आज 18 जुलै, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कथांमधील पात्रांचे वैशिष्ट्य उलगडून दाखविणारा विशेष लेख…
तुकाराम भाऊराव साठे अर्थात अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात असलेले अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील, वाटेगावात झाला. अण्णाभाऊंनी पोवाडे कथा,
कादंबरी अशा विविध लेखन प्रकारातून मराठी वाङ्मयाचा आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
अण्णाभाऊ सामाजिक बांधिलकी मानणारे, समाजपरिवर्तनाचे शस्त्र हाती घेऊन लेखन करणारे साहित्यिक होते. कम्युनिस्ट चळवळीशी त्यांचा जवळून संबंध होता. पण सर्वसामान्य कष्टकरी, दलित, उपेक्षित आणि व्यवस्थेने हक्क नाकारलेले स्त्री-पुरुष हे त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या साहित्यातून प्रगट झालेली त्यांची सर्वसामान्य माणसांविषयीची आंतरिक तळमळ व त्यांच्या सुखदु:खाचे चित्रण करण्याची ओढ वाचकांच्या मनाला भुरळ घालते.
कोणत्याही साहित्यकृतीतील पात्रांचे चित्रण त्यांचा जीवन विषयक दृष्टीकोण, जाणिवा समजून घेण्यासाठी लेखकाच्या जाणिवा, लेखन विषयक भूमिका, प्रेरणा आणि विचारधारा यांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. अण्णाभाऊंच्या कथांमधील पात्रांच्या जीवन संघर्षाचे स्वरूप जाणून घेताना आपल्याला त्यांच्या लेखन विषय भूमिका, लेखनामागील प्रेरणा व विचारधारा यांचा परिचय करून घेणे अगत्याचे ठरते.
अण्णाभाऊंचा जन्म तात्कालीन मांग समाजात झाला. त्यामुळे त्यांनी दलित वेदना, व्यथा जवळून अनुभवल्या होत्या. इतर दलित लेखकांप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव अण्णाभाऊंच्या लेखनामधूनही दिसून येतो. अण्णाभाऊ आपली लेखन विषय भूमिका मांडताना म्हणतात, “मी लिहिताना सदैव सहानुभूतीने देण्याचा प्रयत्न करतो, कारण ज्यांच्याविषयी मी लिहितो ती माणसं असतात, त्यांची मुर्वत ठेवूनच मला लिहिणे भाग पडतं.” या भूमिकेवरूनच आपल्याला असे लक्षात येते की अण्णाभाऊंनी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या जीवनाचे चित्रण त्यांच्या व्यथा वेदनांच्या सकट मांडलेले आहेत. अन्यायाच्या दरीत खितपत पडलेल्या दलित समाजाच्या व्यथा वेदना मांडत असताना त्यांच्या लेखनातून समाजाच्या उद्धाराचा मार्ग दाखवताना ते दिसून येतात.
अण्णाभाऊंच्या लेखनात पात्रांचा जीवनविषयक दृष्टिकोन हा प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक असल्याचे दिसून येते.
अण्णाभाऊंनी आपल्या लेखनातून नीती संपन्न पात्रं उभी केली. स्त्रियांचे शील जपले, स्त्रीला विकृत केले नाही. पोटात भुकेचा आगडोंब असला तरीही ही माणसे आपला आचारधर्म सोडत नाहीत. नीतीचे वर्तन त्यांच्याकडून नेहमी घडते. त्यांच्या कथांमधील पात्र अन्यायाविरुद्ध तसेच परिस्थितीशी लढताना दिसून येतात.
अण्णाभाऊ साठे यांच्या कथांचा विचार करताना त्यांच्या कथात्मक साहित्याबद्दल माहिती करून घेऊ. अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःच्या जिद्दीवर अनुभवाचे टक्केटोणपे खात प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. औपचारिक शाळेचा गंध नसलेल्या अण्णाभाऊंनी पुढे हिमालयालाही लाजवेल एवढ्या उंचीचे साहित्य निर्माण केले. त्यातील फक्त कथासंग्रहांचा विचार केला तरी २१ कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यांची सूची पुढीलप्रमाणे आहे:
१. खुळंवाडी
२. बरबाद्या कंजारी
३. भानामती
४. कृष्णाकाठच्या कथा
५. गजाआड
६. गुऱ्हाळ
७. लाडी
८. फरारी
९. ठासलेल्या बंदुका
१०. निखारा
११. भूतांचा मळा
१२. आबी
१३. रानवेली
१४. राम रावण युद्ध
१५. अमृत
१६. चिरागनगरची भुतं
१७. नवती
१८. पिसाळलेला माणूस
१९. रानगा
२०. स्वप्नसुंदरी
२१. मास्तर
आता अण्णाभाऊंच्या कथांमधील पात्रचित्रण आणि पात्रांचा जीवन संघर्ष त्यांच्या कथांच्या आधारे सविस्तर पाहू.
अण्णाभाऊ साठे यांच्या ‘खुळंवाडी’ या पहिल्या कथासंग्रहातील ‘विष्णुपंत कुलकर्णी’ या कथेतील विष्णुपंत हे साधारणपणे मवाळ वृत्तीच्या ब्राह्मण समाजाचे असले तरी १९१८ मधील दुष्काळ आणि रोगराई यांच्यामुळे होणारे दलितांचे हाल पाहून ते दलितांना क्रांतिकारी सल्ला देतात. – “काहीही करा, पण जगा! तुम्ही साऱ्यांनी जगायलाच हवं! ते दलितांना मठातील धान्य लुटून जगण्याचा मार्ग सुचवतात. दलित ते धान्य लुटतात, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला जातो आणि त्यांना अटक होते. पण विष्णुपंत इथेही सरकारविरुद्ध लढतात आणि अटक केलेल्या दलितांना मुक्त करायला लावतात.
बंडवाला’ या कथेत अन्यायाविरुद्ध उभा राहणारा मांग समाजातील एक तरुण आपल्याला दिसतो. कथेत एक इनामदार एका निष्पाप मांगाची ऐंशी बिघे (हेक्टर) जमीन अगदी मामुली रकमेसाठी गहाण ठेवून घेतो. दोन पिढ्यांपर्यंत ती जमीन इनामदाराच्या ताब्यात राहते. मांगाचा नातू जमीन इनामदाराच्या कचाट्यातून सोडवण्याचा प्रयत्न करत असताना तीन इनामदाराला मारहाण करण्याच्या आणि त्याचा खून करण्याच्या खोट्या आरोपांखाली त्याला तुरुंगवास भोगावा लागतो. जमीन परत मिळवण्याचे सर्व कायदेशीर मार्ग जेव्हा व्यर्थ ठरतात तेव्हा शेवटी तात्या बंडखोर होतो.
‘रामोशी’ ही कथा दोन उद्दाम जमीनदार मधील भांडणांमध्ये गरीब, प्रामाणिक आणि निष्पाप लोकांची आयुष्य कशी भरडून निघतात, सरकारी यंत्रणा कशी भ्रष्ट असते आणि त्यामुळे होणारा छळ कशाप्रकारे संवेदनशील असलेल्या सामान्य माणसाला कायदा हातात घ्यायला भाग पाडतो हे दाखवते. यदू रामोशी आपल्या एकुलत्या एक मुलाचा खंडूचा खूनी असलेल्या तात्या डोंगरे या जमीनदाराचा सूड घेण्याचा कसा प्रयत्न करतो याची ही कहाणी आहे.
‘कोंबडी चोर’ ही कथा गरिबी एका व्यक्तीला चोरी करायला भाग पाडते आणि गरिबी व भूक नष्ट केल्याशिवाय चोरी आणि तत्सम गुन्हे थांबणार नाहीत हे दाखवते. या कथेतून जगण्यासाठी माणसाला कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे चित्रण येते.
‘बरबाद्या कंजारी’ या कथासंग्रहातील याच नावाच्या कथेमध्ये बरबाद्या कंजारी समाजात प्रचलित असलेल्या प्रथेप्रमाणे आपली मुलगी निल्ली हिला २०० रुपयांना डल्लारामला विकतो. तिचे लग्न डल्लारामचा मुलगा सईद्याशी होणार असते. पतीच्या मृत्यूनंतर निल्ली कंजारी समाजाचा नियम मोडून समोरच्या झोपडीत राहणार्या हैदऱ्या बरोबर पळून जाते. यावरून जात पंचायत बरबाद्याला वाळीत टाकते व त्या टाकण्याला बरबाद्या कसा किंमत देत नाही याचे चित्रण करत कालबाह्य आणि अन्यायकारक रीतीरिवाजांना चिटकून राहिलेल्या समाजातील एक प्रगतिशील बंडखोर म्हणून बरबाद्याचे चित्रण अण्णाभाऊ करताना दिसतात.
‘सुलतान’ ही कथा मार्क्सवादी दृष्टिकोनातून लिहीलेली आहे. एका माणसाचा पोट भरण्यासाठीचा, आयुष्यभराचा संघर्ष आणि त्यामधील त्याचा पराभव हा या कथेचा विषय आहे. सामाजिक नीती नियमांच्या चौकटीत जगूनही पोटापुरते अन्नसुद्धा मिळत नाही हे लक्षात आल्यावर अशा भुकेल्या माणसापुढे बंड करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही.
‘मुकुल मुलाणी’ ही कथा बेकारी आणि उपजीविका कमावण्यामधील स्पर्धा, ही रक्ताच्या नातेवाईकांनाही एकमेकांचे शत्रू कसे बनवते आणि अखेर आर्थिक स्थैर्यच मानवी जीवनातील आनंदाचा पाया कसे आहे हे दाखवते.
रंजन करता करता व्यापक जीवनदर्शन घडविण्याचे सामर्थ्य लोककथेत असते. लोकपरंपरेतील मौखिक साहित्याचे वैशिष्ट्य अण्णाभाऊ साठे यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून कलात्मक रूप घेऊन आविष्कृत झालेले आहे. या संदर्भात त्यांची ‘स्मशानातील सोनं’ ही कथा लक्षात घेता येईल. एकूणच मराठी साहित्यामध्ये ‘स्मशानातलं सोनं’ ही एक अजरामर कथा आहे असे म्हणता येईल. भारतातील गरीब, अशिक्षित आणि बेकारांचे नष्टचर्य या कथेत चित्रित करण्यात आले आहे. अण्णाभाऊंच्या या कथेतील नायक “भीमा” गाव सोडून मुंबईला येतो. पोट भरण्यासाठी जिथे काम करत असतो ती खाण अचानक बंद पडते. भीमा नदीकाठी विमनस्क अवस्थेत बसलेला असताना नुकत्याच दहन झालेल्या प्रेताच्या राखेतील अंगठी त्याला दिसते आणि त्याला उपजिविकेचा मार्ग सापडतो. प्रेतांचे अवशेष ऊकरून, त्यांची राख चाळून मिळालेले किरकोळ सोन्याचे दागिने विकून तो आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरतो. या वर्णनावरून जगण्यासाठी इतर संवेदना बाजूला ठेवून बेकारीची कुऱ्हाड कोसळलेला भीमा कसा संघर्ष करतो ते रंगवलेले दिसून येते. भीमा आणि कोल्ह्यांचा कळप यांच्यातील प्रेत ताब्यात मिळवण्यासाठीचे ‘रण’, तसेच प्रेताच्या तोंडात अडकलेली बोटे कशाप्रकारे भीमा गमावून बसतो आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी खाण पुन्हा सुरू होते या घटनांमधून जीवनातील संघर्ष कायम राहतो हे आपल्या लक्षात येते.
अशा प्रकारच्या अनेक कथांमध्ये अद्भुत आणि वास्तव एकाचवेळी अवतरते. हे अण्णाभाऊंनी मौखिक साहित्याच्या परिचयातून आत्मसात केले आहे.
‘सापळा’ या कथेमध्ये अस्पृश्य उच्चवर्णीय यांच्यात मेलेला बैल ओढून देण्यावरून झालेला वाद आणि अस्पृश्यांनी संघर्षातून उच्चवर्णीयांवर केलेली मात असे कथानक आहे. या कथेतून सामाजिक जीवनातील संघर्ष त्यांनी मांडला आहे.
धाडस माणसाचे जीवन सार्थक बनवते तर भित्रेपणा जीवनाला निराशाजनक बनवतो. त्यामुळे हे जग भेकडांसाठी नाही हे ‘भेकड’ ही कथा दाखवते. त्यांच्या या कथेतून जगात जगण्यासाठी संघर्षाला धाडसाने तोंड देण्याची गरज आहे हे दाखवले गेले आहे.
‘येडा नाऱ्या’ ही ‘नवती’ या कथासंग्रहातील कथा अति सहनशील व्यक्तीची पिळवणूक केली जाते असे सांगत पिळवणूकी विरोधात बंड केल्यावर त्याची त्यांना भीती वाटते हे कथेतील नाऱ्याच्या बाबतीतही असेच घडते असे प्रतिपादन करतो.
‘फरारी’ या कथेचा नायक शिवा मांग बारा वर्षाचा तुरुंगवास भोगून आल्यावर विस्कळीत झालेली आपल्या कुटुंबाची घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी जी धडपड करतो त्याचे चित्रण या कथेत येते.
‘आबी’ हे दुर्दैवाने कष्टमय परिस्थितीतही निराश न होणाऱ्या एका ग्रामीण मुलीचे व्यक्तीचित्र आहे. ती हाताश न होता तिला उपद्रव देणाऱ्यांचा ती धाडसीपणे बदला घेते.
‘निखारा’ या कथासंग्रहातील ‘चोरांची संगत’ या कथेतील माळवदकर हा एक चोर आहे. केवळ पोट भरण्यासाठी त्याला हा मार्ग स्वीकारावा लागला आहे. वाचकांनी या कथेकडे मार्क्सवादी दृष्टिकोनातून पहावे अशी अण्णाभाऊंची अपेक्षा असावी असे वाटते.
‘निखारा’ या कथेमध्ये फुला या गरीब मुलीचे वर्णन आहे. तिला आणि नातेवाईकांना त्रास देऊन जगणे मुश्किल करणाऱ्या मुंग्या पाटील या गुंडाचा कसा बदला घेते याकडे दाखवले आहे.
‘चिरानगरची भुतं’ या कथासंग्रहात चिरागनगर, आझादनगर या झोपडपट्ट्यांमधील जीवनाचे चित्रण आहे. यातील पात्रे जीवन जगण्यासाठी संघर्ष करता करता त्यांच्या जीवन जाणीवाच कशा पार बदलून जातात ह्याचे चित्रण अण्णाभाऊंनी केले आहे. शिक्षणापेक्षा अनुभव हाच मोठा गुरू असतो या गोष्टीची अनुभूती त्यांचे साहित्य वाचताना येते.
‘फकिरा’ ह्या अण्णाभाऊ साठे यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरीत त्यांनी आपले खर्या आयुष्यातले मामा फकिरा राणोजी मांग यांची साहसी जीवनकथा मांडलेली आहे. ही कादंबरी वाङमयीन मूल्यांच्या कसोटीवर उतरणारी आहे. अण्णाभाऊंची भाषा, वर्णनशैली आणि कथाकथन अप्रतिम आहे. वारणा खोर्यातील बोलीभाषा त्यांनी अतिशय कौशल्याने वापरली आहे. या कादंबरीतील व्यक्तिचित्रे विशेषत: राणोजी मांग, शंकरराव पाटील, विष्णूपंत कुलकर्णी आणि रावसाहेब खोत ही पात्रे त्यांच्या कंगोर्यांसहित उभी केलेली आहेत.
‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. वैजयंता ही नायिका अन्याय, अत्याचार, शोषण इत्यादी विरोधात आवाज उठवते. तसेच या समाजव्यवस्थेतील पुरुषांकडून मिळणाऱ्या धमक्यांना न घाबरता या वर्गाविरुद्ध प्रतिकार करते.
‘मरीआईचा गाडा’ या कथेत अंधश्रद्धेला आव्हान देण्याचे काम या कथेतील नाना नावाचे पात्र करते.
वरील विवेचनातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, अण्णाभाऊ साठे यांच्या कथेमध्ये व्यक्तिरेखा अन्यायाविरुद्ध लढतात किंवा कोणीतरी त्यांच्यासाठी अन्यायाविरुद्ध लढते. या कथांमधील पात्र सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक पातळीवर जीवन संघर्ष करताना दिसून येतात .यात जगण्यासाठी पात्रांना करावा लागणारा संघर्ष वाचकांना अंतर्मुख करतो.
अण्णाभाऊ साठे यांच्या कथेचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास असे सांगता येईल की, “ही जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाची एक कथा आहे. ही कच खाणारी करणारी माणसे नाहीत, या सर्वांना मानाने जगायचे आहे आणि आक्रमक वृत्तींशी निकराने लढवून त्या सामन्यात त्यांना जिंकायचेही आहे”… “वार झेलला त्यांची नेहमीच आख्याने उभारलेली आहे. त्यांच्या कथांमध्ये इथून तिथून एकच झुंजार मराठबाणा आवेशाने स्फुरतांना दिसून येतो. या पराक्रमाच्या कथा अण्णाभाऊंनी तितक्याच तेजस्वी भाषेत रंगवल्या आहेत.” या शब्दांत आचार्य प्र. के. अत्रे यांनी अण्णाभाऊंच्या कथांचे कौतुक केले आहे. यावरून अण्णाभाऊ साठे यांच्या कथांमधील नायक नायिकांचा जीवन संघर्ष हा त्यांच्या कथांमधील विशेष स्पष्ट होतो.
अण्णाभाऊ साठे मानवतावादी लेखक होते. शोषणमुक्ती हा त्यांचा ध्यास होता. भांडवलदार, शेतकऱ्यांचे शोषण करणारे सावकार हे त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते. केवळ महाराष्ट्र नव्हे तर साऱ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व कष्टकरी, दलित, शोषित, पीडित यांचे शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. वर्गविरहित समाजाचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले. खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे ध्येयवादी लोकशाहीर होते. मानवमुक्तीचे शिलेदार होते !
त्यांनी त्यांच्या कथांमधून रुजवलेल्या जीवन संघर्षाची प्रेरणा आजही आपल्या आयुष्यातही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणादायी आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मरणार्थ त्यांना शतशः प्रणाम अभिवादन !

– लेखन : प्रज्ञा पंडित. ठाणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800