माय तुझा जोगवा, जोगवा मागते
सर्व जगाच्या, कल्याणास्तव मागते
दे शुद्धमती, नि:स्वार्थ सेवेची
मनी उपजो भावना, सत्पात्री दानाची
स्वदेशात या, सुराज्य पुन्हा येवो
दरिद्री-श्रीमंतातील, दरी मिटून जावो
गरजवंतांना, लाभो उदार दाते
माय तुला जोगवा, जोगवा मागते
विज्ञानयुग जरी, अंधश्रद्धेला ये पूर
स्री समानता, अजून कोसो दूर
फक्त नवरात्रीत, तव स्त्रीत्वाचे पूजन
नाकारून स्त्री भ्रूण, जन्मभर शोषण
नको देवत्व, तिच्यास्तव माणुसकी मागते
माय तुला जोगवा, जोगवा मागते
रूप घेऊनी, असूर निरनिराळे
मुखवट्याआड, मन वसे काळे काळे
वाहत्या गंगेत, का धुवुन घ्यावे हात
देश समर्थ असे, ना तर होईल घात
होऊ वचनबद्ध, रक्षु भारतमाते
माय तुझा जोगवा, जोगवा मागते

– रचना : भारती महाजन-रायबागकर. चेन्नई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800