जीवन जगता जगता
खूप काही शिकता येतं
खूप मोठे होता येतं
“समृद्ध” हे विशेषण व्यक्तित्वाला चिकटू शकतं
परंतु यासाठी जीवन जगायचं कसं
हे शिकणं खूप महत्त्वाचं असतं…..१
शिकणं कधी संपत नाही
त्यासाठी वयाचं बंधन नसतं
शिकवणारे कधी संपत नाहीत-
त्यासाठी आस आणि शोध घेणे गरजेचं असतं
आयुष्यात कायम विद्यार्थी होऊन जगायचं असतं
कारण सभोवतीच्या असंख्य घटकातून-
शिकवणं पाझरत असतं..
जीवन जगता जगता खूप काही शिकता येतं
परंतु यासाठी जीवन जगायचं कसं
हे शिकणं खूप महत्त्वाचं असतं…२
आयुष्यात मार्ग बदलावे लागतात –
परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं
मी माझे, माझ्या मनासारखे यांना
मुरड घालणं अपरिहार्य ठरू शकतं
आयुष्यातील अनुभवविश्व किती परिपक्व-
याला प्राधान्य असतं
जीवन ही शाळा
हेच मुक्त विद्यापीठ
इथेच माणूसपण
कसोटीला उतरतं
जीवन जगता जगता
खूप काही शिकता येतं
परंतु यासाठी जीवन जगायचं कसं-
हे शिकणं खूप महत्त्वाचं असतं..
म्हणून जगणं प्रवाही असू द्या
जगणं डोळस असू द्या
जगणं परिपूर्ण असू द्या
कारण ते फक्त एकदाच
जगता येतं
फक्त एकदाच जगता येतं

— रचना : मोहन सामंत. जेष्ठ पत्रकार, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
