“वीरमाता अनुराधा गोरे”
मला अजूनही आठवतोय तो दिवस ; २६ सप्टेंबर १९९६ ! मुंबईतील पार्ले टिळक विद्यालयात, एका संस्थेतर्फे मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. त्यातला एक विषय शौर्य कथा हा होता. काही मुलांनी कॅप्टन विनायक गोरे ह्यांच्याविषयी कथा सांगितली आणि परिक्षक म्हणून उपस्थित असलेले आम्ही सर्व हादरलो. कारण ती होती विनायकची पहिली पुण्यतिथी आणि या स्पर्धेच्या आयोजनात कॅ. विनायकच्या आई अनुराधा गोरे बाई होत्या ! आम्ही हळहळलो. कथा ऐकतांना, तर गोरे बाईचं काय झालं असेल आज तर ? पण त्या शांत होत्या. त्यांनी आम्हाला ह्या दिवसाची जाणीवही करून दिली नाही. कारण विनायकनी त्यांना शपथ घातली होती,
“माझे काहीही झाले तरी तू दुनियेसमोर रडायचे नाही, तू वीरमाता आहेस !”.. त्याचा शब्द पाळण्यासाठी त्यांना किती कष्ट पडले असतील, किती संयम अंगी बाणवायला लागला असेल ! घरात प्रत्येक सेकंदाला त्याची आठवण काढतांना, मन आक्रंदत असतांना, डोळ्यातून किती पाणी वहात असेल ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाहीं. म्हणूनच त्या माझ्यासाठी संयमाचा महामेरू आहेत.
२६ सप्टेंबर १९९५ ह्यादिवशी विनायक गेला तेव्हा मी गोरे कुटुंबाला ओळखत नव्हते . पण पार्लाभर त्यांची चर्चा होती.सर्व जण इतक्या कोवळ्या मुलाचा, असा मृत्यू झाला म्हणून हळहळत होते. आमच्या शाळेचा, आमच्या पार्ल्याचा म्हणून एकीकडे अभिमान होता, तर दुसरीकडे तितकेच दुःख होते.
त्यानंतर काही दिवसांनीच, योगायोगानी गोरेबाईंची आणि माझी ओळख झाली. त्यांनी इतर अनेकजणांना आपल्या छायेखाली जसे घेतले, तसे मलाही घेतले, आणि त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू मला दिसत गेले.
विनायक गेल्यावर दोन गोष्टी बाईंनी ठरवून केल्या. त्यांनी ठरवले “मी असेपर्यंत विनायकचा विसर पडू देणार नाही” आणि असे अनेक समाजातले युवक, सैन्यात जायला तयार होतील, यासाठी मी प्रयत्न करीन”

बाई मुळच्या साताऱ्याच्या ! पार्ले टिळक विद्यालयातल्या शिक्षिका! अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इंग्रजी, संगणक शास्त्र शिकवायच्या !मुलांमधे रमायच्या ! विनायक गेल्यावर त्या या मुलांच्यातच त्याला शोधायच्या .तन मन धन अर्पून असं आपण म्हणतो ना.. तसं ! त्यांनी स्वतः ठरवलेल्या कार्याला वाहून घेतलं !
विनायक लहानपणापासून हुषार. जे करेल ते अगदी मनापासून.. बाईंसारखच ! त्यांच्या तालमीत तयार झाला होता. शाळा कॅालेजमध्ये चमकणारा. फूटबॅाल, हॅाकी हे खेळ आवडीचे. राष्ट्रीय स्तरावर जाण्याइतकं प्राविण्य मिळवलं होतं, पण त्याला देशाची सेवा करणारा गणवेश खुणावत असायचा ! पोहणं , वाचन, पदभ्रमंती करण्यात येणार आवडता विरंगुळा. कॅम्पला जाणं, सह्याद्री पालथा घालणं हा छंद ! ह्या सर्वांमुळे तो लहानखुरा दिसत असला, तरी त्याचं शरीर चांगलेच मजबूत झाले होते आणि कुठल्याही परिस्थितीत रहाण्याचे अनुभवही जमा झाले होते.
विनायक च्या आजोळी पूर्वजांची एक तलवार होती. त्या तलवारीने त्याच्या मनाचा एक कोपरा व्यापला होता. तिथे गेल्यावर तिला हात लावल्याशिवाय त्याला चैन पडायचं नाही. शिवाजी, सावरकर, विवेकानंद ह्यांच्याबद्दलची पुस्तके वाचून, देशसेवेची त्याला प्रेरणा मिळत गेली. त्याचे वडिल विष्णू गोरे अतिशय हुषार, गोल्ड मेडल मिळवलेले, बॅंकेच्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत होते ! विनायक वाणिज्य अथवा अर्थशास्त्राची पदवी घेऊन चार्टर्ड अकांऊंटंट झाला असता. या साठी वडिलांचा अनुभव त्याच्या पाठिशी होता. लहानपणी त्यांच्या घरात गीतारहस्य ह्या ग्रंथाचे सामुदायिक वाचन व्हायचे. असे वाचन मी कधीच, कुठेच, कोणाच्या घरी ऐकले नाही.
अशा आईवडिलांच्या संस्कारात विनायक वाढत होता. पण त्याचा कल देशसेवेकडेच होता. देश सेवा ही त्याच्यासाठी ईश्वरसेवा होती. त्याने चार्टर्ड अकांऊंटंट होण्यासाठी करावी लागणारी आर्टिकलशिप मध्येच सोडली. कारण त्याला संयुक्त संरक्षण सेवेत जाण्यासाठी (Combined Defence Services Examination) प्रवेश परीक्षेची तयारी करायची होती. त्याचा ठाम निर्धार पाहून त्याचे आईवडिल त्याच्या पाठिशी उभे राहिले.
ही कठिण परिक्षा विनायक उत्तीर्ण झाला आणि डेहराडून ला इंडियन मिलटरी ॲकाडमी मध्ये दाखल झाला. तेथील प्रशिक्षण पूर्ण करून तो १२ जून १९९१ रोजी भारतीय सैन्य दलात सेकंड लेफ्टनंट म्हणून रूजू झाला !
विनायकाच्या जेमतेम ५ वर्षांच्या कारकिर्दीत त्याच्या विशेष प्राविण्यामुळे, धैर्यामुळे, समयसूचकते मुळे त्याच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या गेल्या. जम्मू काश्मिर मध्ये कुपवाडा येथे परिस्थिती खूपच गंभीर होती. अतिरेक्यांचा मोठा धोका होता. परिस्थिती हाताळणासाठी हुषार योध्दे हवे होते. तिथे विनायकला निवडण्यात आले होते. अतिशय शांत राहून, सोबतच्या सैनिकांना सूचना देत, हिमतीने विनायक लढत होता. पण थेट झालेल्या बॅाम्बहल्ल्यात जबर जखमी झाल्याने तो वाचू शकला नाही. त्याला हौतात्म्य प्राप्त झाले.

सेना दलातील शौर्य पदक मिळावे ही विनायकची जबर इच्छा होती. त्याने आईला सांगितले होते, “ते मला न मिळताच मला वीरगती मिळाली, तर तू ते घ्यायला जा. पण तेव्हा रडायचं नाही. तू वीरमाता आहेस हे कायम लक्षांत ठेव !”… बाईंनी मुलाला दिलेले वचन पाळले. त्यासाठी त्यांना अनेक टिका झेलाव्या लागल्या.
विनायक शहीद झाल्यानंतर, प्रथम बाईंनी १०० शाळांतून शौर्यकथा सांगायच्या, असे ठरवले. एका आईची व्यथा, तळमळ, त्यांच्या गोष्टीतून, ऐकणाऱ्याच्या काळजाला भिडायची ! महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शाळेत, त्यांना आमंत्रण यायची. अनेक ठिकाणी त्यांना मुलाखतीसाठी, व्याख्यानासाठी बोलवले गेले. अजूनही बोलावतात. दूरदर्शन, आकाशवाणी वर त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. उत्तम वक्त्या, प्रचंड माहिती, सांगण्याची प्रभावी पध्दत यामुळे त्यांचे बोलणे ऐकणारा मंत्र मुग्ध होतो. १०० च्या वर त्यांच्या शाळा कधीच झाल्या. त्या नंतर कोणीतरी, ”हे सर्व पुस्तक रूपानी जास्त जणांपर्यंत पोहोचेल, तुम्ही पुस्तक कां नाही लिहीत ?” असे त्यांना विचारले आणि मग त्यांचा लिखाणाचा प्रवास सुरू झाला. प्रथम फक्त वृत्तपत्रात, मासिकात सदर लिहीता लिहीता, गेल्या २० वर्षात त्यांची ३६ पुस्तकं आली आहेत. त्या मुलांना सैन्यात जाण्यासाठी प्रेरणा देऊ लागल्या. प्रत्यक्ष सैनिकांना, त्यांच्या घरच्यांना, सेनादलातल्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी त्यांच्या शौर्यकथा लिहील्या. ह्या सर्वांची माहिती, त्यांचे हुद्दे, त्यांचे रहाण्याचे ठिकाण आदी सर्व बाईंच्या तोंडावर आहे. त्या सर्वाशी वॅाट्सॲप, फोनच्या माध्यमातून कायम संपर्कात असतात. मदतीसाठी त्यांचा हात कायम पुढे असतो.


बाई १९७५ ते २००३ पार्ले टिळक विद्यालयात माध्यमिक शिक्षिका होत्या. जून २००३ ते ऑगस्ट २००७ पर्यंत रामदेव पोतदार शाळेत मुख्याध्यापिका म्हणून नियुक्त केल्या गेल्या. या सर्व कालावधीत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम राबविले. त्याबद्दल त्यांना उत्तम शिक्षिेकेचा पुरस्कार मिळाला.
त्यांना वेगवेगळ्या संस्थांकडून अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र शासनाने ‘वीरमाता’ पुरस्कार, तसेच सह्याद्री वाहिनीने ‘हिरकणी’ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. झी वाहिनीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले आहे. सैन्याने आणि सरकारने देखील त्यांना अनेक पुरस्कार दिले आहेत.
२०१७ साली बेळगांवात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या बाई अध्यक्ष होत्या. निवृत्त झाल्यावर त्यांनी परत पार्ले टिळक विद्यालयामध्ये, शाळेच्या वेळेच्या आधी, वर्गात मागे पडलेल्या मुलांसाठी अभ्यास घ्यायला सुरवात केली. स्वयंअध्ययन शिकवण्यासाठी त्या मार्गदर्शन करायच्या. त्याचे सर्व रेकॅार्डिग यू ट्यूब वर उपलब्ध आहे. त्यांनी सुट्टीत मुलांसाठी व्यक्तीमत्व बनवून विकास होण्यासाठी शिबिरं घेतली. यशवंतराव चव्हाण विद्यापिठासाठी त्यांनी बरेच काम केले आहे. सध्या सरकारनी दिलेल्या जमिनीवर अनेक प्रकारची, भारतीय मुळ असलेली, महाराष्ट्रातल्या घाटातील ४ हजार झाडं त्यांनी लावली आहेत. त्या झाडांची माहिती, त्या यू ट्यूब वर टाकतात. मुलांना विज्ञान खेळणी, ओरिगामी शिकवतात. डिजिटल माध्यामांचा उपयोग करतात. शोर्यकथांबरोबरच इतिहासातला गोष्टीही त्या रेकॅार्ड करतात. जास्तीत जास्त मुलांपर्यंत, लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचा त्या प्रयत्न करतात.
जसे ज्ञान आपल्या विनायकला मिळाले आणि तो सैन्यात गेला, तसे ज्ञान महाराष्ट्रातल्या मुलांना मिळून, जास्तीत जास्त मुलांनी देशसेवा हे वेड अंगिकाराव ह्यासाठी बाई सतत प्रयत्न करत असतात. त्यांच्या कार्याला शतशः नमस्कार!
त्यांचा दिवस पहाटे ४ वाजता सुरू होतो. वाचन, लेखन, रेकॅार्डिंग हे सर्व त्या सकाळी करतात. अफाट वाचन करून, लिखाणातही मग्न असतात.
तुम्ही गुगल केलेत की त्यांची पुस्तकं, त्यांचे लेख, व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतील. ते जरूर पहा, पुस्तक वाचा.
बाईंना मी भेटते तेव्हा मला संत तुकाराम महाराजांचा…
“शुध्द बीजापोटी
फळे रसाळ गोमटी”
हा अभंग नेहमी आठवतो, तो त्यांच्या कार्यामुळे ! त्यांच्या देशकार्यात आपल्याला थोडा जरी खारीचा वाटा उचलता आला तर आपण जरूर उचलू या..
त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा …

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
