मागच्या वर्षापासून माझं सकाळी फिरायला जाणं तसं बंदच झालंय. पण अधून मधून तोंडाला दोन दोन मास्क बांधून कधी भाजीच तर कधी दळण आणण्याचं निमित्त काढून सोसायटीतून दोन फेऱ्या मारून येते.
कोरोना मुळे तर काय फक्त सात ते अकरा एवढ्या वेळातच घराबाहेर पडायचे तेवढ्या वेळातच सगळी कामं उरकायची. शिवाय शनिवार रविवार पूर्णतः लाॅकडाऊन, म्हणून शुक्रवारी आणि सोमवारी दुकानदार भाजीवाले गिरणी सगळीकडे गर्दीच गर्दी !
अशीच काल सोसायटीत चक्कर मारावी म्हणून सकाळी साडेसहा वाजताच खाली उतरले. पहाते तर काय, गेट जवळ सोसायटीत कामाला येणाऱ्या बायकां ओळीत उभ्या. सगळ्या जणींना घाई. अहो वाचमन दादा आमची रविवारीच तर RTPC की काय, टेस्ट झाली आहे ना, आम्हाला काही झालं नाही. जाऊ द्या ना आम्हाला, बाई वाट बघत असतील. हो पण तुमचं नाव यादीत आहे का ते तर पाहू दे. अहो इथेच तर मी काम करते तुम्ही रोज बघता की मला. हो पण नियम म्हणजे नियम. तुमची ऑक्सिजन लेवल आणि टेंपरेचर घेतल्याशिवाय आत सोडायचं नाही असं आम्हाला बजावलं आहे. बर बर पण लवकर करा हं, आमच्या मॅडम सकाळी लवकरच कॉम्प्युटर उघडून बसतात त्यांना आमच्या स्वयंपाक घरातला मिक्सरचा, भांड्याचा आवाज अजिबात चालत नाही म्हणून घाई करतोय हो !
मी सहजच त्या बायकांकडे पाहिलं, सगळ्याजणी व्यवस्थित आवरून तोंडावर मास्क बांधून आल्या होत्या. त्यांच्याकडून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अजिबात नव्हती आणि कालच्या टेस्ट मध्ये ते सिद्धही झालं !
आमच्या सिंधूशी मी बोलले तर बरं झालं काकू काल टेस्ट करून घेतली म्हणजे आम्हीही निश्चिंत आणि तुम्हीही निश्चिंत झालात आमच्याही मनात धाकधूक असतेच की हो ! आम्हालाही आमची मुलं-बाळं संसार आहेच की ! आम्ही खूप काळजी घेतो. आता आम्हाला बाहेर पडावं लागतंय, घरी बसून खाणार काय ? माझा नवरा ओला कंपनीची टॅक्सी चालवतो पण गेल्या वर्षापासून सगळ्याच धंद्यावर संकट आलंय.
पोरं शाळा नाही म्हणून घरीच अभ्यास करतात. दोघा दोघांना कुठून मोबाईल घ्यायचा ? माझी पण चांगली चांगली काम सुटली. जो तो आपापल्या गावाकडे निघून गेला. घरूनच काम करायचं तर इथे एवढं भाडं कशाला भरायचं ? आहे ती काम टिकवली तर घरातली चूल पेटेल आमच्या !
माझं तरी बरं आहे, माझ्या शेजारी राहणारी ती कांता आहे ना तिची तर बिचारीची वेगळीच कहाणी ! लहान वयात लग्न झालं तीन पोरी पदरात, पुन्हा चौथ्यांदा गरोदर. काय ? मी किंचाळले. हो ना तिच्या नवऱ्याला कुठल्यातरी बाबानं सांगितलं म्हणे यावेळी नक्की मुलगा होईल. एक तरी स्वतः काही करायचा नाही दारू पिऊन हिला मारझोड करायचा. हिला आता मूलंच नको होतं.
पण…. किती दिवस विरोध करेल, सहा महिन्यांची गरोदर असतानाच या पठ्ठ्यांन गळफास लावून स्वतःला संपवलं. त्या धक्क्यानं ती सातव्या महिन्यातच बाळंतीण झाली. मग झाला का मुलगा ? मी घाईघाईने विचारलं. नाही ना काकू, यावेळी पण मुलगीच ! अरे देवा !!
पण गेल्या महिन्यापासून ती परत कामावर जायला लागलीय. घरात बसून काय पोटात काटे भरेल का ? बाईला हरून चालतं का ? लढतेय बिचारी. फार धीराची आहे. जिद्दी आहे. तुमच्यासारख्या बायका तिला आपले मुलींचे जुने कपडे खेळणी देऊन उभारी देत आहेत. अडल्यानडल्या यांची कामाची न कंटाळता करते म्हणून कोणीही तिला मदतीला बोलवतं. नशिबाला बोल लावत रडत बसणारी ती नाही, पोरींनाही शिकवीन म्हणतेय.
कांता ची कहाणी ऐकून मन सुन्न झालं. दररोज वर्तमानपत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण वाचतो पण एकातरी शेतकर्याच्या बायकोनं आत्महत्या केल्याची बातमी आपण वाचली नव्हती. परिस्थितीशी झुंज देत परिस्थितीला मात करत जगायचं असतं हे स्त्रिया जन्मजातच शिकलेल्या असाव्यात त्यासाठी त्यांना कोणत्याही शालेय शिक्षणाची गरज नसते.

– लेखन : सौ.अरूणा कळसकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800