Thursday, June 19, 2025
Homeलेखजीवघेणी तंबाखू

जीवघेणी तंबाखू

साऱ्या जगातील तंबाखू खाणाऱ्या लोकांना, या व्यसनातून मुक्त करून त्यांना निरोगी जीवन जगण्याचा संदेश देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना ३१ मे १९८७ पासून दरवर्षी हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करीत असते. त्यानिमित्ताने तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम सांगणारा हा विशेष लेख…..

मित्रहो, आज विश्वात जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून पाळला जातो. हा दिवस पाळण्यामागे जागतिक आरोग्य संघटनेचं नागरिकांना तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देणं अन् जगातील लोकांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर रहावं, हे उद्दिष्ट आहे.
तंबाखूतली घातक रसायने ही “हेड अँड नेक कॅन्सर” साठी ८५ टक्के जबाबदार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार प्रत्येक ६ सेकंदाला तंबाखू सेवनाने एका व्यक्तीचा मृत्यू होत असून, दरवर्षी त्यामुळे जगातील सुमारे ७ दशलक्ष लोकांना आपला जीव गमवावा लागतो, ही गंभीर बाब आहे. तंबाखू खाल्याने हृदय व रक्तवाहिन्यांवर घातक परिणाम होत असतात. त्याप्रमाणेच तोंड, जीभ, घसा,
अन्ननलिका व अन्य अवयवांचा कर्करोग (कॅन्सर) होत असतो. तसेच आपल्या रोगप्रतिकार शक्तीचेही नुकसान होत असते. तोंडाची त्वचा काळपट पडते. तंबाखू सेवनाने फुफ्फुसावर घातक परिणाम होऊन हृदयाचे पंपिंग गंभीररित्या प्रभावित होत असते.

तंबाखू सेवनाने मेंदूला “निकोटिन”ची जी सवय जडते, ती मानवी जीवनाला अतिशय हानिकारक आहे. हे सर्व प्राणघातक परिणाम पाहिल्यावर नागरिकांनी तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, जर्दा, पानमसाला, खर्रा यांचे सेवन अजिबात करू नये, असे आवाहन जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून करण्यात येत आहे.

तंबाखू सेवनाची लत लागून घरातील कर्त्या पुरुषाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास, त्याचे अख्खे कुटुंब उघड्यावर पडते. तंबाखू खाल्ल्याने भूक मंदावणे, छातीत दुखणे, आतड्यांची कार्यक्षमता मंदावणे, श्वसन नलिका व पोटावर व्रण पडणे, रक्तदाब वाढणे ह्या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. इतकेच नव्हे तर, तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला काही काळानंतर तोंड उघडणे देखील अवघड जाते. या प्राणघातक सवयी पासून नागरिकांनी दूर रहावे, या उद्देशाने तंबाखूच्या दुष्परिणामांची जनजागृती शालेय जीवनापासूनच करणं काळाची गरज आहे.

अत: जगातील प्रत्येक सुजाण नागरिकाने आपल्या आजू बाजूला राहणाऱ्या एका तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तीला तंबाखू खाल्ल्याने होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देऊन त्याला व्यसनमुक्त करावे, म्हणजे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन साजरा करणे सार्थक ठरेल.

तंबाखूची सवय सोडण्यासाठी एक घरगुती उपाय आहे. तो तंबाखू सोडू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी जरूर करून पहावा. १०० ग्रॅम ओवा अन् १०० ग्रॅम बडीशोप यांचे मिश्रण तव्यावर भाजून त्यात एक लिंबू पिळा. त्यापासून तयार झालेले मिश्रण, ज्या ज्या वेळी तंबाखूची तलफ लागेल, त्या त्या वेळी ते खावे. असे केल्याने हळू हळू तंबाखूची सवय सुटेल, हे निश्चित.

आपापल्या मुलांनी पुढे जाऊन तंबाखूच्या आहारी जाऊ नये, यासाठी पालकांनी स्वतः मुलांसमोर तंबाखू खाऊ नये. तसेच तंबाखू खाण्याची सवय ही वाईट संगतीमुळे जडते, हे लक्षात घेऊन पालकांनी आपली मुलं कोणाच्या संगतीत राहतात, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. ही सावधगिरी बाळगल्याने पालकवर्गाला आपल्या मुलांना वाईट सवयींपासून दूर ठेवता येईल.

चला तर, तंबाखू विरोधी मोहीम राबवून जगातील तंबाखू सेवन करणाऱ्या व धुम्रपान करणाऱ्या नागरिकांना या प्राणघातक सवयींपासून कायमची मुक्तता करू या.

रणवीर राजपूत

– लेखन : रणवीर राजपूत
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. श्रीकृष्णकांत सासवडे सर , श्री अमोल सासवडे आणि परिवार श्रीकृष्णकांत सासवडे सर , श्री अमोल सासवडे आणि परिवार

    मा.श्री रणवीर राजपूत साहेब,
    सस्नेह नमस्कार.

    आपण आपल्या लेखातून तंबाखू मध्ये निकोटिन नावाचा
    घातक पदार्थ असतो तो मेंदूला घातक असतो.

    तसेच तंबाखू सेवनाने विविध जीवघेणी आजार होतात,
    कोणतेही व्यसन करणे ,किती घातक असते याची सविस्तर माहिती दिली,तसेच तंबाखू विरोधी मोहीम काढणे आवश्यक आहेअसेही आपण विशद केले आहे.

    साहेब आपण खूप चांगली माहिती दिली आहे.

    आता व्यसन करणा-याने यातून जाणीव पूर्वक बोध घ्यावा म्हणजे ते आपल्या कुटुंबाला वाचवू शकतील.

    आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर व्यसनापासून दूर राहा.
    धन्यवाद !

    संपादक
    ,आदरणीय देवेंद्र जी भूजबळ साहेब आपलेही विशेष आभार व्यक्त करतो.आपणामुळे आरोग्या विषयी आणि इतर चांगले चांगले लेख वाचायला मिळतात आणि ज्ञानात भर पडते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…