गेली कित्येक वर्षे मी लोक जेवतात कसे ? याचे निरीक्षण करत आलो आहे. नोकरीच्या निमित्ताने मंत्रालयात चौरस आहाराच्या पंक्तीत, लग्न समारंभात, घरी पाहुणे आल्यावर किंवा पाहुणा म्हणून गेल्यावर, प्रवासात, वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाच्या एकेक पाहावयास मिळतात. जेवणाच्या पद्धतीमध्ये इतके वैविध्य आढळते की एकेक प्रकार पाहून थक्क व्हायला होते. काय जेवतात ? यापेक्षा कसे जेवतात ? हे पाहणे अधिक रसपूर्ण ठरेल. जेवून उठलेल्या लोकांची ताटे जेव्हा उचलली जातात तेव्हा एकेक ताट जेवणाऱ्याचा स्वभाव, वृत्ती प्रगट करीत असतात.
काही ताटे अगदी अन्नाचा एकही कण वाया जाणार नाही, इतके लख्ख स्वच्छ वाटतात ! तर काही ताटे अक्षरशः चिवडल्यासारखी, भरपूर उष्टे टाकलेले, नको असलेले पदार्थ वेचून बाजूला ढीग करुन ठेवलेले, पोळ्यांचे कड काढून ठेवलेले आढळतात. काही ताटे हवे तेवढेच वाढून घेणारे तर काही वाढलेल्या पैकी हवे तेवढेच खाणारे दिसतात.
पूर्वी मुलगी पहायला आलेला मुलगा जेवतो कसा ?यावरुन त्याची पारख करायचे. वरपरीक्षेत जेवणाची पद्धतही अंतर्भूत होती. कदाचित आपल्या लक्षातही येत नसेल पण आपण जेवत असताना आपण जेवतो कसे ? याचे कळत नकळत निरीक्षण होत असते. आपण लाजत जेवतो की भरपेट हाणतो, अधाशासारखे जेवतो की आदी काळातून आल्यासारखे जेवतो, चाखत माखत जेवतो की केवळ दोन घास ढकलायचे म्हणून जेवतो असे सर्व निरीक्षण होत असते.
काही लोकांना मी जेवणापूर्वी डोक्यावरील टोपी आणि पादत्राणे काढून ताटाला नमस्कार करुन घास बाजूला काढून जेवतांना पाहिले आहे. “अन्न हे परब्रह्म” ही त्यांची भावना बघून नतमस्तक व्हायला होते. अन्नाला मान देऊन जेवावे हा विचार त्यामागे असतो. अन्नापुढे कोणी श्रेष्ठ नाही. अन्नान्न दशा काय असते, अन्नासाठीच सगळी उठाठेव कष्ट असतात हा विचार त्यामागे असतो.
काहींना पूर्ण वाढून होईपर्यंत दम नसतो. सुरवातीला वाढलेली चटणी, लोणचे, सॅलड आणि मीठसुद्धा चाखून पहायची सवय असते. याउलट काही पूर्ण वाढून झाल्याशिवाय व “वदनी कवळ घेता नाम घ्यावे हरीचे” केल्याशिवाय जेवणाला सुरुवात करत नाही.
एक किस्सा आठवतो. एक साहेब नुकतेच बदलून आले होते. त्यांना मी चौरस आहार मध्ये जेवायला घेऊन आलो. ते ताटात एकेक पदार्थ वाढून जाणाऱ्यांकडे हाताची घडी घालून पहात बसले. पूर्ण वाढून झाल्यावर त्यांनी जेवायला सुरुवात करण्यापूर्वी जरा आजूबाजूला पाहिले तर ते थक्कच झाले ! लोकांची निम्मी जेवणं झालेली होती व आता ते वरण भात कालवत होते. इथे काही जमायचे नाही म्हणून ते पुन्हा कधीच चौरस आहाराच्या बाजूला फिरकले सुद्धा नाही. जेवताना बरेच लोक बूट चपला सॅन्डल पायातून न काढताच जेवतात.
चौरस आहारासाठी महाडिक म्हणून एक शिपाई यायचा. एकदा जेवून झाले की तो पुन्हा टोकनासाठी रांगेत उभा रहायचा. मर्यादित वाढीमुळे एकदा जेऊन त्याचे भागायचे नाही. शिवाय तो नेहमी पहिले किंवा शेवटचे आसन निवडायचा. वाढपी या दोन्ही आसनांच्या ठिकाणी जास्त वाढून जातो हे त्याला चांगले माहित होते. “ए महाडिक” असा लोक त्याला मागून मुद्दाम आवाज द्यायचे. पण त्याने शेवटपर्यंत दोनदा जेवण्याचा आपला खाक्या काही सोडला नाही.
एक महिला कानात हेडफोन अडकवून मोबाईलमधील गाणे ऐकत सावकाश एकेक घास घ्यायची. मध्येच इवल्या रुमालाने ओठ पुसत रहायची. तेव्हा तिथे ताटकळत उभे असलेले बिचारे इतर ताटे उचलून टेबल पुसूनपासून होईपर्यंत चुळबुळ करीत उभे रहायचे पण जराही घाई न करता हळुवारपणे पाण्याचीही चव घेत एकेक घोट घेत ती ललना ताटकळत उभे राहिलेल्याना अगदी खल्लास करुन टाकायची.
जेवायला बसणाऱ्यांच्या एकेक तऱ्हा. शेजारचा अंग चोरुन कसेबसे जेवतोय याकडे लक्ष न देता खुशाल ऐसपैस दोन्ही हात टेबलावर टेकवून जेवणारे, तर शेजारच्यालाही जेवायला जमले पाहिजे इतपत तडजोड करुन जेवणारे. आपल्या मागून लोकांना जाता येते की नाही याची पर्वा न करता खुर्ची कशीही तिरकी मागे करुन बसणारे आणि उठल्यावर खुर्ची आहे तशी सरकावून न ठेवता तसेच हात धुवायला उठणारे. ते काम नाईलाजास्तव मागून हात धुवायला बाहेर पडलेल्यांना मग त्रासिकपणे करावे लागेल याची बिल्कुल पर्वा न करणारे.
जेवताना काहींना मी ताटातच नको असलेले पदार्थ थुकून टाकताना पाहिले आहे. तर काही ताटाबाहेर असे पदार्थ काढून ठेवतांना पाहिले आहे. जेवताना काही असे काही मचमच करुन खातात की त्याशिवाय त्यांचे पोटच भरणार नाही की काय ? असे वाटते ! काहीमात्र जराही आवाज न करता घास चावतात. काही इकडे तिकडे न पाहता एकाग्र होऊन जेवतात तर काही शेजारच्याला आपल्यापेक्षा किती वाढले अशी चौकस नजर ठेवून असतात. काहींचे भलतीकडेच लक्ष असते. तर काही वेगळ्याच विचारात गढून गेल्यासारखे जेवत असतात. काही जेवता जेवता आलेल्या फोनवर तावातावाने बोलत घास चावत असतात. तर काही शर्यतीत भाग घेतल्यासारखे सर्वात आधी जेवून बाजी मारतात.
पूर्वी पंक्तीत जो आधी हात धुवेल तो गावाला पंगत देईल असा दंडक होता त्यामुळे जेवण झाले तरी लोक हात सुकवत सगळ्यांची जेवणं झाली का नाही ? त्याची वाट पाहत बसून रहायची. आज उलट झाले आहे. सगळे उठून गेले तरी जेवण करीत बसलेले कधी एकदा उठतील आणि दुसरी पंगत सुरु करता येईल ? याची वाट पहावी लागते.
काहींना पोळी भाजीला टोचून खायची सवय असते. तर काही अगदी रद्दा करुन समरसून खात असतात. काहींना काट्या चमच्याशिवाय जेवता येत नाही तर काही काटे चमचे बाजूला ठेवून सरळ हाताने वरपून खातात.
खाण्याच्या कितीतरी तऱ्हा. काहींना घास झेलून खायची सवय. चणे, शेंगदाणे तोंडात फेकून खायची अनेकांना सवय असते. साऊथकडे भात सांभार कालवून गोळे करुन मुठीने तोंडात टाकून खायची सवय असते.
काहींचे जेवणाकडे अजिबात लक्ष नसते. जेवणापेक्षा कामांमध्ये अधिक गढून गेल्याने अनेकदा जेवणाची वेळ सुद्धा टळून जाते. एक अधिकारी होते. ते जेवायला लेट झाले की जेवण मिळायचे नाही मग ते कटलेट मागून घ्यायचे आणि वर गंमतीने म्हणायचे
‘जेवण लेट तर मागवावे कटलेट ‘!. काहीतर सतत कोणाचा दूरध्वनी घ्यायला तत्पर असावे म्हणून जागेवरच जेवणारे. दूरध्वनी आला की तोंडातला घास काढून दूरध्वनीवर बोलणारे. काहींना तर दूरध्वनीवर ‘जेवायला गेले’ असा निरोप अजिबात खपायचा नाही. वर्षाचे ३६५ दिवस आपण जेवतच राहतो. एक दिवस जेवले नाही तर काय फरक पडतो ? असे वर सुनवायचे.
प्रवासात जेवणाच्या नाना तऱ्हा पाहावयास मिळतात. आजूबाजूला कोणाच्या नजरेला पडणार नाही असा आडोसा करुन खाण्याची अनेकांना सवय असते. माझ्या शेजारी एक कुटुंब रहायचे. मुलं पेरु, सफरचंद खायची तर अशी खायची जशी कोणाच्या नजरेला काय खातोय ते मुळीच दिसता कामा नये.
माझ्या पाहण्यात आलेल्या या काही तऱ्हा आहेत. तुमच्याही पाहण्यात आल्या असतीलच !
– लेखन : विलास कुडके
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००
उत्तम निरिक्षण,माणसाच्या जेवणाच्या पद्धतीवरून त्याची मनस्थिती, वर्तणूक, स्वभाव जाणता येतो हेच खरे.
Very nice sir👍
मनापासून धन्यवाद
खुप छान ललीत लेखन करु शकता सर तुम्ही.खुप सुक्ष्म अभ्यासपूर्ण व चोखंदळ निरीक्षणातुन अस लेखन होत असत.अन्नदाता सुखी भव ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे.त्यामुळे अन्नाचे सेवन व त्यापासुन होणारे प्रभाव मानवी जीवनावर खुप परीणाम करतात.@ उध्दवराव काळे, नाशिक
मनापासून धन्यवाद सर
छान लेख जेवण जीवनावश्यक तसाच लेखही खुमासदार जमला आहे
अप्रतिम लेख चौरस आहारची खूप आठवण आली प्रत्येकाच्या जेवणाच्या तऱ्हा अगदी बारकाईने मांडल्या खूप खूप धन्यवाद
अतिशय गमतीदार मजेशीर लेख.
मनापासून धन्यवाद मित्रा
So nice 👌
मनापासून धन्यवाद युगांत
छान..!
पोटाला आधार देणारी ही मंत्रालयातील अतीशय सुसज्ज अशी खानावळ. कढी असली की महिलांची त्या दिवशी होणारी गर्दी… “घरी काय आपणच रांधायचं आणि आपणच वाढून घ्यायचं.. इथं कसं पुरुषच जेवण बनवतात आणि पुरुषच वाढतात. आपण काय नुसतं ताटावर जाऊन बसायचं. ऊष्ट ताटही पुरुषच ऊचलतात.” असं म्हणत जेवणाचा आनंद घेणाऱ्या महिला पहायला मिळतात. नोकरी निमित्ताने जिल्ह्यामधून आलेल्या आणि आमदार निवासात तर कुणी पाहुण्याकडे राहणाऱ्या मंडळींची एका वेळेच्या जेवणाची ही ऊत्तम सोय आहे. फिल्म सेंटर, ताडदेवच्या कार्यालयात आम्हाला अशी सुविधा नव्हती. परंतू मी २००२ पासून मंत्रालयात रुजू झाल्यापासून या भोजनालयाचा आनंद निवृत्त होईपर्यंत घेतला आहे. मी केळव्याहून ६.३० ला घर सोडत असे. त्यामुळे माझ्यासाठी पहाटे ५ वाजता जेवण तयार करावे लागे. या खानावळीमुळे माझा डबा बंद झाल्याने माझी मिसेस मात्र खूष होती.
एक मात्र नक्की आहे हे जेवण कधीच कुणाला बाधलं नाही. ही खासीयत आहे या भोजनालयाची….
मनापासून धन्यवाद सुंदर अभिप्रायाबद्दल
Very nice
मनापासून धन्यवाद मॅडम
खूपच छान सर.
मनापासून धन्यवाद मॅडम
Very nice👍
मनापासून धन्यवाद सर