सर्कस मधील सर्व कलाकार अक्षरशः जीवावर उदार होऊन आपले मनोरंजन करीत असतात. तर जोकर आपल्याला मनमुराद हसवित असतात.
पण अशा या सर्व कलाकारांचे प्रत्यक्ष जीवन कसे असते ? त्यांच्या सुंदर मुखवट्या मागचा खरा चेहरा कसा असतो ? हे पाहण्याची संधी सूप्रसिध्द छायाचित्रकार डॉ नितीन सोनावणे यांनी उपलब्ध करून दिली आहे.
मुंबईत, सी एस टी स्टेशन जवळ असलेल्या फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया च्या सभागृहात सोनावणे यांनी संवेदशीलतेने टिपलेल्या सर्कस कलाकारांच्या जीवनाचे खरे दर्शन घडविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन काल पासून सुरू झाले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार, चित्रकार श्री प्रकाश बाळ जोशी, राजभवनचे कलाप्रेमी जनसंपर्क अधिकारी श्री उमेश काशीकर आणि न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी या तिघांनीही श्री सोनावणे यांच्या आपल्यातील छायाचित्रण कलेचा सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने उपयोग करण्याच्या गुणांचे कौतुक केले.
या वेळी श्री सोनावणे यांनी त्यांच्या प्रेरणा स्पष्ट करून काही हृदयद्रावक अनुभव सांगितले.
श्री सोनावणे यांचे बालमित्र, एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या समाज कल्याण विभागाचे प्रमुख श्री संतोष जगधने यांनीही समयोचीत मनोगत व्यक्त केले.
सोनावणे यांनी छायाचित्रण केलेल्या रंबो सर्कशीतील कलाकारांनीही आपले अनुभव कथन करून, त्याच बरोबर काही कला प्रकार सादर करून उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले.
प्रारंभी फोटोग्राफी सोसायटीचे सचिव श्री राजेंद्र वाघमारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
सिध्दी सोनटक्के हिने कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाला दूरदर्शन चे निवृत्त निर्माते श्री राम खाकाळ, सामाजिक कार्यकर्ते श्री विलास जाधव, फोटोग्राफी सोसायटीचे सदस्य, अनेक मान्यवर आणि सोनावणे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.हे प्रदर्शन रविवार सोडून पुढील 3 मार्च पर्यंत रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत खुले आहे. विविध कॉलेज, शाळा तसेच कला प्रेमी व्यक्तींनी भेट दिलीच पाहिजे असे हे प्रदर्शन आहे .
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800