कलात्मक घडण
माणसाचे जसजसे वय वाढत जाते, तसतसे त्याच्या अनुभवांचा खजिना भरून जातो. पण त्याचे मन मात्र मागे वळून गेलेल्या भूतकाळाकडे धावतं. वर्तमानात तो जगत असतो. भविष्याच्या आखण्या करत असतो, परंतु भूतकाळात घडून गेलेल्या प्रसंगांचा ठेवा हृदयाच्या एका कप्प्यात जपून ठेवलेला असतो. असेच काही जपलेले प्रसंग राहून राहून डोळ्यासमोर येतात. त्या आठवणींना ताजेपणाचा सुगंध पसरतो, अन त्या भुतकाळी कप्प्यात विलिन होऊन जातात.
बॉम्बे पोर्ट ट्रस्ट (गोदी) या कंपनीत, क्रेन ड्राइव्हर म्हणून माझे बाबा नोकरी करत होते. त्यावेळी आमचं कुटुंब मुंबईत कर्नाक बंदरला बी.पी.टी कॉलनीत राहत होते. अगदी बाबांच्या गोदी समोरच. बाबांचा कामावर जाण्याचा प्रवास अगदी चालत, दहा ते पंधरा मिनिटांचा. बाबांना शिफ्ट ड्युटी असायच्या.
माझे बालपण अगदी पहिली ते सातवी पर्यंतचे याच ठिकाणी गेले. बालपणातले अनेक किस्से आठवले की, तिथली ती इमारत, त्यात राहणारे आमचे शेजारी, इमारती मागचे मोठे मैदान, नि फुटपाथवर बसलेले कामगार, इराण्याचे हॉटेल आणि माझी जनाबाई म्युनिसिपल प्राथमिक शाळा. आजही डोळ्यासमोर येते. माझी जडण घडण अश्याच कलाकृतीतून घडली आहे.
बाबा तसे शिस्तीचे. आमची खोली नंबर एक, तळमजल्यावर. समोरच मालगाडी रेल्वे फाटक होते. गोदीतुन घड्याळाचे भोंगेही स्पष्ट ऐकू यायचे. बाबा कामावर गेले की, आम्ही स्वच्छंदी फुलपाखरू व्हायचो. खेळांना, मस्तीला सुरुवात व्हायची. आमची इमारत तळ मजला प्लस चार मजल्यांची होती. जिने भरभर चढणे नि उतरणे, हा आमचा नियमित खेळ होता. मग कधी कपड्यांचे चाप घेऊन त्याला दोरा बांधायचा आणि एकाने त्याचे टोक घेऊन दुसऱ्या- तिसऱ्या मजल्यावर जायचं. बाकी मुलांनी तळ मजल्यावर तो चिमटा घेऊन राहायचं. बिचारे पांढरी टोपी घातलेले कामगार निवांत बसलेले असायचे, तर कधी पेपर टाकून झोपलेले असायचे. हळूच जाऊन तो चिमटा त्यांच्या टोपीला लावायचा आणि मग धूम पळत वर जायचं. तोवर टोपी वर ओढून आलेली असायची. हा खेळ त्यावेळी मजेशीर वाटायचा. पण आज, तो गुन्हा वाटतो.
गोटया खेळणे म्हणजे डबेच्या डबे भरून गोट्या जिंकायच्या आणि मोकळ्या वेळेत सर्व गोट्या ओतून वेगवेगळ्या रंगाच्या टपोऱ्या व गुळगुळीत रंगाच्या शोधून त्या विलग करायच्या, हा तर आमचा आवडता छंद होता.
मुलांसाठी बीपीटीतर्फे वार्षिक नाचाचे उपक्रम चालवले जायचे. त्यावेळी आम्हा मुलांना संध्याकाळी एक ट्रेनर येऊन नाच शिकवायचे. मला चांगलं आठवतंय, “किती-सांगू-मी-सांगू-कुणाला” तसेच “वल्लव रे नाखवा वल्लव वल्लव” व एक आदिवासी जीवनावरच्या गाण्यावर, अशी अनेक गीतांवर, सतत चार-पाच वर्षे आम्ही नाडकर्णी पार्कमध्ये येऊन हे प्रयोग करत असू. कधी पहिला तर कधी दुसरा क्रमांक, आम्हाला मिळत असे. तो आनंद आज डोळे भरून आणतात. ह्यातूनच जिद्द, ध्येय व जिंकणे असे गुण अंगी भिनले.
माझा आवडता खेळ होता, क्रिकेट व डॉजबॉल. त्यावेळी आम्ही मुलींनी बॅट- बॉल व स्टंम्प हे सर्व साहित्य आमचे खाऊचे पैसे साठवून खरेदी केले होते. रोज एक- दोन तास आम्ही या खेळांचा सराव करत असू. कॅप्टनशिप नेहमी मीच करत आले. त्यावेळी पँट घालणे म्हणजे दिव्य होते. त्यामुळे परकराच्या आत पॅन्ट घालायची व वरती शर्ट घालायचा. जिथे मॅच असेल तिथे जाऊन फक्त परकर, खेळा पुरता काढून ठेवायचा. बहुतेक सामने आमचे कुठल्या ना कुठल्या गच्चीवरच व्हायचे कारण मुलींना मैदानात खेळताना (हा खेळ) कुणी पाहिलं तर घरी काय खैर नव्हती.
सायकल भाड्याने आणायची, अर्धा तास आमच्या मैदानातच, जेव्हा तिथे मुले नसतील, तेव्हा मनसोक्त फिरवायची. दुसरा आवडीचा खेळ म्हणजे टायर फिरवणे. जाडसर लोखंडी शिग घेऊन त्याला टोकाला वळवलेली असायची. मग टायरला लावून मस्त टायर पडत नाही तोवर फिरवायचा.मनसोक्तपणाचा आनंद इथेच मला गवसला.
आमचे शेजारी जोशी, फडके, तावडे, साळवी, कुरले, सावंत. तर माझ्या मैत्रिणी मीना, देवयानी, नंदा अगदी जीवा भावाच्या. जोशींच्या घरातले मुलगे त्यावेळचे दादा. त्यामुळे कधी ना कधी त्यांच्या इतर बाहेरील मुलांशी भांडणे असायची. त्यावेळी पोलिस यायचे. खूप भीती वाटायची. एकदा तर माझा मामे भाऊ, चुलत भाऊ व माझा भाऊ नेहमीप्रमाणे खोलीच्या बाहेरील व्हरांड्यात झोपले होते, आणि अशीच एक घटना झाली आणि सरसकट त्यांनाही पोलीस घेऊन गेले. एकच गोंधळ उडाला होता. ओल्या सोबत सुके जळत, अशी स्थिती झाली होती.
रविवारी आमच्या मुलींचा एक खास बेत असायचा. रोज शाळेला जाताना मिळत असलेले पैसे ‘भिशी’ प्रकारे आम्ही साठवून ठेवत असू. त्या पैशातूनच डॉकयार्ड रोडला एक सिनेमागृह होते, ते तसे आम्हाला जवळ होते. बसने जावे लागत असे. प्रवास तसा एक मार्गी सरळ होता. मग तीन ते सहाचा सिनेमा आम्ही महिन्यातून एकदा पाहायचो. त्यावेळी सिनेमाचे तिकीट तीन रुपये व पाच रुपये असे. तेवढे पैसे जमा करणे म्हणजे आम्हा मुलांसाठी खूप जबाबदारीचे काम वाटे. आर्थिक व्यवहारीपणाची प्रवृत्ती ह्यातून अंगी रूजली.
वाडीबंदरला कामगार कुटुंबासाठी बीपीटी तर्फे दवाखाना होता. कधी सर्दी- खोकला किंवा ताप आला की आई मला त्या दवाखान्यात नेत असे. औषध सगळी चांगलीच मिळायची. पण मला मात्र वेध असे, तिथे मिळणाऱ्या टॉनिक बाटलीचे. पण डॉक्टर कधी मला ती देत नसत. का कुणास ठाऊक ? पण मग मी हट्ट करून ती आईला घेण्यास सांगत असे. तेव्हा ते डॉक्टर म्हणत, “तुमची मुलगी सुदृढ आहे, तिला या टॉनिकची गरज नाही. कुपोषित मुलांसाठी आहे हे टॉनिक.” तेव्हा मला राग यायचा पण मनातून आनंदही व्हायचा कारण मी एवढी कडकी(अंगाने बारीक) असूनही, फिट होते.
ईराण्याचे हॉटेल म्हटले की चहा बिस्कीट खाण्याचे मोकळे ठिकाण. पण या हॉटेलचे एक वैशिष्ट्य होते. तेथे मिळणारा केळीच्या पानावरचा पिवळसर मऊ शिरा. हा शिरा खासकरून माझ्या भावासाठी कित्येक वेळा आमच्या घरी येत असे. मी मात्र गादीवर जाऊन, दहा पैशाची मारी बिस्कीट आणून, मस्त बशीत ठेवून त्यावर चहा ओतायचा. नि मग बिस्किट फुगली की चमच्याने त्याचे केक सारखे तुकडे करून खायचे, कारण त्यावेळी केक हा प्रकार माहितच नव्हता. खाण्यावरून स्वतःला, हट्टीपणापासून नेहमी दूर ठेवण्यास मी शिकले.
त्यावेळी गावी जाण्याचा योग फार कमी यायचा, पण मी मात्र बहुतेक वेळा चुलते म्हणजे दादांसोबत व अण्णांसोबत तर कधी काकांसोबत गावी जात असे. भाऊच्या धक्क्यावरून गावाकडे जाणारी बोट सकाळी नऊ- दहाला सुटत असे. खूप मज्जा यायची. बोटीत मस्त फिरायला मिळायचे पोटभर जेवणाची थाळी असायची आणि झोप लागली की हात पाय पसरून, झोपायलाही मिळायचं. प्रवासाचा बिलकुल क्षीण वाटत नसे. बोटीच्या कडेला उभं राहून, बोटीने मागे टाकलेल्या मोठमोठ्या लाटा पाहताना मन सुखावून जात असे. विजयदुर्गला बोट आली की भोंगा देत असे. किनाऱ्यालगत पाण्याची पातळी कमी असल्याकारणाने बोट धक्क्यापासून खोल पाण्याच्या पातळीवर दूर थांबत असे. मग मोठाली होडी येऊन शिडी लावली जात असे. बाजूला चार माणसे उभी राहत असत. नंतर दोराला पकडून माणसांना त्या हेलकावणाऱ्या होडीत सोडत असत. आताच्या पिढीला बोटीचा प्रवास दुर्मिळच.
थोडक्यात काय ? तर बालपणीचे स्वच्छंदी, मनसोक्त, आनंदी जीवन परत मिळणे अशक्य. आताच्या काळातील मुलांना हे स्वच्छंदी आयुष्यच नाही. सगळं त्यांचं घड्याळ्याच्या काट्यासोबत चालत असतं. जणु त्यांच्या मनाला घड्याळ्याचे काटे लावले आहेत.
नका बांधू पाशाचे दोरखंड त्यांच्या पायी ! जगू द्या त्यांना मोकळेपणाने ! अख्ख आयुष्य पडलय त्यांच्यासमोर ! त्यांच्या आयुष्याचे समीकरण नका करू !
खेळातूनच जीवनाचा एक धडा तयार होत असतो. आणि तोच त्यांना शिकवत असतो. पुस्तकी ज्ञान हे पाठांतराचे रूप आहे, तर अनुभव व प्रात्यक्षिक भविष्याची घडण आहे.

– लेखन: वर्षा भाबल.
– संपादन: अलका भुजबळ. 9869484800.
भाबल मॅडम तुमच्या बालपणीच्या आठवणी खूपच मजेशीर आहेत. उर्वरित भाग लवकरच वाचायला मिळतील अशी अपेक्षा करतो.👌
🙏
एम. बी. आरोटे