“सत्कर्माचे महत्व”
भारत सरकारच्या सेवेत १९७२ ते २०१२ असे प्रदीर्घकाळ राहिलेले, शेती आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींची नितांत आवड असणारे, सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी श्री विठ्ठल गव्हाणे सांगताहेत जीवन विषयक त्यांचे मौलिक विचार….
— संपादक
जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला वाटते आपल्याला जीवनात सुख, समाधान, संपत्ती, ऐश्वर्य, मिळाले पाहिजे. वस्तुस्थितीचा स्वीकार करूनच जीवनाला सुरेख आकार देण्यात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आपला जन्म श्रीमंत की गरीब, कुटुंबात होईल हे कोणालाही माहित नसते. पण आपण चांगले कर्म करून आपले नशीब बदलू शकतो.
माणसाचा उत्कर्ष, उन्नती स्वतःच्या कर्तुत्वातून निर्माण होत असते. समाजातील उच्च विद्याविभूषित व्यक्तींचे मार्गदर्शन तरुण पिढीला मिळाले पाहिजे. आजच्या कॅम्पुटर युगात प्रत्येक जबाबदार पालक मुलांच्या शिक्षणाला प्रथम प्राधान्य देत आहे. या प्रोत्साहनामुळे तरुण पिढी डॉक्टर, इंजिनीयर, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक होऊन देशाचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी सिद्ध झालेली दिसत आहे.
शिक्षण हा ज्ञानाचा तिसरा डोळा आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत शिक्षणाकडे फारसे लक्ष नव्हते. गाव व शेतीला महत्त्व दिल्याने अनेक तरूण, तरुणी, शिक्षणापासून वंचित राहिले. त्या काळातील आजचे आईवडील, आजीआजोबा मुलांना, नातवांना, शिक्षणासाठी स्वतःहून प्रोत्साहन देत आहे. आजच्या आधुनिक डिजिटल स्पर्धेच्या युगात पालक मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी आर्थिक नियोजन करून मुलामुलींना उच्च शिक्षण देत आहे
ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी शहरातील मुलांसारख्या आर्थिक शैक्षणिक सुख सोयी मिळत नाही. तेथे परिस्थितीचा स्वीकार करून मनस्थिती बदलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हुशार मुले स्वतःच्या बुद्धि कौशल्याने परिस्थितीवर मात करून शिक्षण घेऊन यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलेली आपण पाहतो. ही एक अभिमानाची गोष्ट वाटते. कौटुंबिक जीवनात, मुलांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च ही आपल्या भविष्याची दामदुप्पट ठेव आपण निर्माण करत असतो. व्यवहारात पैशाला जेवढी किंमत देतो, त्या पेक्षा शिक्षण व संस्काराला अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे.
या विश्वामध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा एक वाटसरू आहे. आपल्या प्रवासाची अंतिम तारीख, वेळ आपल्याला माहीत नसल्याने आपण गाफिल राहून जीवन जगतो आणि एक दिवस अचानक या जगाचा निरोप घेतो. आपण येताना काय घेऊन आलो असतो ? पण जाताना मात्र सत:कर्मच बरोबर घेऊन जाणार असतो, हे आपण लक्षात घेऊन जीवन जगले पाहिजे. प्रत्येक कर्माच्या ठिकाणी सावध राहून चांगले सत्कर्म केल्यास आपला पुढचा जीवन प्रवास सुखकारक होईल, हे नक्की.
आपल्या जीवन प्रवासात कुटुंब, समाज, राष्ट्र हे तीन घटक महत्त्वाचे असतात. प्रत्येकाने कुटुंबाची जबाबदारी यशस्वी पूर्ण करत सुशिक्षित समाज निर्मिती करून राष्ट्राचे भवितव्य उज्वल केले पाहिजे. वरील ३ घटक हे राष्ट्रीय जीवनाचे आधारस्तंभ आहेत. या त्रिशिल्पातील एक जरी घटक घसरला तर आपले संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होईल. प्रत्येक माणूस समाजाचे, राष्ट्राचे, देणे लागतो ते ऋण फेडण्याची जबाबदारी प्रत्येक माणसाची आहे. धार्मिक सांस्कृतिक, शैक्षणिक, विधायक कार्यासाठी आपला आर्थिक सहभाग असलाच पाहिजे. माणूस किती वर्षे जीवन जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचे वाटते,
आपले शरीर म्हणजे साक्षात ज्ञानदेवाची अलंकापुरी किंवा विठुरायाची पंढरी असून त्यात विराजमान झालेला आत्मदेव हा प्रत्यक्ष ज्ञानदेव किंवा पांडुरंग आहे, विचार हा चैतन्य शक्तीचा अविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. तेव्हा मानवा तुला देव व्हायचे की दानव हे तू ठरव..!!
सद्गुरु वामनराव पै सांगुनच गेले आहेत की,
“तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार”!

— लेखन : विठ्ठल गव्हाणे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अत्रे यांच्या वरील लेख अप्रतिम