भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. आज आपल्या देशाची लोकसंख्या ही अंदाजे दीडशे कोटी पेक्षा जास्त झाली आहे. या दीडशे कोटी लोकसंख्येत जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. भारतातील जेष्ठ नागरिकांची आजची संख्या ही १३ कोटी इतकी आहे. तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील जेष्ठ नागरिकांची संख्या ही १ कोटी ४० लाख इतकी आहे. दर्जेदार जीवनशैली, आधुनिक उपचार पद्धती, राहणीमान, सकस आहार व आरोग्याविषयी जागृती आदी बाबींमुळे देशातील नागरिकांच्या आयुर्मानात वाढ होत आहे, ही आनंदाची बाब आहे. पण दुर्दैवाने एकत्र कुटुंब व्यवस्था हे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या भारतीय समाजात, कुटुंब व्यवस्थेत जेष्ठ नागरिक म्हणजे जणू निरुपयोगी असलेली वस्तू असल्यासारखी दुदैवी परिस्थिती निर्माण होत आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे.
खरं म्हणजे, जेष्ठ नागरिकांनील त्यांच्या त्यांच्या नोकरी, व्यवसायात संपूर्ण आयुष्य वेचलेले असते. त्यामुळे ते अतिशय अनुभव संपन्न व्यक्तिमत्वाचे धनी असतात. त्यामुळे भलेही या व्यक्ती त्यांच्या नोकरी, व्यवसायातून जरी रीतसर निवृत्त झाल्या असतील तरी, या इतक्या प्रचंड मोठ्या संख्येचा राष्ट्र उभारण्यासाठी कसा विधायक उपयोग शकेल, यासाठी निश्चित राष्ट्रीय धोरण आखण्याची आवश्यकता आहे. त्याच बरोबर, आला दिवस कसा तरी ढकलायचा असे न करता, आपल्या अनुभवांचा, समाजाला आपण कशा प्रकारे उपयोग करून देऊ शकतो ? हा विचार आणि प्रयत्न प्रत्येक ज्येष्ठ नागरिकानेही करण्याची गरज आहे. निवृत्ती म्हणजे निष्क्रियता नव्हे, हे जेष्ठ नागरिकांनील लक्षात घेतले पाहिजे. यथाशक्ती घरातील कामे करणे, आपापले जोडीदार, घरातील इतर व्यक्तींचे जीवन कसे सुसह्य होईल, हे पाहिले पाहिजे.
अर्थात सर्वच जेष्ठ नागरिक हे निष्क्रिय राहतात, असे नाही. तर काही जेष्ठ नागरिक असेही आहेत की, ते त्यांच्या पहिल्या करिअरपेक्षा उलट दुसऱ्या; म्हणजेच निवृत्तीनंतरच्या करिअरमुळे जास्त उजेडात आले किंवा त्यांच्या दुसऱ्या करिअरमुळेच त्यांची ओळख निर्माण झाली. अशा काही माझ्या माहितीतील व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (समाजसेवक होण्यापूर्वी ते भारतीय लष्करात वाहन चालक होते), महाराष्ट्रातील हुंडा बंदी चळवळीचे प्रणेते मामासाहेब कुलकर्णी (ते एस टी महामंडळाच्या सेवेत होते) मराठी माणसांमध्ये उद्योजकता रुजावी म्हणून ‘Saturday क्लब’ चळवळ सुरू करणारे माधवराव भिडे (शासकीय सेवेत कार्यकारी अभियंता होते) (अनाथ मुलांसाठी स्थापन केलेल्या वास्तल्य ट्रस्ट चे संस्थापक हे मुंबई महापालिकेच्या सेवेत होते)
अर्थात सर्वच जेष्ठ नागरिक अशा प्रकारचे काम सुरू करू शकतील, असे नाही. पण त्यांनी निदान, ते जे काही काम समाजासाठी करू शकतात, ते तरी केले पाहिजे असे मला वाटते. उदाहरणार्थ, आज देशात लाखोंच्या संख्येने निवृत्त लष्करी अधिकारी, जवान, अन्य सेनादले, निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी आहेत. अशांनी आपापल्या भागात मुली आणि महिलांसाठी स्वसंरक्षणाचे वर्ग सुरू केले पाहिजे. शिक्षक, प्राध्यापक मंडळींनी प्रौढ साक्षरता आणि शाळाबाह्य मुलांना निदान साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, इतर काही जण आपल्या परिसरातील बँका, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन, तिथे येणाऱ्या निरक्षर बंधू भगिनींना फॉर्म भरून देणे, अन्य मदत करणे, आपापल्या भागातील अनाथालये, महिलाश्रम, वृद्धाश्रम येथे जाऊन तेथील व्यक्तींशी गप्पागोष्टी करणे अशा कितीतरी बाबी करता येण्यासारख्या आहेत.
आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत आहेत. ते आपापल्या सदस्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात. त्यांच्यासाठी सहली आयोजित करणे, विविध स्पर्धा, आनंद मेळावे असे साधारण स्वरूप असते. काही जेष्ठ नागरिक संघ मात्र आदिवासी भागात जाऊन, तेथील मुलांना मदत करणे असेही उपक्रम हाती घेत असतात. त्यामुळें जेष्ठ नागरिक संघाचा महासंघ असलेल्या फेस्कॉम ने या प्रकरणी अधिक विचार करून आपापले संघ अधिकाधिक समाजोपयोगी कार्य कसे करू शकतील, याविषयी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
आता तुम्ही कदाचित म्हणाल, किंवा तुमच्या मनात असा प्रश्न साहजिकच पडला असेल की, तुम्ही आम्हाला इतके सांगतहात, तर तुम्ही स्वतः समाजासाठी काय करताय ? तर मला इथे सांगायला आवडेल की, मी स्वतः सात वर्षांपूर्वी माहिती संचालक म्हणून निवृत्त झालो, तत्पूर्वीच मी आणि माझ्या पत्नी ने हे ठरविले होते की आता पैसा आणि प्रतिष्ठा यासाठी कुठल्याही प्रकारची पूर्णवेळ नोकरी, व्यवसाय करायचा नाही. तर आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करीत, समाजाच्या कल्याणासाठी यथाशक्ती योगदान द्यायचे. त्या प्रमाणे ५ वर्षांपूर्वी कला, साहित्य, संस्कृती, विद्यान, आरोग्य, यशकथा, विश्वबंधुत्व याला वाहिलेले न्यूज स्टोरी टुडे हे आंतरराष्ट्रीय पोर्टल सुरू केले आहे.

तीन वर्षांपूर्वी त्याच्या जोडीलाच पत्नीने पुस्तक प्रकाशने आणि नुकतेच यू ट्यूब चॅनल सुरू केले आहे. विविध विषयांवर मी सातत्याने लेखन करीत असतो. व्याख्याने देत असतो. विशेषतः सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना जमेल तशी मदत करीत असतो. ज्या व्यक्तींना, युवकांना मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांना त्या त्या प्रमाणे मार्गदर्शन करीत असतो. समाजात नैराश्य न राहता, प्रेरणादायी वातावरण कसे राहील, यासाठी मी प्रयत्न करीत असतो. यासाठी मी निवृत्तीनंतर, प्रेरणेचे प्रवासी, अभिमानाची लेणी, (इ बुक – कोरोना काळात प्रकाशित) आम्ही अधिकारी झालो, करिअरच्या नव्या दिशा, माध्यमभूषण ही पुस्तके लिहिली असून, काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. तसेच समाजामध्ये बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तींची ओळख आपल्या यू ट्यूब चॅनेल मध्ये करून देत आहोत.
तर मंडळी, चला तर आपण सर्व जेष्ठ नागरिक मिळून हे सिद्ध करू या की, जेष्ठ नागरिक हे कुटुंबावर, समाजावर, देशावर पडलेला बोजा नसून ती एक राष्ट्रीय शक्ती आहे. असे सक्रीय जीवन हे आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचे पाऊल ठरेल. आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल. जीवन अधिक हिरीरीने जगण्यासारखे वाटू शकेल. तर मग, या स्वातंत्र्यदिनी असा काही संकल्प निश्चित करणार ना ?
जय हिंद.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869454800
ज्येष्ठ नागरिकांचे आत्मबल वाढवणारा खरच खूप छान लेख