Wednesday, July 2, 2025
Homeसाहित्य'जीवन प्रवास' ( २५ )

‘जीवन प्रवास’ ( २५ )

आयुष्य पाने चाळताना
आयुष्याचा पहिला अंक भूतकाळात गेला आणि सेवानिवृत्तीनंतरचा, १ फेब्रुवारी २०२० पासून नवीन आयुष्याचा वर्तमान काळ सुरू झाला.

आयुष्यातील नित्यनेमाची दिनचर्या, रोज होत असणारी धावपळ-धडपड थांबली. आता अगदी आपला वेळ फक्त स्वतः साठी ! असे जीवन सुरू झाले. हळूच, थोडे मनाने मागे वळून पाहिले ! नि डोळ्यासमोर संपलेला तो भूतकाळ डोकावला !

आई-बाबांच्या सहवासात उंदडलेले ते बालपण ! घरातील आखाडयात भावंडांसोबत, केलेली ती खोडकर पण प्रेमळ दंगामस्ती ! प्राथमिक व माध्यमिक शाळेत सरलेले ते बालिश सुंदर दिवस ! तिथे लाभलेले काही मायाळू शिक्षक तर, एखादे कडक शिस्तीचे शिक्षक ! तारुण्याच्या उंबरठयावर, कॉलेज जीवनात, गांगरलेले व घाबरलेले ते नाविन्यपूर्ण दिवस ! कधी नि केव्हा, मी “ह्यांच्या” प्रेमात गुंफले नि लपून-छपून भेटतानाचे ते धाडसी दिवस ! आई-बाबांचा आशीर्वाद नि भावाचे पाठबळ आणि देवाच्या कृपेने, बॉम्बे टेलिफोन नामक, नवरत्न कंपनीत मला लाभलेली नोकरी ! आम्हा दोघांचा आगळा-वेगळा, पण विधियुक्त विवाह झालेला तो अविस्मरणीय दिवस !

दोघांनी एकनिष्ठ होऊन, थाटलेल्या तारेवरच्या कसरती संसारात, उमललेल्या दोन फुलांचे संगोपन करताना, भांबावून आम्हा दोघांची होत गेलेली तारांबळ ! संसाराचे स्वप्न पूर्ण तडीस नेताना, दोघांनी केलेले ते अतोनात कष्ट ! त्यामुळे मुलांना आम्ही पुरेसा वेळ देऊ शकलो नाही, असे ते भावूक क्षण ! शून्यातून कधी शंभरी अंक, आयुष्यात आला, ते आनंदी व सुखमय क्षण ! जीवन प्रवास करताना लाभलेल्या कृपाळू व्यक्ती, मित्रपरिवार व ज्येष्ठांचे आशीर्वाद ! आम्ही जिद्दीने व कष्टाने, आमच्या जीवन प्रवासाची केलेली ती सुरुवात ! तारुण्यात पण विचारपूर्वक, आम्ही मारलेली छलांग ! बापरे ! ! !
त्याचे उत्तर आज मी शोधू पाहत आहे.

आता ह्या नवीन वळणावर, न थांबता पुढच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला आहे. प्रवासाच्या गर्दीत खूप मैत्रिणी मिळाल्या. माजी विद्यार्थ्यांचा परिवार लाभला आहे. सामाजिक नाती निर्माण झाली आहेत. आप्तेष्टांचा सहवास लाभत आहे. भरपूर मोकळा वेळ ! ही तर आता खंतच नाही. सर्व कार्यक्रमांस हजर राहणे, सर्वांना वरचेवर भेटत राहणे, फोनवरून मनसोक्त गप्पा मारणे, सारे अगदी सोपे व सुरळीत सुरू झाले आहे.

मैत्रिणींचा भिशी ग्रुप तयार झाला. त्यानिमित्ताने महिन्यातून एकदा भेट होते. गळाभेट करत, गप्पांच्या मैफिली रंगतात. विचारांच्या देवाणघेवाणीतून अधून-मधून सहलीचे बेत आखले जातात. फुल टू धमाल
सुरु झाली आहे.

कुटुंबाला पुरेसा वेळ देता येऊ लागला आहे. त्यांच्या आवडीनिवडी, छंद जोपासताना, त्या सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद न्याहळताना, मन सुखावून जातं. आम्ही दोघं गप्पात रमतो नि भूतकाळातील आठवणी ताज्या होतात. माझ्या कुटुंबीय आयुष्यी वातावरणात, खूप सोसलेल्या अपघाती जखमा, हळूहळू भरू लागल्या आहेत. हरवलेली पिल्लांची मने, ओढीने घरट्याकडे वळू लागली आहेत. त्यांच्यातील स्थिरावलेली भावना, काहीतरी घडविण्याकडे धावू लागली आहे. एकंदरीत आयुष्यातील जखमा आता कुठेतरी पूर्णपणे बऱ्या होताना दिसू लागल्या. खर्‍या अर्थाने पुन्हा एकदा माझ्या आयुष्याची घडी नीटनेटकी बसू लागली. ती आता पूर्णत्वाकडे नेण्याची संधी, पुन्हा मला मिळाली.

माझ्या मनातून ओझरतेपणे काव्य रचनांची सांगड होऊ लागली आहे. जणू माझ्या लेखणीला तलवारीची धार मिळाली आहे. माझ्या मनातील सुप्त इच्छा, मी साध्य करण्याच्या मार्गावर पोहचत आहे. माझ्या जीवनप्रवासाचे आत्मकथन लेखन जवळ जवळ पूर्ण होत आले आहे. आयुष्यात येणारी पुढील वाटचाल, माझ्या ‘जीवन प्रवासात’ नक्कीच रेखाटेन ! अशी मी आशा करते.

आयुष्य फार सुंदर आहे. ते आयुष्य जगताना प्रत्येकाने त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला तर, सर्व मानव जातीला ही दुनिया सुखमय भासेल. ज्या दृष्टीकोनातून आपण, आपल्या आयुष्यातील प्रसंगाना अनुभवतो, तसे आपणास जग भासते. “सुख आणि दुःख ही जीवन पुस्तकाची दोन पाने आहेत.” सुखा मागून दुःख तर, कधी दु:खा मागून सुख हे येतच असते. दुःख सहन करता आले पाहिजे, नि सुख निर्माण करता आले पाहिजे. “रात्र संपली की सकाळ होतेच ना ?” तसेच दुःख संपले की, सुख मिळतेच. पण ह्या दोन्ही भावनांची आपण अनुभूती घेतली पाहिजे. आनंद दुसऱ्यांना देता आला पाहिजे. तरच आपल्या जीवनात आनंद बहरुन वाहतो. चांगल्या कर्माने प्रत्येकाचे दैव घडत असते. आयुष्यातील पाने उघडताना, आम्हा उभयतांना गवसलेले हे महत्वाचे धडे होय.

माझ्या जीवन प्रवासातील माझा सखा-सोबती ! आज मला सर्वांसमोर मांडताना खूप अभिमान वाटतो. काही कौतुके मुखातून येत नाहीत, ते कौतुक मनात रुंजी घालत असते. म्हणूनच ते कौतुक, मी माझ्या हृदयातून-लेखणीद्वारे व्यक्त करत आहे. माझ्यापेक्षा वयाने, तीन वर्षांनी लहान, पण जगाचे ज्ञान अवगत करण्याची क्षमता भन्नाट ! म्हणूनच माझ्या सुरक्षिततेचे कवच बनले ते म्हणजे, माझे पती ! माझ्या शब्दाला म्हणण्यापेक्षा माझ्या मताशी ठामपणे एकरूप झाले, तो माझा मित्र होऊन ! आमच्या आयुष्यात आलेल्या खडतर प्रसंगांना सामोरे जाण्याचे धाडस करत आले, ती हीच व्यक्ती !

आपल्याच माणसांसमोर तर, कधी समाजासमोर निर्भीडपणे, खंबीरपणे माझ्या पाठीशी ढालीप्रमाणे उभे राहीले, ती हीच व्यक्ती ! माझ्या प्रत्येक यशामागे आनंदाने, नेहमीच तटस्थ राहीले, ती हीच व्यक्ती ! पावलोपावली पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले, ते ह्याच व्यक्तीने ! माझ्या प्रत्येक यशाचे कौतुक करून, योग्य अयोग्याची ओळख पटवून देणारी, हीच व्यक्ती !

माणसातील माणुसकी काय असते ! ह्याचे प्रत्यक्ष दर्शन घडले, ते ह्याच व्यक्तीत ! कधीही न कंटाळता, ज्या-ज्या ठिकाणी माझ्या नोकरीच्या बदल्या झाल्या, त्या-त्या ठिकाणी मला कार्यालयात सोडणे व आणणे, अशी निःस्वार्थी सेवा मला दिली, ती माझ्या ह्याच सख्याने ! आणि तेही, कधी भर उन्हात तर कधी भर पावसात, एका दुचाकीसह ! कठीण परिस्थितीत, चटणी-भाकरी तर कधी नुसती पेज खाताना, कोणतीही कुरबूर न करता, चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हाच सोबती ! संसारातील अखंड जोडीदार, तर जिवलग मित्र ! विस्कटलेल्या कुटुंबीय तणावात, धीराची थाप देत तर प्रेमाने हातात हात धरत, पुढे नेणारा ! कधीही माझे-तुझे असा भेदभाव न करता, जीवन प्रवासाची पस्तीस वर्षे, मी ज्या व्यक्ती सोबत सुखाचा संसार करत आहे, ते माझे पती महेंद्र, माझा प्राणवायू आहे.

आयुष्य नावाच्या पुस्तकातील सुख-दुःखाची पाने, कशी भरभर उलटून गेली. एकमेकांशी आयुष्याची बांधलेली गाठ, एकमेकांनी प्रेमाच्या सचोटीत उतरून, ही पस्तीस वर्षे ! कधी भूतकाळात विलिन झाली, कळलेच नाही ! आयुष्यात हिशोब कधीच लावला नाही. फक्त आणि फक्त माणुसकीचे शिखर गाठण्याचे ध्येय, समोर ठेवून प्रामाणिकपणे, सत्याने, कष्टाने आणि इमानदारीने कास धरत, आज आम्ही इथवर पोहोचलो.

‘मनुष्य योनी’ माणसाला एकदाच मिळते. त्या मिळालेल्या ‘मनुष्य जन्माचे’ सार्थक करता आले पाहिजे. माझा जीवन प्रवास जवळ-जवळ साठीच्या आसपास पोहचत आला आहे. हया जीवन प्रवासात आम्ही काय मिळवले ? व काय गमावले ? हा विचार मनात न करता, आम्ही काय शिकलो ? नि काय जपले ? हे मला महत्वाचे वाटते.
प्रथमत: मला ह्या सुंदर जगात, जन्माला आणणारे माझे वंदनीय माता-पिता, यांची मी ऋणी आहे. त्यांच्या संस्कारातून सुसंस्कृत झालेली माझी जडण-घडण, म्हणजे मी त्यांची प्रतिकृती आहे. मी हे माझे भाग्य समजते. आईने दिलेल्या वचनाशी एकनिष्ठ राहून, भावंडांसोबत व समाजबांधवांशी, शेवटपर्यंत आपुलकीने त्यांच्या सोबत असेन. सासर-माहेर ही दोन्ही घरे व तेथील नातेसंबंध माझ्यासाठी सन्माननीय आहेत. ‘अंथरूण पाहून नेहमी जीवनात पाय पसरावे,’ हा सूविचार मनावर कोरून, जीवनात त्या विचारानेच पुढचे पाऊल टाकत आले.

माणसामाणसातील स्वभाव पारखून, जगनामी शाळा शिकले. जगात वाईट-चांगल्या गोष्टींचा अनुभव घेऊन, चांगल्या गोष्टींना नेहमीच प्राधान्य दिले. ‘हाताची मूठ बंद न ठेवता,’ गरजूंना सढळ हाताने मदत करण्यास पुढे सरसावले. प्रेमाने जग जिंकले. स्वतःमध्ये माणुसकी जागृत ठेवून, आयुष्यात येणाऱ्या सर्व चढ-उतारात, दोघांनी धरलेला हात कधी सुटू दिला नाही.

जन्माला येऊन सारेच जगतात. पण प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगवेगळी असते. आयुष्यात एक गोष्ट मात्र आम्ही दोघांनी पक्की अनुभवली. ती म्हणजे-“शितं असतील तर भूतं गोळा होतील !” हो, मित्रांनो ! हे तितकेच खरे आहे.

आम्ही उभयतांनी आमच्या जीवन प्रवासात साहस, धैर्य, मेहनत व आपलेपणा हया सर्व गुणांची सांगड घालत, प्रेमळ व कृपाळू कारंजा सतत वाहत ठेवला आहे. “जीवनात माणसे तोडणे सोपे असते, पण माणसे जोडून जपणे, फार कठीण असते.” तात्पर्य, आमच्या चांगल्या संस्कारातून नेमके, ‘जोडणे व जपणे’ हया दोन गोष्टी आम्ही उभयतांनी जिवापाड जोपासल्या. त्यामुळेच आमच्या जीवन प्रवासात, आम्हाला प्रत्येक वाटेवर भेटलेल्या व्यक्ती, आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत. आम्हावर त्यांच्या प्रेमाचे, सदैव ऋण राहील.

आमच्या आयुष्यात मिळालेली त्यांची सोबत, पाठींबा व निःस्वार्थ प्रेम, माझ्या जीवन प्रवासात आम्हाला लाभलेली आमच्या आयुष्यभराची कमावलेली संपत्ती आहे !
ही सर्वांची सोबत म्हणजे आम्हा उभयतांस लाभलेले वरदान होय !

वर्षा भाबल.

– लेखन : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
– संपादन : अलका भुजबळ.  9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अतिशय छान वर्णन केले आहे,वर्षाने ज्या प्रकारे पतीचे वर्णन केले आहे ते वाचून गदगद झालो,माझ्या प्रती असलेली भावना,प्रेम हळुवारपणे उदबोधित केली आहे,माझ्यासोबत घालवलेले ते क्षण सहज डोळ्यासमोरून गेले,धन्यवाद वर्षा 🌹🌹🌹🌹🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४