आपल्या न्युज स्टोरी टुडे वेब पोर्टलवर पत्रकार श्री राजेंद्र घरत यांना त्यांच्या ” सुखी जीवनाची युक्ती – तंबाखूपासून मिळवा मुक्ती ” या घोषवाक्यास मिळालेल्या राज्य पुरस्काराची बातमी वाचून प्रेरित होऊन श्री प्रकाश पळशीकर, मूळ मुंबईकर पण हल्ली मुक्काम नॉयडा यांनी “झुरका : पहिला ते अखेरचा” हा त्यांच्या व्यसनमुक्तीचा प्रवास येथे मांडला आहे. हा लेख त्यांनी श्री राजेंद्र घरत यांना समर्पित केला आहे.
………………………- संपादक

त्यावेळच्या बॉम्बे टेलिफोन्स मध्ये १९६३ साली शिकाऊ टेलिफोन मेकॅनिक म्हणून माझी निवड झाली आणि एक वर्षाच्या ट्रेनिंगसाठी मांडवी टेलीफोन एक्सचेंजला मी हजर झालो. यथावकाश ट्रेनिंग पूर्ण झाले आणि माझी नेमणूक १९६४ ला माटुंगा टेलिफोन एक्सचेंजमध्ये
झाली. कार्यालयीन सर्व बाबींची पूर्तता झाली आणि माझा एक सहकारी म्हणाला, चल जरा खाली जाऊन चहा मारु या. नाही म्हणणे पुढे अवघड जाईल हे लक्षात आले आणि उतरलो जिना.
बिल्डिंगच्या मागेच षण्मुखानंद सभागृह होते. समोर
एक इराण्याचं हॉटेल होते. चहा घेतला (आयुष्यातला पहिला इराणी चहा) तेंव्हा वयाची फक्त १८ वर्षे पूर्ण झाली होती. चहा पिऊन बाहेर आलो आणि मित्राने सिगारेटच्या दुकानापाशी नेले आणि रुबाबात दोन पनामाची ऑर्डर दिली. झाली का पंचाईत ? ओढावी की नको ?
टू बी ऑर नॉट टू बी ? बघू या तर एकदा. मनाला
समज घातली आणि मारला दम. तो माझा आयुष्यातला पहिला झुरका. साल होतं, १९६४. हळू हळू एकाचे दोन मग तीन असे करत करत मनावर ताबा राहिना. माझे सेक्शनच नाव, इंस्टालेशन सेक्शन असे होते की, जेथे नवीन एक्सचेंज उभारायचे असेल किंवा एखाद्या एक्सचेंज मध्ये नवीन लाईन्सची भर घालायची त्या ठिकाणी जावे लागे.
१९६४ ते १९७४ या काळात सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे वरील सर्वच्या सर्व एक्सचेंज मध्ये काम करीत गेलो. मित्र वर्ग वाढला आणि व्यसनातही वाढ होत गेली. सिगारेटच्या संख्येत भयानक वाढ झाली होती. मद्यपान फारसे होत नव्हते. मूळचा शाकाहारी पण अधून मधून मित्रांसोबत ती ही वाट चोखाळली, नावडीनेच !
यथावकाश विवाह झाला. तेरा बाय दहाच्या खोलीत स्वतंत्र संसार थाटला. जेंव्हा केंव्हा लग्न होईल तेव्हा आपण आपला वेगळा संसार थाटायचा हे आधीपासूनच ठरवले होते. घरात सर्वाना कल्पना होती. खोली आई वडिलांपासून पाच मिनिटाच्या अंतरावर होती. कलह झाला म्हणून नव्हे तर माझी इच्छा होती म्हणून.
“तीन वर्षांनी पाळणा हलला” सन १९६९ मध्ये सिझरिंग झाले. उभयतांनी निर्णय घेतला पूर्ण विराम ! आणि निभावलाही, असो ……
१९७० का १९७३ नक्की आठवत नाही पण माझी बदली फोर्ट मध्ये फाऊंटन टेलिकॉम बिल्डींग येथे झाली. भरपूर काम होते. नवीन टेलेक्स केंद्र दुसऱ्या मजल्यावर तर ट्रंक एक्सचेंज पाचव्या मजल्यावर आणि ऑपरेटिंग बोर्ड सहाव्या मजल्यावर. आरामात सात, आठ वर्षे जातील असे वाटले.
काम मोठे म्हणून स्टाफ ही अधिक. नवे मित्र आणि नवे व्यसन, मद्यपान ! खादी भांडार आणि हँडलूम हाऊस यांच्या आजूबाजूला ‘एम्बसी’ आणि ‘ब्रायटन’ बार होते.
काही वेळेला रात्र पाळी, काही वेळेला दुपारची पाळी अधिक रात्रपाळी. कधी कधी सकाळी नऊला ड्युटी सुरू झाली की दुसऱ्या दिवशीच्या पहाटे चारपर्यंत काम चालायचे. अर्थात ओव्हरटाईम ही दाबून मिळायचा.
१९७८ सालची कथा. मुलगा ९ वर्षाचा झाला होता.
रविवारच्या दिवशी घरीच होतो. आम्ही दुपारी जेवायला बसलो होतो. जेवताना वर्तमानपत्र वाचत जेवायची खोड होती. अचानक मुलगा म्हणाला, बाबा नवीन कम्पास पेटी आणायची आहे मला पैसे पाहिजे. मी म्हणालो, आज नाहीत माझ्याकडे, देतो दोन तीन दिवसात. त्यावेळी मी पेपरचे जे पान वाचत होतो त्याच्या खालच्या अर्ध्या पानावर पनामा सिगारेटची भली मोठी जाहिरात होती आणि खाली “धुम्रपान आरोग्यास हानिकारक आहे” असे लिहिले होते. नेमके तेथेच मुलाने बोट ठेवले. एकही अक्षर न बोलता जेवून उठलो.
या काळात सिगारेटची संख्या रोजची दहा, तर रात्रपाळी असली तर पंधरा सुद्धा व्हायची.
जानेवारी १९७८ सालची गोष्ट, माझी रात्रपाळी होती. नेहमी प्रमाणे कर्जत ते बोरीबन्दर ही गाडी कल्याणला चार नंबर वर यायची. खिडक्या भरलेल्या असायच्या. पण ठाण्यात रिकामी झाली की मला मिळायची. त्या दिवशी ही दोन मित्र समोरा समोरच्या खिडकीत बसलेले होते. एकजण सिगारेट ओढत होता. दुसऱ्याने त्याला सहज विचारले रोज किती ओढतोस रे ? ओढणाऱ्याने आकडा सांगितला. दुसरा प्रश्न विचारला, किती वर्षे झाली सिगारेट ओढतोयस ? ओढणाऱ्याने उत्तर दिले, न ओढणाऱ्याने वर्तमानपत्र घेतले आणि कागदावर हिशोब करून सिगारेट बहाद्दर मित्राला तो आकडा दाखवला आणि म्हणाला, कल्पना कर डोळ्यासमोर दृष्य उभे कर. आजपर्यंत तू प्यालेल्या सिगारेटच्या धुरात तू उभा आहेस. तू ही एक दिवस असाच जळून राख होशील. सिगारेट ओढणारा सुन्न झाला. ठाणे स्टेशन आले. तो उतरून गेला, मी खिडकीकडे सरकलो. त्या दोघातील संवाद माझ्या डोक्यातून जाता जाईना.
१९७८ साली धुम्रपान मद्यपान आणि मांसाहार त्याग केला खरा. दोन वर्षे कशी बशी गेली. आणि दोन वर्षानंतर “ऐश्वर्या फ़िर मोहल्लेमे आ गयी “!
१९८० साली पुन्हा बनारसी पान १२० तंबाखू टाकून खायला लागलो. कडकी असली तर मग साधा सातारी जर्दा चुना लावून हातावर मळायचा आणि गोळी करून गालात सरकाव्याचा. ३२ वर्षे या व्यसनात घालवली.
एक दिवस भल्या पहाटे ५ वाजता जाग आली. काय अवदसा आठवली, कोणजाणे ! पुडीतुन तंबाखू काढली.
मळली. तोंडात सरकवतो ना सरकवतो तो डोके अक्षरशः इतक्या वेगाने गरगरले की मिक्सर ज्या वेगाने फिरतो तसे झाले. फक्त फार तर १० ते २५ सेकंद नि ज्या उलट्या सुरू झाल्या. दहा मिनिटात असे वाटले की आपला खेळ खल्लास !
मुलांनी पटकन रुग्णालयात दाखल केले. श्वसन क्रिया
मंदावली होती. पण डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. संध्याकाळी चारच्या सुमारास श्वसन क्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली. संध्याकाळी सातच्या सुमारास डॉक्टर आले. तपासणी झाली आणि म्हणाले तू आता चांगला झाला आहेस. पटकन मी म्हणालो, मला सोडा, घरी जायचेय नातू दहावीला आहे. त्याचे दोनच पेपर बाकी आहेत. मला घरी बघून त्याचं मनोधैर्य डळमळणार नाही. डॉक्टरांनी थोडा विचार केला. म्हणाले ठीक आहे. रात्रीच्या तपासणीनन्तर ठरवू. रात्री एक वाजता डॉक्टर आले. म्हणाले, सकाळी सात वाजता सोडतो तो पर्यंत २४ तास उलटलेले असतील.
दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर सात वाजता डॉक्टर आले, तपासले आणि जा म्हणाले. तो दिवस होता ११ मार्च २०१२. यथावकाश त्याची परीक्षा पार पडली. तो ८१ टक्के मार्कानी पास झाला
पुन्हा एकदम स्वतः ला स्वतःची लाज वाटली. पुन्हा एकदा माझ्या मनाला मीच वचन दिले. कधीच तंबाखू, सिगारेटच्या वाटेला जाणार नाही. आजच्या तारखेपर्यंत माझा निश्चय पाळीत आलोय, पणअर्धे आयुष्य वाया घालवले याची खंत मात्र कायम आहे.

– लेखन : प्रकाश पळशीकर. नॉयडा.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

प्रकाश पळशीकर यांनी खुप छान अनुभव शेअर केले
🙏धन्यवाद
यशस्वी प्रवास म्हणावा लागेल. दृढनिश्चयाने व्यसनावर विजय मिळविला हे प्रेरणादायी आहे. व्यसन सोडल्याचा वाढदिवस साजरा करणारा एक सहकारी मला आठवतो. वाढदिवसाला तो पेढे नाही (कारण साखर वाढायला निमंत्रण) तर बटाटेवडे स्वतःच्या हाताने प्रत्येकाजवळ जाऊन जाऊन द्यायचा व अभिमानाने सांगायचा आज माझा व्यसनमुक्तीचा वाढदिवस आहे.. लेख प्रत्येकाने आवर्जून वाचला पाहिजे.
श्री पळशीकर यांचा लेख इतरांसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय असा आहे. मनाचा निग्रह मोठा असतो.
श्री प्रकाशजी पळशीकर यांनी घातक झुरक्याचा अनुभव तसेच त्या झुरक्यासोबतचा व त्याच्याविनाचा प्रवास खूप चांगल्या शब्दात मांडला आहे. असे प्रकाश घरोघरी पाहायला मिळोत.💐