देवेंद्रजी भुजबळ साहेब, महाराष्ट्र राज्याचे माहिती संचालक म्हणून जुलै २०१८ साली शासकीय सेवेतून निवृत्त झाले. शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत असताना कामाची प्रचंड व्याप्ती होती तरी देखील समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो, समाजाच्या प्रगतीसाठी, किंबुहुना जडणघडणीत आपले योगदान असणे गरजेचे आहे, ही भावना मनाशी बाळगून आपल्या व्यस्त दिनचर्येतून समाजकार्यासाठी वेळ राखून ठेवत.
पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची आवड तर होतीच आणि त्याच बरोबर समाज प्रबोधनाची गरज लक्षात घेऊन त्यांनी निवृत्ती नंतर सामाजिक बांधिलकी व समाज प्रबोधनातून समाजाचा विकास आणि जनजागृती सारख्या कार्यात स्वतः ला पूर्ण वेळ झोकून दिले.
विशेषतः आज तरुणाईला विशेष मार्गदर्शनाची गरज आहे नेमकी हिच गरज ओळखून समाजातील कर्तुत्ववान व्यक्ती शोधून त्यांचा जीवनपट उलघडून त्यांच्या यशकथा नवीन पिढीला प्रेरणादायी, स्फूर्तिदायी ठरतील याच उद्देशाने त्यांनी “समाजभूषण” पुस्तकाची निर्मिती केली. त्यांचा आदर्श समाजातील नव्या पिढी समोर आणला. जेणे करुन तरुणांना एक नवी दिशा मिळेल.
नव नवीन उद्योग व्यवसायाचे पर्याय उपलब्ध होतील आणि केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतः स्वयंपूर्ण होऊन नव नवीन उद्योग शोधून उद्योजक बनतील आणि केवळ उद्योजक नव्हे तर अनेकांना रोजगार उपलब्ध करून सामाजिक समतोल साधला जाऊन राष्ट्रीय कार्य पार पडेल. त्याचबरोबर एक नवी दिशा, एक नवा आदर्श निर्माण होईल ही मुळ संकल्पना यशकथा असलेल्या समाजभूषण या पुस्तकातून मिळेल, नवीन तंत्रज्ञाना बरोबर ऊर्जा, उमेद ताकद मिळेलच पण उत्कर्ष व उन्नती साधता येईल हे निश्चित. हे मोलाचे कार्य श्री. देवेंद्रजी यांनी अतिशय मेहनत घेऊन केले त्याबद्दल आम्ही त्याचे ऋणी आहोत.
समाजभूषण पुस्तकाची निर्मिती करून पुस्तकाचे प्रकाशन ते पुस्तक घरोघरी पोहचलं पाहिजे यासाठी त्यांना जी मेहनत घ्यावी लागली, त्यांचा जो झंझावात राहिला त्यावरील दृष्टिक्षेप थक्क करणारा आहे. त्याचा लेखा जोखा देण्याचा हा प्रयत्न आहे.
प्रथम समाजभूषण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. हा सोहळा मंत्रालयात उद्योग मंत्री यांच्या दालनात पार पडला. भरारी प्रकाशना तर्फे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यावेळी राज्याचे उद्योगमंत्री मा. सुभाष जी देसाई यांनी हे पुस्तक समाजात प्रत्येक घटकासाठी प्रेरक व प्रेरणादायी ठरेल व घरोघरी समाजभूषण तयार होतील असे गौरवोदगार काढले. या प्रकाशन सोहळयास महाराष्ट्र राज्याचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी हजर होते.
प्रारंभी श्री देवेंद्रजी भुजबळ यांनी समाजभूषण पुस्तकाची निर्मिती व त्याचे महत्व विषद केले. शेवटी मंत्री महोदय व अन्य पदाधिकारी यांचे आभार मानले आणि यासाठी ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचा उल्लेख आवर्जून केला. या अभिनव उपक्रमात त्यांच्या अर्धांगिनी सौ.अलका भुजबळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले, अलका ताई बद्दल सांगायचे झाले तर त्या एका मोठ्या आजारातून मनशक्ती च्या जोरावर मात करून पुन्हा त्याच ताकदीने, त्याच उमेदीने सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या. या कार्यक्रमास सौ अलकाताई भुजबळ, भरारी प्रकाशना तर्फे प्रकाशक लता गुठे तसेच अन्य शासकीय अधिकारी हजर होते.
समाजभूषण या पुस्तकास महाराष्ट्र राज्यातून अल्पावधीत खूप मोठी मागणी आली. हे पुस्तक वाचकांच्या पूर्ण पसंतीस उतरले. यामुळे समाजभूषण पुस्तकाचे प्रकाशन सोहळे राज्यभर अनेक ठिकाणी पार पडले. माननीय देवेंद्रजी स्वतः ठिकठिकाणी आयोजकांच्या विनंतीला मान देऊन हजर राहिले आणि आपल्या झंझावती दौऱ्यात समाज घटकाला, तरुणाईला, नव्या पिढीला, नव्या युगाचा, नवा आविष्कार ही नव संकल्पना राबवत, तरुणांनो जागे व्हा, उद्योजक बना हा घोष मंत्र दिला. या दौऱ्याची, झंझावाताची संक्षिप्त माहिती द्यावी असे वाटते.
सदर पुस्तकाचा मुंबई विभागीय प्रकाशन सोहळा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी मा. देवेंद्रजी, सौ.अलका ताई, अखिल भारतीय सो.क्ष कासार समाजाचे मुंबई विभागीय अध्यक्ष श्री. अशोकजी जवकर, सेवा निवृत्त उपमुख्य दक्षता अधिकारी श्री. अशोकजी कुंदप, सौ आशाताई कुंदप, लेखिका सौ रश्मी हेडे. हजर होते.
पुढे नवी मुंबई, पुणे, सातारा येथील कालिका मंदिरात मोठ्या थाटात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळे झाले.
सातारा विभागीय प्रकाशन कार्यक्रमास ज्येष्ठ सल्लागार व चित्रपट निर्माते अरुणजी गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. त्यांनी पुस्तकाचे महत्व विषद करून कौतुक पूर्ण शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विभागीय अध्यक्ष हेमंतजी कासार, सेवा निवृत्त उपमुख्य दक्षता अधिकारी श्री. अशोकजी कुंदप, सौ आशाताई कुंदप, महेश कोकीळ, अनिल हेडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन, सौ. रश्मी हेडे यांनी तर आभार प्रदर्शन, सौ.ज्योती कासार यांनी केले. सौ.ज्योस्ना खुटाळे, सौ.मनीषा हेडे,
सौ.सविता हेडे यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.
सांगली येथे श्री.पोपटलाल डोर्ले यांच्या औषध कंपनीत सांगली विभागीय प्रकाशन श्री.डोर्ले यांच्या हस्ते झाले. डोर्ले यांनी तरुणांना उद्योजक व्हा, असे आवाहन केले. या कार्यक्रमास सांगली जिह्यातील मान्यवर उपस्थित होते.
साहेबांचा दौरा वेगाने पुढे चालूच होता. त्यांनी पिंपरी चिंचवड येथील श्री कालिका मंदिर आवारात महिलांनी भरवलेल्या उद्योग प्रदर्शनात त्यांनी तरुणांना यशकथेचे महत्व विषद करताना तरुणांनो उद्योजक बना अशी साद घालत सर्वांची मने जिंकली.
पुढे त्यांचे प्रस्थान अहमदनगर जिह्यातील प्रमुख बाजारपेठ असलेले व देवेंद्र जी यांचं जन्मगाव संगमनेर येथे झाले. तेथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली व समाजभूषण पुस्तक भेट दिले. यावेळी मंत्री महोदयांनी समाजभूषण पुस्तक बदलत्या समाजाचे यथार्थ चित्रण आहे, असे कौतुकास्पद गौरवोद्गार काढले. याप्रसंगी आमदार डॉ सुधीर तांबे, साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. संतोष खेडलेकर, अशोकजी कुंदप, संगमनेरचे प्रसिद्ध व्यापारी गोरखजी रासने आदी मान्यवर उपस्थित होते.
याच दरम्यान संगमनेर येथील दैनिक युवावार्ता कार्यालयात श्री देवेंद्रजी यांचा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी जिद्द व कठोर परिश्रमाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास स्पर्धा युगात सामान्य माणूस उल्लेखनीय काम करू शकेल हा मोलाचा संदेश दिला.
पुढे नाशिक येथे ही प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त श्री मंडलेश्वर काळे, जयंत काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
याच धर्तीवर लातूर येथे ही ज्येष्ठ पत्रकार श्री. जयप्रकाश दगडे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा,स्वच्छता भुकंप् पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते “समाजभूषण” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी मंत्री महोदय यांनी या यशकथा दिशादर्शक ठरतील, असे सांगून मनापासून कौतुक केले. या प्रसंगी प्रा.स्मिता दगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्धा येथील दहेगाव मुस्तफा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरु असलेले संत अडकोजी महाराज यांच्या २०० वी जयंती निमित्त व १०० वी पुण्यतिथी निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टूडे चे संपादक देवेंद्रजी भुजबळ यांनी केली. दहेगाव मुस्तफा येथे आडकोजी महाराज यांचे २५ वर्ष वास्तव्य होते. ज्या दिवशी जन्म त्याच दिवशी बरोबर १०० वर्षांनी समाधी घेतलेले अडकोजी महाराज एकमेव उदाहरण आहे.
याही ठिकाणी समाजभूषणचे विदर्भ विभागीय प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अखिल भारतीय सो क्ष कासार समाजाचे अध्यक्ष श्री शरद भांडेकर बोलताना म्हणाले, समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे. तर श्री देवेंद्र भुजबळ यांनी समाजभूषण पुस्तकाचा उद्देश विषद करतानाच समाजातील यशवंतांचे कौतुक करून इतरांना प्रेरणा मिळावी असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री सुनील काटेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजक व विदर्भ कासार मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल नागपूरकर यांनी सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमास विविध ठिकाणाहून आलेले विविध मान्यवर समाजबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शेवटी मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
खरचं देवेंद्रजी व सौ.अलकाताई तुम्ही उभयतांनी समाजभूषण पुस्तक निर्मितीसाठी जे अपार कष्ट, मेहनत घेतली आणि यशकथेच्या माध्यमातून समाजाला एक नवी दिशा, प्रेरणा दिली. या बद्दल आपले व या कामी ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्व टीमचे मनापासून आभार 🌺

– लेखन : दीपक जवकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800