आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटन वाढावे म्हणून जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात 1970 मध्ये झाली. 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटनदिन साजरा करण्यात आला.
आधुनिक कालखंडातील धावपळीच्या युगात थोडा निवांत क्षण काढावा म्हणून प्रत्येक परिवार कोठेतरी निवांत काही वेळ घालवत असतात आपण त्यास पर्यटन असे म्हणू.
पर्यटन हे केवळ निसर्ग भ्रमण नसते तर त्यामध्ये आर्थिक सामाजिक सांस्कृतिक घटक समाविष्ट असतात. अशा प्रकारच्या पर्यटनाने माणसाच्या मनाला ताजेतवानपणा येतो. मानसिक दृष्ट्या माणूस प्रसन्न होतो.
चला तर मग कोठे पर्यटनाला जावे, या प्रश्नाचे उत्तर आम्ही जुन्नर तालुक्यातले असल्याने जुन्नर तालुक्यात यावे असा आग्रह करतो.
जुन्नर तालुक्याला किमान तीन ते चार हजार वर्षांची ऐतिहासिक, सांस्कृतिक, आर्थिक परंपरा आहे. याविषयी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन, जुन्नर वन विभागाने प्रसिद्ध केलेला जुन्नर तालुका पर्यटन हा 500 पानांचा ग्रंथ पहावा.
जुन्नर तालुक्यात लहान मोठे दहा किल्ले, 300 च्या आसपास लेणी, मोठी निसर्ग संपदा, धबधबे आणि बरेच काही आहे. विस्तार भयास्तव सर्व यादी येथे देता येणार नाही.
एखाद्या गावी आपण पर्यटनाला गेलो की तेथे काय घडू शकते आणि आपल्याला काय माहिती मिळते याविषयी पुढे मजकूर देत आहे.
आपल्याला आपल्या भूतकाळाची ओळख करून देतात आणि सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक विकासात मोठा हातभार लावतात. यामध्ये दोन्ही विषय एकमेकांना पूरक आहेत आणि समाजाच्या समग्र प्रगतीसाठी उपयुक्त ठरतात.मात्र यासाठी आपल्याला त्या त्या गावाचा सर्वंकष म्हणजे आर्थिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक स्थानिक इतिहास लिहिणे गरजेचे आहे.
स्थानिक इतिहास लेखनाचे महत्त्व :
संस्कृती आणि वारसा जतन : स्थानिक इतिहास लेखनाद्वारे त्या विशिष्ट क्षेत्रातील लोकजीवन, परंपरा, आणि सांस्कृतिक विविधता जतन केली जाते. हा लेखनप्रकार एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून कार्य करतो, ज्यामुळे भविष्याच्या पिढ्यांना त्यांच्या वारशाची ओळख होऊ शकते. जुन्नर तालुक्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे येथील पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी ती परंपरा चांगली जपली आहे. या ठिकाणची लेणी किल्ले छत्रपती शिवरायांची जन्मभूमी ट्रेकिंग साठी प्रसिद्ध असलेले माळशेज नाणेघाट निसर्ग संपन्न असा दाऱ्याघाट अशी अनेक नावे आपणास समोर देता येतील.
सातारा येथील निसर्ग संपन्न असा फुलांचे ताटवे असलेला कास पठार आपल्याला माहित आहे. मित्रांनो अशाच पठारासारखे सुंदर निसर्ग संपन्न असा घाटांचा प्रदेश आमच्या जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर तालुक्याचे निसर्ग अभ्यासक आणि माजी सैनिक श्री रमेश खरमाळे यांनी त्यास खास पठार असे नाव दिले आहे. त्या ठिकाणी वाजणारे घंटेचे दगड पाहणे यातील आनंद काही वेगळाच आहे. तेथून पुढे गेले की आपल्याला आंबेहत्तवीजचे निसर्ग सौंदर्य मनमोहित करते. जुन्नर होऊन आंबेहत्तवीज या गावाकडे जाताना लागणारा निसर्ग सौंदर्याचा रस्ता नवी फुलांचे ताटवे आणि घाटवाटा वर्णनीय आहेत.
सामाजिक ओळख : प्रत्येक समाजाची स्वतःची एक वेगळी ओळख असते. स्थानिक इतिहासाचा अभ्यास करून आपण त्या क्षेत्रातील लोकांच्या सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय ओळखीचा शोध घेऊ शकतो. स्थानिक इतिहास लेखन समाजाच्या सामुदायिक भावना बळकट करतो. जुन्नर मधील आदिवासी बांधवांचा अभ्यास आपण जेवढा करू तेवढा कमीच आहे. प्राचीन काळापासून मध्ययुगापर्यंत जुन्नर मधील बहुतांश किल्ल्यांची सेवा करण्याची संधी आदिवासी बांधवांकडे होती. जुन्नरच्या इतिहासात त्यांचे योगदान खूप मोलाचे आहे. जुन्नर मध्ये साबळे बांबळे कोंडाजी नवले यांचा क्रांतिकारी अभ्यास जरूर अभ्यासणे गरजेचे आहे. 1830 चा जुन्नर मधील उठाव हा ब्रिटिशांविरुद्धचा सर्वात मोठा उठाव होता. या सर्व सामाजिक गोष्टीचा अभ्यास पर्यटनामध्ये करता येतो. त्यास आपण सामाजिक अभ्यासाचे पर्यटन असे नाव देवू.
विकासाच्या आर्थिक मुळांची ओळख : इतिहासाचे अभ्यासक एखाद्या क्षेत्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या मुळांचा शोध घेऊ शकतात. स्थानिक उद्योग, व्यवसाय, आणि कृषी प्रणाली यांचा अभ्यास करून त्या क्षेत्राच्या विकासाचे दस्तऐवजीकरण करता येते. जुन्नरच्या सर्व किल्ले आणि घाटांची आर्थिक कागदपत्रे मिळवून त्याचा अनुवाद केला तर जुन्नर चा आर्थिक इतिहास किती समृद्ध होता ही गोष्ट लक्षात येते. एक साधे उदाहरण आपल्यासमोर ठेवतो. जुन्नर मधील किल्ल्यांचे प्रवेशद्वारे ही अप्रतिम आहे शिवकाळामध्ये त्या किल्ल्यांचे कुलूप आणि चाव्या या सोन्याच्या होत्या. मी म्हणजे आम्ही जुन्नर परिसरातील सर्व किल्ल्यांची अप्रकाशित कागदपत्र मिळवून त्याचा अनुवाद केला आहे. त्यामधील किल्ला घेरा परिसर आणि तहाच्या खर्चाच्या सर्व रकमा पाहिल्या तर 1815 पूर्वी त्या काही लाखांमध्ये आहेत. अशा प्रकारे आपल्याला संशोधकीय दृष्टीने किल्ल्यांचा आर्थिक इतिहास मांडता येतो. तो स्थानिक इतिहास संशोधनाचा पर्यटनाचा एक भाग आहे. त्याचबरोबर अशा प्रकारची सर्व कागदपत्र आणि जुनी ग्रंथसंपदा एकत्र करून तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याचे मोठे वस्तुसंग्रहालय तयार केले तर त्या ठिकाणी आपल्याला तो डिस्प्ले करता येईल. परिणामी येणाऱ्या पर्यटकांना तो पाहता येईल.
नवीन संशोधनासाठी आधार : स्थानिक इतिहासाच्या आधारे नवीन संशोधनाच्या दिशा उघडतात. विविध विषयांवरील इतिहास लेखन संशोधकांसाठी मौल्यवान स्रोत ठरतात. आत्तापर्यंत किल्ल्यांचा तालुक्याचा राजकीय इतिहास लिहिला आहे पण आर्थिक सामाजिक सांस्कृतिक इतिहास लिहून इतिहास संशोधनाचे नवे पैलू आम्ही विविध ग्रंथांद्वारे पर्यटकांच्या समोर ठेवले आहेत. जुन्नर तालुक्यातील जुनी बौद्ध जैन वैदिक सर्व मंदिरे मंदिरांच्या सनदा मोडी आर्थिक कागदपत्र मुस्लिम बांधवांच्या धार्मिक स्थळांची कागदपत्र त्यांचा इतिहास सर्वकाही येणाऱ्या पर्यटकांना सादर केले तर त्यांना समजून सांगितले तर तालुक्याच्या इतिहासात किती बदल होऊ शकतात आणि पर्यटकांची संख्या वाढू शकते हे आम्ही अनुभवले आहे. त्यासाठीच घेऊन येत आहोत जुन्नर तालुक्यातील दुर्ग वैभव हा 600 पानांचा सर्व किल्ल्यांचा समावेश असलेला आर्थिक सामाजिक सांस्कृतिक कागदपत्रांच्या आधाराने लिहिलेला नवा ग्रंथ.
सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची वाढ : स्थानिक इतिहास आपल्याला क्षेत्राच्या मूल्यांची आणि परंपरांची माहिती देतो, ज्यामुळे आपल्या सांस्कृतिक समृद्धीमध्ये भर पडते. आपल्या तालुक्याचा इतिहास असा सर्वांच्या समोर मांडला तर वैभवशाली जुन्नरची इतिहास परंपरा सर्वांना समजू शकेल. जुन्नर मधील पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्था सर्व किल्ले संवर्धक तरुण वर्ग यासाठी झटत आहे. त्यांना राजकीय नेतृत्वाने पाठबळ देखील दिले आहे. परिणामी जुन्नर तालुका पहिला पर्यटन तालुका झाला आहे.
पर्यटनाचे महत्त्व : जुन्नर पर्यटनाचे काय महत्त्व आहे आणि आपण अधिक जोमाने काम केले तर काय होऊ शकेल याविषयीचा पुढील हा वृत्तांत…
आर्थिक विकास : पर्यटन हे कोणत्याही प्रदेशाच्या आर्थिक प्रगतीचे एक मोठे साधन आहे. स्थानिक पर्यटन वाढल्यामुळे त्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतात, जे स्थानिक लोकांसाठी फायदेशीर ठरतात. तालुक्यामध्ये पर्यटकांचा आवक वाढला स्थानिकांच्या व्यापारात हॉटेल व्यवसायात आर्थिक उलाढालीमध्ये वाढ होऊन निश्चित चार पैसे खिशात जमा होऊ शकतात.
सांस्कृतिक देवाण-घेवाण : पर्यटनामुळे विविध संस्कृतींची ओळख होते. पर्यटक त्यांना भेट देणाऱ्या ठिकाणाच्या परंपरा, कला, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली यांच्याशी परिचित होतात. यामुळे विविध समाजामध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण होऊन एकमेकांबद्दल समज वाढते.
सांस्कृतिक वारसा संवर्धन : स्थानिक पर्यटनाच्या माध्यमातून ऐतिहासिक स्थळे, वास्तुशिल्प आणि स्मारके जतन करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. पर्यटनामुळे वारसा स्थळांना जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळते, ज्यामुळे त्या स्थळांची देखभाल आणि संवर्धन शक्य होते.
स्थल वैशिष्ट्यांचे महत्त्व : पर्यटनामुळे स्थानिक इतिहासाला महत्त्व प्राप्त होते. स्थानिक स्थळांच्या विशेषतेचा प्रचार आणि प्रसार होतो, ज्यामुळे स्थानिक लोकांना त्यांच्या वारशाचा अभिमान वाटतो.
शिक्षण आणि ज्ञानाचा प्रचार : पर्यटन हे फक्त मनोरंजनाचे साधन नसून, ते शैक्षणिक साधन देखील आहे. इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांविषयी जाणून घेण्याची संधी पर्यटकांना मिळते. स्थानिक इतिहासाचे महत्व पर्यटकांना सांगितले जाऊन त्यांच्यात ज्ञानवृद्धी होते.
स्थानिक इतिहास लेखन आणि पर्यटन यांचे परस्परसंबंध : स्थानिक इतिहास लेखन हे पर्यटन विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा एखाद्या स्थळाचा इतिहास प्रामाणिकपणे मांडला जातो, तेव्हा ते ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षण ठरते. इतिहासाची माहिती असल्याने पर्यटक त्या स्थळाचा आदर करतात, आणि त्या स्थळाशी अधिक जवळीक साधू शकतात. उदाहरणार्थ, जुन्नर मधील तुळजा लेण्याद्री मानमोडी नाणेघाटातील लेणी भूत लेणी आणि इतर सर्व लेणी, किल्ले आणि प्राचीन मंदिरे हे ऐतिहासिक स्थळे पर्यटकांना इतिहासाची ओळख करून देतात, ज्यामुळे ती ठिकाणे जागतिक पातळीवर प्रसिद्ध होतात. त्यामुळे स्थानिक इतिहास लेखन आणि पर्यटन हे एकमेकांना पूरक आहेत आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहेत.
आपला तालुका पर्यटनासाठी सज्ज करणे हे कोणा एकट्याचे काम नव्हे. हा जगन्नाथाचा रथ आहे सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. आजपर्यंत ते करत आलो आहोत. आता नेटाने पुढे नेत राहू.
चला तर मग आज पर्यटन दिनाच्या निमित्ताने कोठे पर्यटनाला जायचे तर, पुढील चार दोन महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये याचे उत्तर आहे छत्रपती शिवरायांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी, सातवाहनांचा नागनिकेचा नाणेघाट, कुकडेश्वर चे शिवमंदिर, पारुंड्याचे मंदिर. जुन्नर तालुक्यातील कृषी पर्यटनाचा आस्वाद आणि आनंद. द्राक्ष आणि आंब्याच्या मोसमात त्यांचा घेतलेला आस्वाद. जुन्नरची मासवडी, पाटवडी आणखी किती पदार्थ सांगू. मग यासाठी चला तर जुन्नरला…..
— लेखन : प्रा डॉ लहू गायकवाड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. 9869484800