सन्माननीय ओळख
“जीवन गाणे गातच राहावे,
झाले गेले विसरून सारे,
पुढे पुढे चालावे ॥”
जीवनाचा परिपाठ जणू असाच पुढे न्यावा लागतो. दुःखद आठवणींना हृदयाच्या एका कोपऱ्यात, अश्या गच्च बांधाव्यात की, त्यातील एखादाही कण, सुखद आठवणीवर पसरुन, सुखाचा कप्पा विरून जाऊ नये.
अगदी असेच ते दिवस समीप आले होते. सन २०१९ इकडून तिकडून अगदी वाऱ्या सारख्या बातम्या कानावर येत होत्या. सर्वांच्या जीवाची घालमेल सुरू झाली होती. कसं होणार ? नि काय होणार ? सर्वांच्या समोर उभा राहिलेला मोठा प्रश्न चिन्ह होता !
मला सुपरवायझर पोस्ट मिळून, चार-पाच महीने उलटले होते. त्याच दरम्यान वाशी ऑफिसहून संदेश येऊ लागले होते.
“रोज पाच जणींना वाशी ऑफिसला सर्विस बुक चेक करण्यास पाठवून द्या.” आता मात्र मनात विचारांनी काहुर मांडलं होतं. पोझिशन मॅनेज करून, रोज पाच जणींचा ग्रुप, वाशीला पाठवू लागलो होतो. सर्विस बुकमध्ये सापडलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी ऍडमिन ऑफिस, प्रभादेवीला जावे लागत असे. नवी मुंबई ते प्रभादेवी, तसा हा प्रवास दूरचाच होता. पण प्रत्येकीने ह्या कामात हयगय न करता, लवकरात लवकर कामे पूर्ण करून घेण्याचा मानस बाळगला होता.
हे काम संपताच, प्रत्येकीचे निवृत्तीनंतर मिळणारे अंदाज पत्रक सादर झाले होते. त्यात केला जाणारा हिशोब म्हणजे, जणू त्या वेळी गणिताचा विषय भासत असे. लगेचच स्वेच्छानिवृत्तीची पत्रके अपलोड झाली होती.
त्यावेळी बेलापूर कॉल सेंटरचे (डीई) पांडे सर, यांनी आमचा क्लास घेण्यास सुरुवात केली होती. पत्रकाच्या किती प्रती काढाव्यात ? त्या कशा जोडाव्यात ? त्यावर माहिती कशी भरावी ? या सर्व गोष्टींचा अभ्यास सुरू झाला होता.
स्वेच्छानिवृत्ती घेणे फायद्यात आहे की तोट्यात ? हा प्रश्न सगळ्यांसमोर अगदी भयावह प्रश्न होता ! ह्या प्रश्नाचे उत्तर (डीई) पांडे सरांनी, अतिशय मार्मिकपणे व सोप्या शब्दात स्पष्ट करून, सर्वांसमोर मांडले होते. बघता बघता स्वेच्छानिवृत्तीच्या पत्रकांच्या प्रतीनी एक बॅग भरली . घरी भरून आणलेली पत्रके, पुन्हा ऑफिसमध्ये टेबलावर मांडून, एकमेकींमध्ये तपासून पाहू लागलो होतो. त्यांची क्रमवार जोडणी पुन्हा-पुन्हा करत होतो. नोकरीला लागताना जेवढे किचकट काम करावे लागले नव्हते, त्याच्या चौपटीने स्वेच्छानिवृत्तीची पत्रके गोळा करताना काम करावे लागले होते. दिवस उजाडे पत्रकांच्या दर्शनाने व दिवस मावळे तोही, पत्रकांच्या दर्शनाने !
आता मात्र जीवाला कुठेतरी सल बोचू लागली होती. नियमानुसार मिळणाऱ्या निवृत्ती अगोदरच, स्वेच्छानिवृत्ती आमच्या पदरी पडणार होती. त्यामुळे सर्वांचे विलगीकरण मनाला दुःख देऊ लागले होते. उरलेले दोन-तीन महिने, एकमेकींमध्ये उत्साहाने मिळून-मिसळून आनंदात घालवायचे, असे सर्वांनी मनाशी पक्के केले होते.
ऑफिसमध्ये जेवणाच्या सुट्टीत, आम्ही काही खेळ आखले होते. कधी ‘तळ्यात मळ्यात’ असा खेळ खेळू लागलो होतो. कधी स्वतःचे डोळे बांधून ‘देवीच्या कपाळी टिळा लावणे.’ असाही खेळ खेळत असू. त्यावेळी बालपणात गेल्यासारखे वाटत असे.
हाताच्या बोटावर मोजण्या इतपत, काही महिने आमच्या नोकरीचे शिल्लक होते. कंपनीचे ओळखपत्र इतक्या वर्षात कधीच, ऑफिसमध्ये गळ्यात घातले नव्हते. पण त्या क्षणी मात्र, “ओळखपत्र म्हणजे आमचा खरा सन्मान आहे ” या गोष्टीची ओळख पटली होती. म्हणूनच राहिलेल्या दिवसात सर्वांनी कंपनीचे ओळखपत्र न विसरता रोज गळ्यात घालू लागलो होतो. पण मनात, हातून निसटलेल्या सन्माननीय ओळखीला मान देणे, आमच्याकडून राहून गेले होते. या गोष्टीची मात्र खंत राहून गेली होती.
ठेवणीतल्या साड्या, नवीन ड्रेस परिधान करून, ऑफिसला रोज येऊ लागलो होतो. कुणीही रजा घेऊन घरी राहायचे नाही असा जणू नियमच केला होता. त्यामुळे रोज ऑफिस भरलेले असे. उगाचच छोट्या छोट्या मेजवान्या करू लागलो होतो. रोज सर्वांसाठी प्रत्येक जणी स्वतः घरी, एखादा पदार्थ बनवून आणत असत. हे सारे करताना कामाचे भान ठेवले होते. शेवटी ‘माझ्या कंपनीचा ग्राहक, आमच्यासाठी देव आहे. त्याचे समाधान हे आमचे धेय्य आहे.’ हे आम्ही कधीच विसरलो नाही.
उरले सुरले दिवस कंपनीच्या कुशीत एकजुटीने घालवायचे. हा एकच ध्यास सर्वांच्या मनी भरला होता. नवरात्रीत नऊ दिवस, नऊ रंगाच्या साड्यात, देवीच्या आराधनेत घालवले होते. देवीला आम्ही साऱ्या पुन्हा, अश्या एकत्रित भेटणार नव्हतो. तिच्या समोर ओटीने भरलेले ताट, डोक्यावर घातलेली फुलांची वेणी, आमच्या ओटीत पडणार नव्हती. हीच मनाला खंत वाटत होती. गणेशचतुर्थीचे ते बारा दिवस, आमच्या ऑफिसच्या गणरायासोबत, आम्हाला घालवण्यास मिळणार नव्हते. आमच्या ह्या देवाला दर मंगळवारी अगरबत्तीचा सुवास, लख्ख दिव्याची ज्योत व गळ्यात फुलांचा हार तर आवडता मोदकाचा प्रसाद, आम्हाला देता येणार नव्हता. हया कल्पनेने मनाची कालवाकालव होत होती. आमच्या मुखातून देवासाठी आरती म्हणण्यास मिळणार नव्हती. सारेच दुरावणार होते. अथांग विचारांनी साऱ्यांनाच गलबलून येत असे.
शनिवार-रविवारचा आमचा इवलासा स्टाफ म्हणजे, आमची दूर्वा ! सर्वांना तिचा लळा लागला होता. तिलाही माझ्या सर्व मैत्रिणींना भेटल्याने खूप आनंद होत असे. ऑफिसमध्ये तिला आठवड्याभराची ऊर्जा मिळत असे. तिचा वाढदिवस २३ नोव्हेंबर २०१९ हा दिवस, ऑफिसमध्ये आम्ही थाटला होता. प्रत्येक जणी त्यादिवशी तिच्या छोट्या मैत्रिणी झाल्या होत्या. प्रत्येकीने डोक्यावर टोपी घालून, मस्त स्नॅक्स पार्टी केली होती. सर्वांनी प्रेमाने भरून दिलेली ती उबदार रजई, जणू मायेची कूस होती.
आजही ती रजई, दुर्वा अंगावर घेते तेव्हा तिला हया सगळ्या आजींची प्रकर्षाने आठवण येते. आणि मला एकच प्रश्न ती करते. ‘तुम्ही सगळे ऑफिसला का जात नाही ?’ त्यावेळी मी मात्र निरुत्तर होते. पण तिच्या बालमनास खुलवण्यासाठी, तिच्या वाढदिवसाला, मी केलेली कविता तिला ऐकवते :-
सोमवार येतो शुक्रवार जातो,
पटकन् कसा शनिवार येतो,
मम्माच्या ऑफिसात जाण्याचा,
पुन्हा मला चान्स मिळतो ॥
झोपता झोपता,
विचार करते ठाम,
बॅगेत काय भरावे ?
उद्याचे आहे काम ॥
अमृता आंटीचा बेडूक,
उड्या मारून करतो धमाल,
सुजाता आजीच्या ड्रेसवर,
हिना आजीची कमाल ॥
पूजा आंटीची पर्स,
शोभून दिसते खास,
माया आजी भरवते,
चिऊ माऊचा घास ॥
मोबाईल खेळता खेळता,
दूध मिळे बशीत,
कधी बसले मांडीवर,
तर कधी कुशीत ॥
शिला आजीचा मिळतो,
मेसेज फोनवरून ,
येतेस ना ग दुर्वा,
खाऊ ठेवला आणून ॥
शुभदा आजीचे मनोरंजन,
केले गाणे गाऊन,
न कळे मज गाणे,
मी जाते भाव खाऊन ॥
फोटोंची होते बरसात,
आज्ज्या माझ्या विजू दमी,
फोटो सारे फार छान,
अमृता आंटी देते हमी ॥
ऐकून आहे साऱ्यांचे,
सर्वांत प्रेमळ असते आजी,
सारे ठाऊक आहे मला,
फुलावाणी मने त्यांची ताजी ॥
आठवणींनी रडू येते मला,
हृदयात ठेवेन जपून,
मोठी होऊन भेटेन तुम्हाला,
मिठीत तुमच्या विसावून ॥
दुर्वाला गवसलेले प्रेम म्हणजे जणू यशोदा-कान्हामधील प्रेमाची प्रचिती होती.
स्वेच्छानिवृत्तीच्या पत्रकांची कामे प्रत्येक एमटीएनएल ऑफिसात जोरदारपणे चालू झाली होती. माहिती भरून पूर्ण झालेली पत्रके, पांडे सरांनी तयार केलेल्या टीम कडून पुन्हा तपासून घेण्यास सुरुवात झाली होती. दीपा, दमी, जयश्री, बजाज, विजू, सायली व मी, साऱ्या मन लावून काम करू लागलो होतो. तेव्हा उडणाऱ्या धांदलीत, कारकुनी कामाचे शिक्षण समजले होते.
पुढे ह्या पत्रकांचे गठ्ठे, दळवी मॅडमच्या टेबलावर पोहचले होते. आमच्या बेलापूर कॉल सेंटरच्या क्लार्क म्हणून, कित्येक वर्षे ऑफिसचा भार ती सांभाळत होती. फोन मेकॅनिक अशी तिची पोस्ट असून, कारकुनी कामात ती चांगली तरबेज होती. तिच्यासह स्मिता व क्षीरसागर यांनीही ह्या कामात जबाबदारीने उत्तम काम केले होते. आमच्या टीमकडून चुकून राहिलेले दोष, समजुतीने आम्हाला सांगून, ते सुधारले होते. “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” हे आमच्या एमटीएनएलच्या स्टाफचे विशेष वैशिष्ट होते.
यादरम्यान अनेक बँकांचा स्टाफ आमच्या ऑफिसमध्ये येऊन, पेन्शनसाठी उपयुक्तता म्हणून सेमिनार देत होते. आयुष्यात नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात, बँक आपल्या दारी उभी राहते, हे चित्र माझ्या एमटीएनएलच्या योगदानाने आम्हास लाभले होते. आम्ही साऱ्याजणी एमटीएनएलच्या सेवेतून पूर्णपणे मुक्त होणार, या कल्पनेने फार दुःखी झालो होतो. असे म्हणतात, ‘एक दार बंद झाले तर दुसरे दार उघडते.’ आम्हाला ग्राहक सेवा केंद्रात, स्वेच्छेने काम करण्यास संधी देण्यात येईल, असा मेसेज मिळाला होता.
मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे कार्यालयीन काम पूर्ण होताना, दिनदर्शिकेत डिसेंबर २०१९ कधी संपला ते कळलेच नाही. शेवटी नको असलेली बातमी, ऑफिसमध्ये धडकली होती. ‘३१ जानेवारी २०२० हा एमटीएनएल सेवेचा, सर्वांसाठी शेवटचा दिवस असेल.’ मेसेज वाचून जीवाची घालमेल होऊ लागली होती. पण आलेल्या प्रसंगाला सामोरे जाणे, हाच पर्याय आता सर्वांसाठी होता.
एका डोळ्यात आनंद भरून तर दुसऱ्या डोळ्यात दुःख लपवून, निरोप समारंभाच्या तयारी लागलो. ३१ जानेवारी उगवणारा दिवस, आम्हाला नव्या जीवनाची सुरुवात करून देणारा असेल. या दिवसाच्या उत्सवमूर्ती, श्रोते आणि वक्ते, आम्ही सर्वजणी असणार होतो.
असा हा त्रिवेणी संगम उत्सव, पहिल्यांदाच माझ्या एमटीएनएलच्या सगळ्याच ऑफिसेस मध्ये साजरा होणार होता.
क्रमशः

– लेखन : सौ. वर्षा भाबल
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अतिशय छान लिहिलंय , सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आता ते दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाहीत याची खंत वाटतेय 😔
Great piece of article. I appreciate your writing talent. All the events before the retirement has been narrated with pictures. The surprise part is that all the characters involved in the retirement process has not been forgotten. To be honest, i don’t read any large content but your article has drawn my attention to read it 2-3 times. All memories once again became fresh in mind. Thank you for your heart touching article.
धन्यवाद !
अतिशय उत्तम लेखन आहे.थेट काळजाला भिडते. कविता खूपच अर्थापूर्ण ,प्रत्येक व्यक्तीचे येथोचित् वर्णन केले आहे.👌👌👌🌹🌹