१४ जून रक्तदान दिवस या निमित्ताने अवयवदान चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते सुनील देशपांडे यांनी, आपण रक्तदान करावं यासाठी खुसखुशीतपणे केलेलं अभिनव आवाहन……….
जुने द्या आणि नवे घ्या
कोणतीही अट नाही.
कोणतेही जास्त पैसे नाहीत.
फक्त जुनी वस्तू द्यायची आणि नवी मिळवायची.
चला त्वरा करा.
नाव नोंदणी दिनांक १४ जून.
पत्ता : ब्ला ब्ला ब्ला ब्ला
अशा प्रकारची जाहिरात वर्तमानपत्रात झळकली.
वॉटस् अप, फेसबुक, लिंक्डिन, ट्विटर, ब्लॉग, इन्स्टाग्रॅम वगैरे सर्व सोशल मिडिया वरही झळकली आणि खळबळ उडाली.
अनेक जणांनी त्याला फेक ठरवलं. हा कुठलातरी मार्केटिंगचा फंडा आहे असे अनेक जणांनी सांगितलं. जुन्या वस्तू घेऊन पळून जाईल, देणारच नाही ही फसवाफसवी आहे अशा अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अनेक जणांनी उलटीसुलटी मते व्यक्त केली. टीव्हीवर, पेपरमध्ये त्यावर अनेक संवाद, लेख झाले.
आणि…….
१४ जूनला ब्ला ब्ला ब्ला ब्ला या पत्यावरील ‘त्या’ दुकानासमोर भली मोठी रांग लागली. दुकान बंद होते. दुकान केव्हा उघडते याची सर्वजण वाट पाहत होते. दुकानाच्या बाजूच्या दरवाजातून एक जण दुकानासमोर येऊन उभा राहिला. त्याच्या हातात मोठा कर्णा होता. दुकानासमोर जमलेली गर्दी, मोठी जमलेली रांग, नंबरासाठीची भांडणे. गम्मत बघायला आलेले बघे. विविध चॅनेलचे कॅमेरे, पत्रकार सगळे सगळे गर्दी करुन होते. त्या माणसाने बाजूच्या उंच चौथऱ्यावर उभे राहून बोलायला सुरुवात केली
“मित्रहो माझी जाहिरात पाहून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पण मी तुम्हाला ग्वाही देतो की मी दिलेला शब्द पाळणार आहे. त्यामध्ये काहीही बदल होणार नाही. फक्त मी सांगेन तीच वस्तू तुम्ही द्यायची. आज नाव नोंदणी करून केव्हाही येऊन ती वस्तू देऊन जायची आणि दिल्यानंतर ९० दिवसाच्या आत तीच वस्तू त्याच्यापेक्षा चांगल्या प्रतीची आणि नवी कोरी देण्याची मी गॅरंटी देतो. फक्त ६५ वर्षावरील ज्या व्यक्ती आहेत त्यांनी रांगेतून दूर व्हावे. आता तुमचं आयुष्य जगून झालेलं आहे. नवीन वस्तूचा हव्यास करण्याचं वय आता राहिलेलं नाही. त्यामुळे त्या माणसांनी रांगेतून दूर व्हावे. त्यांना यात सहभागी होता येणार नाही. बाकी सर्वांनी नक्कीच या संधीचा लाभ घ्यावा. आता मी त्या वस्तूचे नाव सांगत आहे.
ती वस्तू म्हणजे ‘रक्त’ !
तुमच्या शरीरातलं खेळतं, खळखळतं, स्वच्छ, शुद्ध रक्त !
तुम्ही आज रक्तदान करा.
केव्हाही रक्तदान करा.
९० दिवसांनंतर आपल्या शरीरामध्ये तुम्ही दिलेल्या रक्तापेक्षा चांगल्या प्रतीचं रक्त निसर्ग आपोआप निर्माण करतो. त्यामुळे पुन्हा माझ्याकडे यायची गरज नाही. फक्त देण्यासाठी यायचं नवीन वस्तू तुम्हाला आपोआप देण्याची हमी निसर्गाने दिलेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या. रक्तदान करा. आपल्या शरीरात नवीन रक्त मिळवा आणि शरीरात उत्साह व आरोग्य कायम राखा. चला सर्वांनी रक्तदान करा. इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करा ! ”
त्यानंतर ते दुकान उघडले गेले. त्यामध्ये रक्तदान शिबिराचा भव्य स्पष्ट बोर्ड दिसला. काहीजण निराशेने निघून गेले. पण बरेच जण त्यामुळे प्रभावित होऊन अनेकांनी रक्तदान केलं आणि अभिनव पद्धतीने रक्तदान दिन साजरा झाला.

– लेखन : सुनील देशपांडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
टीप : मित्रहो सहसा अशा कथे खाली किंवा लिखाणा खाली असे लिहिलेले असते की, लेखकाच्या नावासह हे लेखन फॉरवर्ड करायला हरकत नाही. पण हे लेखन लेखकाच्या नावासह फॉरवर्ड करा किंवा नावाशिवाय फॉरवर्ड करा. लेखकाच्या नावाच्या जागी तुमचं नाव टाकून फॉरवर्ड करा. कसंही करा. पण निश्चित फॉरवर्ड करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करा.
धन्यवाद !!
करा, त्वरित फॉरवर्ड करा.
व्वा अफलातून
कल्पना छान आहे..