Monday, September 15, 2025
Homeलेखज्येष्ठांसाठी हेल्प लाईन

ज्येष्ठांसाठी हेल्प लाईन

आज जागतिक जेष्ठ नागरिक दिन आहे. त्यानिमित्ताने जेष्ठ नागरिकांना दिलासा देणाऱ्या दिलासा हेल्प लाईनची ही उपयुक्त माहिती…..

बँकेच्या सर्विस मधून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर, पूर्ण वेळ समाजकार्यासाठी देण्याच्या उद्देशाने मी समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेण्याचे ठरवले. या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात विविध सामाजिक विषयांवर अनेक प्रोजेक्ट्स आणि शोधनिबंध सादर करावे लागतात. तसेच नेमून दिलेल्या एका सामाजिक संस्थेत वर्षभरात २८० तास अनुभवासाठी फिल्ड वर्क करावे लागते.

पहिल्या वर्षी मी स्त्री मुक्ती संघटनेत आणि दुसऱ्या वर्षी लोकमान्य सेवा संघ पारले अशा दोन नावाजलेल्या संस्थामध्ये फिल्ड वर्कचा अनुभव घेतला.

लोकमान्य सेवा संघ पारले ही सामाजिक संस्था शतकमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असून संस्थेच्या पाळणाघरापासून ते वृद्धाश्रमापर्यंत वीस विविध शाखा कार्यरत आहेत. मी सर्व शाखांमध्ये कार्यानुभव घेतला. या दरम्यान ‘ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यां ‘ हा विषय एका प्रोजेक्ट साठी मला दिला गेला. आणि मनासारखा विषय मिळाला म्हणून मीही जीव ओतून प्रोजेक्ट बनवले. प्रोजेक्टला “ए प्लस ग्रेड” मिळाली.

तत्कालीन संघ कार्यवाहांना माझं प्रोजेक्ट खूपच आवडलं. त्यांनी मला या संकल्पनेवर आधारित ज्येष्ठांसाठी एक नवीन शाखाच सुरु करायला सांगितली. मी सविस्तर प्रस्ताव कार्यकारिणीला सादर केला आणि वर्ष २०१० च्या जानेवारी महिन्यात “दिलासा” शाखेचा शुभारंभ झाला. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध विषयांवर आठवड्याला एक कार्यक्रम केला जाई. परंतु प्रत्यक्ष हेल्प लाईन सुरु व्हायला २०१३ साल उजाडले. कल्पना होती ज्येष्ठांनी ज्येष्ठांसाठी चालवलेली हेल्प लाईन !

दिलासाच्या सभासदांमध्ये सेवानिवृत्त बँक अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, अभियंते, लेखक, कवी, साहित्यिक, कलाकार असे एकसे एक दिग्गज अनुभवी स्वयंसेवक आहेत. प्रोजेक्ट मधील योजनेनुसार या सर्वांकडे भरपूर अनुभव, ज्ञान, क्षमता, (शारीरिक व मानसिक), वेळ, आर्थिक स्थैर्य आणि मुख्य म्हणजे समाजासाठी काहीतरी करण्याची प्रामाणिक इच्छा हे सर्व गुण आहेत. या अमूल्य अशा “ज्येष्ठ शक्तीचा” समाजासाठी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांतुन मार्ग काढण्यासाठी उपयोग करण्याचा माझा उद्देश होता आणि तो सफलही झाला.

संस्थेकडून एक स्वतंत्र टेलिफोन लाईन, कार्यालयीन लेखन साहित्य आणि एक स्वतंत्र समुपदेशन कक्ष, अभ्यागत कक्ष हेल्प लाईन केंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आला. वीस ज्येष्ठ स्वयंसेवकांना अधिकृत प्रशिक्षण दिले. मनोवैज्ञानिक डॉ. प्रतिमा हवालदार यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्व सभासद स्वयंसेवकांना लाभले. तसेच कुटुंब न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश श्रीमती बागेश्री पारीख या स्वतः दिलासा शाखेच्या अध्यक्षा असल्याने त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ तर झालाच परंतु प्रत्येक स्वयंसेवकाला दैनंदिन सहाय्यही लाभले. त्यांनी कम्युनिकेशन स्किल्स आणि लिसनिंग स्किल्स वर धडे दिले. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते १२ अशी दोन तास हेल्प लाईनची सेवा गरजूना द्यायची असे ठरले. त्यानुसार वेळापत्रकही तयार झाले. दररोज दोन स्वयंसेवक केंद्रावर वेळेवर पोचतील आणि हेल्प लाईनचे काम सांभाळतील अशी व्यवस्था केली गेली. संस्थेकडून स्वयंसेवकांना अधिकृत ओळखपत्रे सुध्दा देण्यात आली.

हेल्प लाईन केंद्रावर ज्येष्ठांना अतिशय मोलाच्या विविध सेवा पुरवल्या जातात. सर्वानुमते केंद्राचे नांव ठरवले  “संवाद-सल्ला-सहयोग दिलासा हेल्प लाईन”

(१) मनमोकळा संवाद अथवा व्हेंटिलेशन : अनेक ज्येष्ठ नागरिक एकटेपणामुळे एकाकी असतात तर काही मोठ्या कुटुंबात राहूनही एकाकी असतात, कारण कुटुंबातील सदस्यांना त्यांच्याशी बोलायला वेळ तर नसतोच परंतु त्यांचं कुटुंबातील – घरातील अस्तित्वही दखलपात्र नसतं. असे ज्येष्ठ नैराश्याचे बळी होतात. त्यांना भावना व्यक्त करायला, बोलायला सोबत कोणीच नसतं. अशा परिस्थितीत हेल्प लाईनचे स्वयंसेवक संवाद साधतात. त्यांची एकटेपणाची, एकाकीपणाची भावना दूर करतात, तसेच त्यांची खुशाली जाणून घेण्यासाठी अधून मधून त्यांच्याशी फोनवर संपर्क करून त्यांना दिलासा देतात. अशा ज्येष्ठांच्या छोट्या मोठ्या तक्रारी समस्यां असतात. खरं तर त्यांचं निराकरण करायला ते सक्षम असतात, परंतु त्यांना कोणाशीतरी बोलायचं असतं – आपलं म्हणणं कोणीतरी ऐकून घ्यावं असं त्यांना वाटत असतं. त्यांच्यासाठी दिलासा हेल्प लाईन एका करीबी दोस्ताची भूमिका बजावते.

(२) कौटुंबिक समस्यांचे समाधान करण्यासाठी कुटुंब न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश श्रीमती बागेश्री पारीख चोख मार्गदर्शन करतात. समुपदेशनाच्या माध्यमातून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न असतो.

(३) वृद्धाश्रम ही आज काळाची गरज झाली असून संस्थेने महाराष्ट्रातील वृद्धाश्रमांची संपूर्ण माहिती देणारी एक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. ही पुस्तिका गरजू ज्येष्ठांसाठी अतिशय उपयुक्त ठरली असून सध्या तेराव्या आवृत्तीवर काम सुरु आहे. विविध वृद्धाश्रमांची माहिती संकलीत करण्याचे काम सगळे स्वयंसेवक करतात. तसेच आवश्यक माहिती फोनवरही दिली जाते.

(४) आपल्या माघारी आपल्या चल अचल संपत्तीचे वाटप आपल्या वारसांना करण्यासाठी ज्येष्ठांना नेहमीच चिंतेची बाब वाटते. त्यांची चिंता दूर व्हावी यासाठी इच्छापत्र अथवा मृत्युपत्र बनवण्यासाठी सर्वतोपरी मदत हेल्प लाईन केंद्रात मिळते.

(५) तसेच वृद्धपकाळात मृत्यूसमयी कृत्रिमरीत्या श्वासोच्छवास सुरु ठेऊन जागवण्यापेक्षा शांतपणे मरणाला सामोरे जाण्याची ज्या वृद्धांची इच्छा असते त्यांच्या साठी वैद्यकीय इच्छापत्राचे मार्गदर्शन केंद्रात केले जाते.

(६) काही समस्या अशा असतात की त्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन गरजेचे असते, तेही केंद्रात तद्न्यांकडून दिले जाते.

(७) देहदान, नेत्रदान, त्वचादान आणि अवयव दान याचे महत्व आज सर्वच जाणतात. यासाठी कायदा आहे, कायदा समजावून देऊन हे दान करण्याची प्रक्रिया, फॉर्म उपलब्ध करून दान रजिस्टर करण्यासाठीचे संपूर्ण मार्गदर्शन हेल्पलाईन केंद्रात केले जाते. मागील पाच सहा वर्षात जवळ जवळ २८० देहदान व नेत्रदानाचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. अवयव दानासाठीचा मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा समजावून समुपदेशन सुद्धा हेल्प लाईन केंद्रात होते.

(८) ज्येष्ठांच्या काही आरोग्याच्या समस्या असतील अथवा त्यांना काही वैद्यकीय मदत हवी असल्यास आठवड्यातून एक दिवस डॉक्टर उपलद्ध असतात.

सर्व स्वयंसेवक अतिशय समर्पण भावनेने हेल्पलाइनवर सेवा देतात. आजवर हजारो गरजूंना या सेवेचा लाभ मिळाला आहे. हेल्प लाईन दूरध्वनी : ०२२-२६१४२१२५. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत मदत उपलब्ध असते. तरी गरजू जेष्ठ नागरिक,त्यांच्या कुटुंबियांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच असे इतर कुणी गरजू असतील तर त्यांनाही ही माहिती द्यावी.

जेष्ठ नागरिक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐

– लेखन : आशा कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अतिशय स्तुत्य उपक्रम, की ज्याची आज समाजाला सर्वात जास्त गरज आहे. हेल्पलाईन सेवेमुळे अनेक जेष्ठ नागरिकांना जिवन आनंदाने व्यतीत करण्याचा आधार नक्कीच मिळणार यात तिळमात्र शंका नाही. परमेश्वराची कृपादृष्टी अशीच सदैव अशा कामांवर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विश्राम (संजू) व शुभांगी कुलकर्णी, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments