क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏
१) ज्योतिबा
हार गुंफिले जन्मभरी तू सत्त्याचे ज्योतिबा
शिवार फुलले मानवतेच्या धर्माचे ज्योतिबा
सुरुंग दिधले लाउन त्याच्या पायतळी क्रांतिचे
ढासळले मग बुरूज चारी वर्णाचे ज्योतिबा
अंतरात पेटवून ज्योती उजळलेस जग पुरे
तिमीर सरला दार उघडले ज्ञानाचे ज्योतिबा
भेदभाव अन जातीपाती घातक देशामधे
धडे दिले तू फुटीरतेला ऐक्याचे ज्योतिबा
मुक्त विहरती फुलाफुलांवर सुंदर फुलपाखरे
समतेचे उद्यान लाभले हक्काचे ज्योतिबा
शेतकऱ्यांच्या हाती असूड देऊनी हिमतिने
ठणकावुन मागले मागणे न्यायाचे ज्योतिबा
सोंग ढोंग अन दांभिकता ही मोडुन काढायला
प्रहार केले अखंडातुनी शब्दांचे ज्योतिबा
ईशभक्तिची मक्तेदारी नसे कुणाची इथे
फोडलेस तू बिंग बेगडी वर्गाचे ज्योतिबा
महिलांच्या प्रगतीने डोळे दिपून जाती अता
चीज जाहले तू केलेल्या कष्टाचे ज्योतिबा
जन्माने या लहानमोठे ठरते ना कोणिही
मर्म जाण हे सांगितले तू कर्माचे ज्योतिबा
बहुजन सारे काबिज करती शिखरे यशकीर्तिची
तव जन्माने सार्थक अमुच्या जन्माचे ज्योतिबा
– रचना : प्रा. सुभाष भि. मगर. मेहकर, बुलढाणा

२) हे महामानवा
हे महामानवा,
सार्थ अभिमान वाटतो मला,
वंदन तुम्हा करायला ,
हे महामानवा,
शिकवलं तुम्ही बरंच आम्हाला ,
शिकवलं स्त्रियांचा सन्मान करायला;
इथल्या समाजव्यवस्थेनं
त्यांची अवहेलना केली होती.
हे विश्वमानवा,
शिकवलं तुम्ही आम्हाला,
जातीधर्माच्या पलिकडं पहायला
आणि माणूस म्हणून जगायला;
हे सत्यशोधका,
या देशाच्या- समाजपरिवर्तनाचे जनक
आणि भारतवर्षाच्या क्षितिजावरील
प्रकाशणारा , सूर्य तुम्ही.
म्हणूनच सदैव अभिमान वाटतो मला
तुम्हाला वंदन करायला.

– रचना : प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे
३) महात्मा ज्योतिबा
धन्य पिता गोविंदराव माता चिमणाबाई
जन्मले त्यांच्या पोटी ज्योतिबा क्रांतिकारी ..
भेदभाव जाती धर्मातील सामाजिक विषमता
जीवनभर झटले तळागाळातील अस्पृश्यांकरीता ..
सत्यशोधक समाज स्थापला सत्यशोधाचे प्रणेते
गोडवे गाईले शिवबाचे चरित्राचेही ते रचेते ..
महिलांसाठी शाळा निर्मिती जनक साऱ्या स्त्रीवर्गाचे
मानवता सर्वश्रेष्ठ मानूनी उद्दारिले जीवन दलितांचे ..
तोडीली बंधने जातीभेदाची सलाम त्यांच्या धैर्या
त्रिवार वंदन तुजला महात्मा ज्योतीबा क्रांतीसूर्या ..
✒️- नेहा हजारे, ठाणे
🌹कधीही नं वाचलेल्या कविता, आपण खूप प्रभाविपणे मांडल्या आहेत. 🌹 खूप सुंदर 🌹
अशोक बी साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ