जीवन म्हणजे काय ? या मालिके अंतर्गत आज आपण वाचू या मनीषा ताम्हणे यांचे विचार. त्या विविध विषयांवर, विविध प्रकारात लिखाण आणि कविता करतात. विविध साहित्य संमेलनात त्यांनी आपल्या कविता सादर केल्या आहेत. “गुलबक्षी” हा त्यांचा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.
न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे.
– संपादक
सुसंवाद आवश्यक
सर्वसामान्य माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्रमुख गरजा आहेत. हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जगण्यासाठी त्याची गरज आहे, परंतु माणसाचे जगणे तणाव रहित, काळजी, चिंता रहित असेल तर तो सुखाने आणि आनंदाने जगेल हे सत्य नाकारून चालणार नाही. असे जीवन जगण्यासाठी त्याला भावनिक गरजेचीही आवश्यकता आहे.
त्याला जर कोणाची साथ मिळाली तर तो ह्या गर्दीत कोलाहलात कधीच एकटा पडणार नाही.. त्याला एकांत छळणार नाही. ही साथ फक्त त्याच्या सोबत असून काही उपयोग नाही तर वेळोवेळी त्याला शाब्दिक संवादाची जोड हवी. मनातले भाव, विचार व्यक्त होण्यासाठी मिळणारी सोबत त्याच्या मनाला आनंदी ठेवण्यास, स्थिर ठेवण्यास मदत करते. त्यामुळेच सुसंवाद ही माणसाची प्रमुख भावनिक गरज आहे आणि ती माणसाचे मानसिक आयुष्य निश्चितच समृध्द करते त्यामुळे सुसंवाद ही काळाचीच गरज आहे.
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे.तो समूहप्रियही आहे. गर्दीत एकटा पडलेला माणूस न्यूनगंडाने पछाडलेला, आत्मविश्वासाचा अभाव असलेला आढळतो. स्वत:च्या भावना, विचार व्यक्त केल्यामुळे मनात बंदिस्त ठेवलेल्या भावनांना मोकळी वाट करुन दिल्यावर मनाचा ताणही हलका होतो. आपल्या भावना व्यक्त करुन दुसर्याच्या भावनाही जाणून घेणं हे देखिल तितकच महत्वाचे आहे. एकमेकांशी बोलण म्हणजे संवाद पण फक्त संवाद नको सुसंवाद हवा. हा सुसंवाद कुटुंबातील व्यक्तींसोबत, समवयस्क व्यक्तींसोबतही असतो.एकलकोंड्या, निरस आयुष्याला सुसंवादाची झुळूक उत्साही बनवते.आपल्या वयात येणार्या मुलामुलींसोबत सुसंवाद साधणं हे तर पालकांच मुख्य कर्तव्य आहे.
त्यामुळेच संवाद जसा महत्वाचा असतो तसाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्वाचा असतो सुसंवाद. आजच्या धकाधकीच्या जीवनात सुसंवाद हरवत चालला आहे. आईवडिल नोकरी निमित्त घराबाहेर. मुलं शाळा, काॅलेजमधे. घरी आल्यावरही पुन्हा आपापल्या विश्वातच दंग आणि उरलेल्या वेळात मोबाईलमधे डोळे घालून बसणार. वेळ केव्हा देणार संवादाला ? आणि सुसंवाद तर दूरच राहतो. आपल्या मुलांची बदललेली मन:स्थिती, त्याला काही सांगायचे आहे का ? इथेही हल्ली काही पालकांचे लक्ष नसते. ते स्वत:च्याच व्यापात इतके बुडून जातात कि मुलांची काही वेळा पालकांशी सुसंवाद साधायची इच्छाही असते पण पालकांना वेळच नसतो आणि मग वेळ निघून गेल्यावर पालकांनी मन:स्ताप करण्याला काही अर्थ नसतो.
निदान रात्री जेवताना एकत्र बसून दिवसातील घडलेल्या गोष्टी एकमेकांना सांगितल्यास किती तरी प्रश्नांची उत्तरे सापडू शकतात. मन हलके होते.आपल्या मुलाला कोणाची संगत आहे ? तो एखाद्या व्यसनात तर गुरफटत नाही न ? त्याचे अभ्यासात नीट लक्ष आहे का ? ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी सुसंवाद साधूनच समजू शकतात आणि त्यातूनच योग्य मार्ग सापडू शकतो. तसेच हा सुसंवाद आपण कोणाशी करावा ? हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण हल्ली “आम्ही समदु:ख्खी” असे लेबल स्वार्थापोटी स्वत:ला लावून निव्वळ टाईमपास करणार्यांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे कोणाशी किती संवाद साधायचा ? कोणता संवाद सुसंवाद ठरवायचा ? हे कळणंही महत्वाचं आहे. नाहीतर भाबडेपणे एखाद्यावर विश्वास ठेवून मनातलं पटापट बोलून टाकायचं आणि त्यातून निर्माण होणार्या समस्येमुळे फार मोठ्या मन:स्तापाला सामोरे जायचे असेही होऊ नये ह्याची खबरदारी घेणे तितकेच महत्वाचे आहे.
कुटुंबातील व्यक्तिव्यतिरिक्त सुसंवाद करताना आपण ज्याच्याशी सुसंवाद साधतो ती व्यक्ती फक्त विश्वासातीलच नाही तर वागण्याच्या, बोलण्याच्या मर्यादा सांभाळणारीच असावी. कारण काही व्यक्ती अशाही असतात आपल्याशी बोलताना आपल्या तोंडावर मित्रत्वाचे सल्ले देतात आणि आपल्यापाठी स्वत:च्या “खास” व्यक्तींमधे आपली खिल्ली उडवतात, थट्टा करतात आणि आपल्या समस्यांना एक चघळायचा विषय बनवतात. तेव्हा अशा व्यक्तींसोबत सुसंवाद तर दूरचाच पण संवादही करणे टाळलेले केव्हाही उत्तम.
सुसंवाद घरातील, कुटुंबातील व्यक्तींमधे असणे ही तर मोठी गरज आहे. जेव्हा मुलगी वयात येते, मुलं पौगंडावस्थेत असतात तेव्हा त्यांच्यात अनेक शारीरीक आणि मानसिक बदल होतात अशावेळेस त्यांची हळवी मानसिक अवस्था पालकांनी जाणून घेणे गरजेचे असते. त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना बोलत करुन त्यांच्या मनातील शंका दूर कराव्यात. मुलांशी अशावेळेस सुसंवाद केला नाही तर ही मुले सर्व गोष्टी मनातच ठेवतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक असुरक्षितता भासते. करिअरच्या वाटा निवडतानाही आपल्या पाल्याची रुची कशात आहे हे जाणून घेऊन त्यानुसार त्याचा कल ज्या विषयात असेल त्या क्षेत्राची त्याला निवड करण्याचे स्वातंत्र देणे महत्वाचे आहे. स्वत:च्या हट्टाला मुरड घालावी. ह्यासाठी घरातील व्यक्तींचे परस्परांशी नाते मैत्रीचे असावे. निष्कारण ताठर भूमिका, उगीचच अतिशिस्त नसावी.
मैत्रीपूर्ण संवादाने नात्याचे बंध अतूट राहतात. घरातील वातावरण हसरे खेळकर असावे. त्यामुळे मुलं बाहेर घडलेली कोणतीही घटना विश्वासाने घरात सांगू शकतील.मुलं चाणाक्ष असतात. आपले आईवडिल परस्परांशी किती मोकळेपणे, आदराने वागतात ह्याकडे त्यांचे लक्ष असते. बाहेर स्वत:च्या बाबतीत घडलेल्या बारीक सारीक घटना मुलं आपल्या पालकांना केव्हा सांगतील ? जेव्हा पालकांचा मुलांशी सुसंवाद असतो तेव्हाच ही मुलं मोकळेपणे व्यक्त होतात. मुलांच्या आत्महत्या, लहान मुलींचे लैंगिक शोषण इ.समस्या पालकांचा मुलांशी सुसंवाद नसल्याचेच द्योतक आहेत. तसेच आपल्या घराची आर्थिक परिस्थिती प्रत्यक्षात कशी आहे ह्याची समज पालकांनी मुलांना द्यायला हवी. उगीचच खरी परिस्थिती लपवून फुकटचा बडेजाव करु नये. ह्या सर्व गोष्टी पालक आणि पाल्य ह्यांच्यातील सुसंवादानेच साध्य होतात. कोणताही कठीण प्रश्न निव्वळ सुसंवादाने चुटकीसरशी सुटतो.
मुलांनाही वाटत घरातील मोठ्या माणसांनी त्यांच्याशी गप्पा माराव्यात,खेळावं,त्यांच्यासाठी वेळ काढावा. स्वत:ची कामं, कार्यक्रम, फोन ह्यातून मुलांसाठी वेळ द्यावा. आज बर्याच घरात नात्यातील संवाद हरवत चालला आहे. तो डिजिटल दुनियेत गायब झाला आहे हे त्रिवार सत्य आहे. हे नजरेआड करुन चालणार नाही. हा संवाद असाच हरवला तर मुलांच्या मनातील भावभावना, त्यांची दु:ख्खं सगळ मनात साठून राहतील. सुसंवादा अभावी नात्यात कायमचा दुरावा निर्माण होईल. अनेकदा पतीपत्नी एकमेकांना मोकळेपणा देतात. एकमेकांच्या करिअरमधे हस्तक्षेप करीत नाहीत. हे चांगलेच आहे पण हे करताना आपल मुलं एकट आहे त्यालाही आपल्या संवादाची गरज आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांनी मुलांमधे काही वेळासाठीतरी अडकणे महत्वाचे आहे पण हे पालक मुलांना अशावेळेस निरनिराळ्या छंदवर्गांना अडकवून मोकळे होतात आणि मुलांच्या विचारांचे असे वाळवंट करतात. अनेकदा काही सुशिक्षित पालक मुलांना घरात एकटे वाटू नये म्हणून घरातल्या आजी आजोबांना महत्व न देता मुलांना काॅमप्युटर, मोबाईल, व्हिडीओ गेम्स आणून देतात पण पालकांना हे कळत नाही की ह्या निर्जीव वस्तु मुलांना ज्ञानाची नवी दालने उघडून देतील पण मुलांना शाबासकी कोण देणार ? त्यांच्या मुलांच्या दबलेल्या भावना ती कोठे मोकळ्या करणार ? त्यासाठी सुसंवाद हवाच. “जुळतील सूर संवादाने बहरेल जीवन आनंदाने”
पतीपत्नीमधे सुसंवाद असलाच पाहिजे.दोघांनीही एकमेकांकडे मन मोकळ करावं. फारच थोड्या स्रिया पतीकडे आपल्या मनातले विचार व्यक्त करतात अशावेळेस पतीनेही पत्नी आपल्याशी मोकळेपणे का बोलत नाही हे जाणून घेतले पाहिजे. तसेच पतीनेही लपवाछपवी न करता पत्नीशी सुसंवाद साधला पाहिजे. बर्याच जणांच्या संसारात हे असं घडत नाही त्यामुळे विसंवादामुळे गोष्टी एकमेकांवर संशय घेणे, वारंवार एखाद्या विषयावरुन वादावादी होणे इथपासून गोष्टी घटस्फोटापर्यंत जातात. घरात वाद नको म्हणून बर्याचशा स्त्रिया मनातल बोलण्याचे टाळतात. दोघांच्याही बोलण्यात तारतम्य असावे. भांडणं होतात म्हणून सुसंवाद करायचा नाही ही पतीपत्नीची भूमिका चुकीचीच आहे. पतीपत्नीतील सुसंवाद ही देखिल काळाचीच गरज आहे. सुसंवाद साधा. एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या विचारांचा भावनांचा आदर करा.
व्यवस्थापनातील सुसंवाद हा देखिल एक महत्वाचा भाग आहे. व्यवस्थापकांनाही सुसंवाद साधणे फार अवघड असते आणि इतरांनी व्यस्थापकांना सुसंवाद उत्तमरीत्या नेहमीच साधता येतो अशी ठाम समजूत करुन घेतलेली असते. वरिष्ठ आपल्या हाताखालच्या लोकांशी नेहमी सुसंवाद साधत असतील तर त्यांचा कर्मचारीवर्ग आपल्या समस्या मोकळेपणे मांडतील.
प्रशिक्षण कार्यक्रमात सुसंवाद असेल तरच ते यशस्वी ठरतात. ह्या कार्यक्रमात सुसंवाद योग्य रित्या शब्दबध्द करणे महत्वाचे आहे. समोरची व्यक्ती समजू शकेल अशा शब्दांचा वापर झाला पाहिजे. अशा कार्यक्रमात मधून होणारी सततची कुजबूज, मधेमधे फिरणार्या व्यक्तींच्या हालचाली ह्यामुळे चित्त विचलीत होऊन सुसंवादात बाधा येऊ शकते. सुसंवादात जर रस घेणार्या व्यक्ती नसतील तर सुसंवाद होणार नाही. तसेच वैरभावना असेल, तुलनात्मक भावना असेल, पूर्वग्रह दुषित असतील तर सुसंवाद होणं अशक्य. त्यामुळे सुसंवादासाठी सूर जुळणे गरजेचे आहे.
शाळाकाॅलेजमधील शिक्षकांचा आणि विद्य्यार्थ्यांचा सुसंवाद हा देखिल आवश्यक आहे. विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत शिकवणारे शिक्षक त्यांच्या शिकवण्याच्या हातखंड्याने विद्यार्थ्यांमधे अभ्यासाची आवड उत्पन्न करतात आणि अल्पावधीतच विद्यार्थिप्रिय होतात. ह्याउलट संवाद न साधता औपचारिकतेने शिकवणारे शिक्षक विद्यार्थ्यांमधे धास्तीचे वातावरण निर्माण करतात आणि अखेर पर्यंत नावडते ठरतात. सुसंवाद साधणारी व्यक्ती नेहमीच दुसर्याच मन जिंकून घेते. त्यामुळेच कार्यक्रमात सुसंवाद साधणारी व्यक्ती जर उत्तम सुसंवाद करणारी असेल तरच तो कार्यक्रम रसिक प्रेक्षकांचे मन जिंकते आणि नाटकीपणे, पाल्हाळ लावून इतरांना बोलून न देता स्वत:च नको इतका सुसंवाद साधणारी व्यक्ती चेष्टेचा विषय ठरते.
|| हितमं मितं प्रियं स्निग्धं मधुरं परिणामायत्
भोजनं वचनंचापि युक्तं मुक्तं प्रशस्यते ||
हितकर बोला, आवश्यक तेवढच, आनंददायी, प्रेमळपणे, गोड, परिणामकारक, सकारात्मक, राग, निंदा, हेटाळणी वर्ज्य करत संवाद साधलात तर तो सुसंवाद होतो. शब्दाने शब्द फुलला तरच सुसंवाद होतो आणि हा सुसंवाद जीवन समृध्द करतो.
— लेखन : सौ.मनीषा ताम्हणे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
डाॅ.सतीश सर, सुधीर सर,शितल ताई मन:पूर्वक आभार.
खूप छान जीवनाचा अर्थ
मनिषा मॅडम छान लिहिला आहे लेख 👌👌👌👌
ताम्हणे मॅडम यांनी जीवनाचा जो अर्थ उलगडून सांगितला आहे,तो अनुकरणीय आहे.अन्न, वस्त्र आणि निवारा यांसोबत सुसंवाद अत्यावश्यक आहे,हे सूत्र मध्यवर्ती आहे.त्याची भावनिक गरज लक्षात घेऊन, पालकांची या बाबतीत भूमिका किती महत्वाची ठरते याचे सुरेख विवेचन केले आहे.