मानवी जीवन हे हृदयाच्या कार्यतत्परतेवर चालत असते. या हृदयात चार कप्पे असतात. तत्वद् आपल्या आयुष्यात चार दालनं येतात. पहिल्या दालनात होणारा प्रवेश हा जीवनातील पहिला काळ म्हणजे बालपण असतं, जे मातृकृपेनं प्राप्त होतं.
या दालनकाळात मन रिझविण्यासाठी खेळणी, फुलपाखरं, पऱ्या, काऊ – चिऊ, मनिमाऊ, चांदोबा, खारुताई, इत्यादी अनेक जण असतात. किंचित वाढते वय होता, चालणारे, दुडू दुडू धावणारे, सवंगडी येतात. यांचेबरोबर खेळत असताना कधी तारुण्याच्या मार्गावर प्रवेश होतो हे कळतही नाही. जसजसे पुढे जावे तसतशी मागील काळाची दालने ही बंद झालेली असतात, म्हणून ज्या त्या गोष्टी या त्याच काळात होणं ही मानवी जीवनाच्या सकस वाढीची गरज असते
तारुण्याचे दालन हे विविध खेळांचे, स्वप्नांचे असते. व्यक्तीसापेक्षतेनुसार संदर्भ बदलतात. स्वप्नांच्या जगात वावरताना मनाचा ब्रेक लागणंही काही वेळेला अशक्य होऊन जातं आणि मग अशा वेळी ….
अपेक्षाभंगाचं दुःख
फार मोठं असतं ।
अपेक्षाच केल्या नाही
तर, जगणं फार सोपं असतं ।।
याची प्रचिती आल्याशिवाय रहात नाही. काही महत्वकांक्षा निर्माण होतात, ते ही स्वाभाविक असतं. मात्र विचारात प्रगल्भता असेल तर, वास्तवाची जाणं ही येऊ शकते, तेव्हा ….
स्वप्न सत्यात येताना
हर्ष मनी झाला ।
आयुष्याच्या पानावर
साज चढवून आला ।।
ही सुद्धा जीवनाच्या वाटचालीची सत्यता होणे या सारखा दुसरा स्वानंद नाही.
जीवन वाटचालीत स्वप्नपूर्ती होत असताना काही वेळा अनेक गोष्टी हातातून पाऱ्यासारख्या निसटून गेल्या आहेत, हे कळायला फार उशीर झालेला असतो आणि अशावेळी मानसिक त्रास होणं ही मानवी वृत्ती असते. असं असलं तरीही, प्रसंगानुरुप वेळकाळ पाहून यश तथा अपयश हे पचवायला शिकलं पाहिजे.कारण, परमेश्वरानं आपली पाठ मागे ठेवली आहे. त्यामुळे पाठ थोपटली तरी मागूनच आणि धोका झाला तरी तोही मागूनच होत असतो. एखाद्याला लाथ मारताना पाठीखालील पृष्ठभागावर मारली जाते. पाठीमागून मारलेली लाथ कारणपरत्वे एक वेळ क्षम्यही होऊ शकेल, पण ….
पोटावर लाथ मारुन एखाद्याचं आयुष्यच उध्वस्त होईल तर ते कधीही क्षम्य होणार नाही.
जीवन जगायचंच असेल तर, पाण्यासारखं जगलं पाहिजे. कुणाशीही मिसळून जा, पण स्वतःच अस्तित्व, महत्व कमी न होऊ देता जगावे. जीवनात संकटे ही येणारच. ती परिक्षा असते. त्यातून येणारे अनुभव गाठीशी धरुन पुढील वाटचाल करावयाची असते. त्यानुसार चालणारेच जीवनात यशस्वी होतात, कारण प्रत्येक संकटात यशोदायी जीवनाचं बीज दडलेलं असतं. त्याला योग्य ते खतपाणी मिळालं तर आणि तरच ते वृद्धिंगत होतं.
वयपरत्वे शरीर थकायला होतं, पण मन मात्र अजूनही काही करण्याच्या विचारात असतं. पण, तसं घडतंच असं नाही. त्यामुळे या किनाऱ्याच्या आयुष्यात कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे, त्यासाठी मन तेव्हढं सशक्त असलं पाहिजे. आयुष्यात येऊन जीवन सार्थक झाल्याचे भाव हे दृश्य होणे महत्त्वाचे असते, त्यासाठी आदर्शवृत्ती ही मनी असणं ही आपली नैतिकता असते.
तरुणपणातील धावपळ, स्वप्ने, सुख- दुःख प्रसंग हे सगळं आपल्या पुढील पिढीसाठी ध्येयप्रत आणि आदर्शव्रत असलं पाहिजे.
शेवटी जाता जाता, ज्याच्या साथीनं जगलो, वावरलो त्यांच्याबरोबरच राहून एकमेकांच्या चुकांचं योग्य परिमार्जन करणं,
आणि आनंदानं येणारे क्षण उपभोगत, हातात हात घेत, ज्या अनंताच्या प्रवासाला पुढं जायचं आहे त्या साठी….
मी आणि तू तसे
आहे जीवनप्रवासी ।
प्रवाहात राहिलो म्हणून
आहे ना सहवासी ।।१।।
हे नयन आता
मिटतील कधीही ।
साथ सुटली जरी
स्मरण राहील तरीही ।।२।।
हीच विचारसरणी असली पाहिजे ….
।। तथास्तु ।।

— लेखन : अरुण पुराणिक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
वाह…! खूपच छान…!!
… प्रशान्त थोरात,
पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007