Saturday, July 5, 2025
Homeयशकथाज्ञानयोगी डाॅ. सतीश शिरसाठ

ज्ञानयोगी डाॅ. सतीश शिरसाठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ सतीश शिरसाठ नुकतेच सेवा निवृत्त झाले. त्यांचा हा गौरवशाली ज्ञान योग….

प्रा डाॅ. सतीश कान्हू शिरसाठ हे मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उदापूर या गावचे रहिवासी. उदापूर येथील जीवन शिक्षण मंदिर या प्राथमिक शाळेतून त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सातवीत त्यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तिसरा क्रमांक मिळवून स्कॉलरशीप मिळवली होती
सरस्वती विद्यालयातून त्यांनी एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. एस.एस.सी.मध्ये  ते ओतूर केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.

पुढील शिक्षण त्यांनी पुण्यातील पुणे विद्यार्थी गृह आणि ओतूर येथील आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय येथून पूर्ण केले. बारावीत त्यांनी स्कॉलरशीप मिळवली होती. पदवी पातळीवरील शिक्षण त्यांनी ओतूर येथील आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातून पूर्ण केले.
पदवीचे शिक्षण घेताना भारत सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमात तसेच राष्ट्रीय सेवा योजनेत कार्य केले.

आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातर्फे पुणे विद्यापीठात एन.एस.एस.च्या सेन्ट्रल कॅम्पमध्ये त्यांनी ओतूर महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले होते.
यात महाविद्यालयातर्फे त्यांना कुशल संघटक चषक मिळाला होता. याच महाविद्यालयात त्यांनी महाविद्यालयाच्या दहा प्रौढ शिक्षण केंद्रांचे पर्यवेक्षक म्हणून कार्य केले. यावेळी केंद्रांचे नियोजन व व्यवस्थापन, केंद्रसंघटकांची प्रशिक्षण शिबीरे, प्रौढांची महाविद्यालयास भेट व विज्ञान प्रदर्शन, प्रौढांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व तत्सम उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले.

पुणे विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण सल्लागार समितीचेही सदस्यत्व त्यांना मिळाले होते. पुण्यातील कर्वे समाजसेवा संस्थेतून त्यांनी समाजकार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण (एम.एस.डब्ल्यू) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (तेव्हाचे पुणे विद्यापीठ) प्रौढ शिक्षण प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू झाले. विद्यापीठातील तत्कालीन ५ जिल्ह्य़ातील महाविद्यालयात प्रौढ शिक्षण कार्यक्रमाची देखरेख, मूल्यमापन व संबंधित काम त्यांनी केले.

याच काळात पुणे विद्यापीठातील प्रायोगिक प्रौढ शिक्षण केंद्रांचे समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले. याच प्रौढ शिक्षण केंद्रांपैकी कोंढवा येथील डॉ. बंडोरावाला लेप्रसी हाॅस्पीटलमध्ये सौ. मृदुलता दंडे या केंद्र संघटिकेने चालवलेल्या प्रौढ शिक्षण केंद्राच्या उत्कृष्ट कार्याबद्दल भारताच्या मा. राष्ट्रपतींनी त्यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविले होते. या प्रायोगिक प्रौढ शिक्षण केंद्रांतून साक्षरता प्रसाराबरोबर जाणीव जागृती, कार्यात्मकता, विविध विकास कार्यक्रमांचे उद्बोधन, प्रकल्पभेटी, संघटक बैठका, प्रशिक्षण, प्रौढांचे सांस्कृतिक कार्यक्रम इ.उपक्रम आयोजित करण्यात आले.अनेक संघटकांनी काही चर्चासत्रांतूनही यशस्वी सहभाग घेतला.

डाॅ. सतीश शिरसाठ यांनी याच काळात पुणे शहरातील प्रौढ शिक्षण कार्यक्रम राबविणा-या महाविद्यालयांतील संघटकांचे संयुक्त प्रशिक्षण व संयुक्त विविध उपक्रम आयोजित केले. डाॅ. शिरसाठ यांनी विविध स्थानिक, राज्य, विद्यापीठ, महाविद्यालय, विभागीय, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रे, कृतिसत्रे, परिसंवाद, बैठका यांत सहभाग घेऊन मार्गदर्शन केले (यात बाली व माॅरिशस येथील आंतरराष्ट्रीय परिषदांचा समावेश आहे) निबंध व शोधनिबंध सादर केले, अनेक चर्चासत्रे, कृतिसत्रे, परिसंवाद, बैठका, प्रशिक्षण शिबीरे, मेळावे यांचे आयोजन केले. विभागातर्फे शासन व इतर संस्थांना सादर करण्यात येणारे विविध अहवाल, माहिती पुस्तिका यांचे संपादन त्यांनी केले.

डाॅ. शिरसाठ यांनी एम.ए. एम.एस.डब्ल्यू, एम.फिल., डी. एल. एल. एल अ‍ॅन्ड एल.डब्ल्यू, पीएच. डी. या पदव्या संपादन केल्या. पुढे विद्यापीठात त्यांनी समाजकार्य विषयात पहिली पीएच. डी. मिळवली.
याच विषयात ते पीएच. डी. गाईड म्हणून कार्यरत आहेत. आजवर त्यांच्या पाच विद्यार्थ्यांना पीएच. डी. मिळाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ते समाजकार्य आणि प्रौढ शिक्षण (आंतरविद्याशाखीय) या विषयांत पीएच. डी. गाईड म्हणून तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात समाजकार्य विषयात एम. फिल. चे गाईड म्हणून कार्यरत आहेत.

डॉ शिरसाठ यांनी इंग्रजी व मराठी विषयांत कथा, कविता, संपादित साहित्य, वाचन साहित्य, प्रशिक्षण साहित्य असे विपुल लेखन केले आहे.

आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील पदव्युत्तर पातळीवरील डिप्लोमा इन ट्रायबल डेव्हलपमेंट व एम. ए. इन लाईफ लाॅन्ग लर्निग या विषयासाठी अध्यापन व तदनुषंगिक काम केले आहे. विद्यार्थ्यी दशेत त्यांनी लिहिलेला ‘हिरवी चाहूल’ हा कवितासंग्रह महाराष्ट्र शासनाच्या नवलेखक अनुदान योजनेतून प्रकाशित केला गेला. आकाशवाणी, दूरदर्शन, विविध वाहिन्या, वृत्तपत्रे, नियतकालिके यांतून त्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले आहेत. विविध सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यविषयक क्षेत्रात ते सतत सहभाग घेतात.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चार डाॅक्युमेंटरीज चे संहितालेखन त्यांनी केले आहे. याच विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते पहिले समन्वयक होते. यावेळी त्यांनी विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांतून विविध सामाजिक, शैक्षणिक, ज्ञानविस्तार, प्रबोधन, लोकशिक्षण, विद्यार्थ्यी – उद्बोधन कार्यक्रम आयोजित केले.

याच काळात त्यांनी महात्मा फुले अध्यासनाची एक बहुउद्देशीय वेबसाईट तयार केली. तसेच शेकडो पुस्तकांचे ग्रंथालय विकसित केले. ३७ वर्षांच्या सेवेतून ३० सप्टेंबर २०२१ रोजी ते सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्ती कार्यक्रमात मा.कुलगुरू व मा.प्रकुलगुरू यांचे हस्ते सत्कार  (मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन)👆🏻

म.फुले, सावित्रीबाईसेवानिवृत्ती कार्यक्रमात मा.कुलगुरू व मा.प्रकुलगुरू यांचे हस्ते सत्कार ( मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन)👆🏻 फुले व संबंधित विषयावर प्रकाशित ‘क्रांतिरत्न’ या महत्त्वपूर्ण संपादित ग्रंथात त्यांच्या लेखाचा समावेश झाला आहे. भविष्यात नवोदित लेखक, कवींना साहित्य लिहिण्यासाठी सहकार्य करणे, समाजातील उपेक्षित विविध घटकांसाठी त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, असंघटित कामगार, ज्येष्ठ नागरिक इ. घटकांसाठी कार्य करण्याचे त्यांचे नियोजन आहे.

डॉ सतीश शिरसाठ सरांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

देवेंद्र भुजबळ

– देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments