“ईकेगाई” हा जपानी शब्द आहे. त्याचा अर्थ म्हणजे ‘जगण्यामागचं कारण’.
मी हा शब्द पहिल्यांदा वाचला तेव्हा वाटलं, आपण खरंच का जगतो ? नोकरी, जबाबदाऱ्या, सामाजिक बंधनं… पण स्वतःसाठी काय ?,
मनापासून केल्याने काही होतं का आणि काय काय ?
1️⃣ ईकेगाई शोध : ‘मी कोण आहे ?’
मी एक पशुवैद्यकीय अधिकारी होतो. सरकारी सेवेत ३८ वर्षं दिली. अनेकदा फक्त कर्तव्य म्हणून झपाटून काम केलं, पण एक दिवस मनात प्रश्न उभा राहिला, हेच आहे का माझं जगणं ?
माझ्या लहानपणी वडील गेले.
कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली. दारिद्र्य, संघर्ष, आईचं बोट धरून पार केली. मनात एकच ध्यास होता, तो म्हणजे काहीतरी अर्थपूर्ण करायचं.
तेव्हाच माझं ईकेगाई तयार होत होतं !
समाजाची व मुक्या पशुपक्ष्यांची सेवा करण्याच्ये वडिलांकडून आलेले बाळकडू आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण करून सक्षम करणे, हेच माझं ‘जगण्यासाठीच कारण’ बनलं.
2️⃣ इचीगो इचिए
‘प्रत्येक क्षण अमूल्य आहे’
नोकरीत असताना अनेकदा शेतकरी / पशुपालक भेटायचे. “डॉ. बैल चालत नाही /चारा खात नाही / एखादी गरीब घरातली माऊली सांगायची, ‘माझी बकरी आजारी आहे तिला वाचवा तिच्यावरच माझा संसार आहे’. कोणी कोंबडी वाचवा म्हणून यायची. गाईच्या बाबतीत सांगायचं तर कोणी वासरांसाठी,
तर कोणी म्हशीच्या बाबतीत रात्री बेरात्री तक्रारी घेऊन यायचे. काहीतरी करा आणि जीव वाचवा म्हणून सांगायचे.
मी प्रत्येक शेतकऱ्याला, पशुपालकाला त्यांच्या जनावराला अंतिम क्षणापर्यंत वेळ देऊन ते जनावर / पशु वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यात मला यशही येत गेलं कारण मला माहिती होतं तो क्षण पुन्हा येणार नाही. म्हणून संपूर्ण मन, बुद्धी ज्ञान अनुभव, वेळ आणि कौशल्य मी त्यात झोकून देत असे. त्यामुळे मनाला काम केल्याचं समाधान वाटत होतं आणि कृतकृत्य झाल्या सारख वाटत होत.
हेच इचीगो इचिए
मी माझ्या जीवनात प्रत्यक्षात उतरवलं.
प्रत्येक अनुभव आणि आलेली संधी फक्त एकदाच मिळते हे माहिती असल्याने मी वर्तमानात जगलो,
व आताही मी वर्तमानतच जगतो न भूतकाळ आठवतो ना भविष्याची चिंता करतो. हेच मला इचिगो इचीए ने हे शिकवलं.
3️⃣ जपानी रहस्यांचा अभ्यास करतांना मीच माझा उलगडत गेलो :
माझ्या जीवनशैलीत परिवर्तन आणण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला तेव्हा कायझेनमुळे मी आयुष्यभर शिकत होतो व अजूनही शिकत आहे.
सेवानिवृत्तीनंतरही विविध प्रकारची पुस्तके, नवीन नवीन टेक्नॉलॉजी, योगाभ्यास, व जगात जे काही नवनवीन असेल ते शिकणं सुरू ठेवलं आहे.
डानशारी ने शिकवलं, त्यानुसार
मी कमी गरजांमध्ये /वस्तूंमध्ये समाधानाचा व आनंदाचा शोध घेतो.
आता अनावश्यक गोष्टींना स्पष्ट ‘नाही’ म्हणतो.
ज्या गोष्टींमध्ये मला आनंद मिळत नाही किंवा ज्यामुळे मला त्रास होतो अशा गोष्टीपासून मी अलिप्त होतो.
मोआई जपलं …माझे जुने मित्र, सहकारी, गुरु, शेजारी यांना मी आजही नियमित भेटतो, त्यांना नियमित फोन करतो. त्यांची आस्थेने विचारपूस करतो आणि तेच माझं मोआई आहे.
शिनरिन योक्कू :
निवृत्तीनंतर मी आता निसर्गात फिरून आनंद घेतो.
झाडांशी संवाद साधतो .
छोट्या छोट्या ट्रेक्स करतो.
त्याने मला खूप आनंद होतो व आतून मला समाधान मिळते.
झाझेन व गमन : ध्यान व संयम, संकटातही स्थैर्य आणि धैर्य देण्याचं काम संयम करते. संयम माझ्या आजच्या वयात मला मानसिक बळ आणि आरोग्य प्रदान करते.
4️⃣ न्यूरोसायन्स मुळे मनाला आनंदी ठेवण्याचे विज्ञान शिकता आलं. ते आज मला सेवानिवृत्तीनंतर कळालं :
म्हणूनच मी माझं मन अगदी आनंदी ठेवण्याचं काम करतोय. आनंद घ्या, आनंद वाटा आणि आनंदाचा सुगंध पसरवा. कारण न्यूरोसायन्स हे विज्ञान आहे.
दररोज झोपण्याआधी मी आभार मानतो. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईचे, ज्या कुटुंबाने माझ्यावर विश्वास टाकला, ज्या नातेवाईकांनी/ मित्रांनी/ शेजाऱ्यांनी मला मदत केली, आयुष्याच्या चढ-उतारात अनेक गुरु भेटले त्यांच्यामुळे मी शिकलो, वाढलो आणि इथपर्यंतच आयुष्य जगलो. अशा सर्व गुरूंचे, हितचिंतकांचे आभार मानतो व स्वतःचे पण आभार मानतो कारण त्यामूळेच तर मी स्वतःला उभारी देऊ शकतो. त्यामूळेच तर आता मला खूप शांत झोप लागते.
ध्यान, प्राणायाम, योग, सायकलिंग व सकाळची पूजा अर्चना हेच माझ्या तणावावरच औषध मी शोधलं आहे.
माझा नातू युध्वीर, त्याला गोष्टी सांगणं, त्याच्याशी खेळणं, त्याच्याशी मस्ती करणे.
त्याच्यावर संस्कार करणे.
त्याचा हसरा चेहरा पाहिल्यानंतर माझा थकवा कुठे च्या कुठे निघून जातो. मी सुखावतो आणि हाच माझा डोपामिन डोस आहे.
माझं लेखन, कविता, मित्र, नाटके, व्याख्यानं यांच्यामुळेच माझी सर्जनशीलता टिकून आहे.
सारांश :
मी एक अति सामान्य माणूस आहे. पण इकीगाई, इचीगो इचिए, या जपानी तत्त्वज्ञानाने आणि न्यूरोसायन्सने मला सामान्यांमधून असामान्य जीवन जगायला शिकवलं –
समाधानी, अर्थपूर्ण, आणि आनंदी जीवन. माझं यश म्हणजे, पद, प्रतिष्ठा,पदवी, पैसा कधीच नव्हते. तर माझं आत्मिक समाधान, संतुलन आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात दिलेलं मदतीच योगदान हेच माझं खर यश.
मी माझं इकीगाई शोधलं. आपणही आपलें इकीगाई शोधले तर… आणि मग जगणं हे फक्त अस्तित्व न राहता – एक अर्थपूर्ण प्रवास होईल आणि होतोच हाच माझा अनुभव आहे.
आपल्या सर्वांना सुखी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : डॉ. चंद्रकांत हलगे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
लेखकाचा फोन नंबरही दिलात तर बरं होईल
खूप प्रेरणादायी लेख..सरकारी सेवेत 38 वर्षं दिली..एक दिवस विचार आला ..हेच आहे का माझं जगणं??
हे तुमचं मनोगत वाचताना जाणवलं की या तुमच्या प्रश्नाचं उत्तर ही तुम्हीच दिलं आहे ..जेव्हा तुम्हालाच जाणवलं की जे काम पशुवैद्यकीय म्हणून करताना इचीगो इचीए माहिती झाल्याने तुम्ही तुमचं सारं कौशल्य वेळ मन बुध्दी वापरून करत राहिलात आणि आपल्या कुटुंबाला सांभाळत वाटचाल केलीत तेव्हा तुमच्याही नकळत तुम्ही जीवन यशस्वीपणे जगलात..ईकेगाई म्हणजे काय हे माहित नसतानाही…खूप सुंदर लेख..true to life..hats off to u
आपण प्रकाशित केलेला या लेखा साठी आपले मनापासून खूप खूप धन्यवाद व आपल्या आभार आपल्या प्रोत्साहनामुळेच मला लिहिण्याचं बळ मिळतं आणि मी या वयात लिखाण करू शकतो ही भावनाच मला सुखावह करते आपल्या आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असावे आणि काही माझ्या चुका असल्यास त्या सांगाव्या मी नम्रपणे त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद!
इकिगाईवर सुरेख भाष्य