“शिल्पा अरुण वझे”
पुण्याची ज्ञानप्रबोधिनी शाळा बहुतेक सर्वांनाच माहित आहे. स्वदेशात विचारप्रबोधन व्हावे, कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे हा प्रबोधिनीच्या कार्याचा हेतू आहे. त्यामुळे तिथे विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण व संस्कार हे इतर शाळांपेक्षा वेगळे असतात.
असे विद्यार्थी जेव्हा भारताबाहेर स्थायिक होतात आणि त्यांची मुले जेव्हा तिथल्या शाळेत जातात तेव्हा तिथेही वेगळे, चांगले शिक्षण मिळत असले तरी ज्ञानप्रबोधिनी सारखे, राष्ट्रप्रेम जागवणारे, मातृभूमीचे महत्व व संस्कार सांगणारे शिक्षण मिळत नाही म्हणून अस्वस्थ होतात.
ज्ञानप्रबोधिनीची शिल्पा अरूण वझे पण अशीच अस्वस्थ होती. तिने अनेक ठिकाणी चौकशी केली. पण तिला तिच्या शाळेसारखे शिकवणारे क्लास, शाळा तिला मिळाल्या नाहीत.
मग तिला वाटले आपणच काही सुरू केले तर ? एकदा विचाराची ठिणगी पडल्यावर शिल्पा स्वस्थ बसणारी नव्हती. अमेरिकेतील ह्यूस्टन (टेक्सास) इथे रहाणारी शिल्पा पुणे विद्यापीठाच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंस्ट्रूमेंटेशन मध्ये अभियंता झाली. नंतर अमेरिकेतील कॅनसास स्टेट विद्यापीठातून तिने यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर तिथेच तिने विद्युत अभियांत्रिकी मध्ये पी एचडी
देखील मिळविली.
जेव्हा मुलांसाठी बालप्रबोधिनीतर्फे काही करायचे शिल्पाने ठरविले, तेव्हा त्यासंबंधीचे पूर्ण ज्ञान हवे म्हणून तिने क्वान्टीक स्कूल ॲाफ बिझनेस ॲंड टेक्नॅालॅाजी मधून एक्झिक्युटीव्ह एम बी ए केले. शिल्पा गेली १७ वर्षे वेगवेगळी तांत्रिक पदे यशस्वीपणे सांभाळत आहे.
शिल्पा २६ वर्षे अमेरिकेत आहे. आपल्या मुलांना आपल्या संस्काराशी जोडण्यासाठी ती झटत असते. तिने शिक्षिका, स्वयंसेविका म्हणून ह्युस्टनच्या काही शाळांमध्ये रोबोटिक्स आणि मोबाईल ॲप बनवण्यासाठी सुध्दा काही वर्ष काम केले आहे. ५ ते ४५ वर्षे वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी, मराठी, हिंदी , इंग्रजी, कला, संगीत आणि अभियांत्रिकी असे अनेक विषय ती गेली २० वर्षे शिकवत आहे.

ज्ञानप्रबोधिनीला जेव्हा ५० वर्ष पूर्ण झाली तेव्हा शिल्पा जगातल्या अनेक माजी विद्यार्थ्यांच्या संपर्कात आली. ज्ञान प्रबोधनी अमेरिका, ह्या संस्थेच्या काही प्रकल्पात ती कार्यरत झाली. प्रबोधिनीचे संचालक डॅा. गिरीशराव बापट यांच्याकडे जेव्हा तिने भारताबाहेर काही करायची इच्छा दर्शवली तेव्हा त्यांनी त्या प्रकल्पाला प्रोत्साहित केले. ज्ञान प्रबोधिनी फाऊंडेशन शिक्षण, ग्राम विकास आणि महिला सक्षमीकरण या तीन क्षेत्रांतर्गत भारतात अनेक प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे. शिल्पाने प्रथमच ह्या संस्थेतर्फे भारताबाहेरच्या मराठी मुलांसाठी बालप्रबोधिनी हा प्रकल्प सुरू केला, ज्यामध्ये अमेरिकेतले माजी विद्यार्थी आणि काही हितचिंतक असे २५ जण जोडले गेले.
५० टक्के मराठी व बाकीचे इतर सर्वांगीण विकास होईल , आपले भारतीय संस्कार होतील असा अभ्यासक्रम ठरला. आता बालप्रबोधिनी सुरू करून आता ४ वर्ष झाली आहेत. सध्या एका आड एक रविवारी दीड तास हा वर्ग ॲानलाईन पद्धतीने घेतला जातो. शिल्पाबरोबर आणखी ४ जणी बाल प्रबोधिनीचे काम बघतात. ३० मुले ह्या वर्गात असतात. विद्यार्थ्यांच्या वयाप्रमाणे आणि मराठी कौशल्याच्या पातळीप्रमाणे वेगवेगळे वर्ग असतात . या वर्गांमध्ये मराठी लिहायला, वाचायला आणि बोलायला शिकवतात. या व्यतिरिक्त कला, वक्तृत्व, पाठांतर, पदार्थ बनविणे, प्रयोग करणे असे खूप काही वेगवेगळे विषय शिकवतात. अमेरिका, यूरोप, आयर्लंड, कॅनडा, युनायटेड किंगडम इथली मुलं वर्गाला येऊ शकतात.
मराठी मैत्र या उपक्रमात आठवड्यातून दोनदा मुलांशी व्हिडिओ कॅाल करून, मराठी बोलण्याचा सराव होण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी काही स्वयंसेवक आपला वेळ देतात. मुलांकडून घेतलेल्या फी चा सर्व निधी भारतातल्या प्रबोधिनीने सुरु केलेल्या “बालक प्रायोजक” या प्रकल्पासाठी वापरला जातो. सर्व सेवाभावी शिक्षिका, पैसे न घेता हे काम करत आहेत. मुलं आतुरतेने रविवारची वाट पहात असतात.

अभियंता असलेल्या शिल्पामध्ये संगीताची आवड आई, वडील आणि बहिणीमुळे निर्माण झाली.तिची बोटे तबल्यावर छान ताल धरतात. ती तयारीने वाजवते, साथ करते. तिने तबलावादनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले असले तरी अजूनही ती पंडित शांतीलालजी शहांकडे तबला शिकते आहे.
शिल्पाने मुंबईच्या गुरू अनुराधा जोशींकडून हिंदुस्तानी शास्त्रीय गायनाचेही धडे घेतले आहेत. ती शिळेवर गाणेही वाजवते.
आपले गाण्याचे वेड शिल्पाने स्वतः पुरतेच ठेवले नाही. तर २००१ मध्ये तिचे पीएचडी. चे मार्गदर्शक डॉ. प्रकाश क्रुष्णस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सभा (SABHA -Society for Appreciation of Bharatiya Heritage and Arts) ही संस्था कॅनसस स्टेट युनिव्हर्सिटीत चालू केली.या संस्थेची संस्थापक, खजिनदार, अध्यक्ष अशा विविध पदांद्वारे ती काम पहात होती. भारतीय नसणाऱ्या व्यक्तींना आपल्या अभिजात शास्त्रीय संगीताची, कलेची ओळख करून देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमासाठी भारतातल्या नामवंत कलाकारांना आमंत्रित करणे, त्यांचे आदरातिथ्य करणे, दर महिन्याला स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम करणे, स्वतःही तबला-गायन ह्यात सक्रिय सहभाग घेणे, पश्चिमात्य संगीत कलाकारांबरोबर फ्यूजन सारखे गायन आणि तबला वादनाचे प्रयोग करणे यात शिल्पा रमत होती.
पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित आनिंदो चैटर्जी, पंडित विजय घाटे, पंडित विश्व मोहन भट, उस्ताद ईर्शाद खान, जॉर्ज ब्रुक्स, काई एकार्ट, स्टिव स्मिथ, जॉन मैकलॉग्लिन असे काही दिग्गज कलाकार या सभेत येऊन गेले आहेत.
या व्यतिरिक्त सायकल चालवणे, चित्रकला, कुटुंबासोबत सहलीला जाणे यासाठी शिल्पा वेळ काढत असते.
काही ध्येय ठरविले कि त्यासाठीचे आकाश दिसायला लागते. आणि मग शिल्पा सारख्यांना त्या आकाशात झेप घ्यायला कोणी अडवू शकत नाही हेच खरे.
शिल्पाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !
अधिक माहिती साठी आपण पुढील लिंक अवश्य पहा. ज्ञान प्रबोधिनी प्रशाला : https://www.prashala.jnanaprabodhini.org/
ज्ञान प्रबोधिनी : https://www.jnanaprabodhini.org/
ज्ञान प्रबोधिनी फाऊंडेशन : https://www.jnanaprabodhinifoundation.org/
बाल प्रबोधिनी : https://www.jnanaprabodhinifoundation.org/baal-prabodhiniSponsor-a-Child Program https://www.jnanaprabodhinifoundation .org/sponsor-a-child

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️9869484800
छान