पुण्यनगरीबद्दल पुण्याबाहेर अनेक पूर्वग्रह, समज, प्रवाद आहेत. पण इथली जमीन छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगराने नांगरली आहे. लोहगड, तोरणा, तिकोना, पुरंदर, सिंहगड अशा अनेक किल्ल्यांनी वेढलेले हे पुणे. पराक्रमी पेशव्यांचे पुणे. असंख्य साहित्यिक, नेते, कवी, नाटककार, कलावंत, चित्रकार, गायक, वादक, अभिनेते, प्रकाशक, संशोधक, विविध क्षेत्रातील अनेक चळवळी, नाविन्यपूर्ण उपक्रम यांचे पुणे. गणपती, मारुती, विठोबा, पेठा यांचे पुणे. पण एक महत्वाची गोष्ट अशी दिसते की येथे वैयक्तिक पातळीवर विविध प्रकारच्या बहुमोल आणि पुरातन वस्तूंचे संग्रह करणाऱ्या शेकडो व्यक्ती आहेत. येथे अनेक वस्तुसंग्रहालये आहेत. मला वाटते की ही पुण्याचा सांस्कृतिक अभिरुचीचा दर्जा खूप उंचावणारी गोष्ट आहे. त्यात आता एक अत्यंत मोलाची, महत्वाची भर पडली आहे ती म्हणजे पुण्यानजीक नव्याने तयार झालेल्या ‘ झपुर्झा ‘ या वस्तू, कला आणि सांस्कृतिक संग्रहालयाची !
पुण्यानजीक कुडजे गावामध्ये खडकवासला धरणानजीक एका खूप सुंदर आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी ही नगरी अवतरली आहे. येथेच असलेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( नॅशनल डिफेन्स अकॅडमी ) ही आपल्या देशाला शूर सैनिक देणारी संस्था आहे. आता झपुर्झा हे संग्रहालय आपल्या देशाचे नाव जगाच्या सांस्कृतिक नकाशावर सन्मानाने झळकवेल ! सुमारे ८ एकर जागेत विस्तारलेले हे कलामंदिर अत्यंत नियोजनबद्ध आणि कलात्मक पद्धतीने उभारण्यात आले आहे. पुण्यातील सुमारे २०० वर्षे जुन्या आणि सुप्रसिद्ध अशा ” पु.ना. गाडगीळ ” या सराफ पेढीचे अध्यक्ष श्री. अजित गाडगीळ यांची कलात्मक दृष्टी आणि देशभरातून जमविलेला अत्यंत पुरातन व दुर्मीळ वस्तुसंग्रह यातून उभ्या राहिलेल्या या कलानगरीत, स्टुडियोसारखी १० प्रशस्त दालने, एक संस्कृती दालन, अँफी थिएटर, मोठे खुले प्रेक्षागृह, विशेष वस्तूंचे विक्री केंद्र, सुसज्ज खाद्यगृह आहे. शेजारीच धरणातील पाण्याचा प्रचंड साठा व घनदाट वृक्षराजी यामुळे हा मंतरलेला परिसर वाटतो.
संग्रहालयाच्या सुरुवातीलाच श्री.अजित गाडगीळ यांचे एक सुंदर निवेदन आहे. येथेच जगप्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रकृती पाहायला मिळतात. नंतरच्या प्रत्येक दालनामध्ये आपण अपेक्षा केल्यापेक्षा खूपच कांही अप्रतिम आणि वेगळेच पाहायला मिळते. उदा. दिव्यांच्या दालनामध्ये मिट्ट काळोख आणि तेलाचे दिवे लावण्यापासून ते अत्याधुनिक दिव्यांपर्यंतचा प्रवास खूप आकर्षकपणे मंडला आहे. मी गेली ५५ / ५६ वर्षे दिव्यांचा संग्रह करीत आहे, पण इथे पाहिलेल्या कांही दिव्यांची तर मी कधी कल्पनाही केली नव्हती. संबंधित विषयाला पूरक अशी प्रचंड भित्तिचित्रे, माहिती फलक, चित्र पट्ट्या, फोटो फ्रेम्स, रेखाटने, पोस्टर्स, लावलेली आहेत. प्रत्येक दालनात सगळी माहिती उत्साहाने देणारी जाणकार निवेदिका हजर असतेच. पोथी नावाच्या दालनात तुम्ही काय अपेक्षा ठेवाल ? जुन्या ग्रंथांची पाने, लेखनाची उपकरणे, नैसर्गिक रंग बनविण्याची रीत, रंगांचे प्रकार यांची मनोरंजक माहिती अगदी विष्णुधर्मोत्तर पुराणातील उल्लेखासह दिली आहे. चित्र रेखाटण्यापासून रंगविण्यापर्यंतचा प्रवास दाखविला आहे.
ज्योतिष ग्रंथांची माहिती, शंभर फूट लांबीच्या पुरातन कुंडल्या, विविध राशींची माहिती, धार्मिक माहिती असा परिपूर्ण ऐवज येथे आहे. वस्त्रकथीमध्ये भारतातील विविध वस्त्रे आणि साड्यांचे प्रकार ” लुगडं ” या शीर्षकाखाली पाहायला मिळतात. वस्त्र विणण्याचे हातमाग आता पाहायला मिळणे कठीण आहे. येथे त्याची छोटी आवृत्ती पाहायला मिळते. ज्यांची फक्त आपण नावेच ऐकलेली असतात अशा अनेक प्रकारच्या साड्या येथे प्रत्यक्षात पाहायला मिळतात. दागिन्यांच्या भरगच्च दालनात स्त्रियांचे आणि पुरुषांचेसुद्धा अत्यंत वेगळे, पुरातन, सुंदर दागिने पाहायला मिळतात. झपूर्झामध्ये कल्पकता ठायीठायी पाहायला मिळते. चांदीच्या विविध गुलाबदाण्या मांडण्यासाठी येथे सुमारे १५ फूट उंचीची गुलाबदाणीच्या आकाराची शोकेस तयार केलेली आहे. मराठी भाषेच्या आगळ्यावेगळ्या दालनात अनेक साहित्यिकांच्या हस्ताक्षरातील पत्रे, सह्या, फोटो, कवितांचे फलक, म्हणी लिहिलेल्या अनेक पाट्या आहेत. साहित्यातील नवरसांची माहिती आणि अत्यंत प्रसिद्ध चित्रकाराचे त्यावरील चित्र हे अगदी विशेष आहे. आपल्याला भारतातील, जगातील प्रसिद्ध चित्रकार माहिती आहेत. पण १२००० वर्षांपासून कलेचा वारसा असलेल्या अस्सल महाराष्ट्रातील अत्यंत गुणी चित्रकार, मूर्तिकार, शिल्पकार यांच्या कलाकृती, अमूर्त शैलीतील चित्रे, पुतळे, मूर्ती अशा वस्तू येथिल ” महाराष्ट्र स्कूल , कला आणि विचार ” या शीर्षकाखाली मांडण्यात आल्या आहेत. आमच्या शाळेतील कलाशिक्षक व प्रसिद्ध चित्रकार मु.स.जोशी यांचा फोटो व चित्र येथे पाहिल्यावर मला खूप आनंद झाला. ए.ए. आलमेलकर त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन आणि गांधीजींच्या आयुष्यावरील प्रदर्शन ही आणखी वैशिष्ट्ये !
येथे सुमारे १०० वर्षे जुन्या शिवमंदिराचे जतन करण्यात आले आहे. एक विशेष संस्कृती दालन येथे अस्सल खेड्यातील घराचे रुपडे लेवून उभे आहे. यात खेड्यातील जीवनाशी निगडित अशा शेतीची अवजारे, धान्य साठवण, न्हाणीघर, स्वयंपाकघर, उखळ मुसळ, जाते इत्यादी असंख्य वस्तू मांडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे झपुर्झामध्ये कुठेही फोटोग्राफीस मुक्त परवानगी आहे.
येथे होणारे अन्य उपक्रम चकित करणारे आहेत. नाट्यप्रयोग, नृत्ये, गाण्याचे कार्यक्रम, विविध गटांसाठी ड्रॉईंग, पेंटींग, ओरिगामी, लिप्पन आर्ट, रॉक क्लाइंबिंग, जेंबे मेडिटेशन, ब्लॉक प्रिंटिंग, एअरो मॉडेलिंग, पपेट मेकिंग, स्टोन बॅलन्सिंग … बाप रे ! ( या नव्या कलाप्रकारांना चपखल व प्रचलित मराठी शब्द उपलब्ध नाहीत. त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी मूळ इंग्रजी शब्द दिले आहेत. ) सगळ्यात आश्चर्य म्हणजे येथे ११ व १२ नोव्हेंबरला साजरी झालेली दिवाळी पहाट, म्हणजे खरोखरच पहाटे ५.३० वाजता. पुण्यातून येथे यायला सुमारे अर्धा पाऊण तास लागतो. पं. जयतीर्थ मेवुंडी, पं. शौनक अभिषेकी, प्रतीक राजकुमार ( गिटार वादन ), राजस उपाध्ये ( व्हायोलिन ) यांच्या या कार्यक्रमांना पहाटे सुमारे ३०० रसिक उपस्थित राहतात हे खूप कौतुकास्पद आहे.
श्री.अजित गाडगीळ यांनी येथे अक्षरशः कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत असे म्हटले जाते. झपुर्झा हा त्याला मोठाच अपवाद आहे. लक्ष्मी आणि सरस्वती यांचा अद्भुत संगम येथे दिसतो. पुणे हे मोठमोठे संगीत महोत्सव, नाट्य स्पर्धा, व्याख्यानमाला, अभिनव उपक्रम यासाठी खूप प्रसिद्ध होते. आता त्याला मिळणारा प्रतिसाद थोडा कमी होतोय. पण मला असे वाटते की झपुर्झाने त्या सांस्कृतिक पुण्याचे अक्षांश रेखांशच बदलून टाकले आहेत. ते सर्व आता झपुर्झाकडे सरकले आहे. एखादे लग्नकार्य असावे इतक्या उत्साहाने दिवसभर लगबगीने तत्पर असणारे सुनील पाठक, नरेंद्र जाधव, राजू सुतार, दिलीप जोशी यांचा लाखमोलाचा सहभाग हा झपुर्झा शब्द सार्थ करणारा आहे.
अभिजात संस्कृती, रम्य निसर्ग, विविध कला, उच्च अभिरुची, अप्रतिम मांडणी याचाच नवा अर्थ म्हणजे झपुर्झा !
झपूर्झाचे “अक्षांश रेखांश “– पिकॉक बेच्या पुढे, सर्व्हे क्रमांक ६५, कुडजे गाव, पुणे – ४११०२३. फोन – ०७०२८४८६०७०,
(सोमवारी बंद ).
— लेखन : मकरंद करंदीकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
झपूझा॑चे नाव ऐकूण होतो संपादक देवेंद्र भूजबळ साहेबांनी परिपूर्ण माहिती संपादन केली आहे मनापासून शुभेच्छा धन्यवाद.
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.
८७८८३३४८८२