आपण सारे आपल्या प्राणप्रिय भारताचा स्वातंत्र्यदिन महोत्सव उत्साहाने साजरा करीत आहोत. किती भाग्यवान आहोत आपण. परंतु या स्वातंत्रयज्ञामध्ये हजारो देशभक्तांच्या आहुती पडल्या. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांच्याही. खरं तर स्वातंत्र्यलढा अठराशे सत्तावनपासूनच सुरू झाला.
राणी लक्ष्मीबाई, चेन्नम्मा अशा अनेक लढवय्या स्त्रियांनी स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केले. त्या सर्व देशाला स्फूर्ती स्थान ठरल्या. अनेक स्त्रिया देशप्रेमाने प्रेरित होऊन यात सहभागी होऊन निडरपणे काम करत राहिल्या, शहीद झाल्या. स्वराज्यासाठीच्या चळवळीत अहिंसक सत्याग्रहात हजारो स्त्रिया सामील झाल्या, तर अनेक स्त्रिया सशस्त्र क्रांतिकारक गटांमध्येही धाडसाने सहभागी झाल्या. स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन प्रथमत: प्रचारपत्रके वाटणे, भूमिगतांना खाणे पुरवणे, त्याचे निरोप पोहोचविणे वगैरे वरवरच्या कामांत भाग घेणाऱ्या स्त्रियांचा हळूहळू आतल्या गुप्त क्रांतिकारक गटातही प्रवेश झाला. ठिकठिकाणी माता दुर्गेचे अवतार दिसू लागले, त्यातीलच एक धगधगती ज्वाला राणी गिडालू !

राणी गिडालू किंवा राणी गाइदिन्ल्यूचा जन्म २६ जानेवारी १९१५ रोजी मणिपूरच्या सध्याच्या तामेंगलाँग जिल्ह्यात झाला. नागालँडच्या उत्तर कछार पहाडी भागात राहणाऱ्या या केवळ तेरा वर्षांच्या मुलीने आपला चुलतभाऊ जाडोनांग याच्या स्वातंत्र्यसंग्रामातील कार्यापासून प्रेरणा घेतली आणि स्वतः ला याच कार्यासाठी झोकून दिले. ही हेराका नावाची चळवळ होती, ज्याचा उद्देश नागा आदिवासी धर्माचे पुनरुज्जीवन करणे आणि ब्रिटीश राजवट संपवणे आणि स्वशासित नागा राज स्थापित करणे हे होते.
१९३१ मध्ये जाडोनांगला फासावर चढवण्यात आलं, तेव्हां आंदोलनाचं नेतृत्व गिडालूकडे आलं. तिने आपले कार्यालय मणिपूरहून आदिवासीबहुल असलेल्या पहाडी भागात आणले. तिने मणिपूर, नागालँड आणि आसाममध्ये ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र चळवळीचे नेतृत्व केले. ‘सरकारला कर भरू नका’ हे आंदोलन तिने १९३१ मध्ये सुरु केले. ब्रिटीश सरकारने लादलेल्या अमानुष कर आणि नियमांच्या विरोधात तिने लोकांना एकत्र करण्यास सुरुवात केली. लोकांनी कोणत्याही प्रकारचा कर भरण्यास नकार दिला. ब्रिटीश सरकारने लोकांकडची शस्त्रास्त्रे जप्त केली. गिडालूने आपले आंदोलन अधिक तीव्र केले. यानंतर तिने ब्रिटिशांविरुद्ध गनिमी कावा सुरू केला. १८ मार्च१९३२ रोजी हंगरुम गावातून सुमारे ५०-६० लोकांनी ब्रिटिश सैनिकांवर हल्ला केला. मात्र, तोफेसमोर भाले, बाण आणि धनुष्य कमजोर झाले.
या युद्धानंतर गिडालू भूमिगत झाली. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इंग्रजांनी तिचा शोध सुरू केला. गिडालूच्या लोकप्रियतेमुळे ब्रिटीश सरकार आधीच हैराण झाले होते आणि गनिमी कावा ही त्यांच्या तोंडावर चपराक होती. तिला पकडण्यासाठी इंग्रज प्रयत्न करू लागतांच बहाद्दर गिडालू बराक नदीकाठच्या जंगलात पसार झाली. तिच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासून तिने दाखवलेल्या शौर्यामुळे आणि अदम्य धैर्यामुळे तिला ‘नागालँडची लक्ष्मीबाई’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ती गनिमी युद्धात पारंगत होती आणि तिला पकडण्याची शर्थ करणाऱ्या ब्रिटिश सैनिकांच्या नाकात तिने दम आणला. तिचे वैशिष्ठ्य म्हणजे ती इंग्रजांच्या तोफांचा मुकाबला बाण आणि भाल्याने करत होती. तिची लोकप्रियता वाढतच होती आणि इंग्रज तिला पकडण्यासाठी जिवाचे रान करीत होते.
इंग्रज सरकारने आसाम रायफल्सचे कॅप्टन मॅकडोनाल्ड यांना गाइदिन्ल्यूला (गिडालूला) पकडण्यासाठी पाठवले. कॅप्टनला एक टीप मिळाली की गिडालू आणि साथीदार पुलोमी गावात लपले आहेत. यानंतर इंग्रजांनी गावावर हल्ला केला आणि १७ ऑक्टोबर १९३२ रोजी गिडालूला अटक करण्यात आली. येथून तिला कोहिमा आणि नंतर इम्फाळला नेण्यात आले. येथे खून, हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली तिला वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यांत आली.
१९३२ ते १९४७ पर्यंत या नागा स्वातंत्र्यसैनिकाला ईशान्येतील अनेक तुरुंगात ठेवण्यात आले. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिची सुटका झाली पण तिने आपले जीवन समाजकार्यासाठी समर्पित केले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिला ‘डॉटर ऑफ द हिल्स’ असा किताब दिला आणि तिच्या अतूट साहसीपणा, नागा समाजाची अध्यात्मिक आणि राजकीय नेता याबद्दल तिला ‘राणी’ ही पदवी दिली. पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेल्या राणी गिडालू यांनी शेवटच्या श्वासापर्यंत (१७ फेब्रुवारी १९९३) आपल्या भागातील लोकांच्या हक्कांसाठी लढा दिला. आपली संस्कृती, भाषा आणि मातीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपली ओळख गमावणे होय, असे त्यांचे सांगणे होते. हेरका संस्कृती जपण्यासाठी त्यांनी केवळ ब्रिटीशांशीच लढा दिला नाही तर स्वतःच्या समाजातील फुटीरतावाद्यांचाही सामना केला.

भारत सरकारने १९९६ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ स्टॅम्प प्रदर्शित केला तसेच २०१५ मध्ये एक नाणेही. २४ ऑगस्ट २०१५ रोजी त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांस ‘राणी-मा’ म्हटले. त्यांच्या नावाने स्त्री शक्ती पुरस्कारही देण्यास सुरुवात केली आणि भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजालाही त्यांचे नांव देण्यात आले. राणी गिडालूला तर शतश: प्रणाम पण तिच्यासारख्या अनेक तरुण क्रांतिकारी स्रिया, ज्या देशासाठी जीवन समर्पित करूनही ज्यांची नावं ही कधी क्रांतिकारकांच्या विजयगाथेत झळकली नाहीत, ‘नाही चिरा, नाही पणती’ अशी ज्यांची स्थिती त्या सर्वांना, सर्वच क्रांतिकारांबरोबर हृदयापासून अभिवादन ! तुम्हां सर्व वीरपुत्र आणि वीरकन्यांमुळेच आम्ही वर्षानुवर्षे स्वातंत्र्यदिन साजरा करू शकतो आहोत, स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून जगांत ताठ मानेने वावरत आहोत.
रक्त सांडले अनेक देशभक्तांनी
तळपला स्वातंत्र्यसूर्य भारतदेशी
अभिमाने फडकतसे तिरंगा नभी
कृतज्ञ आम्ही ज्ञात-अज्ञात साऱ्यांशी !

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ ☎️ 9869484800
अप्रतिम लेख
खूप खूप सुंदर नवीन माहिती मिळाली… राणी गिडालू यांना ग्रेट सॅल्यूट 🙏