गुंफुनि सारे
“मानवी आयुष्य हे अथांग सागराप्रमाणे आहे.”
अफाट सागर स्वतःच्या पोटात अनेक जीवांना सांभाळत, नाहक फेकलेल्या, त्याला त्रासदायक असणाऱ्या, वाईट-चांगल्या वस्तूंना सामावून घेत, पुढे-पुढे सरकतो. पण जेव्हा खवळलेला सागर आपल्या पात्रातील काही वस्तू, लाटांसोबत वाहत आणून तो, किनाऱ्याला फेकून पुढे जातो, तेव्हा त्या सागराची, मानवाने केलेली विटंबना दिसून येते.
असेच बरेवाईट प्रसंग आमच्याही आयुष्यात येत होते. मनावर संयमाचा ताबा राखत, अशा बऱ्याच गोष्टींना सोबत घेऊन, आम्हा उभयतांचा खडतर प्रवास पुढे जात होता. शेवटी, आलेल्या संकटांना तोंड देणे व त्यातून मार्ग काढत, निभावून बाहेर पडणे, हेच आमचं कौशल्य होतं. अथक प्रयासांनी आम्ही मिळवलेले नाव, प्रसंगांना दोन हात करत, उभा केलेला आमचा सुखी संसार, ढळू न देणे हे आमचे ध्येय होते. दु: ख करत न बसता किंवा घाबरत न जगता, आमची ध्येयवादी नौका, पल्याड काठाला पोहचवणे ही आमच्या आयुष्याची स्पर्धा होती. आयुष्याला मिळालेली गती, वाऱ्याच्या वेगा सोबत, वादळा प्रमाणे पुढे घेऊन जाणे, हेच आमचे दोघांचे अखंड स्वप्न होते.
नवनवीन क्षेत्रात स्वतःला गुंफून घेणे हा माझा ध्यास होता. माझ्यातील सुलेखनाचा उपयोग, माझ्या कंपनीसाठी मार्केटिंग म्हणून वापर करू लागले होते. रोज येणारे ब्रॉडबँड व मोबाईलचे नवनवीन प्लानस, फळ्यावर सुंदर अक्षरात लिहून ते इमारतीच्या गेटवर लावू लागले होते. ह्यात जाधव सरांची कल्पना व माझे लेखन यांची सांगड चांगलीच बसली होती. मार्केटिंग म्हणून हा उपक्रम आमच्या कंपनीला फलदायी ठरो ! असे मनी देवाला सांगत असे.
पूजे निमित्ताने वरळी एक्स्चेंजला, कामगार संघाचे अध्यक्ष माननीय श्री. अरविंदजी सावंत (भाई) येत असत. त्यावेळी त्यांच्या नजरेत, हा आमचा उपक्रम आला होता. तेव्हा त्यांनी कौतुकाने शाबासकीची थाप, जाधव सर व मला दिली होती.
माझ्या वकृत्वामुळे मला युनियनचे सभासदत्व, तर कधी खजिनदार पद, तर कधी उपाध्यक्ष,अशी पदे देऊन, कामगारांसाठी युनियन तर्फे काम करण्याची संधी मिळाली होती. माझे जेष्ठ कलिग श्री. कांबळे सर यांचे वकृत्व खूप जबरदस्त होते. त्यांच्या निवृत्ती अगोदर त्यांनी आपले कार्य माझ्या हाती सोपविले होते.
माझी मैत्रीण चित्रा, (माझी अगदी खास मैत्रिण) ही अशी व्यक्ती की ऑपरेटिव्ह स्टाफच्या (एन ई) मध्ये झालेला गोंधळ, स्वतः अभ्यास करून, अचूक तिने शोधला होता. ही गोष्ट आम्ही नायगाव येथील युनियन कार्यालयात, भेटून, तेथील कार्यकारी सभासदांना, लक्षात आणून दिली होती. चित्राही माझ्यासोबत युनियन वरळी विभागात अध्यक्षपदी कार्यरत होती. तिच्यातील चौकसपणा नेहमीच आमच्या युनियन मीटिंगमध्ये अतिशय उपयुक्त ठरत असे.

“हिंदी प्रशिक्षण” असा उपक्रम आमच्या एम टी एन एल ने सुरू केला होता. त्यावेळी आम्ही दोघीही (चित्रा), त्या प्रशिक्षणासाठी दादर जीपीओ मध्ये शिक्षण घेऊ लागलो होतो. संध्याकाळी चारचा क्लास असल्यामुळे, आम्ही आमच्या ऑफिसच्या मागे पोस्टऑफिसचे एक कार्यालय होते. तिथून साडेतीनला निघणाऱ्या पोस्टाच्या गाडीला हात दाखवून व सविस्तर आमची माहिती देऊन, आम्ही त्या गाडीने जात असू. मजेची गोष्ट म्हणजे, कधी पुढे (ड्रायव्हर शेजारी ) जागा नसेल, त्यावेळी आम्ही चक्क, गाडीच्या डीकीत बसून प्रवास करत असू. आज ते आठवले की वाटतं, माणसाच्या मनात तळमळ असेल, तर कोणताच कमीपणा न बाळगता, ध्येयाकडे लक्ष केंद्रित करुन, स्वतःच्या इच्छेचा पल्ला गाठू शकतो.
हिंदी प्रशिक्षण पूर्ण करून आम्ही दोघी “प्रज्ञा” परीक्षा पास झालो होतो. आपली राज्यभाषा म्हणून त्यावेळी कार्यालयीन पत्र व्यवहार व इतर कागदोपत्री व्यवहार हिंदी भाषेत केले जात होते. असा आमच्या कार्यालयाने नियम ठेवला होता. हया शिक्षणातून मला, बऱ्याच हिंदी भाषिक शब्दांची ओळख झाली होती. पत्र लेखनाची पद्धत, वेगवेगळ्या विषयांवरील वेगवेगळे पत्रलेखन कौशल्य मिळाले होते. हिंदी शब्दांचा समूह करून त्याचा योग्य वापर, पत्र लेखनात कसा करावा ? अशा बऱ्याच गोष्टींचे, उत्तम अध्ययन मिळाले होते.
हयातून एका गोष्टीची जाणीव झाली होती. माणूस वयाने कितीही मोठा झाला तरी तो, अखंडपणे शिकत राहू शकतो.
काळानुरूप कंपनीसमोर अनेक स्पर्धक उभे राहिले होते. त्यामुळे एमटीएनएलच्या कामकाजाला चांगलेच मार्केटिंगचे रूप आले होते. त्यावेळी मोबाईलचे सीम घेऊन, आम्ही ऑफिसच्या गेट बाहेर टेबल लावत असू. आमचा काही स्टाफ पूर्ण वेळ हे काम करून कंपनीला नफ्यात आणण्याच्या प्रयत्नात असे. कधी कधी तर आम्ही रोडवर तंबू लावून, सीम विक्री केली होती. ग्राहकांना आमच्या सेवेची पूर्ण माहिती देत असू. मला चांगलं आठवतं ! हया उपक्रमाने आमच्या मोबाईलचे जाळे खूपच पसरले होते. त्यावेळी आमच्या उत्तर क्षेत्राचे जीएम, यांच्याकडून आमच्या सर्वांचे फार कौतुकही झाले होते.

एक्स्टर्न्ल एक्सचेंज व इंटर्नल्स एक्स्चेंज (एम डी ए ) हया दोन विभागांचे काम एकत्रित होत असे. कटओवर होताना, दोन्ही विभागातील स्टाफला, पूर्णपणे मनाने, कामाशी एकरूप व्हावे लागत असे. हया दोन विभागांचे नाते म्हणजे सख्खे भाऊ- भाऊ ! हया कामामुळे मला, टेक्निकल कामाची बरीच माहिती ह्याच एक्स्चेंजमध्ये मिळाली होती.
एमडीएफ मध्ये टेलिफोनच्या एन-ई ला केलेले पेग (एक प्रकारचा रंगीत प्लास्टिकचा छोटासा चिमटा ) कट ओवरच्या दिवशी, हेच पेग पटापट दोन हाताने, न तुटता अचूक काढले जात असत. कारण ग्राहकांची गैरसोय होता कामा नये, ही काळजी घ्यावी लागत असे. त्या कामाचे पर्व, सर्व अधिकारी वर्गासोबत करताना, त्यांनाही त्या कामाची जबाबदारी काळजीपूर्वक सांभाळावी लागत असे. हे काम पूर्ण करताना, सर्व स्टाफची ती कामाची हुन्नरी व लगबग, अगदी आजही डोळ्यासमोर उभी राहते.
ऑफिस कामांसोबतच युनियनच्या सभा, स्टाफच्या काही समस्या, कार्यालयीन उपकरणांची गैरसोय, अश्या अनेक गोष्टी, वरिष्ठ अधिकाऱ्या समोर घेवून जाणे व त्या पूर्ण तडीस नेताना, श्री. चव्हाण व सुनील म्हात्रे ह्यांचे नेतृत्व, त्यांच्या स्पष्टवादी बोलण्यातून, उद्भवलेल्या तक्रारींचे निर्मुलन होत असे.
त्यासोबतच नवनवीन येणाऱ्या शिक्षणाचे प्रशिक्षण घेणे, पूजा निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी करून, कार्यक्रमांमध्ये भाग घेणे, निवृत्ती सोहळे साजरे करणे, तर कधी कोणावर अचानक येणाऱ्या संकटात, धीराचा हात देत मदत करणे. अशा अनेक कार्यांचा भार सावरताना, मनाला खूप समाधान मिळत असे. एकत्रित कुटुंबाप्रमाणे, आपुलकीची भावना जपणारे, असे हे आमचे वरळी एक्स्चेंज, जणू माझ्यासाठी माहेर घरच होते.
जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या ऑफिसमधून, “महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ” वरळी विभागातर्फे, आमच्या कार्यालयातून आम्हांस आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी महिला दिनानिमित्त, मी भाषणातून, माझे विचार मांडले होते. कसलीही तयारी न करता, कर्तुत्ववान महिलांच्या चारित्र्यावर खूपसे बोलले होते. टाळ्यांच्या कौतुकात, सन्मानचिन्ह देऊन मला सन्मानित केले होते. मैत्रिणींनी माझी पाठ थोपटून, खूप प्रशंसा केली होती. तो दिवस माझ्यासाठी आयुष्यातील आगळावेगळा दिवस होता.
दरवर्षी एमटीएनएल मध्ये “हिंदी पखवाडा” उपक्रम आयोजित केला जात असे. त्या वर्षी म्हणजेच सन २००९ मध्ये मराठी निबंध स्पर्धेत मी भाग घेण्याचे ठरवले होते. कार्यालयात त्यासाठी परवानगी पत्र दिले होते. जाधव सरांनी ते पाहून, त्यांनी मला बोलावून घेतले व माझ्यातील स्पर्धक वृत्तीचे कौतुक केले होते. निबंधाचा विषय निवडल्यानंतर त्यांनी मला मोलाचे शाब्दिक सहकार्य दिले होते. त्या विषयावर अनेक मुद्द्यांची चर्चा करत, माझ्यातील कल्पक बुद्धीला धार दिली होती.
माझ्या निबंधाला उत्तर क्षेत्रातून प्रथम क्रमांक मिळाला होता. त्यावेळी मिळालेले प्रशस्तीपत्र व रोख रुपये १०००/- घेताना, वडाळा जी एम ऑफिस मध्ये, स्वतः जाधव सर उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाची छटा दिसली होती. गुरु असतो तो असा !
सर्व कार्यभारा सोबतच, “गाबीत समाज” वडाळा विभागातून, महिला समारंभाचे सूत्रसंचालन माझ्या हाती सोपवले जात असे. असे कार्यक्रम नाडकर्णी पार्क शाळेत होत असत, तर कधी पाटील सभागृहात साजरे केले जात असत. अश्याच एका कार्यक्रमात माननीय नगरसेविका सौ. प्रेसिला कदम व सौ. तृष्णा विश्वासराव यांच्या उपस्थितीत साजरा झाला होता. त्यावेळी गाबीत समाजाच्या महिला संघटनेला व मुलांनी सादर केलेल्या कलांना, त्यांनी भरभरून उत्तेजन दिले होते.
माझ्या या सर्व गुणांचा जास्त अभिमान वाटत असे, तो माझ्या पतींना ! खंबीरपणे पुढे जाण्यास पाठिंबा दिला तो माझ्या पतीने ! त्यांची साथ माझ्यासाठी लाखमोलाची आहे. माझ्या यशामागे माझे पती, माझे सर्व कुटुंब व आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, मला लाभलेले आदरणीय गुरु ! हया सर्वांचा खूप मोठा वाटा आहे. मी सर्वांची जन्मोजन्मी ऋणी राहीन.

– लेखन : सौ.वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : अलका भुजबळ 9869484800
वर्षा खूप छान लिहिलेस असेच छान छान लिहित जा शुभेच्छा तुला
वर्षा खूप छान लिहिलेस असेच छान छान लिहित जा शुभेच्छा तुला
धन्यवाद! आरोटे सर.आपला अभिप्राय, हीच लेखनाची ताकद!
खूपच सुंदर आठवणी लेखन मुद्रित केलेल्या आहेत. वरळी टेलिफोन एक्ससेंज मधील बऱ्याच आठवणींना उजाळा मिळाला
🙏धन्यवाद