पोरके दारिद्रय
जीवनात दोघांनी मिळून ठरवलेले ध्येय पूर्णत्वाकडे नेण्यासाठी, आम्हा दोघांच्या प्रयत्नांची घोडदौड वेगाने सुरू होती.
उपजीविकेसाठी पदरी असलेली नोकरी, ज्ञानाच्या दानात उभा केलेला क्लास, त्यातूनही आर्थिक मदत मिळत होती. हया ज्ञान दानाच्या परिचयातूनच, आम्हाला मिळत गेलेली सन्माननीय ओळख, त्यातूनच समाज कार्यासाठी लागणारा आमचा खारीचा हातभार, अश्या सर्व धावपळीच्या कामासाठी आम्हाला मिळणारा वेळ, अपुरा पडत असे. वेळेचे नियोजन करण्यासाठी आम्ही पहिली सेकंड हॅन्ड दुचाकी स्कूटर, यांचा मित्र प्रशांत सावंत यांच्या मदतीने खरेदी केली.
देवरूपी लाभलेली व्यक्ती म्हणजे प्रशांत सावंत होय. व्यक्ती अतिशय प्रामाणिक नम्र व व्यवहारी. प्रत्येक गोष्टीतील हया व्यक्तीचा डोळसपणा अगदी वाखाणण्याजोगा आहे.
या दुचाकीचीही एक अतिशय मार्मिक घटना आहे. प्रशांत सावंत यांच्या कॉलनीतील त्यांच्या मित्राची ती दुचाकी होती. त्या मित्राने नवीन दुचाकी घेऊन, जेमतेम तीन-चार महिने उलटले होते. दुर्दैव ! या गाडीवरून त्या मित्राचा अपघात होऊन ती व्यक्ती गेली होती. तीच गाडी आम्ही खरेदी केली होती. गाडी तशी नवीनच होती. गाडी चालवण्याचे प्रशिक्षण माझ्या पतीनी प्रशांत सावंत यांच्या कडूनच घेतले होते. ज्या दिवशी व्यवहार करून, गाडी आमच्या घरासमोरील रोडवर आली तेव्हा, प्रशांत सावंत यांनी मला गाडीवर मागे बसवून, स्व: वाहनाच्या आनंदाची अनुभूती दिली.
त्यानंतर हया गाडीवरील अनेक किस्से, आम्ही दोघांनी अनुभवले. लर्निंग ड्रायव्हर एकटाच गाडीवर बसू शकतो, असा नियम आहे. पण गाडीचे प्रचंड वेड असलेले माझे पती, मला सोबत बसवून गाडीवरून दादर टी टी च्या, आतील रस्त्याने गाडी काढत रोज मला प्रभादेवी एक्सचेंज कार्यालयात सोडत व घ्यायलाही येत असत. ट्राफिक पोलीस दिसला की मी, गाडीवरून उतरून पुढे चालत जात असे. असे गमतीदार प्रकार आठवून, आज ते दिवस डोळ्यासमोर उभे राहतात.
कितीतरी वेळा अचानक ब्रेक दाबताच, आम्ही दोघंही गाडीवरून, कित्येकदा पडलो आहोत. कधी थोडं खरचटलं होतं तर, कधी नुसते आपटलो होतो. ज्या ज्या वेळी हे घडत असे, त्यावेळी आमचे शेजारी लगेच घरी येत. विचारपूस करून, माझ्या शेजारील मैत्रिणी मला औषध सुद्धा लावून देत असत. काळजीपोटी सल्लाही देत असत.
माझी आई घाबरून नेहमी आम्हाला सांगत असे की, “गाडी कश्याक होई, बशी हत ना ! उगाच जीवाक घोर. तुमची रोजचीच घाय !” आजही तिच्या फोटोकडे पाहिले की, तिचे ते शब्द, त्या प्रसंगांची आठवण करून देतात.

तरुणाई माणसाला अश्या प्रसंगांची भीती वाटू देत नाही. आपण करतो ते योग्य आहे, हया संभ्रमात तो वावरत असतो. पण आज कळतं. कारण आम्ही आज त्यांच्या वयाएवढे होत आहोत, त्यामुळे मुलांच्या भिडस्त स्वभावाला व वागण्याला काळजीपोटी, त्यांना आवरणे प्रत्येक पालकांचे कर्तव्य आहे.
अपघाती वाहन कधी खरेदी करू नये, असे म्हणतात. कारण त्यात त्या माणसाची, अतृप्त आत्म्याची साया असते. त्यामुळे खरेदी करणाऱ्यांस धोका होऊ शकतो. पण खरं सांगते ! आमच्या या गाडीने कितीतरी वेळा आम्हाला नेहमीच सावरले व वाचवले होते. त्यामुळे माझे पती नेहमी या गाडीवरून प्रेमाने हात फिरवत, म्हणत असत, “माझ्या गाडीला आपली खूप काळजी आहे.”
सन १९८३ पासून मी प्रभादेवी स्पेशल सर्विस मध्ये कार्यरत होते. खूप मोठा महासागर होता. आम्ही खूप मैत्रिणी होतो. त्यावेळी आमच्या गोडबोले मॅडम सुपरवायझर होत्या. त्यांच्यातील तो दरारा, आजही आठवतो ! न बोलताच डोळ्यात दिसणारी त्यांची वचक, साऱ्या स्टाफला नियमात ठेवत असे.
सन १९८५ मध्ये पर्मनंट झाले नि सर्विस मध्ये नवनवीन टेक्निकल संकल्पना विकसित होऊ लागल्या होत्या. त्यावेळी काउंटरवर दर महिन्याला मिळणारा पगार, इन्सेंटिव्ह खूपच आनंद देवून जात असे. कॉल लावण्यावरून व कॉल अटेंड करण्यावरून, दरमहा तीन नावे बोर्डावर लिहिली जात असत. त्यावेळी होणारी चढाओढ म्हणजे, लवकर ऑफिसला येऊन चांगला बोर्ड मिळवायचा, त्यामुळे त्या बोर्ड वरून पटापट कॉल्स कनेक्ट होत असत. काम केल्याचे समाधान मिळत असे.
नाईट शिफ्टला एखादी विक्षिप्त व्यक्ती, पीसीओ वरून, वारंवार विचित्र शब्दांत बोलून त्रास देत असे. मग ती तक्रार वहीत लिहून ठेवली जात असे. त्यावर पुढे शोध मोहीम सुरू व्हायची. हळूहळू हा त्रासही कमी होत असे. कधी पेजरवर काम केले, तर कधी तिसऱ्या मजल्यावरील डिमांड सेक्शन मध्ये जाऊन कॉल्स लावले. त्यावेळचा तो पीपी म्हणजे पर्टिक्युलर पर्सन, हा कॉलम अतिशय महत्त्वाचा असे.
शेवटी डिरेक्टरी सेक्शन मध्ये काम केले. येथे चुकीचे नंबर शोधून, ते डिलीट केले जात असत व नवीन नंबर क्रिएट केला जात असे. इथेच मला भेटलेल्या माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणी म्हणजे वंदना सावंत व मंगल नलावडे.
सन १९९९ मध्ये आमची सर्वांची पहिली ट्रान्सफर ऑर्डर, झोनप्रमाणे काढण्यात आली होती. माझी नियुक्ती वरळी टेलिफोन एक्स्चेंज येथे झाली होती. महासागरातून आमची सर्वांची ताटातूट झाली होती.
एसडीई श्री.गाडे सर, यांच्या नेतृत्त्वाखाली मी टेस्टरूम मध्ये कार्यरत झाले होते. तेथील काम व सर्व स्टाफ माझ्यासाठी नवीन होता. हळूहळू कामाची पूर्ण ओळख झाली होती. स्टाफ मधे मैत्रीचे बंधही घट्ट होवू लागले होते. इथे मला मिळालेल्या मैत्रिणी म्हणजे, वृंदा, नयना व चित्रा.
वरळीत अनुभवलेली पहिली वार्षिक पूजा, माझ्या साठी नावीन्यपूर्ण होती. त्यावेळी तिथे थाटलेला तो सांस्कृतिक कार्यक्रम, खूपच मनोरंजक होता. सूत्रसंचालक श्री. गाडे सर, ह्यांच्या काव्यरचना ऐकण्यास मिळाल्या होत्या. नृत्य प्रदर्शन खूपच मनोरंजक वाटले होते.
हया नृत्यात मी प्रथमच, न्यूजस्टोरीटुडे च्या आजच्या संपादक सौ. अलका भुजबळ ह्यांना पाहिले होते. हळू हळू अलकाच्या विविध क्षेत्रातील कार्याची तळमळ व निष्ठा दिसून येत होती. खरंच, अलका, तीच जिद्द आजतागायत तू तेवत ठेवलीस. ‘कॉमा’ पुस्तकाची लेखिका, तर कँसर सारख्या आजारावर मात करून, हया आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना, लढण्यास बळ देण्याचे उत्तम सहकार्य, तिने हल्लीच तिच्या मुलाखती द्वारे सर्वांपर्यत पोहचवले आहे. श्री. देवेंद्र भुजबळ सर व माझी प्रिय मैत्रीण, संपादिका सौ. अलका भुजबळ, या उभयतांनी स्व:ताच्या न्यूजस्टोरीटुडे पोर्टल द्वारे माझ्या सारख्या नवोदित लेखकांस वाचकांसमोर आणले. खूप खूप आभारी आहे.
आपल्याच घरातील कार्य समजून, वरळीतील प्रत्येक स्टाफ, कामांना हातभार लावत असे. त्या सर्वांचा एकोपा पाहून वरळी म्हणजे एक कुटुंब आहे ही जाणीव मला तिथे मिळाली होती.
सार्वजनिक कार्यक्रम आमच्या चाळीच्या शेजारील पटांगणात, माझ्या पतीच्या अध्यक्षतेखाली साजरे होत असत. त्यातील पहिला उत्सव ‘होळी’, या उपक्रमास सुरुवात झाली होती. हया उत्सवाच्या वेळी, माझी आई आवर्जून आमच्याकडे चार-आठ दिवस राहायला येत असे. त्या उत्सवात पूजेच्या विधी व त्या बद्दल बरीच माहिती, माझी आई देत असे. म्हणूनच नेहमी जेष्ठ व्यक्ती आपल्या घरी किंवा आसपास असावी. होळीच्या त्या रात्री, माझ्या पतींची होणारी घाई पाहून, माझी आई नेहमी म्हणत असे, ‘गावचो पाटील हा ह्यो !’ ते कौतुकाचे चार शब्द ऐकून, माझे पती खूप खूष होत. आजही ते होळी हया सणाच्या दिवशी, माझ्या आईची आठवण, आवर्जून काढतात. मनापासून म्हणतात, ‘जावयाचे लाड करणारी फक्त सासूच असू शकते’.
दुसरा उत्सव दहीहंडीचा साजरा होत असे. दहीहंडीच्या दिवसा अगोदर, ‘सलामी’ नामक कार्यक्रम आयोजित होत असे. मानाने, बाहेरील दहीहंडी पथकांस, आमंत्रित करून त्यांना दहीहंडीसाठी थर लावण्याचा मान दिला जात असे. त्यावेळी आमच्या वॉर्डच्या नगरसेविका सौ. तृष्णा विश्वासराव, सौ.प्रेसिला कदम, श्री.अनिल कदम, दत्ताजी शिंदे, शाखाप्रमुख श्री. शरद गावकर, अशा मान्यवर व्यक्तींना आमंत्रित केले जात असे.

त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या हस्ते दहीहंडी पथकांना सन्मानित केले जात असे. त्यावेळी नगरातील प्रत्येक कार्यक्रमात, माझे पती सूत्रसंचालन करताना, उपस्थित श्रोत्यास हसवत ठेवत असत. आजही ते, उत्कृष्ट क्रिकेट कॉमेंट्री व सूत्रसंचालन उत्तम प्रकारे करतात.
प्रत्येक कार्यक्रमासाठी माझे पती महेंद्र, सढळ हस्ते मदत करत होते व आजही करत आहेत. कधी आर्थिक रूपात, तर कधी काही वस्तूंचे वाटप करून, कधी जेवणातील पदार्थास आर्थिक साह्य देत असत. आजही, जरी आम्ही नगरापासून दूर असलो तरी, आमच्या नगरास अशी मदत देण्यास कधीच विसरलो नाही.
आमचा फुलत असलेला संसार पाहून माझी आई खूप आनंदात दिसत होती. मुलांच्या सुखात स्वतःचे सुख शोधणारी म्हणजे आई ! तिला मुलांकडून कशाचीच आस नसते. तिला हवे असते फक्त मुलांचे प्रेम व त्यांचे सुख !
माझा होत असणारा उत्कर्ष, आईला सुखावत होता. आम्ही चारही भावंडे जवळच राहत असल्याने, तिच्या डोळ्यात नेहमी आनंद दिसत असे. आमचा एकोपा, तिला समाधानाचे सुख देत असे. माझ्या बहिणींची, तिला जास्त काळजी लागून राहत असे. कारण मोठे भावोजी हयात नव्हते, तर दुसऱ्या भावोजींची नोकरी गेली होती. त्यामुळे बाबांच्या मागे, तिला मिळणारी पेन्शन दर सहा महिन्यांनी, एकदाच भावासोबत बँकेत जावून काढून घेत असे. त्या रकमेचे चार भाग करून आम्हा भावंडांना देत असे. मुलं कितीही मोठी झाली तरी, आईसाठी तिची मुले तिला, नेहमीच लहान वाटत असतात.

आई ही सर्वांनाच हवीहवीशी वाटते, पण नियमानुसार कधीतरी ती आपल्या पासून दूर निघून जातेच. खूप वाईट वर्ष होते ते ! आईला बरं वाटत नव्हते. अंगात अशक्तपणा वाढू लागला, खाणेपिणे ती टाळू लागली होती. दोन चार दिवसात तिला बरे वाटेल असे आम्हाला वाटत होते. पण तिचे आजारपण वाढतच गेले होते. एवढा भयावह प्रसंग आला की, शेवटी माझ्या पतीनी तिला उचलून रोडपर्यंत आणले होते. इस्पितळात, तिचे बरेच आजार दृष्टीस पडले होते. काही गुप्त आजार तिने आमच्या पासून लपवून ठेवले होते. पण त्यावेळी तिच्या वयानुरूप, शस्त्रक्रिया करणे, अशक्य होते. हळूहळू ती मलूल पडू लागली होती. आम्ही तिघी बहिणी, वेळेचे नियोजन करत, तिच्या जवळ थांबत असू. काही दिवसात तिला घरी सोडले होते. थोडीफार ती आत-बाहेर फिरू लागली होती.
सन २०००, त्या दिवशी फोन खणखणला, संध्याकाळचा पाच-सहाचा वेळ होता. फोन कानी लावताच, भावाचे शब्द होते, ‘आई काहीच बोलत नाही, मी तिला बी पी टी इस्पितळात घेऊन चाललो आहे.’ आम्ही लगेचच इस्पितळात पोहचलो. आईला तत्पर सेवा गृहात ठेवले होते. मी आत गेले, उघड्या डोळ्यांनी ती जणू पहात होती. मी तिचा हात हातात घेतला. “आई” अशी तिला मी हाक दिली, पण ती काहीच बोलली नाही. तिला खूप हलवले, पण जराही ती हलली नाही. तिचा धरलेला हात खाली कोसळला होता. आम्हा मुलांना सोडून, तिने जगाचा निरोप घेतला होता.
आम्ही भावंडं त्या दिवशी, आईविना पोरके झालो होतो. पण तिने दिलेल्या तीन गोष्टी, मी जतन करत राहिले आहे. एक, कधीही विसरू शकणार नाही, तो आईचा प्रेमळ “स्पर्श”, दुसरे, काहीही घडो, भावंडात सदा एकोपा राखा, असे आईला दिलेले “वचन”, तिसरे, थोर माणसांशी “आदरणीय वर्तन” जपत राहा.

– लेखन : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : अलका भुजबळ, 9869484800
धन्यवाद! आरोटे सर, तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप खास आहे. असेच प्रेम माझ्या लेखास आपल्या कडून मिळत राहो.🙏
सुंदर लेखन, सुंदर आठवणी
🙏