Tuesday, September 17, 2024
Homeलेखझटपट लघु कथा

झटपट लघु कथा

२ झलक 😀

(अर्थात झटपट लघु कथा)

सवयीचं व्यसनात रूपांतर कधी होतं ते अनेकदा कळत नाही. मग संभाव्य आजाराच्या धोक्याची घंटा वाजू लागते.

परंतु आताशा ……. ‘घंटा-आजारच’ बळावू लागलाय😔 त्याबद्दलच्या ह्या २ झलक ! 👇

“आजार-घंटेचा !”

झटपट लघुकथा – १

हल्लीच्या प्रथेनुसार (?) एकटं रहाणारया Jr. गटातल्या गोखले आजोबा-आजींची ही गोष्ट. परवाच्या सकाळची.

(हल्ली ‘म्हातारपण हे दुसरं बालपण’च्या चालीवर आजी-आजोबांचा, वय वर्ष ६०ते ७५ हा Jr. गट आणि ७५ onwards हा Sr. गट,अशी वर्गवारी सहज करता येते.😃)

“अगं, चहा झाला का ?”
“हुं !!” काकूंनी हुंकार भरला.

चहाची वाट पहात आजोबांनी पेपर उघडला खरा पण ‘आजींचं नक्की काय बिनसलंय’ याचा अंदाज येईना त्यांना !

‘झोप लागली का तुम्हाला ?’ किंवा ‘आज पावलं कितपत दुखतायत ?’
ह्या अशा प्रश्नांपैकी आजींनी काहीही न विचारणं, किंवा मग,
‘अगं बाई, एवढे का वाजले ? उशीरच झाला की हो उठायला !’ अशासारखी कोणतीही प्रतिक्रिया न देणं जरासं खटकलंच त्यांना.

“गाळलास का गं चहा ?”
“अं ? हो हो !” म्हणत आजींनी चहा-बिस्कीटं आणली एकदाची !

“हे काssय ? आजच्या उपासाचं विसरलीस ?”

“ती तुमच्यासाठी हो ! माझं उपवासाचं बिस्किट माझ्या हातातै”!

तिरसटल्यासारखं उत्तर आल्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड वाटली आजोबांना. ‘आठवण’ बऱ्यापैकी शाबूत होती आजींची ! गुडघेदुखीचा त्रास असल्याने त्यांचं हिंडणं फिरणं कमी झालं असलं तरी ‘WhatsApp मंडळं’ खूप होती. मेसेजेसच्या ‘घंटी’चा किणकिणाट अव्याहत चालू असे. खरंतर आजोबा कधी कधी ह्या ‘टिंग टिंग’ मुळे त्रस्त होत. परंतु, ‘त्यामुळे तरी निदान मंजुळ आवाज होतो घरात’ असं ते स्वत:लाच समजावीत असत.

आत्ताही आजीला ‘काय झालंय ? विचारावं’ तर काही ‘वादग्रस्त मुद्दा’ उपटू नये म्हणून शांतपणे मंजुळ ध्वनीची प्रतीक्षा करत त्यांनी परत एकदा पेपरमध्ये डोकं खुपसलं. एक डोळा आजींच्या किचनमधून बेडरूममध्ये उगाचच होणाऱ्या फेऱ्यावर वाॅच ठेवून होता.

वाचता वाचता, काल रात्रीपासून ही किणकिण वाजलीच नसल्याचं त्यांच्या ध्यानात आलं मात्र, अन् ‘युरेका-युरेका’ सारखा आजींच्या अस्वस्थतेचा त्यांना शोध लागला.
त्याबद्दल काही बोलायला जाणार इतक्यात –

“अहोss, हे पाह्यलंत का ? 😲काय मेलं माझं डोकं तरी ? काल लाडवांसाठी पाक करतांना या फोनचा डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून स्विच्ड आॅफ करून ठेवला तो परत चालूच केला नाही. आता मिसेस जोशींच्या कवितेवर पहिली प्रतिक्रिया द्यायचा चान्स गेला माझा !😔च् च् च् ! शिवाय वीणाला एव्हाना सगळ्यांच्या बर्थडे विशेस देऊनही झाल्या असतील.”

असं बोलता बोलता उत्साह भरलेल्या आजींनी मोबाईल सुरू केला.
आणि….
सुमारे पाचेक मिनिटं मंजुss ळ किणकिणाट सुरूच राहिला.

आजोबा अनिमिष नजरेनं पहात राहिले, मोबाईलकडे अन् आजींकडेही !!😊

झटपट लघु कथा – २

“हॅलो, आई ! मी ‘ॲक्टिव्हा’ पार्क करून वर येतेय, दार उघड”
ईशानाने फोन कट केला.

‘उघडतेस का ? वगैरे नाहीच ! आणि इथल्या इथे फोन कशाला ? डोअर बेल नाहिये ?’ स्वत:शीच बडबडत लेकीचं स्वागत करायला संध्यानं दार उघडलं.

“काय गं, आज एवढ्या लवकर परतलीस काॅलेजमधून ? बरं वाटतंय नं ? डोकं वगैरे दुखतंय का ?”
“आईs, डोकं ‘वगैरे’ काय ? एक्कच असतं नं ? 😲प्लिजच हं, प्रश्नांचं बम्बार्डिंग करून डोक्यात जाऊ नको. आध्धीच ‘FB’नं सटकवलंय माझं डोकं !”

तणतणत बाईसाहेबांनी स्वत:च्या रूममध्ये जाऊन धाडकन् दार बंद केलं सुध्दा !!

‘आता या ‘FB’ नं डोकं सटकवलं म्हणजे ? 😳’ काही अंदाज येईना संध्याला. हल्ली मान वाकवाकवून सतत काहीतरी चालू असतं ईशानाचं, एवढं मात्र लक्षात आलं होतं तिच्या.

पूर्वी ‘मान मोडून काम करणारयांना ‘कारकुंडा मेला’ हे स्टेटस् असायचं! हल्ली पहावं तर ‘स्टेटस’ असलेले असूं दे की ‘कार’ असलेले, तरूण असूंदे की एल्डरली व्यक्ती -सगळ्यांच्या माना बघाव्या तेव्हा खाली ! ह्या अशा सगळ्या विचारांकडे दुर्लक्ष करून संध्या आपल्या कामाला लागली.

पहिली वाफ गेली की होईल शांत, असा विचार करून संध्यानं थोडा वेळ जाऊ दिला. ईशाना तशी शांत अन् सेन्सिबल मुलगी. तिनेच तर संध्याला patiently फेसबुक ची ओळख करून देऊन अकांऊट सुध्दा उघडून दिलं होतं. हळुहळु ‘FB’ चा “तोंडवळा” आणि तिथले मॅनर्स म्हणजे ‘likes’ , ‘comments ‘ इ. चांगलंच परिचयाचं झालं होतं संध्याच्या !

हात कामात अन् डोकं अशा 👆विचारात व्यस्त असतानांच संध्याला एकदम ईशानाच्या ‘मूडआॅफ’चं कारण क्लिक झालं.

“बहुतेक पोस्टवर किंवा सेल्फीवर FB च्या ‘likes’ची अन् ‘comments’ ची बेल हलली नसावी, surely !” संध्याचा स्वत:शीच संवाद झाला अन् तिनं लेकींचा मूड ठीक करायला पारंपारिक डिश न करता ताबडतोब ‘noodles’ करायला घेतले.

संध्या noodles घेऊन ईशानाच्या खोलीत जाणार इतक्यात,

“आयुडी, hehe, जरा लेट का होईना पण माझ्या article ला ‘likes’ यायला सुरूवात झाली. थट्टी (30) तर already आले सुध्दा !”
संध्याच्या हाताला धरून ईशाना तिला गोलगोल फिरवू लागली.
आणि…..
‘क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे’ चा हा खेळ
संध्या ची काळजी भरल्या नजरेनं पहातच राहिली.

— लेखन : अनुजा बर्वे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. झटपट लघुकथा ही साहित्यातील नवी पध्दत ज्यातून सोशल मिडीया जीवनात गोंधळ निर्माण करतो यावर आधारित कथानक वाचनीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments