ज्ञात अज्ञाताच्या पोकळीतून
जीव एकदा जन्म घेतो
स्वतः पाशात अडकतांना
अनेक पाश सांधत जातो
कधी, कुठे, केव्हां जायचं
कोणा संगे कुठे कधी
सहजीवन कंठायचं
हेही त्याला ठावूक नसतं
सुखदुःख झेलत झेलत
वरपांगी हसत हसत
जीवनाच्या नाटकाचे
अंकांवर अंक रंगवतो
कधी जीवन वाटे हिरा
पैलूपैलूतून चमकणारा
जन्मभरीच्या कष्टांनी
दैदिप्यमान होणारा
कधी असे जीवन जलौघ
खेळीमेळीत खळाळणारा
आजुबाजूंना कवेत घेऊन
निर्मळ, संपन्न बनविणारा
कधी जीवन असे एक फूल
पाकळीपाकळीने उमललेले
रंग, रुप, गंध ज्याचे
कानोकानी परिमळलेले
अशाच एका बेसावध क्षणी
वादळ सुटते उपवनी
कितीक वर्षाचे भावजीवन
उध्वस्त होई तत्क्षणी
शेवटी, कुणी कुणाला थांबत नाही
हीच आहे जगरहाटी
भरलेल्या संसाराला मात्र
कायमचीच लागते ओहोटी

– रचना : स्वाती दामले.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800