारातच त्या मोठ्या झाल्या. प्रसिध्द डॅाक्टर विजय आजगावकर हे डॅा.मेधा यांचे गुरू.त्या डॅाक्टर आजगावकर ह्यांना वडिलांच्या जागी मानतात. त्यांच्या तालमीत तयार झालेल्या मेधाताई, समाज सेवेचा वसा घेऊनच सतत कार्यरत असतात.

डॅा.मेधा यांनी नायर हॅास्पिटलमधून एम डी. रोगविज्ञान (पॅथॅालॅाजिस्ट) ही पदवी संपादन केल्यावर विरार ला ८/९ वर्षे एका प्रयोगशाळेत ॲानररी पॅथॅलॅाजिस्ट म्हणून काम केले. नंतर गोरेगावच्या एका प्रयोगशाळेमध्येही काम केले. असा सर्व अनुभव घेऊन त्यांनी ४० वर्षांपूर्वी पार्ल्यामध्ये स्वतः ची प्रयोगशाळा सुरू केली.

रुग्णाच्या आजाराचे निदान योग्य व्हावे ह्यासाठी डॅा. मेधा ह्यांनी आपल्या प्रयोगशाळेमध्ये तेव्हा अद्ययावत मशिनरी घेतली होती.आणि आताही त्या सतत अद्ययावत मशिनरी घेत असतात.

गोड हसून बोलणे, रिपोर्ट सांगतांना ते मृदू भाषेत समजावणे, सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत तत्पर सेवा देणारा कर्मचारी वर्ग यामुळे डॅा. मेधा ह्यांची “पार्ले पॅथॅालॅाजी” ही प्रयोगशाळा खूप लोकप्रिय झाली आहे. या प्रयोगशाळेमधील रिपोर्ट्स हे अचूक असतात, त्यामुळे पार्ल्यातले सर्व डॅाक्टर रुग्णांना इथेच जाण्याचा आग्रह करतात. विशेष म्हणजे इथे गरजू रुग्णांकडे कधीही पैशासाठी तगादा केला जात नाही. उलट अनेक वेळा मोफत तपासण्या करून उपचारासाठीही पैसे दिले जातात.आलेले अनेक जणं आपल्या आजाराबरोबरच आपल्या जीवनातल्या इतरही समस्या मेधाताईंना सांगतात, इतका त्यांचा विश्वास मेधाताईंनी मिळवला आहे.

मेधाताईंनी अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं घेतली आहेत. मोफत रक्त तपासण्या केल्या आहेत आणि करीत असतात. कोसबाडच्या पद्मश्री अनुताई वाघ ह्यांच्या कार्यात त्या सहभागी होत्या.
आदिवासी भागातील अनुताईंच्या ग्राममंगल ह्या संस्थेत त्यांनी मोफत वैद्यकीय उपचार केंद्र सुरू केले . तिथे वेळोवेळी जाऊन, तिथल्या लोकांच्या चाचण्या , त्या करायच्या . “हेल्पिंग हॅन्ड “संस्थेतर्फे अनेक शिबिरं घेऊन, पॅप टेस्ट, कॅन्सरच्या तपासण्या करून, जनजागृतीसाठी त्यांनी प्रयत्न केले. अनेकांचा “रक्त हवे “ म्हणून त्यांना फोन येतो आणि त्या वेळकाळ न पहाता, रूग्णांना रक्त मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. कधी त्यांना मदतीसाठी फोन करा, त्या मदत करतातच, आणि योग्य मार्गदर्शनही करतातच !

आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून मेधाताई इतर अनेक कामं आनंदानी करतात. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा म्हणून त्यांनी शिबिरात विज्ञान, शरीरशास्त्र रक्त तपासणी ह्या विषयावर माहिती देत असत. त्या मुलांना प्रयोगशाळेत बोलावून , सूक्ष्मदर्शक कसा वापरायचा, कसे बघायचे , काय दिसते ते दाखवायच्या. ”होमी भाभा बाल शास्त्रज्ञ “परिक्षेसाठी त्या मार्गदर्शन करायच्या. काही वर्षांपूर्वी देवदासी पुनर्वसनाच्या कामात शेटे पतिपत्नी खूप मदत करत. पैसे, कपडे, पुस्तकं, इतर गरजेच्या वस्तू ते नेहमी पुरवत असत.पार्ल्यात वयोवृध्द लोकांसाठी “मराठी मित्रमंडळ “नावाची संस्था आहे. त्यात आणि इतर अनेक संस्थात मेधाताई पदाधिकारी आहेत. पार्ल्यात २३ वर्षांपूर्वी “साथसंगत महिला मंडळ” सुरू करण्यातही त्यांचा पुढाकार होता. एकाकी असणाऱ्या जेष्ठांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी त्या तत्पर असतात.

आपले छंद जोपासण्यासाठी डॅा. मेधा ह्यांना वेळ कसा मिळतो ? हा प्रश्न सगळ्यांना पडतो. पण त्या वेळ काढतात. वाचनाची आणि नवे काही शिकण्याची आवड त्यांनी आपल्या आईकडून घेतली आहे. ६५ व्या वर्षी त्यांनी संस्कृतची पदविका प्राप्त केली होती ! आता ९२ वर्षांच्या असणार्‍या मेधाताई अजून “सुडोकू” सोडवतात.भरपूर वाचतात. त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यातही पुस्तकं विकत घेऊन वाचायला आणि दुसऱ्यांना पुस्तकं भेट द्यायलाही आवडते. त्यांचे स्वतः चे छोटेसे ग्रंथालय आहे. प्रवासाचीही त्यांना भरपूर आवड आहे. मित्रमंडळी, नातेवाईक ह्यांना सोबत घेऊन त्या सहलीचा आनंद घेतात. त्यांचा जनसंपर्क खूपच मोठा आहे.

त्या कलावंत देखील आहेत. क्विलिंग मध्ये त्यांनी प्रविण्य मिळवले आहे. अतिशय उत्तम कलाकृती त्यांनी निर्माण केल्या आहेत. त्या विकून ते पैसे कॅन्सर रुग्णांना दिले आहेत. पूर्वी जशा बायका वाती करत बसायच्या सारख्या तसेच क्विलींग करायला लागते. कारण फार नाजूक आणि मोठ्या संख्येने क्विलींगचे आकार करायला लागतात. त्यासाठी भरपूर चिकाटी लागते. त्या मंडल आर्टही करतात. क्विलिंगचा ताजमहल, घड्याळं, डबे, तबकं, पुस्तकात ठेवायला खूणेसाठी आकार, शीत कपाटावर लावायला चुंबक अशा कितीतरी वस्तू त्यांनी तयार केल्या करून लोकांना प्रेमाने भेट दिल्या आहेत, इतरांना शिकवल्या आहेत.

सैनिकांसाठी भेटकार्ड करणं, धान्य बॅंकेत मदत करणं, या बरोबरच त्यांचे शिकणेही चालू असते. त्यांनी “समर्थ रामदास स्वामी साहित्य आणि त्यांचे विचार“ यांचा अभ्यास केला आहे. त्या पार्ल्यात सावरकर केंद्राच्या कार्यकारिणीत आहेत. तिथे हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्या स्वतःही तिथे शिकल्या आहेत. समर्थ विद्यापीठाच्या सर्व परीक्षा त्यांनी हल्लीच दिल्या असून त्यात प्रावीण्य मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर शेवटच्या परीक्षेत “कल्याण स्वामी पुरस्कार“ मिळवून प्रथम आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

आता त्या अभ्यासपूर्ण प्रवचने देतात. तिथेच त्यांनी काहींच्या मदतीने दोन तीन वर्षांपूर्वी “थालेसेमिया मुक्त मुंबई“ नावाचा गट तयार केला आहे. थालेसेमिया या रोगाबद्दल जनजागृती करणे, आधीच तपासण्या करून, रुग्णांना, त्यांच्या कुटुंबीयांना योग्य मार्गदर्शन, मदत करणे, लेख लिहीणे, शिबिरं घेणे, व्याख्यान देणे अशा सर्व प्रकारे हा गट काम करतो आहे. या गटाने सायन रूग्णालयातील २५ वर्षे वयाच्या आतील २७५ अविवाहीत परिचारिकांच्या सीबीसी व एचपीएलसी अशा थॅलेसेमियाच्या रक्त तपासण्या विनामूल्य करून दिल्या आहेत.

अशा हरहुन्नरी, कलावंत , समाज सेविका असलेल्या डॅा. मेधाताईंच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत जन सेवा समिती विलेपार्ले तर्फे जनगौरव पुरस्कार, स्वा.सावरकर सेवा केंद्राचा समाज सेवा पुरस्कार, रोटरी क्लब तर्फे व्यवसायिक उत्कृष्टता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

वयाचा बाऊ करणार्‍या व्यक्तींनी मेधाताईंचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन, आपल्याकडून समाजाच्या कल्याणासाठी जमेल तसे योगदान देत राहण्याचा सतत प्रयत्न केला तर त्यांचा वेळ सत्कारणी लागेल आणि आरोग्यही जपल्या जाईल, यात काही शंका नाही.

मेधाताईंचे कार्य असेच उत्साहात, जोरात सुरू रहावे, ह्या साठी त्यांना मनापासून सदिच्छा !

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments