Sunday, July 13, 2025
HomeUncategorizedजीवन प्रवास - भाग - १५

जीवन प्रवास – भाग – १५

सुख दु:खी आठवणी
“जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला”। आम्हा भावंडातील, मुलांमधील सर्वात मोठा भाचा विश्वनाथ   (बाळा) समजूतदार, कल्पक बुद्धीचा व सामाजिक कार्ये आवडीने करणारा, पण थोडासा हट्टी होता. लहानपणात त्याने केलेले अनेक उपद्व्याप म्हणजे, शाळेचा कंटाळा करणे ! पण सर्वांना हवाहवासा वाटणारा होता !

वयाने प्रौढ होताच त्याला, एका भयावह आजाराने गाठले होते. औषधांची हेळसांड, आळसपणा व चिडचिडेपणा या गोष्टींमुळे, त्याचे आजारपण वाढतच गेले होते. त्याने गाठलेला तो शेवटचा टप्पा, आजही माझ्या डोळ्या समोर, तसाच उभा राहतो.

त्या दिवशी त्याला खूपच धाप लागली होती. खूप अस्वस्थ झाला होता म्हणून त्या रात्री त्याला, आमच्या घरी आणले होते. पाण्याचा घोट घेण्यासही त्याला अवघड झाले होते. शेवटी आम्ही त्याला भायखळा येथील मसिना हॉस्पिटलला घेवून गेलो होतो. त्याची रिपोर्ट फाईल पाहून व त्याची प्रकृती तपासून, डॉक्टरांनी त्याला, हॉस्पिटलच्या आवारात एका कोपर्‍यात उभारलेल्या छोट्या इमारतीत, (जेथे  क्षयरोग्यांची काळजी घेतली जाते, असे ते दालन होते.) तेथे भरती करून घेतले होते. नातेवाईकांनाही त्या रुग्णांना भेटण्यास मनाई होती. गेटवर परवानगी घेऊन आम्ही दोघं, रोज सकाळ- संध्याकाळ त्याला भेटून येत असू. का कोण जाणे ! दोन- तीन दिवसानंतर तो पटकन आम्हाला म्हणाला होता, “मावश्यानू, आता माझा काय खरा नाय ! मी आता काय जगत नाय”!

त्याचे बोलणे ऐकताच माझे हात पाय थरथरू लागले होते. तो दिवस भयानक वाटू लागला होता. ऑफिसातही मन लागत नव्हते. वारंवार तोच डोळ्यासमोर येत होता.
त्याचे शब्द खरे ठरले होते !

रात्री दहाच्या सुमारास हॉस्पिटलमधून फोन आला. आम्ही एवढेच सांगितले होते की, “बाळाची तब्ब्येत जास्त खालावली आहे, म्हणून आम्ही हॉस्पिटलला निघालो आहोत.”
घाईघाईतच स्कूटर काढून आम्ही, हॉस्पिटलला पोहोचलो. नेहमीच्या दालनात, तो आम्हाला दिसला नव्हता. नंतर कळले की त्याला आयसीयुच्या शेजारील खोलीत नेले आहे. आम्ही दोघांनीही त्या खोलीत प्रवेश केला होता. डॉक्टर त्याच्या छातीवर विशिष्ट प्रकारे दाब देत होते. त्याने आम्हाला पाहून रडवेला चेहरा केला होता. तो हाताने नकारात्मक गोष्टीची आम्हाला चाहूल देत होता. खूप प्रयत्न करूनही त्याला श्वास घेता येत नव्हता. आमच्या डोळ्यादेखत त्याने आपला प्राण सोडला होता.

माझ्या विधवा बहिणीचा तरुण मुलगा, तिचा आधारस्तंभ तिने गमावला होता. ‘नवतरुण मित्र मंडळाचा’ हिरीरींने स्वतः च्या बुद्धीच्या शक्तीवर कामे आखणारा, होर्डिंगवर सुंदर अक्षरांनी लिहिणारा, एक चांगला चित्रकार मंडळाने गमावला होता. माझ्या संग्रहीत फोटोंचा, सुंदर अल्बम त्याने स्वतःच्या कल्पक बुद्धीने तयार केला होता. आजही माझ्याकडे त्याची आठवण म्हणून मी जपून ठेवला आहे.
क्लासचा लोगो, त्याच्याच कल्पनेतून त्याने तयार केला होता. त्याच्या जाण्याने आमच्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली.

मानवाच्या योगदानाने, असंख्य जीव वाचू शकतात. यासाठी आपण काहीतरी करावे असे माझे पती महेंद्र, यांच्या मनात कित्येक वर्षे घोळत असलेली खंत, घडवून आणण्याच्या प्रयत्नात ते होते.

अखेर, त्या योगदानाच्या पुण्याईचा अवसर, महेंद्र यांना गवसला होता. कै.विश्वनाथाच्या स्मरणार्थ, “नवतरुण मित्र मंडळ” व “सोनाली क्लासेस” आयोजित, “रक्तदान शिबीर” कार्यक्रमाचे आयोजन आमच्या पटांगणात
केले होते.

त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या, नगरसेविका सौ. तृष्णा विश्‍वासराव, माननीय दत्ताजी शिंदे, उपशाखाप्रमुख श्री. शरद गावकर व इतर मान्यवरांसमवेत, त्यांच्या हस्ते शुभारंभ केला होता. राबवलेल्या कार्यक्रमाची प्रशंसा करून, मंडळाचा कार्यकर्ता कै. विश्वनाथ यांस मौन राखून श्रद्धांजली वाहिली होती. रक्तदानाचा प्रारंभ माझे पती महेंद्र, यांनी स्वत: पासूनच केला होता. कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला होता. हया शिबिरास “लायन्स क्लब ट्रस्ट” माटुंगा हॉस्पिटलचे डॉक्टर व त्यांचा सेवाभावी स्टाफ, यांनी मोठे योगदान दिले होते.

अनेक वर्षे खितपत पडलेले आमचे शिवशंकर नगर, विकासाची स्वप्ने पहात होते.शिवशंकर झोपडी संघाचे अध्यक्ष हया नात्याने, नगराचा विकास घडावा,अश्या गोष्टींकडे महेंद्र यांचे लक्ष वेधू लागले होते. इतर सभासद सल्लागारांशी विचार विनिमय करत, चांगल्या कामाची जनजागृती ते करू लागले होते.

पाण्याची त्रुटी, शौचालयांची गैरसोय व विस्कळीत जनजीवन, सोयीस्कर व्हावे म्हणून झोपडी संघाच्या वतीने, “शिवशंकर नगर एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (नियोजित)” हया नावाने कागदोपत्री कामांना सुरुवात झाली होती.

प्रथम आलेल्या सुराणा बिल्डरने, अठराशे झोपडी धारकांसोबत, झोपडी कार्यालयाच्या पटांगणात खुली सभा घेतली. हे नगर ग्रीनबेल्ट आरक्षण क्षेत्रात येते, असे कारण पुढे करून, त्या बिल्डरने काढता पाय घेतला होता.

बिल्डर्स येत होते नि जात होते. कामात यश येत नव्हते. शेवटी न्यूमेक बिल्डरने आशेचा किरण दाखवला. झोपडी धारकांची कागदपत्रे जमा करण्यात आली. यावेळी माझे पती महेंद्र अध्यक्ष, मुख्य प्रवर्तक शिवाजी मर्ढेकर, चिटणीस विजय पाटील, खजिनदार जनार्दन बैकर अशी वीस जणांची, कार्यकारी कमिटी तयार करण्यात आली होती. कामाला जोमाने सुरुवात झाली होती.

न्यूमेक बिल्डरने झोपडीधारक कमिटी सभासद व माजी उपआयुक्त श्री. खैरनार यांना एकत्रित घेऊन पहिली सभा, सायन येथे, मानव सेवा संघ सभागृहात भरवली. बिल्डिंगचे प्लानिंग पुस्तक व प्रत्येक झोपडीमागे एक प्रतिनिधी म्हणून, आमंत्रित पत्रक वाटण्यात आले होते. सभेत प्रश्न- उत्तरांची देवाण-घेवाण शांतपणे पार पडली. नगरवासी स्वतःच्या मनात सुंदर घराचे स्वप्न पाहू लागले होते. मलाही उंच इमारतीत राहू लागल्याची स्वप्ने पडू लागली होती.

क्लासची जबाबदारी सांभाळत, बिल्डर्स सोबत वरचेवर होणाऱ्या सभा, यांमुळे क्लासची हेळसांड होऊ नये म्हणून, आमच्या क्लासची माजी विद्यार्थिनी शोभा चोडणेकर हिला, आम्ही क्लासवर नेमले होते. प्रथमच आम्ही दोघां व्यतिरिक्त, एक शिक्षक क्लासवर नेमला होता.

वरळी दूरदर्शन केंद्रात, टेस्टरूम मध्ये श्री. गाडे सरांची ट्रान्सफर ऑर्डर आली होती. त्यांच्या जागी एसडीई श्री. संतोष जाधव सर यांची नियुक्ती झाली होती. ओळख करून घेताना, प्रथम जाधव सर कठोर व शिस्तबद्ध असल्याचे आम्हाला जाणवले. ते शिस्तबद्ध होतेच, पण बौद्धिक हुशारी त्यांच्यात होती. त्यांच्या कामाच्या पद्धतीत, आम्हा स्टाफला खूप काही शिकण्यास मिळाले होते.

त्यांच्यात सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड दिसली होती. वार्षिक पूजेनिमित्त, ते स्वतः सूत्रसंचालन करून, प्रेक्षकांना एका जागी जखडून ठेवत असत. कार्यक्रमाची रुपरेखा सुंदर आखत असत. पूजेच्या वार्षिक समारंभात स्टाफ व त्यांच्या मुलांना सहभागी करून, त्यांच्यातील कलांना प्रदर्शित करण्याची संधी देत असत. त्यांच्याच नेतृत्वात आमचा टेस्टरूमचा स्टाफ कामाच्या बाबतीत खूप दक्ष, प्रामाणिक व हुशार झाला होता. वेगवेगळया पैलूत हुशार असणारे, श्री. जाधव सर म्हणजे जणू एमटीएनएलला लाभलेला अष्टपैलू अधिकारी होता.

एसडीइ, संतोष जाधव सर आणि त्यांच्या पत्नी सौ शैला

त्यांनी सुरू केलेली एक प्रथा खूपच सुंदर होती. त्यांच्या केबिन मधील कॅलेंडरवर ते प्रत्येक स्टाफचे नाव, तारखेवर जन्मदिवस म्हणून लिहून ठेवत असत. सकाळी दहाच्या आधीच, ऑफिसला येऊन, मला त्या स्टाफच्या वाढदिवसाची आठवण करून देत असत. मग मी, आमच्या सेक्शनमध्ये फळ्यावर त्या स्टाफसाठी, शुभेच्छांची चारोळी लिहीत असे. दुपारचा वेळ साधून त्या स्टाफसाठी आम्ही केक आणून, त्या व्यक्तीबद्दल जाधव सर चार शब्द मांडत असत. हळूहळू तो सूत्रसंचालनाचा वारसा त्यांनी मला सुपूर्त केला. थोडेफार मीही त्यांच्या भाषणाचे धडे घेत, चांगली तरबेज होत गेले.

लहानपणापासून मला वेळोवेळी वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक गुरू लाभले. त्यांच्या अनुकरणाने मला खूप काही शिकण्यास मदत झाली. असं म्हणतात, “माणसाने एखादा तरी गुरु घ्यावा” त्याचे महत्त्व आज मला कळले आहे. गुरूच्या शिक्षेतून, आचरणातून वा बोलण्यातून खूप काही गोष्टी आपणास लाभत असतात. आपण त्याचा योग्य वापर करून घेतला, तर आपण नक्कीच यशस्वी, पारंगत व्यक्ती होऊ शकतो. म्हणजेच “गुरु देवो नमः” गुरु हा ईश्वरा प्रमाणे आहे.

समोर बसलेल्या अफाट जन समुदायासमोर भाषण करण्याची भीती माझ्यातून निघून गेली होती. पहिली गोष्ट म्हणजे मी आमच्या क्लासमधे माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असे. दुसरी गोष्ट म्हणजे चाळीतील अनेक स्त्रियांना एकत्रित करून हळदीकुंकू सारखे महिलांचे कार्यक्रम मी करत असे. त्यानंतर ऑफिसमध्ये स्टाफ व अधिकारी वर्गासमोर, वाढदिवसानिमित्त किंवा सेवानिवृत्ती कार्यक्रमांमध्ये कधी सूत्रसंचालन करू लागले होते, तर कधी त्या व्यक्तीबद्दल चार शब्द सगळ्यांसमोर मांडू लागले होते. या गोष्टींमुळे माझी भीती पूर्ण चेपली गेली होती. त्यामुळे मला आमच्या गाबीत समाज वडाळा विभाग, हया संघात महिला सभासद म्हणून बोलण्याची वा काही मते मांडण्याची संधी मिळू लागली होती.

माझे पती महेंद्र, एक आदरणीय व्यक्ति म्हणून, आमच्या नगरात त्यांना ओळख मिळाली होती. आमच्या गाबीत समाजाच्या संघटनेत, माझ्या पतीला सन्माननीय जागा मिळू लागली होती. आयुष्यात काहीतरी, समाजाशी निगडीत राहून, खारीचा वाटा आमच्या हातून घडावा, अशी सुप्त इच्छा मनी होती. ती आता आम्हाला मिळू लागली होती.

दसरा सण म्हणजे, आमच्या नगरातील अनेक ओळखीच्या व्यक्ती, आमचे विद्यार्थी, शेजारी-पाजारी सोने देण्यास घरी येत असत. प्रेमाने दिलेले सोने,
(आपट्याचे पान) त्यांनी केलेला तो चरण स्पर्श आणि प्रेमाचे आलिंगण या तिन्ही गोष्टी, आम्हाला मिळालेला आदराचा ठेवा होता व आजही आहे. सोन्यापेक्षाही तो अनमोल होता व आजतागायत आहे.

दसरा व कोजागिरी पौर्णिमा हे दोन उत्सव, आमच्या क्लासच्या मुलां सोबत व आमच्या चाळीतील कुटुंबांसमवेत, गरबा नृत्याच्या तालावर तर स्वच्छ चंद्राच्या प्रकाशात, तयार केलेल्या मसाले दुधाच्या प्राशनाने, हया सणाची लज्जत, आमचे शेजारी गणेश गवळी यांच्या साऊंड सर्विसमुळे अधिकच वाढत असे. “गेले ते दिन गेले, उरल्या फक्त आठवणी ! ”

वर्षा भाबल.

– लेखन : सौ.वर्षा महेंद्र भाबल
– संपादन : अलका भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments