Sunday, July 6, 2025
Homeलेखजीवन प्रवास - भाग - ९

जीवन प्रवास – भाग – ९

देवदूत

खऱ्या अर्थाने संसाराशी दोन हात करण्याची वेळ सुरू झाली होती. बेचाळीस दिवसांच्या रजेनंतर ड्युटी सुरू झाली होती. जेमतेम बाळ दीड-दोन महिन्याच झालेलं होतं. शिफ्ट ड्युटीमुळे मी शक्यतो सातची ड्युटी करायचे ठरविले होते. बाळाची अंघोळ घरी आल्यानंतरच, माझी मोठी बहीण बायो, घालत असे. तोपर्यंत तिला दूध पाजणे, झोपवणे, खेळवणे माझ्या दोन्ही बहिणी करत असत. आईच्या पान्हयात फार ताकद असते ! असं म्हणतात, बाळ रडू लागलं की ‘आईचा पान्हा ओलावतो.’ माझ्याप्रमाणेच प्रत्येक मातेला याची अनुभूती आली असेलच. त्यावेळी पॅड (छातीचा) वापरणे, हे मला माहीतच नव्हते. त्यामुळे पान्हयाने ओलावलेला भाग ओढणीच्या मदतीने लपवण्या पलीकडे कोणतेच गत्यंतर नव्हते.

दोघात तिसरं आलं होतं. जबाबदारी वाढली होती. बाळाचे संगोपन करणे, फार जोखमीचे काम होते. पण बहिणींच्या आधाराने, मला थोडेसे हलके झाले होते. दोन प्रसंगांना घेतलेले कर्ज कमी करण्याच्या प्रयत्नात आम्ही होतो. कारण व्याजाने पैसे दुप्पट जात होते. आता काहीतरी मोठी उड्डाण घेतल्याशिवाय यातून, बाहेर निसटणे अशक्य वाटत होते. ह्यांचेही प्रयत्न चालू होते. काही दिवस एअर फ्लाईट कुरिअर मध्ये यांनी काम केले, तर काही दिवस सिक्युरिटी म्हणूनही काम केले. पण रात्रपाळी हा प्रकार त्यांच्या प्रकृतीस साथ देत नव्हता. सन १९८९ मध्ये भावाचे लग्न आले. त्यावेळी आई घरी येऊन म्हणाली होती, “मी सांगतय, तुमी दोगानी लग्नाक येवा, कोणाक काय घाबरू नको, मी हय ना !” आईच्या खंबीर पाठिंब्यामुळे, आम्ही त्या सोहळ्यात उपस्थित राहिलो होतो. पण नातेवाईकांच्या भेदक नजरा खूप काही सांगून गेल्या होत्या.

संसारात माणूस पडला, की त्याची जीवनाशी खरी लढाई सुरू होते. त्यात आम्हा दोघांमध्ये असलेला बालीशपणा ! शूल्लक कारणांनी आम्हा दोघांमध्ये किरकिर होऊ लागली होती. यांच्या अति रागीट स्वभावामुळे, टोकापर्यंत जाणे मी, टाळण्याच्या प्रयत्नात असे.

ताण-तणाव व कसरती जीवनाचे एक वर्ष संपले. हया वर्षात आम्ही दोन वस्तू खरेदी करू शकलो होतो. पण त्याही हप्त्यावर, छोटा ब्लैक एंड व्हाइट टीव्ही व सीलिंग पंखा. कारण दोन्ही गोष्टी गरजेच्या होत्या.

मुलीचा पहिला वाढदिवस आला. बहिणीच्या घरी माझ्या आईच्या उपस्थितीत, वाढदिवसाचा छोटासा सोहळा पार पडला होता. त्या वेळची एक गोष्ट मला इथे मांडावीशी वाटते, मुलीला नवीन फ्रॉक घ्यायचा होता. पण एखाद्या कीड- शॉप मध्ये जाऊन घेणे, आम्हाला परवडणारे नव्हते. म्हणून असेच तीन-चार वाढदिवसाचे कपडे, आम्ही दादर टी.टी.ला ह्यांचे मित्र, सुनील मोरे आणि उमेश रेवाळे, या दोघांचे पादचारी रस्त्यावर कपडयांचे दुकान होते. पैसे जास्त खर्च होऊ नयेत, म्हणून आम्ही तिचे कपडे तिथूनच खरेदी करत असू. मोठ्या दुकानातील छान छान ड्रेस पाहून मनाला आवर घालावा लागत असे.

जून १९८९, आमच्या उज्वल आयुष्याची पहाट ! सहज ह्यांच्या एका मित्राने सुचवले, स्वतःची दोन मुलं व शेजारची दोन तीन मुलं प्रथम यांच्याकडे पाठवली आणि बहिणीच्या घरीच क्लासला सुरुवात केली होती. तोंडी जाहिरात होता- होता क्लासची मुले वाढत गेली. छोट्याशा घरात मुलांना जागा अपुरी पडू लागली. तेव्हा शेजारीच चौघुले यांचे घर, एकशे वीस रुपये भाड्याने घेतले. हया घराचे मालक आईच्या माहेरचे(चुलत भाऊ) होते. तिच्या सूचक, विचारातून सुचवून दिलेले हे घर. मुलीचा संसार सुखाने उभा व्हावा, ही तळमळ फक्त आईतच असते !

पुन्हा आमच्या संसाराला त्या भाड्याच्या खोलीतून सुरुवात झाली व “सोनाली क्लासेस” नावाने क्लासला उभारी आली. फी तशी कमीच होती, अगदी वीस रुपयांपासून सुरुवात केली होती. “पैशापेक्षा, आमच्या ज्ञानाला मार्ग सापडला होता. एक वेगळी ओळख आमची होणार होती.” याचा अभिमान आम्हाला जास्त वाटू लागला होता. कल्पकतेच्या आधाराने मानाने ताठ उभं राहण्याची शक्ती, ज्या देवदूता मुळे मिळाली ते म्हणजे, ह्यांचे मित्र विलास मोरे यांना आमचा शतशः प्रणाम!🙏

सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत क्लास चालत असे. सरांचा (ह्यांचा) स्वभाव कडक, शिस्तबद्ध असल्याने पालक स्वतः येऊन सांगत असत, की “आमच्या मुलाला चांगले फटके द्या. अजिबात अभ्यासाला बसत नाही. आम्ही कोणतीही तक्रार करणार नाही. व विचारायलाही येणार नाही.” असे विश्वसनीय पालक आताच्या युगात सापडणे कठीणच ! मुलांना फटके तसे कमीच. पण जी काही शिक्षा होती, ती मात्र अजबच ! मुलं तशी लहानच होती. चौथीपर्यंतच्या मुलांना मारणे, आम्हाला काही पटेना. त्यांची वही-पुस्तक डोक्यावर ठेवून, पूर्ण गोलाकार चाळीतून फिरवायचो. लाजेखातर मुले हळूहळू वळणावर येऊ लागली. अशाच शिक्षेमुळे, अगदी मठ्ठ मुलांना, पालक आमच्याकडे पाठवू लागले. पण अशाच, मठ्ठ दगडांना कोरून, त्यांचे कोरीव शिल्प आमच्या हातून तयार होत होते. या गोष्टीचे आम्हा दोघांना खुप समाधान मिळत होते.

क्लासचा पसारा वाढत होता. पहिली ते दहावी (फक्त मराठी माध्यम) पर्यंतचे वर्ग प्रथम आम्ही सुरू केले होते. फक्त जेवणासाठी व थोडासा आराम मिळावा म्हणून दुपारी दोन तास क्लास बंद राहत असे. यांनाही एकट्याला क्लास घेणे कठीण होत असे. मग मी ही कायमची नाईट शिफ्ट (डबल ड्युटी) म्हणजे०४:४० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० पर्यंतची ड्यूटी करू लागले होते.. त्यामुळे तो पूर्ण दिवस मला घरी मिळत असे. तसेच या नाईटचे पेड- नाईट म्हणून, शंभर रुपये (प्रत्येक नाईट) जादा मिळत असत. त्यात नाईट भत्ताही पगारात मिळत असे. शिवाय सकाळचे क्लासही घेण्यास मला जमत असे. असा भरधाव वेग आमच्या कष्टाला मिळाला होता. बहिणी जवळ रहात असल्याने सोनाली (मुलगी) त्यांच्या स्वाधीन असे. त्या महत्त्वाच्या काळात माझ्या बहिणींनी, मला दिलेला मौलिक आधार व मदतीचा पाठिंबा आम्ही शेवटच्या श्वासापर्यँत विसरू शकणार नाही.

कष्टाला काळवेळ नसावा, तसेच कष्टाला मोजमाप नसावे. तरच कष्टाच्या वेलीवर फळे लवकर येतात. नेमकं हेच घडत होतं. आम्ही एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. हिंडणे फिरणे होतच नव्हते. मुलीलाही पुरेसा वेळ देता येत नव्हता. यांना आपल्या क्रिकेट छंदापासून दूर रहावे लागत असे. अगदी आमच्या ध्येयाने आम्हाला ग्रासून टाकले होते. एक मजेशीर गोष्ट मला सांगावीशी वाटते. नाइट करून घरी आल्यावर लगेच घराच्या बाहेर हापशीने नळाचे पाणी भरावे लागत असे. स्टोव्हवर नाश्ता- चहाची तयारी होत असे. कपडे-भांडी धुणे आटपुन घ्यायचे. लादी- पोछा करून, डाळभाताचा कुकर लावायचा, तोपर्यंत क्लासची मुले येत असत. बारापर्यंत क्लास आटोपला की आरामखुर्चीत बसल्या बसल्या झोप लागत असे.असंच एकदा, संध्याकाळचे आठचे क्लास संपले आणि याच खुर्चीत माझा डोळा लागला. यांनी मला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझी झोप काही उठू देईना. जेव्हा मी सकाळी जागी झाले तेव्हा मला कळलं, की मी रात्रभर या खुर्चीतच झोप पूर्ण घेतली होती. तात्पर्य ! अफाट श्रमांमुळे मिळालेली भाकर व झोप फार सुखाची असते.

कार्यालयातील माझा ग्रुप, त्यांच्या नाईट शिफ्टला मला भेटत असे. त्यावेळी आमच्या गप्पा संपतच नसत. माझी कथा माहीत असल्या कारणाने, माझी आस्थेने विचारपूस करत असत. हाच जिवलग जिव्हाळा, आम्हाला एम.टी.एन.एल. च्या परिवारात अखंड गवसला.

व्यस्त जीवनाची दरमजल करत, दीड- दोन वर्षे होत आली होती. सर्व कर्जातून मुक्त झालो होतो. थोडीफार शिल्लक गाठीशी राहत होती. देवाने प्रसाद द्यावा, तसा आम्हाला तिथेच जवळपास साडेतेरा हजाराला छोटासा प्लॉट मिळाला होता. आता त्यावर घर उभे करायचे होते. त्यावेळी घरावर सिमेंट पत्रे टाकताना त्यावरची कौले कमी किंमतीत विकत मिळत असत. अशीच कौले आम्ही विकत घेतली होती. अचानक एका रात्री ही कौले घरासमोरून चोरीस गेली होती. त्यावेळी आम्हाला ही चोरी खूप महागात पडणार होती. त्यांच्या क्रिकेट खेळामुळे, हया विभागाशी तशी बरीच ओळख होती. हे काम कोण करू शकतो ? अश्या गुप्त गोष्टींची ह्यांना कल्पना होती. असेच बोलता-बोलता, झोपडी संघाच्या कार्यालयासमोर हे बोलून गेले, “कोणी हे काम केले आहे, हे मला ठाऊक आहे. त्याने परत आणून नाही ठेवली, तर ही तक्रार पोलिसांपर्यंत मी नेईन.” झाले ! दोन दिवसात कौले जागेवर येऊन पडली. शांत वाटणारा माणूस, वैचारिक दृष्ट्या प्रामाणिक आहे. याची प्रचिती लोकांनी ओळखली होती. काही वर्षातच शिवशंकर नगर झोपडी संघाच्या अध्यक्षपदी, लोकांमते यांची निवड करण्यात आली, ती आजतागायत आहे.

एका विद्यार्थ्याची मेहनत, चिकाटी व जिद्द आजही डोळ्यासमोर येते. विजय नामक विद्यार्थ्याची, एसएससी पार होण्याची तळतळ आजही प्रकर्षाने आठवते. त्यावर्षी एसएससी बॅचला वसंत सारंग, शोभा चोडणेकर, विश्वनाथ मणचेकर, व विजय पाटील हे विद्यार्थी होते. त्यातील विजय हा मुलगा दहावीला नापास झालेला होता. दोन वर्षांची गॅप घेऊन त्याला पुन्हा परीक्षा द्यायची होती. सर्व अभ्यास क्लासवरच आधारित होता. सर्व विषय घेऊन तो पुन्हा परीक्षा देणार होता. त्यामुळे हा वर्ग रात्री आठ नंतर सुरू होत असे. कधी- कधी तर रात्रीचे बाराही वाजत असत. वसंत दुसऱ्या नगरात, थोडासा लांब राहत असे. त्यामुळे उशीर झाला की हे स्वतः त्याला घरी सोडण्यास जात असत. सर्व विषयांचा अभ्यास करून घेण्यासाठी वेळ मिळेल तसे या वर्गाला बोलावून क्लास घेत असत. मुलेही फार कष्टाळू होती. मुलांची मेहनत, सरांचे उत्कृष्ट मार्गदर्शन या दोन्हीच्या बळावर मुले चांगल्या प्रकारे पास झालीत. आज हा विजय आयकर विभागामध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. तसा तो यांचा मित्रच! आजही विजय भेटला की म्हणतो, “सर, मी तुमच्यामुळेच चांगला माणूस घडू शकलो. शतशः आभार !”

नवीन आयुष्याच्या उड्डाणात बरेच कठीण डोंगर समोर येतच होते. पण आम्ही दोघांनीही धीर न सोडता प्रयत्नांच्या बळावर त्यांना भेदून पुढे जाण्याचा प्रयास करत राहिलो. जली, काष्टी, पाषाणी देव असतोच ! माणसाच्या रुपात भेटलेल्या देवदूतानेच आमच्या आयुष्याला, नव्या उमेदीचे वळण दिले होते.

वाईट दिवस संपून, सुगीचे दिवस उजाडू लागले होते. आमच्या प्रामाणिक कष्टाची पोचपावती आम्हाला मिळणार, या गोष्टीची आशा, मनी निर्माण झाली होती. मानसिक व शारीरिक कष्टात, आनंदाने डुंबून सुखाचा तीर गाठण्याच्या प्रयासात होतो.

वर्षा भाबल.

– लेखन : सौ. वर्षा भाबल.
– संपादन : अलका भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. आरोटे सर, तुमच्या भावूक मनातून मिळालेल्या अभिप्रायास, मनःपूर्वक प्रणाम.🙏

  2. संघर्ष करून मिळवलेले यश म्हणजे काट्या कुट्यातून मार्ग काढून पुढे त्याचा राजमार्ग बनविणे होय. भाबल मॅडम व त्यांच्या यजमान यांनी जीवनात केलेल्या संघर्षाला सलाम 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments