संध्यारंग दाट झाले
नभी चाले पोरखेळ
गर्द सोनेरी रंगाची
अवतरे सांजवेळ
रंग सारा ओघळतो
झाडा पाना वेलीतून
चंद्र प्रकाश डोकावे
नभी तारकामधून
संधीप्रकाश पडला
दूर रस्त्यारस्त्यांतून
जाग येतेय हळूच
कष्टकरी वस्तीतून
कुठे बायांची भांडणे
कुठे पोरांचा गोंगाट
कसा दिसणार इथे
सांजवेळी थाटमाट
हातावर सारी पोटे
श्रम हेच भांडवल
निसर्गशोभा सांजेची
यांना कशी जाणवेल
चंद्र, तारे मुक्त वारे
दूर दुरून जातात
भाकरीचे प्रश्न यांच्या
मानेवर बसतात
सांजवेळा भोगायला
दूर काळोख घालवा
जगण्याचे प्रश्न जरा
सर्वप्रथम सोडवा
ज्याची त्याची सांजवेळ
स्वतः पुरती असते
काळी असो किंवा शुभ्र
झरोक्यातून दिसते.
– रचना : श्रीनिवास गडकरी
अप्रतिम कविता 👌🏻
खुप छान कविता. वास्तवतेच यथार्थ वर्णन.