Wednesday, July 2, 2025
Homeलेखज्ञानसूर्य : डॉ.बाबासाहेब आंबेडकर

ज्ञानसूर्य : डॉ.बाबासाहेब आंबेडकर

दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यात येते. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु गेल्या दिड – दोन वर्षात कोरोनाने भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.

या विषाणूविरुध्द लढत असताना आता पून्हा ओमिक्राॅन या विषाणूने डोके वर काढून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे पून्हा एकदा लाॅकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होते की काय ? अशी भीती वाटू लागली आहे. एकमेकांचा अधिकचा संपर्क टाळता यावा म्हणून घराच्याबाहेर न निघता घरात बसूनच बाबासाहेब यांना अभिवादन करावे, असे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे.

मुंबईत चैत्यभूमीवर येथे बाबासाहेबांसमोर नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून महापरिनिर्वाणदिनी येत असतात. पण यंदाही त्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत. अशी वेळ भारतात  प्रथमच आली असावी. जगाच्या पाठीवर बाबासाहेब आंबेडकर यांचेच एकमेव उदाहरण असे असेल ज्या महापुरुषाचा महापरिनिर्वाणदिन अनेक देशांमध्ये साजरा केला जातो.

रामजी सुभेदार आणि माता भिमाई यांच्या पोटी भीमराव आंबेडकर या महान तपस्वीचा जन्म झाला. अत्यंत कठीण असा तो काळ होता.  मानवाने निर्माण केलेल्या जातीयतेच्या काळात जेथे खुला श्वास घेणे अवघड होते. गुलामगिरीसारखे जीवन जगावे लागत होते. त्याकाळात शिक्षण घेणे दुरापास्तच नव्हे तर अत्यंत कठीण होते.

रामजी सुभेदार आणि माता भिमाई

पण म्हणतात ना काळाचा महिमा कुणी सांगितला ? अशा कठीण काळात सुभेदार रामजी यांनी भीमरावला शाळेत घातले. त्या काळच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत भीमराव नावाच्या या छोट्या चिमुकल्याने आपली चमकदार कामगिरी दाखवत रामजी सुभेदाराचे नाव रोशन केले. जणू त्यांच्या पोटी हा हिराच जन्मला होता.

अस्पृश्य समाजाचा विकास करावयाचा असेल तर शिक्षणापेक्षा दुसरे मोठे साधन नाही, कारण शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे यावर त्यांची गाढ श्रध्दा होती. स्वातंत्र्य, समता,  बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित समाज घडविण्यासाठी शैक्षणिक क्रांतीची आवश्यकता असल्याची जाणीव बाबासाहेबांना होती. प्रत्येकाने बुध्दीचा विकास करण्यासाठी हाल अपेष्टा सहन करून  शिक्षण मिळवले पाहिजे आणि आपल्या ज्ञानाच्या बळावर स्वतंत्रपणे विचार करावयास शिकले पाहिजे,  असे डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. बुद्धीचा विकास करणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे.  शिक्षणामुळे विकास साधता येतो म्हणून त्यांनी आयुष्यभर देशातील शुद्र- अतिशुद्रांच्या शिक्षणासाठी लढा दिला. बाबासाहेबांनी स्वतःच्या शिक्षणालाही महत्व दिल्याचे आपणास पहावयास मिळते.

बाबासाहेबांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील मराठी माध्यमिक शाळेत इंग्रजी  पहिल्या वर्गात नाव नोंदले. शैक्षणिक काळात कृष्णाजी केशव आंबेडकर या शाळेतील गुरुजींचा बाबासाहेबांवर विशेष लोभ होता. तसेच कृष्णाजी अर्जून केलूसकर यांचाही त्यांना चांगला सहवास लाभला. केलुसकर गुरुजी यांंनी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर रावबहादूर सी के बोले यांच्या अध्यक्षतेखाली भीमरावांचा सत्कार घडवून आणला आणि  भीमरावांना आपले बुध्दचरित्र भेट दिले. या चरित्राचा भीमरावांच्या भावी जीवनावर मोठा परिणाम झाला.

कृष्णाजी अर्जून केलूसकर

पुढे इंदूप्रकाश प्रेसचे दामोदर सावळाराम यंदा यांच्यासह भीमरावांना सयाजीराव गायकवाड यांच्या भेटीस नेऊन महाविद्यालयीन शिक्षणासाठी दरमहा रुपये २५ इतकी शिष्यवृत्ती मिळवून दिली. परदेशातील उच्च शिक्षणासाठी भीमरावांना बडोदे सरकारची शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी केलूसकर गुरूजींनी सहकार्य केले. १९१४-१९१६ या काळात सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांसाठी परदेशातील उच्च शिक्षणासाठी वार्षिक २३० पौंड शिष्यवृत्ती मंजूर केली.  त्यामुळेच बाबासाहेब अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठात एम.  ए. च्या शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकले आणि पुढे Administration & Finance of the East India Company  हा प्रबंध सादर करून २ जून १९१५ रोजी त्यांनी एम. ए. ची पदवी प्राप्त केली.

सयाजीराव गायकवाड

तसेच याच विद्यापीठात  The National Dividend of India : A Historical and Analytical Study हा अर्थशास्त्र या विषयावरील पीएच. डी. साठीचा प्रबंध सादर केला. हा प्रबंध विद्यापीठाने १९१६ साली  स्वीकारला.

इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पाँलिटिकल सायन्स मध्ये १९१६ साली एम.एससी साठी त्यांनी प्रवेश घेतला.  बाबासाहेबांची ज्ञानाची भूक कमी होण्याऐवजी वाढतच होती. त्यातच त्यांनी ११ नोव्हेंबर १९१६ मध्ये बार- अँट-लाॅ साठी ‘ग्रेज इन’ मध्ये आपले नाव दाखल केले. मात्र शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने बडोदे सरकारने त्यांना भारतात परत येण्यास सांगितले. आँक्टोबर १९१७ पासून पुढच्या चार वर्षाच्या  आत उरलेला अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याची अनुमती लंडन विद्यापीठाकडून मिळवून  २१ ऑगस्ट १९१७ रोजी बाबासाहेब मुंबईत पोहचले.

शिक्षणाची गोडी कायमच असल्यामुळे पुन्हा बडोदे सरकारने  शिष्यवृत्तीच्या रकमेत वार्षिक १८० पौंड इतकी रक्कम १४ आक्टोबर १९१६ रोजी वाढवून देण्यास मंजुरी दिली.  त्यामुळेच कायद्याचे अर्धवट राहिलेले शिक्षण त्यांनी पूर्ण करून बार- अँट- लाँ ही पदवी लंडनच्या ग्रेज इन मधून पूर्ण  करून या सोसायटीच्या न्यायसभेने २८ जून १९२२ रोजी डॉ. बाबासाहेबांना ही कायद्याची अत्युच्च पदवी प्रदान केली.

जर्मनीच्या बाँन विद्यापीठातून अर्थशास्त्रातील आणखी एखादी डॉक्टरेट मिळवावी म्हणून त्यांनी प्रवेशही घेतला. त्यासाठी त्यांनी जर्मन भाषाही अवगत केली आणि आपला प्रबंध विद्यापीठाला सादर केला. तत्पूर्वी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रातील डिएस. सी. ही पदवी मिळवली होती. त्यांच्या प्रबंधाचा विषय   ‘The Problem of the Rupee : it’s origin and solution’ असा होता.  अशाप्रकारची उच्च पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.

शिक्षणाविषयीची गोडी बाबासाहेबांची कधीही कमी झाली नव्हती असे आपणास प्रकर्षाने दिसून येते.  म्हणूनच ज्ञानाची भूक कधीही कमी न होऊ दिल्याने त्यांना ज्ञानपिपासू याच उपाधीने संबोधले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला शिक्षणाचा एक टप्पा पूर्ण केला आणि या आपल्या शिक्षणाचा उपयोग शोषित, गुलामगिरीच्या खाईत अडकलेल्या आणि जातीभेदाने त्रस्त झालेल्या अस्पृश्य वर्गाच्या कल्याणासाठी केला.  एक एक आंदोलन आणि चळवळ हाती घेऊन अनेक लढे त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. महाड चवदार तळ्याचा लढा सर्वश्रुत आहे.  १९२७ साली झालेल्या या लढ्याचा वेगळा इतिहासही आहे.

पुढे  नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह या अशासारखे अनेक लढे लढले आणि ते यशस्वी केले. महिलांच्या स्वातंत्र्यासाठी बाबासाहेबांनी  हिंदू कोड बिल आणले. स्त्री -पुरूष विषमता दूर झाली  पाहिजे, असे त्यांना मनोमन वाटत होते. स्त्रियांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी डॉ.  आंबेडकरांनी वापरलेले महत्त्वाचे अस्त्र म्हणजे कायदा.

बाबासाहेबांबद्दल कितीही लिहिले,  बोलले तरी ते कमीच आहे. स्वतःला आणि कुटुंबियांसाठी राहण्यासाठी अनेकजण घरं बांधतात. पण केवळ ग्रंथ ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी घर बांधले. त्याचेच नाव त्यांनी राजगृह ठेवले. यावरून त्यांचे ग्रंथप्रेम किती होते, याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

अभ्यासाबद्दलचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. म्हणूनच तर कोलंबिया विद्यापीठासमोर जगातील विद्वानांपैकी बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तीचा पुतळा उभारण्यात आला आहे. यासाठी या विद्यापीठाने सर्वेक्षण केले होते. त्यात सर्वाधिक स्कॉलर म्हणून बाबासाहेबांचे नाव पुढे आले.

अशा या ज्ञानसूर्याला, महामानवाला त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम !

शेषराव वानखेडे

– लेखन : शेषराव वानखेडे. जेष्ठ पत्रकार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४