दिवसेंदिवस मोबाईलच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक, भावनिक फसवणूक होत असून, अशी फसवणूक टाळण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी मोबाईल वर येणाऱ्या प्रलोभनांच्या बाबींपासून दूर राहिले पाहिजे असा इशारा निवृत पोलीस उप अधीक्षक सुनीता नाशिककर यांनी दिला. मुंबईतील अंधेरी येथील स्नेहवर्धन ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या ‘ज्येष्ठांची सुरक्षा व सायबर सुरक्षा’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलताना त्यांनी हा इशारा दिला.
फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन काही ज्येष्ठ नागरिक मोबाईल पासूनच दूर राहतात. पण त्यांनी असे न करता, असे घाबरून न जाता मोबाईल वापरताना काय दक्षता घ्यावी याचे मार्गदर्शन करून सायबर गुन्ह्यांमध्ये फसगत झालीच तर आपण त्वरित काय केले पाहिजे याची त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच सामान्य नागरिक आणि पोलिस खात्यातील दुरावा कमी होण्याची गरज आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
आपल्यावर लहानपणी झालेल्या संस्कारांमुळे आपण पोलिस सेवा प्रामाणिकपणा, अनुशासन, कणखरपणा, सामाजिक भान राखून बजावू शकलो असे सांगून नाशिककर मॅडमनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपले प्रेरणास्थान आल्याचे सांगून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ‘पसायदान’ चा अर्थ साध्या, सोप्या, रसाळ भाषेत समजावून सांगितला.
प्रारंभी सौ.नीला पंडित यांनी सुंदर प्रार्थना म्हणून वातावरण भावपूर्ण केले. श्री प्रदीप पंडित यांनी सौ.सुनीता नाशिककर यांचा परिचय करून दिला. सौ.पल्लवी घाग यांनी आभार मानले. मंडळाचे सचिव श्री विरेंद्र चित्रे यांच्या हस्ते आभार पत्र, पुष्पगुच्छ देऊन नाशिककर मॅडम यांचा गौरव करण्यात आला.
या सुंदर कार्यक्रमाची सांगता सर्वांनी म्हटलेल्या पसायदानाने झाली.
पोलिस खात्यात थेट पोलिस उप निरीक्षक म्हणून भरती झालेल्या पहिल्याच तुकडीतील अधिकारी असलेल्या नाशिककर मॅडमचे सेवेत आलेले थरारक अनुभव ऐकून, प्रसंगी जीवाची बाजी लावत धाडसाने बजावलेली त्यांची पोलीस सेवा ऐकून उपस्थित सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी आदर भाव निर्माण झाला. यामुळे सकारात्मक उर्जा मिळाल्याचे सांगत उपस्थितांनी हे व्याख्यान आयोजित केल्याबद्दल स्नेहवर्धन ज्येष्ठ नागरिक संघाचे मनोमन आभार मानले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800