असेही क्षण !
“जीवनाची ही घडी, अशीच राहू दे !”
मराठी भावगीतातील हे अर्थबोधक कडवे !
आयुष्याच्या चौकटीला अगदी तंतोतंत जुळेल, अशी कवीने रचना केली आहे.
कितीही वाटलं तरी, मानवाच्या भावनांना नाजूक असे स्वाभिमानाचे आवरण, कुठे ना कुठे विरतेच ! मग त्याला ठिगळ लावणे, हे आपल्या हाती असते. मग ते स्वाभिमानी आवरण कसे जपायचे ? कसे वापरायचे ? नि कसे टिकवायचे ? हे आपण ठरवायचे असते.
माझ्याही जीवनी हया नाजूक आवरणास, अनेक विसंगत प्रसंगांचे, धागे विरत होते. त्या विसंगत प्रसंगाना, ठिगळ लावण्यापलीकडे काहीच गत्यंतर नव्हते. आम्ही, आमच्या आईवडिलांचे मन दुखावून, आम्ही दोघांनी मिळून घेतलेला तारुण्यातील निर्णय, कदाचित त्यांच्यासाठी वेदनादायी होता. त्याचेच प्रायश्चित्त आम्हाला मिळत असावे, असे स्व:मनाला समजावून, आम्ही स्वतःच, स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे शोधत होतो.
असो ! ठेच लागल्या नंतरच माणूस धडा शिकतो, हे मात्र खरे ! पण, तेव्हा फार उशीर झालेला असतो. घडून गेलेली घटना व वेळ पुन्हा येत नसते. तोपर्यंत, आपण सारे पूर्णपणे विस्कळीत झालेले असतो. इथेच आपल्या जीवनाची घडी मोडते. विस्कळीत जीवनाचे प्रसंग, कधीही शत्रूवरही न येवोत. ! हीच देवाला प्रार्थना !
कौटुंबिक ताणतणावातून विसाव्याचे माहेरघर म्हणजे, माझ्या एमटीएनएलचे बेलापूर कार्यालय ! ऑफिस कामात मन रमवून, मैत्रिणींच्या घोळक्यात स्वतःला समाविष्ट करून, तात्पुरता का होईना, मनावरील बोजा कमी होत असे. युनियन कामानिमित्त अनेक सभेत हजर राहून, निर्माण होणाऱ्या स्टाफमधील समस्यांवर तोडगे शोधताना, स्वतः मधील समस्यांवर कधी ना कधी योग्य पर्याय नक्कीच मिळतील ! असे देवावर सोडून, वाट पाहण्याचे ठरविले होते.
एकाच वयात आम्ही सर्व सख्या नोकरीला लागलो होतो. सर्वांची सेवा तीस-बत्तीस वर्ष पूर्ण झालेली होती. त्यामुळे बऱ्याच जणी सेवानिवृत्तीच्या जवळपास पोहचल्या होत्या. कोणाची दोन वर्षे तर कोणाचे एक वर्ष, कुणाची तीन तर कुणाची चार, अगदी सगळया जणी नोकरीच्या शेवटावर येऊन पोहोचल्या होत्या.
सेवानिवृत्तीचे हे आनंदी क्षण, जवळ येऊ लागले होते. सेवानिवृत्तीच्या समारंभात, उत्सव मूर्तीच्या एका डोळ्यात दुःख असते तर दुसऱ्या डोळ्यात आनंद ओसंडून वाहत असतो. असा हा आगळावेगळा सोहळा, क्रमाक्रमाने ऑफिसात साजरा होवू लागला होता. कार्यक्रमाची सुरुवात गणेशाच्या आरतीने होत असे. त्यानंतर माझ्या मैत्रिणींच्या सुमधुर गीताने, कार्यक्रमात उल्हासित वातावरण तयार होत असे.
बेलापूर कॉल सेंटरमध्ये बरेच सेवानिवृत्तीचे सोहळे, माझ्या सूत्रसंचालनात निर्भीडपणे व जबाबदारीने पार होत होते. आमच्याच बरोबरीची एक आमची कलिग उषा बोबडे, तिला मी बीकेसी पासून ओळखत होते. ती माझ्याप्रमाणेच कायमचीच नाईट ड्युटी करत असे. नेहमी टापटीप, कामाशी एकरूप अशी शांत सुस्वभावी होती. अचानक तिला एका अनोख्या आजाराने घेरले होते. तिचे शब्द कळेनासे झाले होते. तिचे चालणे लटपटीत पडले होते. शरीराने कृश होत होती. तिचे खाणे-पिणे मंदावले होते. बऱ्याच महिन्यांच्या सुट्टीनंतर, ती बेलापूर कार्यालयात पुन्हा त्याच स्थितीत रुजू झाली होती. तरीही बोर्डवर बसून, ती थोडेफार कामही करू लागली होती. पण शेवटी तिला सेवानिवृत्ती घेणे भाग पडले होते. तेव्हाचा तो तिचा निरोप समारंभ करताना, साऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.
भारती पाटीलचा, सेवानिवृत्तीचा समारंभ खूप छान झाला होता. तिने दिलेली ती रिटर्न गिफ्ट, आजही माझ्या किचनमध्ये तिची आठवण करून देते. गणेश पाटील व आरोळे यांच्या सेवानिवृत्तीचा दिन, एकाच दिवशी साजरा झाला होता. तेव्हाचे माझे सूत्रसंचालन व्हिडिओमध्ये कैद झाले होते. ती आठवण तशीच डोळ्यासमोर उभी राहते. व्हिडिओ पाहताना गेलेल्या क्षणांचा, खूपच आनंद मिळतो. वाटतं ! हरवलेले दिवस पुन्हा भेटतील का !
आमच्या बेलापूर कॉल सेंटरचे (एसडीई) श्री.मदन सर, यांचा सेवानिवृत्ती दिवस आमच्यासाठी फार खास होता. जेवढे ऑफिसर माझ्या कामाच्या ठिकाणी मला लाभले, ते खरंच खूप मार्गदर्शनीय व स्टाफला सांभाळून घेणाऱ्या व्यक्ती होत्या. त्याच पैकी, हे आमच्या बेलापूर कॉल सेंटरचे मदन सर ! त्यांच्यावर मी एक कविता रचली होती, ती अशी-
आज येतो उद्या येतो,
फोनवर साधतो संवाद,
फायलींचा होतो ढीग,
ऑफिस पाहतंय,
तुमच्या येण्याची वाट ॥
दोन्ही कडील चार्जने,
नवनवीन तंत्रज्ञानाने,
वाढला कामाचा भार,
ऑफिस पाहतंय,
तुमच्या येण्याची वाट ॥
केबिन होते सुन्न,
टेबल पाहते दाराशी,
क्लार्कची होते घाई,
ऑफिस पाहतंय,
तुमच्या येण्याची वाट ॥
टेबल भरते अर्जांनी,
फोन खणखणे दमूनी,
अंधारात केबिन रुसुनी,
ऑफिस पाहतंय,
तुमच्या येण्याची वाट ॥
होताय तुम्ही सेवानिवृत्त,
स्टाफ गेला गदगदुन,
त्रुटी तुमची जाणवून,
ऑफिस पाहतंय,
तुमच्या येण्याची वाट ॥
त्यांच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या सौ., ही कविता ऐकून खूप खुश झाल्या होत्या. सरांच्या निरोप समारंभाचे आयोजन पाहून, त्या खूप भारावून गेल्या होत्या. समारंभातील सर्व कामांशी निगडीत वृंदा पाटील, शुभदा, अमृता, दळवी मॅडम, विजू जाधव, रेखा, जयश्री, मानसी, दीपा, मृणाल अशा अनेक मैत्रिणींचा मोलाचा वाटा असे.
पै मॅडमच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात, मला तर पराकोटीचा आनंद लाभला होता. या समारंभात, बेलापूर कॉल सेंटरचे (डीई) पांडे सर उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन या नात्याने माझे काम नेहमीच सरांनी ऐकले होते. प्रत्येक समारंभात हातभार लावणाऱ्या, प्रत्येक व्यक्तिचा सन्मान करणे व आभार मानणे, हा कार्यक्रमाचा शेवट ! नेहमीच असे. त्यादिवशी मात्र अगदी उलटे घडले होते.
कार्यक्रम संपण्यापूर्वीच सरांनी बोलण्यास सुरवात केली होती. त्यांचे ते उद्दगार आजही माझ्या कानात रुंजी घालतात. ते म्हणाले होते,
“भाबल मॅडम, सभी कार्यक्रम मे सभी का सन्मान करती है। सभी का आभार प्रदर्शन करती है। फोटो खिचनेवालीको भी छोडती नहीं। तो सूत्रसंचालनकरनेवाली का भी सत्कार होना चाहिए। तो आज, भाबल मॅडम का सत्कार होना चाहिए। मॅडम, सूत्रसंचालन बहोत अच्छी तरह से निभाती है।”
असे म्हणून, त्यांना दिलेला पुष्पगुच्छ, त्यांनी मला बोलावून, माझ्या हाती दिला होता. हा प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही. माझ्या सूत्रसंचालनाचे, ते माझ्यासाठी खूप मोठे बक्षीस होते.
माहेरवाशीणीचे लाड व्हावेत, असे प्रत्येक स्त्रीला वाटते. असे लाड पुरवले, ते माझ्या बेलापूर कॉल सेंटर मधील शुभदा व रेखा हया उत्साही मैत्रिणींनी ! आणि तेही प्रत्येकीचा वाढदिवस साजरा करून ! शुभदा आणि रेखा हया दोघी कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करत असत. प्रत्येकीच्या वाढदिवसाला केक आणून, तिच्या डोक्यावर मुकुट लावून, प्रेमाने गाणी गात, हा सोहळा साजरा करत असत. माझ्या वाढदिवशी मी प्रेमाने, त्यांच्यासाठी काव्याच्या चारोळी रचल्या होत्या, त्या अश्या-
वाटले सासरी आले ,
संपले सारे लाड ,
बेलापूरच्या परिवारात ,
माहेर मला लाभले ॥
आजच्या खास दिवशी,
आई ताई मावशी,
काकी आत्या मामी,
भेटतील का वाढदिवशी ॥
कौतुकाने ओवाळले आईरुपी,
भरवला केक ताईरुपी,
कुशीत घेतले मावशीरुपी,
लावले गालबोट काकीरुपी ॥
आनंदात सुखावले मनातून,
सजला दिवस सोन्यासारखा,
नाती रुजली प्रेमात,
अश्रू आले दाटून ॥
टाळ्यांच्या आवाजात, सर्वांच्या डोळ्यातील अश्रू मात्र हसत होते.
आमचे धडाकेबाज फोटोग्राफर म्हणजे दम्या व अमृता ! फोटो काढणे आणि व्हिडिओ शूटिंग करणे हया दोघींचा आवडता छंद ! आजही आमच्या सेवानिवृत्तीनंतर आमच्या फोटोंचा आणि व्हिडिओचा आस्वाद आम्ही घेत आहोत.
आम्हा उभयतांच्या जीवनी, मैत्रीचा साठा अथांग आहे. आमचा लग्न दिवस किंवा माझ्या पतीचा वाढदिवस असो, ह्यांची रॉयल 40 + सानपाडा क्रिकेट टीम, न विसरता केक घेऊन आमच्या घरी येते. त्यांचे खास मित्र, प्रदीप व नरेंद्र हे सुद्धा, हया दिवशी न चुकता केक घेऊन घरी येतात. आमचा लग्न दिवस किंवा माझ्या पतींचा जन्मदिवस द्विगुणित करतात. असे अनमोल प्रेम या सर्वांकडून आम्हाला मिळत आहे.
‘माणसे जोडणे खूप कठीण असते, पण माणूस तोडणे फार सोपे असते.” माणसे जोडणे, हया आमच्या दोघांच्या स्वभावगुणाने, मैत्रीच्या अफाट महासागरात आम्हा उभयतांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या, थोर मनाच्या व्यक्ती आम्हाला लाभल्या आहेत. त्यांची उतराई करणे, नक्कीच ! हया जन्मात अशक्य आहे ! मैत्रीप्रेमाचा हा ऋणानुबंध, माझ्या जीवन प्रवासातील, आमच्यासाठी मौल्यवान व अखंडीत रेशमी धागा आहे.

– लेखन : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800