Thursday, February 6, 2025
Homeसाहित्यज्ञानयोगिनी: डॉ स्मिता होटे

ज्ञानयोगिनी: डॉ स्मिता होटे

डॉ. स्मिता होटे यांना समाजकार्याचे बाळकडू लहानपणापासूनच मिळालेलं. नागपुरात विविध कार्यक्रमात स्वागतगीत तयार करुन सादर करणे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक या कार्यात त्यांचा हातखंडा. स्मिताताईंचे वडील बँकेत नोकरीला होते.त्यामुळे बदल्यांच्या गावी त्यांचे शिक्षण झाले. प्राथमिक शिक्षण सोलापूर व अंबरनाथ येथे तर माध्यमिक शिक्षण उत्कर्ष मंदिर, मालाड, मुंबई येथे झाले. नंतर वडीलांची नागपूरला बदली झाल्याने पदवीपर्यंतचे शिक्षण श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयात तर एम. ए., एम. फिल., पीएचडीचे शिक्षण नागपूर विद्यापीठातून झाले. सर्वच परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकण्याचा मान त्यांना मिळाला. रामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पंकज चांदे यांच्या मार्गदर्शनाखाली “दत्तात्रेय येरकुंटवार यांच्या हस्तलिखितांचा अभ्यास” या विषयावर संशोधन प्रबंध सादर करून ‘विद्यावाचस्पती’ ही पदवी त्यांनी संपादन केली.

शिकत असताना अध्यापनाची उपजत आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे सहपाठी मैत्रिणींना कठीण विषय समजावून सांगणे, आसपासच्या शालेय विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवणे हे छंद लक्षात घेऊन आपण या क्षेत्रात करीअर करायचे, अशी खूणगाठ त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षीच बांधली. स्मिताताईंनी बॅरिस्टर वानखेडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बीएडच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला व तो पूर्ण करत असतांनाच प्रारंभी भोसला वेदशास्त्र महाविद्यालय, तसेच ज्युनियर व सिनियर कॉलेजमध्ये ज्ञानदानाच्या कार्यास सुरुवात केली. दरम्यान, संस्कृत ज्ञानाचा पाया पक्का करण्यासाठी, काशीहून आलेले वेदशास्त्र संपन्न आ.अंबादासशास्री पांडे गुरुजी यांच्याकडून संस्कृत भाषेचे पारंपरिक शिक्षण त्यांनी घेतले.

पुढे डॉ स्मिता होटे यांनी नागपूर येथील प्रथितयश लेडी अमृतबाई डागा महिला महाविद्यालयात अव्याहतपणे १९८२ पासून, ३७ वर्षे संस्कृत विषयाच्या अध्यापनाचे कार्य केले. नियत वयोमानानुसार २०१९ साली संस्कृत विभाग प्रमुख पदावरून त्या निवृत्त झाल्या.

आई सौ मंदाकिनी आणि वडील श्री गंगाधरराव यांचा कुशाग्र बुद्धिमत्तेचा वारसा लाभलेल्या डॉ. स्मिता होटे म्हणजे पूर्वाश्रमीच्या कु. सरोजिनी गंगाधरराव घाटोळे. या केवळ संस्कृत विभागाच्याच नव्हे तर एल. ए. डी. महाविद्यालयाच्या बहुमूल्य भूषण असा त्यांचा लौकिक होता. अध्यापन कौशल्य, नियोजन कौशल्य, अमाप उत्साह, वाक्चातुर्य, हजरजबाबीपणा, समयसूचकता आणि चिकित्सक व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या डॉ. स्मिता होटे यांनी संस्कृत प्रचाराचा वसा घेतला आहे. त्यासाठी त्यांनी महाविद्यालयामध्ये व अन्यत्र ३२ संभाषण वर्गांच्या आयोजनाचा विक्रम केला आहे. चित्रकलेतील त्यांचे नैपुण्य विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या कुंचल्यातून साकारलेले ‘गुरुवर्य प्रज्ञाभारती श्री. भा. वर्णेकर’ यांचे तैलचित्र रामटेक येथील कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या सभागृहात आजही दिमाखात विराजमान आहे.

गुरुवर्य डाॅ वर्णेकरांचे पोर्ट्रेट प्राचार्य राम शेवाळकर आणि नागपूरचे कमिशनर चक्रवर्ती यांच्या उपस्थित विद्यापीठाला अर्पण करताना

सामाजिक कार्याचे उत्तरदायित्व म्हणून रक्तदान, नेत्रदानाचा संकल्प, अंध विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अभ्यासक्रम विषयक ध्वनिमुद्रिका, यांना वाचक म्हणून केलेले सहाय्य या सर्व गोष्टी त्यांच्या हृदयातील सामाजिक जाणीव प्रत्ययास आणून देतात. सूत्र संचलनामध्ये डॉ. होटे यांचा हातखंडा आहे. कार्यक्रम वैचारिक असो वा सांस्कृतिक डॉ स्मिता होटे यांच्या सूत्र संचालनाने कार्यक्रमाचे सोने होऊन जाते. विद्यापीठ दीक्षांत समारोह, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आदी अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांचे संचालन त्यांनी केले.

मुख्यमंत्री मा विलासराव देशमुख,डाॅ श्रीकांत जिचकार कुलगुरू डाॅ चांदे

अनेक संशोधनपूर्ण निबंध आणि पुस्तके प्रकाशित करून त्यांनी संशोधनाच्या क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त केले आहे. संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे कोषाध्यक्षपद, सहसचिवपद आणि कार्यकारिणी सदस्यत्व, संस्कृत वर्ष समितीचे उपाध्यक्षपद, विविध संस्कृत परिषदांमधील सत्रांचे अध्यक्षपद, विद्यापीठाच्या संस्कृत भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्षपद, नागपूर आणि कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणीचे सदस्यपद त्यांनी भूषविले आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या संस्कृत पाठ्यपुस्तकाचे (२००७) मूल्यमापन केले आहे. तसेच बारावीच्या नवीन संस्कृत पाठ्यपुस्तकात त्यांनी लिहिलेल्या ‘प्राचीनकाले प्रसाधनम्’  या पाठाचा समावेश करण्यात आला आहे ही विशेष अभिनंदनीय व ऐतिहासिक नोंद घ्यावी, अशी घटना आहे.

संपूर्ण भारतातील ‘संस्कृत भवितव्यम्’ या एकमेव संस्कृत साप्ताहिकाचे प्रबंधन व संपादन, ‘दर्पण’ या त्रैमासिकाचे संपादन, ‘डॉ के. रा. जोशी : देववाणीचे वरदान’ आणि ‘ नी. र. वऱ्हाडपांडे : तर्कवीर दर्शन’ या मान्यवरांच्या गौरव ग्रंथाचे संपादकत्व, महाविद्यालयाच्या लोकल मॅनेजमेंट कमिटीवर प्राध्यापक प्रतिनिधी, महाविद्यालयाच्या पतसंस्थेत संचालक सदस्य, अशा अनेक सामाजिक संस्थांचे दायित्व आणि महाविद्यालयातील विविध कार्यक्रमामध्ये व्यस्त असलेल्या डॉ स्मिता होटे यांना संगीत, अभिनय, कथालेखन, नाट्यलेखन, काव्यरचना इ. सर्व कार्यांमध्ये अतिशय रुची आहे. विधानसभेच्या रजत महोत्सवानिमित्त १९८९ साली नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ”इंद्रधनू” या सांस्कृतिक कार्यक्रमात ”अष्टनायिका” सादर करून मान्यवरांची वाहवा मिळविली.

दिल्ली संस्कृत संस्थान तर्फे अखिल भारतीय संस्कृत नाट्य लेखनासाठी दोन वेळा त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेत त्यांनी अनुवादित केलेल्या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. मंगलाष्टकांची रचना, प्रासंगिक कविता, ग्रीटिंग कार्डवर संदेशांच्या चारोळ्या, वृत्तपत्रांमधून ललित लेखन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले छंद जोपासण्याची त्यांची धडपड प्रशंसनीय प्रसंशनीय आहे. ‘उर्मि’ या महाविद्यालयीन वार्षिकांकाचे ३ वर्षे संपादक आणि १० वर्षे संपादक सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. विशेष म्हणजे विद्यापीठीय ‘महाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धेत’ त्यांच्या कार्यकाळात अनेक वेळेला ‘उर्मि’ या वार्षिक अंकाला प्रथम व द्वितीय क्रमांकांची अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत. त्यांच्या कारकीर्दीत या सर्व उपक्रमांची विशेष दखल घ्यावी लागेल.

चार पाठ्यपुस्तकांचे आणि सात नियतकालिकांचे संपादन त्यांनी केले असून यामध्ये दर्पण, तरंग, ऊर्मि, आदर्श, संस्कृतभवितव्यम्, महाविद्यालयाची अमृत महोत्सवी स्मरणिका, संशोधन पत्रिका यांची विशेषत्वाने नोंद घ्यावी लागेल.
१. वैदर्भीय कवी – दत्तात्रेय येरकुंटवार : एक अध्ययन.
२. इतस्ततः (संस्कृत).
३. नाट्यत्रिदलम् (संस्कृत).
४. संस्कृत साहित्यातील प्रसाधन आणि अलंकरण,.
५. श्री ब्रम्हज्ञानी कथामृत.
आदी पुस्तके त्यांच्या सिध्दहस्त लेखणीतून साकार झाली आहेत. त्यांच्या अनेक शोधनिबंध व वृत्तपत्रीय लिखाणास वेळोवेळी प्रसिध्दी मिळाली आहे.

नागपूर आकाशवाणीवर त्यांच्या संस्कृत विषयक ६० कार्यक्रमांचे प्रसारण झाले आहे. त्यांच्या या संस्कृत कार्याबद्दल संस्कृत भाषा प्रचारिणी सभेने त्यांचा गौरव केला आहे. एम. फिल. च्या पाच विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या पाच विद्यार्थिनींना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाने पीएच. डी. प्रदान केली आहे.

संस्कृत विभाग प्रमुख म्हणून २०१९ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावरही आधुनिक काळाशी सुसंगत विविध उपक्रम त्या राबवत आहे. ऑनलाईन व्याख्याने,फेसबुक, युट्यूब आदी माध्यमावर प्रक्षेपित होणाऱ्या त्यांच्या काल सुसंगत कार्यक्रमांची रेलचेल असते आणि प्रेक्षक – वाचकांकडून त्याची दखल घेतली जाते, हे विशेष.

आपल्याला घडविण्यात मान्यवर, गुणग्राही गुरुजनांचा सहभाग आहे, हे त्या आवर्जून सांगतात. बालवयात आईवडिलांनी दिलेली संस्कारांची शिदोरी आणि संस्कृतने दिलेले विचारधन यामुळे सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी त्या समाजातील निरलस आणि नि:स्वार्थ भावनेने कार्य करण्याऱ्या संस्थांचा सतत शोध घेत असतात “घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे” या भावनेने गेल्या वर्षभराच्या कठीण काळात अनेक गरजू संस्था, विद्यार्थी, रुग्ण यांना आर्थिक मदत देऊन सत्पात्री दानाचे व्रत स्मिताताई चालवत आहे. परंपराभिमान आणि आधुनिकता यांचा सुयोग्य मेळ घालणाऱ्या स्मिताताई परिवारातील सदस्यांचे जन्मदिवस, पितरांचे स्मृतिदिन इत्यादी प्रसंग दानाने संस्मरणीय करण्याची परंपरा पाळतात.
डॉ स्मिता होटे यांचा परिवार उच्च शिक्षित आहे. यजमान श्री. सुधीर महादेवराव होटे भारत सरकारच्या नागपूर येथील रक्षा लेखा कार्यालयात – वरिष्ठ अंकेक्षक (सिनियर ऑडिटर) या पदावरून २०१८ साली निवृत्त झाले. याशिवाय ते विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यात सतत अग्रभागी रहात आले आहेत. मोठी कन्या सौ संस्कृती अमित भेलोंडे यांनी पत्रकारितेतील उच्च अभ्यासक्रम पूर्ण केला आहे तर धाकटी कन्या सुरभी बी ई, एम एस असून अमेरिकेतील न्यू जर्सी येथे नोकरी करत आहे.
ज्ञानयोगी स्मिताताईंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

– लेखन : प्रा चंद्रकांत खांडगौरे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. My self Prakash Parandkar,Lokmanya Nagar,Indore-9(M.P.) proud of my so talented vahini,Smt.Smita Sudheer Hotey.Her husband Mr.Sudheer M.Hotey colleagues,served together in the Department of Govt.of India,i.e.Defence Accounts Department @Pachamarhi(M.P.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी