“अनुश्री क्षीरसागर”
काही काही व्यक्ती स्वस्थ बसूच शकत नाहीत. नवीन काही शिकत, स्वतःचे व्यक्तिमत्व घडवत, जीवनातला आनंद घेत असतात. त्यातलीच एक अनुश्री क्षीरसागर.
गोरेगावकर असलेल्या अनुश्रीने अंधेरीच्या कॅालेजमधून रसायन शास्त्राची पदवी घेतली, पण आज तिची ओळख ही तिच्या अनुस्वर या संस्थेमुळे काव्य, गायन, कथाकथन करणारी, निवेदन, सूत्रसंचालन लिलयेने करणारी, आणि प्रसिध्द व्यक्तींची मुलाखत घेऊन लेखन करणारी अशी आहे !
अनुश्रीचा हा प्रवास सोपा होता का ? मुळीच नाही .. खरं म्हणजे डिग्री घेऊन काही वर्षे संसार करेपर्यंत कधी असा विचारच तिने केला नव्हता.. पण स्वभाव स्वस्थ बसण्याचा नव्हता, प्रयत्न करण्यात कंटाळा नव्हता. पदवी घेतल्यानंतर तिने तीन वर्ष
कांदिवली येथील ग्रॅावर ॲंड वेल या मेटल फिनिशिंग कंपनीत नोकरी केली. लग्नानंतर बाहेर जाऊन नोकरी न करता, काही वर्षांनी संसारातल्या जबाबदाऱ्या कमी झाल्यावर, डेटामॅटिक्स या कंपनीचे काम घरी आणून करायला सुरवात केली.
अनुश्रीच्या आयुष्यात अचानक मेंदी आली. मामेबहिणीच्या लग्नासाठी म्हणून ती मेंदी काढायला शिकली.आधी आवडत होतीच, त्यात कलाकार असल्यामुळे तिने डिझाईन्स लवकर आत्मसात केली. चिकाटी होती . त्यामुळे त्या लग्नात रात्रभर बसून सगळ्यांच्या हातावर मेंदी काढली. ती सर्वांनाच आवडली. मग जवळच्या नात्यात, ओळखीत मेंदी काढायला बोलवायला लागले. तेव्हा हौस म्हणूनच अनुश्री मेंदी काढत होती.पण इतकी वर्ष अशी मेंदी काढल्यामुळे ती अगदी प्रविण झाली होती . तिची खूप प्रॅक्टिस झाली होती. म्हणूनच एकदा पार्लर मध्ये गेली असतांना, पार्लरवालीने तिच्या हातावर सफाईदार, सुंदर काढलेली मेंदी पाहिली आणि तिला आपणहून विचारले, “मी ॲार्डर्स दिल्या तर लग्नासाठी तुम्ही मेंदी काढाल ?” एका क्षणाचाही विचार न करता अनुश्री हो म्हणाली आणि तिची आवड व्यवसायिक रूपात बदलली. पार्लरवाली जयू अनुश्रीची मैत्रिण झाली.

खूप डिझाईन्सची पुस्तकं, मेंदीचे सामान जयू बरोबर तिने जाऊन आणले. रोज त्या डिझाईन्सची कोणाच्या तरी हातावर, नाहीतर कागदावर प्रॅक्टीस करून अनुश्री तरबेज झाली. नम्र लाघवी बोलणं, हसरं, शांत व्यक्तिमत्व आणि तन्मयतेने काढलेली सुरेख मेंदी.. यामुळे तिला खूप ॲार्डर्स मिळाल्या. मेंदीचे क्लास घेणे, परिक्षक म्हणून जाणे आणि मागणी प्रमाणे मेंदी काढायला जाणे हे २० वर्ष तिने केले. मेंदीवाली म्हणून तिची ओळख झाली होती. पूर्वी केसालाही मेंदी जास्त लावली जात होती. केसाचा डाय इतका अंगिकारला नव्हता बायकांनी. तेव्हा बायका खात्रीची मेंदी घ्यायला अनुश्री कडेच जायच्या.

अनुश्रीला गाणे आवडायचे, गाता सुद्धा यायचे. पण ती शिकली नव्हती. डॅा.नीता कानिटकर ह्या मैत्रिणीमुळे अनुश्रीच्या आयुष्यात गाणे आले. सुप्रसिध्द गझल गायक आणि संगीतकार श्री. विकासजी भाटवडेकर यांच्याकडे त्या दोघींनी गाणं शिकायला सुरवात केली. हळूहळू शास्त्रीय संगीताची आवड देखील निर्माण झाली. त्यामुळे डॅाक्टर वंदना कट्टी यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकायला सुरवात केली. योग्य गुरू मिळाल्यामुळे अनुश्रीचे गाणे सुधारू लागले. आत्मविश्वास वाढला. यानंतर अनुश्रीच्या आयुष्यात अचानक योगायोगाने एक संधी चालून आली .. सूत्रसंचालनाची . ! सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक श्री. मिलिंद रायकर यांच्या एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. तो कार्यक्रम दिवाळी पहाट होता. तिच्या लक्षात आलं की आपल्याला जमतय आणि आवडतय. मग या क्षेत्रात येण्यासाठी काय प्रयत्न करावे लागेल हा विचार सुरू झाला. या संधीचे तिने सोनं केलं तिचं गाणं आणि सूत्रसंचालन वाढलं.
याच सुमारास “स्नेहांकित” या दृष्टीहिन विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेशी अनुश्रीचा परिचय झाला. या संस्थेसाठी रीडर म्हणून ती काम करू लागली. त्यांच्याकडून एक पुस्तक आणि एक रेकॉर्डर असं कोणीतरी संस्थेचीच सभासद व्यक्ती आणून देत असे. आपण घरी बसून ते पुस्तक नीट स्पष्ट आवाजात वाचून रेकॉर्ड करायचं आणि वाचून झालं की त्यांना कळवायचं. मग त्यांचा माणूस येऊन पहिलं पुस्तक घेऊन जात असे आणि दुसरं नवीन पुस्तक आणून देत असे. उच्चार स्पष्ट हवेत. आसपास कुठल्याही प्रकारचा गोंधळ आवाज नको. असे त्यांचे काही नियम असत. ते सांभाळून रेकॉर्डिंग करावे लागे. शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबरच, स्पष्ट उच्चार पाहून, त्यांनी अनुश्रीला गीतारहस्य, तुकारामांची गाथा, एमपीएससी – यूपीएससी – एलएलबी आदी अभ्यासक्रमांची पुस्तकं वगैरे रेकॉर्डिंग साठी द्यायला सुरुवात केली. तिला ही पुस्तकं वाचायला फार आवडत असे कारण वेगवेगळे विषय. त्यामुळे तिचा ही अभ्यास होत असे. एकदा तिला आठवी नववी दहावीची, इंग्रजी माध्यमातील संस्कृत अभ्यासक्रमाची पुस्तक पाठवली. ही पुस्तकं वाचताना मात्र तिची तारांबळ उडाली. कारण शाळेत संस्कृत होतं पण ते पन्नास मार्कांच आणि ते देखील मराठी माध्यमातून.
ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून इंग्रजीतून वाचताना तिला आधी स्वतःला खूप अभ्यास करावा लागला. यातूनच पुन्हा एकदा संस्कृत शिकण्याची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. डॅा.आसावरी बापट यांनी पार्ल्यामध्ये पुण्यातील टिळक विद्यापीठाचे संस्कृतचे कोर्सेस सुरू केले होते.तिथे तिने शिकायला सुरुवात केली. दोन वर्षांत डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर तिने गाणं आणि सूत्रसंचालनावर लक्ष केंद्रित केलं. ती सांगते..
“सूत्रसंचालन मी शिकले ते विकास सर, वंदना ताई आणि डॉ. सुनील कट्टी सर यांच्यांकडून. वर्षभरातील येणाऱ्या सणांवरील गाण्यांवर रंग ऋतू सणांचे, सुमनताईंच्या गाण्यांवरील केतकीच्या बनी, शास्त्रीय राग आधारित बॉलिवूड मधील गाण्यांचे कार्यक्रम, क्लासिक फेव्हरेटस.. आदी कार्यक्रम विकास सरांसह केले.”

“वंदनाताई आणि सुनील सर यांच्यासह कहत कबीर, रंग रसिया, होरी खेले है कृष्ण मुरारी.. आदी उपशास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम केले. काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये, आपलं म्हणणं संपृक्तपणे कसं मांडावं, इत्यादी गोष्टी त्यांच्याकडून शिकले.”

“साथ संगत महिला मंडळाच्या माध्यमातून अनेक गोष्टींची ओळख झाली. त्यापैकी एक..चित्राताईंच्या घरातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती. हा प्रयोग पाहून आल्यावर माझ्यावर त्या गोष्टीचं गारुड बसलं आहे ते आजतागायत. गेली जवळपास पंधरा वर्षं माझ्या घरातील ओला कचरा बाहेर गेला नाही. सुरुवातीला कंपोस्ट खताची बास्केट होती. आता बास्केट नाही. भाज्यांच्या साली, डेखं वगैरे बारीक कापून कुंड्यांतून पसरून देते. एकदा आंब्यांच्या कोयी, एकदा जांभळाच्या बिया, तर एकदा चक्क वेल गुंजेच्या लाल काळ्या बिया बास्केट मध्ये गेल्या आणि त्या रुजून त्यांची रोपं तयार झाली. एवढ्या रोपांचं करू काय मोठा प्रश्न निर्माण झाला. त्या वेळचे मुंबई महापालिका अधिकारी श्री श्रोत्रीय सर यांनी सांगितलं, दुधाच्या पिशव्या स्वच्छ धुवून त्यात माती घालून त्यात रुजलेल्या बिया अलगद ठेवा. रोपं थोडी वाढवा आणि आमच्या ऑफिस मध्ये आणून द्या. मी तशी रोपं लावून देत गेले. आधी नकळत बिया खताच्या कुंडीत टाकल्या गेल्या होत्या. आता जाणुन बुजून टाकत गेले.”

“अशा प्रकारे आंबा, फणस, जांभूळ, सिताफळ, चिंच, लिंबू ,संत्र, चिकू अशी शेकडो वेगवेगळी रोपं तयार करून दिली. वड, पिंपळ, उंबर अशी कित्येक रोपं कुठेही उगवलेली असतात, ती तिथून उपटून वर्षभर घरी वाढवून कुणाच्या घरी, कुणाच्या शेतात, कुठे वैराण माळावर जंगल तयार करण्यासाठी अशी दिली. आज त्यांचे वृक्ष झाले आहेत. एरवी ही जास्वंदी, मोगरा, गुलबक्षी, शेवंती, मेक्सिकन ब्ल्यु, जमैकन, स्पाइक, झिप्री क्रोटन्स जेड अशा माझ्याकडे असलेल्या झाडांची छोटी रोपं तयार करून मित्र मैत्रिणींना देणे हा आवडता छंद आहे. माझा दिवसातला कितीतरी वेळ यात मजेत जातो. सर्वात मोठा फायदा म्हणजे पहाटेपासून चिमण्या, बुलबुल, वटवट्या, सनबर्ड आदी वेगवेगळे पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरं, खारी अशी मंडळी भेट देऊन जात असतात.”

संवादिनी .. नावाचा पुस्तक वाचनाचा एक ग्रूप आहे. अनुश्रीला वाचनाची प्रचंड आवड. जवळपास दिवसाला एक या वेगाने लायब्ररीतून पुस्तकं आणून ती वाचत असे. लहान असेल तर दोन पुस्तकं दिवसातून. कागद खाणारी कसर जणू. मैत्रिण संगीता बेहेरेमुळे ती तिथे जायला लागली आणि तिला जणु खजिना सापडल्या सारखं झालं. दर महिन्यात वेगळं पुस्तक वाचायचं. वेगवेगळ्या मैत्रिणींनी सुचवलेलं. प्रत्येकीची आवड वेगळी. त्यावर लिहायचं बोलायचं.. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर असंख्य पुस्तकं तिने अगदी मनापासून वाचली. अक्षरशः रवंथ केली. या सगळ्याचा नंतर अनुस्वर साठी फायदा झाला.
अनुश्री सांगते..”विकास सरांच्या मार्गदर्शनात स्वरविकास संस्थेतर्फे दीनानाथ नाट्यगृहासारख्या ठिकाणी होणाऱ्या मोठ्या कार्यक्रमांमधून मी ही कार्यक्रमांचं आयोजन शिकले. माझ्या शाळेच्या अमृतमहोत्सवा निमित्त शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एक सांगितिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. त्यातूनच पंडित विरेन सामंत सर यांच्या “स्वरनिनाद“ संस्थेचे कार्यक्रम मिळत गेले. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, वाद्य, सगळ्याच प्रकारचं संगीत इथे सादर होतं. त्यामुळे हे कार्यक्रम हा एक वेगळा अनुभव असतो.
काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमाच्या नियोजनाच्या निमित्ताने श्री. सचिन शिंदे यांच्या SKS कराओके ग्रुपशी संबंध आला. मी हा ग्रुप जॉईन केला. माझ्यासाठी हे नवीन तंत्र होतं. हळूहळू आत्मसात करत गेले. खूप आनंद मिळत होता. मुख्य म्हणजे स्टेजवर उभा राहून गाणं सादर करण्यातला आत्मविश्वास. सचिन सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संस्थेच्या सभासदांसह भरपूर कार्यक्रम केले. कोविडच्या काळात देखील फेसबुक लाईव्ह कार्यक्रम केले.
‘संवादिनी’ या वाचन ग्रुप मध्ये एका पुस्तकाचं परीक्षण लिहायचे होते. मी पुस्तक वाचून परीक्षण लिहिलं. ते सर्वांना खूप आवडलं. सगळ्या मैत्रिणींनी मनापासून कौतुक केलं. त्यामुळे आपण लिहू शकतो हा आत्मविश्वास आला. सुरुवातीला इतरांच्या काही कल्पनांवरून प्रेरणा घेऊन लिखाण केलं. नंतर मात्र स्वतःच्या अनुभवांवरून विषय मिळत गेले आणि लिखाण होत गेलं. त्यातूनच पुढे ‘आम्ही पार्लेकर‘ या विलेपार्ले च्या मुखपत्रासाठी लिखाण करायला सुरुवात केली. संगीत क्षेत्रातील कलाकार, शिक्षक, चित्रकला, नृत्यकला या क्षेत्रांमधील कलाकार यांच्या मुलाखती घेतल्या. हिंदी तसंच मराठी संगीतक्षेत्रातील गीतकार संगीतकार तसेच प्रसिद्ध गाणी यांच्यावर देखील स्फुट लेखन केल.
एकदा सहज मनात विचार आला, आपण लिहिलेले ललित लेख, संगीत विषयक लेख, त्या अनुषंगाने कविता आणि गाणी यांचा एकपात्री तासा दीड तासाचा कार्यक्रम करावा. कार्यक्रमाचं नाव ठरवलं ‘तिहेरी गोफ’. साथसंगत मधे केलेल्या पहिल्या कार्यक्रमानंतर सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. माझा उत्साह द्विगुणीत झाला. यानंतर लेखांमध्ये काही बदल केले. काही बाहेरच्या लेखकांचेही लेख मी कार्यक्रमांमध्ये अंतर्भूत केले आणि बऱ्याचशा मंडळांमधून या कार्यक्रमाचे सादरीकरण केले आहे. थोडे थोडे बदल करत राहिल्यामुळे कार्यक्रमात तोच तो पणा येत नाही आणि दरवेळी नवीन कार्यक्रम सादर केल्याचा आनंद मिळतो. SKS तर्फे एका संस्थेसाठी सांगितिक कार्यक्रमाची तयारी आम्ही केली होती. काही कारणाने तो कार्यक्रम मिळू शकला नाही. माझ्या सह सगळ्याच मित्र-मैत्रिणींच्या उत्साहावर पाणी पडले. तेव्हा मी स्वतःची “अनुस्वर” ही संस्था स्थापन करून ,त्या तर्फे कार्यक्रम करायचे ठरवले. 23 जुलै 2023 या दिवशी अनुस्वरचा पहिला कार्यक्रम “मेघा रे.. देशस्थ ऋग्वेदी संघ, विलेपार्ले पूर्व “ येथे उत्साहात पार पडला. संस्था स्थापन करण्यापासून कार्यक्रम पूर्ण पार पडेपर्यंत, सर्व मित्र मैत्रिणी खंबीरपणे पाठीशी होते. सर्वांच्या सहकार्याने एक उत्तम कार्यक्रम करू शकलो. त्यानंतर बाहेरून ही कार्यक्रम मिळू लागले. दिवाळी पहाट, कोजागिरी, पार्लेश्वर मंदिरात तसंच अंबरनाथ येथील हेरंब मंदिरात भक्तिसंध्या असे विविध कार्यक्रम केले.”
तर अशी ही अनुश्री.. मेंदी पासून अनुस्वर पर्यंत ,स्वतःच आकाश शोधत त्यात आता रमणारी … यशस्वी होणारी.. तिला मदत केलेल्या सर्वांचा ती आदरपूर्वक उल्लेख करून , वेळोवेळी त्यांना धन्यवाद देते हे तिच्या विनयशील स्वभावाला शोभेसेच आहे. तिच्या अनुस्वरचा आलेख असाच वर जात राहो यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा..!

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
