Friday, November 22, 2024
Homeलेखजीवन प्रवास - भाग - १२

जीवन प्रवास – भाग – १२

साकव
मुलीला चांगलं सासर असावं अशी प्रत्येक मुलीच्या मात्यापित्यांच्या, काळजातली कणव असते.आई- वडिलांसारखे समजून घेणारे, आधारासाठी सासू-सासरे असावेत. बहिणी सारखी मायाळू, मैत्रीण अशी नणंद असावी. भावासारखा खोडकर, पाठीराखा, धीरवान दीर असावा. मीही ह्याच भावना मनात साठवून, भाबल परिवाराचा एक हिस्सा झाले होते.

लग्नानंतर असे माणसांनी भरलेले सासर, मला मात्र लाभले नव्हते. आमचा विवाह, आमच्या दोन्ही कुटुंबांना अमान्य होता, त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून मांडलेले संसार- धेय्य म्हणजे, माहेर व सासर हया दोन्ही नात्यांना प्रेमभरीत विश्वासाने जोडणे व स्व:भरारीने आमचा प्रेमविवाह सफल करणे, हे उद्दीष्ट आम्ही मनोमनी पक्के केले होते.

आमच्याशी कधीतरी कडवेपणाने वागलेले आमचे शेजारी, काही महिन्यातच आमच्यासाठी मित्राच्या नात्यापेक्षा, कुटुंबातील आपण सारे सभासद, असे परिवारीक नात्यात गुंफले गेलो होतो.

तन-मन-धन, तिन्ही गोष्टींना उदारता पूर्वक वाहून, माझे पती (महेंद्र) नेहमीच सर्वांना मदतीचा आधार देत होते. आजूबाजूच्या मुलांमध्ये एक आदरणीय भावना आमच्या प्रति, त्यांच्या मनी प्रतिमा तयार झाली होती. प्रेमाने प्रेम मिळते, हा स्वभाव गुण आजही, माझ्या पतीच्या अंगी ठासून भरलेला आहे.

एखादा भयंकर प्रसंग मनाला चटका लावून जातो. असाच अनुभव आम्हाला मिळाला होता. आमच्या समोरील चाळीत, पाटणकर कुटुंब राहत होते. त्यांच्यावर कोसळलेला प्रसंग, आम्ही कधीच विसरू शकत नाही.श्री. पाटणकर बीएमसी मध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत, सफाई कामगार म्हणून काम करत होते. क्लासच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा मुलगा मंगेश आवडीने भाग घेत असे. कॅरम खेळात चांगलाच हुशार होता. जेमतेम तेरा चौदा वर्षाचा होता. “जो सर्वांना आवडे तोचि देवाला आवडे” अगदी असेच त्याच्या बाबतीत घडले होते.

काही महिन्यांपूर्वी मंगेश आजारी होता. दिवसेंदिवस त्याची प्रकृती ढासळत होती. के.ई.एम.इस्पितळात उपचार घेवून सुद्धा, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर त्याच्या सर्व चाचण्या टाटा इस्पितळात पाठविण्यात आल्या होत्या, आणि तिथे त्याच्या ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते. ऐकताच काळजाचे पाणी पाणी झाले होते. त्याच्या घरचे पार गळून गेले होते. त्यावेळी आम्ही दोघांनी, त्या कुटुंबाला धीराने उभे केले होते. त्यांच्यासोबत अनेक वेळा टाटा हॉस्पिटल मधे बरीच धावपळ केली होती. आमच्या सकारात्मक बोलण्यातून मंगेशची इच्छा शक्ती वाढली होती. त्यामुळे आमच्या आधाराने, एक प्रकारचे बळ त्याला मिळू लागले होते.

त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता, उपचाराकरता काही पैशांची गरज होती. माझ्या पतीनी पुढाकार घेवून, आजूबाजूस शेजारील लोकांसमोर ही समस्या मांडली होती. ‘आपल्या नगरात ही अशी कॅन्सरची पहिलीच केस झाली आहे, लहान मुलगा आहे, त्याच्या औषधोपचाराला हातभार लागावा म्हणून, आपण सर्वांनी मिळून आर्थिक मदत करणे, हा आपला शेजारधर्म आहे. त्यावेळी महेंद्र यांनी प्रत्येकाच्या घरी, वैयक्तिक जाऊन आर्थिक मदत गोळा केली होती. ह्या कार्याने आमच्या चाळीला एक नवीन ओळख मिळाली होती.

नियमित चेकअप व औषधे घेऊन मंगेश चांगला बरा झाला होता. ह्याच दरम्यान आमच्या क्लासच्या पिकनिकचा उपक्रम होता. हट्टाने तोही हया पिकनिकला आला होता. पण ही पिकनिक त्याच्यासाठी मात्र शेवटची ठरली होती. आजही ती पिकनिक आठवली की, त्याने आनंदात लुटलेले पिकनिक मधील ते क्षण, डोळ्यासमोर उभे राहतात.

सन १९९६, दुसऱ्या बाळासाठी आम्ही विचार केला होता. माझी नणंद कल्पना हीचे लग्नही ठरले होते. ह्या कारणाने का होईना, सासूने आम्हाला या कार्यक्रमाचा कानोसा दिला होता. त्यामुळे कुठेतरी मनाला खूप बरे वाटले होते. महेंद्र यांच्या मूळ घरी जाऊन, लग्न तयारीच्या कामात लक्ष घालावयास मिळाले होते. १० मे १९९६, मुहूर्त दिवस मिळाला होता. मी त्या वेळी सात महिन्यांची गरोदर होते. त्यामुळे यजमानपण व इतर विधी करण्यास आम्हाला शक्य नव्हते. पण कुटुंबाच्या पहिल्या कार्यात सहभागी होता येणार, हया आनंदात आम्ही दोघेही खूष होतो. माझे चुलत सासरे (बबन नाना) यांच्या, कल्याणच्या घरी लग्नाचे आयोजन केले असल्याने, आम्ही सकाळी लवकरच कल्याणला गेलो होतो. लग्नात प्रथमच मी आंबेरी (सासर) गावांमधील भाबल कुटुंबियांस व इतर जवळील आप्तेष्टांना भेटले होते. “ही माझी सून” अशी सासूनी करून दिलेली ओळख, खूप आपुलकीची वाटली होती.

लग्नसोहळा आटोपून आम्ही रात्री नऊला घरी आलो होतो. त्यावेळी चाळीचा पूर्ण आवार सामसूम, नि:शब्द भासला होता. सर्व महिला घरासमोरील पायऱ्यांवर बसलेल्या होत्या. काहीजण नारळाच्या झाडाखाली बसलेले होते. तर काही आजूबाजूला घोळक्याने उभे होते. क्षणभर सारे पाहून मन दचकले होते. थोड्यावेळाने कळलं, की मंगेश पाटणकर गेला ! मनात धस्स झाले, डोळे भरून आले, हसता-खेळता डोळ्यासमोरील एक मुलगा जावा! मनाला पटतच नव्हतं. त्यांच्या घरी गेलो, रडणे आवरतच नव्हते. कुणीतरी समजावलं, ‘तुम्ही स्वतःला आवरा मॅडम, दोन जीवांच्या आहात तुम्ही’. त्याची आई रडत सांगत होती, ‘सकाळी तुम्ही गेल्यापासून, त्याची तब्येत बिघडत गेली होती. सारखा सांगत होता, सर आणि मॅडमला बोलवा. त्यांना सांगा, मला हॉस्पिटलला घेऊन चला.’ हे ऐकून तर खूपच वाईट वाटले होते. कधीही विसरू न शकणारा, हा शेजार कुटुंबातील दुःखद प्रसंग होता.

१० मे हा दिवस आमच्यासाठी नणंदेचा लग्न दिवस, तर मंगेशने सर्वांना सोडून दूर जाण्याचा दिवस ! दरवर्षी तो दिवस, त्या प्रसंगाची आठवण करून देतो.

माझ्या प्रसूतीचे दिवस जवळ येऊ लागले होते. मनात इच्छा होती, होणारे बाळ मुलगा असावा. १९ जुलै १९९६ ला आम्ही कन्या प्राप्तीने दुसऱ्यांदा आई-बाबा झालो होतो. याप्रसंगी आमची आर्थिक परिस्थिती चांगली होती. पण नकळत आठ वर्षापूर्वी अश्याच प्रसंगाला सामोरे जाताना,मिळालेल्या अनुभवाचे चित्र, क्षणभर डोळ्यासमोर येऊन गेले होते.

आनंदाची गोष्ट म्हणजे या प्रसंगाने माझे सासर मला मिळाले होते. इस्पितळात मला भेटण्यासाठी माझी सासू आली होती. मला या गोष्टीचा खूप आनंद झाला होता.

हॉस्पिटलमधून घरी नेण्यासाठी माझा दीर गजानन, स्वतः बाळाला हातात घेऊन, भर पावसात मला घरी घेऊन आला होता. इतक्या वर्षानी, आमच्या नात्यातील तुटलेला जिव्हाळा, त्यावेळी अतूट बंधाच्या साकवाने जोडला गेला होता. आणखीन काय हवं ?

दुरावलेले सासर, आंघोळ घालण्याच्या निमित्ताने, माझ्या सासू, मला मिळाल्या होत्या. मनात खूप साठवून ठेवलेल्या गोष्टी, मनमोकळेपणाने आम्ही मांडू लागलो होतो. मागचं सगळं विसरून मनाने अगदी जवळ आल्यासारखं वाटत होतं. दुखावलेली सासरची मने, माझ्या माहेरच्या माणसांच्या मनात मिसळू लागली होती. सासर-माहेर ही अनुभूती, मनाला उल्हासित करत होती.

प्रभादेवी एक्स्चेंजला शिफ्टड्यूटी असल्याने, माझी नोकरी मला सावरता येत होती. ह्याच दरम्यान आमच्या कंपनीचे “बॉम्बे टेलिफोन” नामांतर होवून, सर्व स्टाफ “एमटीएनएल” नामाने कार्यरत झाला होता. त्यामुळे वेतनश्रेणीत वाढ होऊन, आयुष्यातील अनेक सुखे साकारण्यासाठी, माझ्या कंपनीचा मोठा वाटा आहे. आमचे प्रत्येक कार्यालय वैभवाच्या रेखीव मखरात साकारून, अनेक उपक्रम राबवू लागले होते. पूर्ण शहरभर टेलीफोन, पेजर, इंटरनॅशनल कॉल्स, लोकल कॉल्स, स्पेशल सर्विस अशा अनेक कामांचे जाळे पसरून, आमची कंपनी नवरत्नात झळकत होती.

मुलं लहान असताना मला आलेला अनुभव, मुद्दाम इथे मला सांगावासा वाटतो. आधुनिक पिढी, चाळ पद्धतीत राहणे पसंत करत नाहीत. त्यांना फ्लॅटमध्ये राहणे जास्त आवडते. पण चाळीत मिळणारी एकोप्याची मजा, प्रेमाचा ओलावा, हाकेवरील मदतीचा हात, आपणास कधीच फ्लॅटमध्ये मिळत नसतो. प्रत्येकजण स्वतःच्या फ्लॅटच्या दरवाज्या प्रमाणे, मनाची कवाडे बंद करून जगत असतो.

आमचा हा झोपडपट्टी विभाग असल्याने, येणारी पत्रे किंवा काही महत्त्वाची कागदपत्रे नियमित वेळेत मिळत नसत. कधी-कधी तर गहाळ होत असत. ही गोष्ट विचारात घेवून, आमच्या आजूबाजूच्या सहा चाळीना एकत्र आणून महेंद्र यांनी आपल्या कल्पनेतून या ग्रुप चाळीला “शिवनेरी चाळ” असे नाव दिले. समोरच्या भिंतीला पत्रपेटी बसवून घेतली. त्यानंतर, नियर सोनाली क्लासेस, शिवनेरी चाळ, हया पत्त्याच्या आधारे, आसपासच्या लोकांची पत्रे या पेटीत पडू लागली होती. सर्वांसाठी ही केलेली छोटीशी सोय, फायदेशीर ठरली होती.

नगरवासियांना एकत्रित आणण्यासाठी, दहिकाला या उत्सवाच्या निमित्ताने, पटांगणात “नवतरुण मित्र मंडळ” मार्फत महेंद्र यांच्या पाठिंब्याने, दरवर्षी दहीहंडी बांधली जात असे. बाहेरून येणाऱ्या दहीहंडी पथकास, हंडी फोडल्यानंतर महेंद्र सर, जीवन प्रवासाचा ग्वाही कल्पवृक्ष, याचे श्रीफळ देऊन, अगत्याने त्यांचा सत्कार करत असत.

जीवन प्रवासातील खडतर आयुष्य सोपे करत, लग्नगाठीचे आयुष्य, सन १९९८ पर्यंत येऊन पोहोचले होते. हा दिवस आला की आमच्या लग्नाचा दिवस डोळ्यासमोर उभा राहतो. आमच्यासाठी हा दिवस आनंदाचा होता. पण आमच्या दोन्ही कुटुंबियांसाठी अविस्मरणीय दुःखद हादरा देणारा होता. दहा वर्षात आम्ही दोन्ही कुटुंबांना एकत्र आणले होते. त्यात आमचा लग्न वाढदिवस साजरा करून आम्हाला विरजण घालायचे नव्हते. त्यांच्या मनाला दुखवायचे नव्हते. सर्वांना एकत्र घेवून पुढे जायचे होते. त्यामुळे या दहा वर्षात आमचा लग्न वाढदिवस आम्ही कधीच साजरा केला नव्हता. तो दिवस फक्त आम्हा दोघांना लाभलेला अतूट आयुष्याचा, खास दिवस होता.

वर्षा भाबल.

– लेखन : सौ वर्षा भाबल
– संपादन : अलका भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments