निरोप घेताना…..
जीवनाच्या पहिल्या टप्प्यावर घवघवीत यश मिळवले. पुढच्या वाटचालीचे स्वप्न मनी भरू लागले होते. आई-बाबासोबत, ‘पुढे काय करू ?‘ हया मुद्द्यावरून बोलणे सुरू झाले होते.
आईचे म्हणणे अगदी स्पष्ट होते, “धावी शिकला, बास झाला, हेच्यापुढे शिकला तर, लगीन करताना हेच्यापेक्षा मोप शिकलेलो पोर शोधूचो लागात.” आईला वाटे, मी दहावी पास झाले म्हणजे, काहीतरी मोठे शिक्षण झाले ! असा तिचा भोळाभाबडा विचार होता. मी मात्र पुढे शिकण्याचा अट्टाहास धरून राहिले.
गावच्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचे तर,’ देवगड शिवाय पर्याय नव्हता. तेसुद्धा बारावीपर्यंतचे शिक्षण, तेथे मिळू शकले असते. मग पुढच्या शिक्षणासाठी ‘रत्नागिरी‘ किंवा ‘कणकवली‘ गाठावी लागली असती. असे मुद्द्यावर मुद्दे समोर उभे राहत होते. यावर उपाय म्हणून मी, डी.एड.कोर्स करण्याचे सुचवले. यासाठीसुद्धा ‘मिठबाव‘ किंवा ‘कुडाळ‘ या दोन गावांमध्ये हे शिक्षण उपलब्ध होते. मुलीच्या जातीने परगावी एकट्याने राहणे, हा विचार काही आईबाबांना पटत नव्हता.
‘मी पास झाले’, हे पत्राने मुंबईला, माझ्या भावाला(आज्या) कळविले. त्याच्याकडून येणार्या पत्राची, मी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहू लागले. दुपारी दोन वाजता पोस्टमन येत असे. त्या दरम्यान अंगणाच्या पायरीवर बसून, पोस्टमन घाटीवरून आमच्या घराकडे, वळतो की काय ? असे रोज, वाटेकडे डोळे लावून पाहत असे.
अखेर पत्र मिळाले. मजकूर वाचून, मी सुखावले. मुंबईला भावाने, भाऊशी (चुलत भाऊ) सल्ला मसलत करून, मला मुंबईला येण्यास, पत्रात लिहिले होते.
माझ्या भावाला बीपीटी मध्ये, नोकरी लागून जेमतेम तीन वर्षे झाली होती. त्याचा पगार तसा, हजार रुपयांपर्यंत असावा. स्वतःचा खर्च भागवून, तो आम्हाला गावी, पाचशे- सहाशे रुपये पाठवत असे. मी मुंबईला जाऊन, पुन्हा माझा खर्च वाढणार, या विवंचनेमुळे आई थोडीफार कुरकुर करू लागली होती.
इथे मला एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे पोस्टाने येणारी मनीऑर्डर, अंतर्देशीय पत्र किंवा पोस्टकार्ड, त्या वेळी गावात येणारा पोस्टमन, कडक उन्हाळा, कोसळणारा धो-धो पाऊस, याची तमा न करता, पायपीट करून प्रत्येकाच्या घरोघरी जावून, सुख-दु:खाचे संदेश पोहचवत असे. त्यावेळी पोस्टमन हा, सर्वांसाठी देवदूत होता.
देवगडात’ जाणं झालं की, मी पेपर, मासिक विकत घेत असे. त्यात काही कोडी असत. कोडी सोडवणं, माझा त्या वेळचा छंद झाला होता. चौकोनात अंकाची तिरपी- आडवी- उभी बेरीज करून, तोच अंक आला पाहिजे. असेच एक कोडे सोडवून, मी पाठवले होते. माझे नाव जिंकण्याच्या यादीत आले व मला बक्षिस म्हणून, तेथून एक साडी आली होती. पोस्टमन, ते पार्सल घेऊन आले. तेव्हा कमालीचा आनंद मला झाला होता. पण जेव्हा त्यांनी सांगितले की, याचा ट्रान्सपोर्ट खर्च रुपये साठ भरावे लागतील. तेव्हा क्षणातच, माझा आनंद लोप पावला होता. “पण पार्सल मागे करता येणार नाही, तुम्हाला ते घ्यावेच लागेल,” असे पोस्टमननी निक्षून सांगितले. तेव्हा वाटले, चार आण्याची कोंबडी आणि आठ आण्याचा मसाला. अशी स्थिती झाली होती.
मुंबईला येऊन महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचे, असे ठरले. पुढे मला शिकता येणार, हया ओढीने मनात आनंद झालाच, पण या माझ्या निसर्गमय कोकणास आता मी मुकणार ! याचे राहून राहून दुःख वाटत होते. निसर्गाच्या सोबतीत घालवलेली मनमोहक तीन वर्षे, दिवस-रात्र माझ्या डोळ्यासमोर येऊ लागली होती.
पहाटे बांग देणारा कोंबडा, कोकिळाचे मधुर गाणे, चिमणी- पाखरांचा किलबिलाट, गोठयातून येणारा गुरांच्या हंबरन्याचा आवाज, चिंचेच्या झाडावर लटकणारे, चिंचेचे कोळ, आंब्याच्या पानातून डोकावणारे, लाल- पिवळसर आंबे, फणसाच्या बुंध्यापर्यंत ओथंबलेले फणस, सोसाट्याचा मनमौजी वारा, पावसाची सतत धार, हिरवीगार शेते, माळावर उमललेली, रंगीबिरंगी छोटी-छोटी फुले, खळखळ वाहणारा ओढा, खाडीच्या काठी वसलेलं माझं वीरवाडी गाव, त्या गावात वसलेली, माझी साधी-भोळी कोकणी माणसा, लाल चिरे, लाल माती, डोंगराच्या अथांग रांगा, करवंदी वर लटकणारी काळी टपोरी करवंदे, माझे आवडते जेवण, कोकणातला भात कालवा किंवा माशाचा कालवण (लाल रस्सा) या सर्वांसोबत मला ज्ञान देणारी, माझी वाड्यातील शाळा, मामाच्या गावचा रस्ता व तेथील माझी प्रेमळ मामा-मामी या सगळ्यांना मागे ठेवून, मला निघणे, खूप जड जाणार होते.
आजूबाजूच्या मैत्रिणींना कळले तेव्हा म्हणाल्या “तू आता हय हस, तावसर आपण केलेल्या मजा, पुना करून घेवया.” रोज सकाळी अंघोळीचे कपडे व धुण्याचे कपडे घेऊन, कोंडीच्या ओहोळावर घेवून जात होतो. कपडे धुवून आवरले, की कातळावर वाळत टाकून, मग ओहोळात उड्या घेत, मस्त डुंबून घेत होते.
त्या दिवशी, सूर्य उगवन्या आधी, कापडी पिशवी घेऊन करेल्यात (आंब्यांच्या झाडांनी बहरलेले क्षेत्र) उतरून खाली गेलो होतो. खूपशी आंब्याची झाडं ओहोळाला लागूनच होती. रात्रभरात पडलेले आंबे, पटापट गोळा करून पिशवीत भरून घेतले होते. करेल्यातील, वाकडी- तिकडी पाय वाट चढून वर आलो होतो. मोकळ्या जागी गोलाकार बसून, सगळ्या पिशव्यातील आंबे एकत्र केले होते. आणि त्याच्या प्रत्येकी वाटण्या करून घेतल्या होत्या.भुके पोटी तिथेच बसून दोन-चार आंब्यांचा मनमुराद आस्वाद घेतला होता.
खाडीत जाऊन कालवे बोचून आणली होती व सोबत छोटी टोपलीभर, डोळे (कालवा असलेले खडक) घरी आणले होते. झाडाखाली विस्तव पेटवून, फणसाच्या पानात कालवे ठेवली, मस्त भाजून, पोटभर हात मारून घेतला होता.
स्वयंपाक घर, ओटा, पडवी, शेण आणून हाताने जमिनी सारवण करून घेतल्या होत्या. घरापुढील (खळे) अंगण, केरसुणीचा वापर करून सारवण करून घेतले होते. कारण अंगणाचा आवार व घरा मागील ओसरी, त्यामानाने मोठा भाग असे.
रात्री जेवणे झाल्यावर, खळ्यात (अंगणात) सगळे जमलो होतो. शेजारची मोठी माणसे, आई- बाबा, त्यांनी अनुभवलेल्या भूतांच्या गोष्टी ऐकवल्या होत्या. आकाशात शुभ्र चांदणे असूनही, आजूबाजूच्या दाट काळोखाची मला मात्र भीती वाटली होती.
गावातील गणपती उत्सव, शिमगा, कुणकेश्वर यात्रा, महादेवाची पालखी, बोळवण, तुळशीविवाह , नागपंचमी, सगळे सण पटकन डोळ्यासमोर येऊ लागले होते. आमच्या घरच्या गणपतीची मूर्ती बनविण्यासाठी, महिनाभर आधी, काका मुंबईहून गावी येत असत. हातानेच नागोबा बनवून अळूच्या पानावर ठेवून ,त्याची रंग-रंगोटी करत असत.
गणपतीची मूर्तीही हाताने बनवून, त्यात सुंदर रंग भरून, गणेश चतुर्थीला, बाप्पाला त्याच्या जागी बसवत असत. अकरा दिवस आरत्यांची ऱ्हास, टाळाच्या गजरात व मृदंगाच्या तालावर, मोठ्या उल्हासात होत असे. रात्री फुगडी व भजने मी स्वतः गात असे. ‘केशवा माधवा’ व ‘बाई मी पतंग उडवत होते’ या गाण्यांच्या सुरात, मी डुंबून जात असे. अनंत चतुर्थीला लेझीमच्या तालावर, बाप्पांचे विसर्जन, होडीतून नदीच्या मध्यावर बाप्पा सोबत जाण्याचे आनंदी क्षण मिळत असत. बाप्पाला निरोप देताना, जणू आपल्या घरातील व्यक्ती परदेशी जात आहे, अश्या दु:खाने, डोळ्यातून अश्रूधारा वहात असत.
तुळशीविवाहात, प्रत्येकाच्या घरून, ओंजळभर प्रसाद म्हणून, पोहे मिळत असत.ह्या पोह्यांनी सोबत घेतलेली पिशवी भरून जात असे.
शिमग्याच्या (होळी उत्सव) सणाला मांडावर (पाटील घराण्याचे अंगण) वेगवेगळी पात्रे बनून गाणी गायली जात असत. नाटकरुपी खेळात पुरुष मंडळी स्रीचे पात्र करत असत. मडकीच्या तोंडावर चर्म बसवून, ‘घुमट’ नावाचे वाद्य वाजविले जात असे. त्यातून येणारा विशिष्ट नाद, ऐकताना गोड वाटत असे. गावातील जणू हा आमचा मनोरंजनाचा भाग असे.
विविध कला गुणांनी, नटलेला माझा कोकण. अथांग निसर्गरम्य, हिरव्यागार शालीत लपेटलेला, उंच-उंच डोंगरांच्या कुशीत विसावलेला ‘माझा कोकण’. त्यावेळी त्याचा निरोप घेणे, मला असह्य होत होते.
फक्त आठवणींची शिदोरी घेऊन, मला पुढच्या शिक्षणासाठी, स्वप्ननगरी खुणावत होती.

– लेखन : वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800.
खुप छान,
शब्दच नाहीत वेगळं असं काही लिहायला.
खुप छान.
कोकणाचे सौंदर्य उत्तम रेखाटले आहे. कोकणचे निसर्गरम्य वातावरण नेहमीच प्रत्येकाला आवडते, भावते. भाषाशैली उत्तम आहे. असेच लिहीत रहा. वाचायला कंटाळा येत नाही.👍👍👍
👍कोकणातील गावाचे मनमोहक वर्णन केलेले आहे. लेखन एकदम सुरेख. 👌
सगळाच जीवन प्रवास संस्मरणीय आहे. अप्रतिम कथनशैली.. खूपच भावले.. अशा आठवणींचे एक पुस्तक व्हावे.