दिलीप पाथर यांचे पनवेल पूर्व, दादासाहेब धनराज विसपुते सभागृहामधे रुक्मिणी पांडुरंग पोटले चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई आणि आदर्श शैक्षणिक समूह संचलीत डी डी विसपुते अध्यापक विद्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गौरवशाली, कर्तृत्ववान महनीय व्यक्तिमत्वांचा ‘गौरव महाराष्ट्राचा राज्यस्तरीय पुरस्कार म्हसळा टाइम्सचा’ पुरस्कार सोहळा संपन्न होत होता. संतूर वाद्याच्या श्रवणीय किणकिणाटाने सभागृह गुंजत होते. पुरस्कारार्थी व त्यांच्या सोबत आलेले मित्र, नातेवाईक यांनी सभागृह गच्च भरलेले होते. सगळ्या उपस्थितांच्या चेहऱ्यावर कुतुहल मिश्रीत भाव होते. जीवन गौरव व समाज भूषण पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच पुर्ण झाला होता.

सुत्रसंचालकाने दिलीप शंकर पाथरे, अलिबाग यांना आता उद्योग रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याने त्यांनी व्यासपीठावर यावे, अशी विनंती करताच दमदार पावले टाकत दिलीप पाथरे ,पत्नी माधवी सह व्यापपीठावर आले. सुत्रसंचालकाने त्याची ओळख करून दिली. मान्यवरांच्या हस्ते दिलीपला उद्योग रत्न पुरस्काराचे स्मृति चिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. दिलीपच्या जीवनातील हा परमोच्च आनंदाचा क्षण होता अन् त्याला त्या आनंदामधे सहभागी व्हायला मी तिथे म्हसळा टाइम्सचा सल्लागार संपादक व पुरस्कार समितीचा अध्यक्ष या नात्याने उपस्थित होतो.8i दिलीपच्या देह बोलीतून त्याला झालेला अपूर्व आनंद मी ही अनुभवीत होतो. आयुष्यभर केलेल्या कष्टाला आज उद्योग रत्न या पुरस्काराचे गोंडस फळ लागले होते. जिद्द, चिकाटी, खडतर परिश्रम, प्रामाणिक प्रयत्न, अथक मेहनत याला आज यश आलं होतं. आज दिलीपला त्याच्या वयाच्या बहात्तराव्या वर्षी उद्योग रत्न या बहुमानाच्या पुरस्काराने गौरविणेत आलं होतं.

यशाची एकेक पायरी पादाक्रांत करणाऱ्या दिलीपची अन् माझी ओळख रायगड जिल्ह्यातील महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मध्ये झाली.आम्ही दोघेही ७२ च्या बॅचचे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी होतो. पदवीनंतर तो त्याच्या मार्गाला अन मी पुढील शिक्षणाकरीता पुण्याला गेल्यामुळे आमची ताटातूट झाली. परंतु तीन वर्षांपूर्वी कॉलेजमेटच्या गेटटुगेदरमुळे आम्ही पुन्हां एकत्र आलो. यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या दिलीपच्या आयुष्याचा खडतर प्रवास अत्यंत हृदयस्पर्शी असाच आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या रायगड किल्याच्या परिसरात तथा रायगड किल्याच्या पायथ्याशी वसलेल्या नाते या छोट्याशा खेड्यात ७ डिसेंबर १९५३ रोजी दिलीपचा जन्म झाला. एकूण पाच भाऊ बहिणी. त्यातील दिलीप हे दुसरे अपत्य. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची, गरिबीचे दाहक चटके सोसत सोसत गेलेले बालपण, नाते गावातच झालेले शालेय शिक्षण. मॅट्रिक झाल्यावर पुढे काय? हा यक्ष प्रश्न समोर उभा, पुढीलî शिक्षण कसे करावे ही विवंचना सतावित असतानाच त्याच्या माऊलीने आम्ही कितीही काबाडकष्ट करू पण तू उच्च विद्याभूषित झालाच पाहिजे यासाठी कंबर कसून प्रयत्न करायचे ठरवले अन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाड येथे वाणिज्य शाखेत पदवीधर होण्यासाठी त्याने प्रवेश घेतला. चार भावंडे पाठीमागे असताना अत्यंत गरिबीत त्याचे पुढील शिक्षण सुरू झाले. सर्व अपत्यांना वर्षाकाठी एकच ड्रेस मिळायचा तसाच दिलीपला एक पँट शर्ट व टोपी हा ड्रेस मिळायचा. तो ड्रेस वर्षभर टिकला पाहिजे म्हणून दिलीप नाते ते महाड सायकलवरून कॉलेजला येताना सायकलच्या कॅरिअरला पँट शर्ट गुंडाळी करून लावायचा. कॉलेज जवळ आले की पँट शर्ट परिधान करायचा. पुन्हा परत जाताना कॅरिअरला ड्रेस गुंडाळी करून लावायचा. हो, कारण तो ड्रेस वर्षभर न फाटता तगला तर पाहिजे ना ? अशा परिस्थितीत तो कॉलेजला येत होता. म्हणता म्हणता चार वर्ष अशीच गेली अन् दिलीप बी. कॉम. झाला.
रिझल्ट हातात येताच दुसऱ्याच दिवशी नोकरी मिळवण्यासाठी दिलीप मुंबईला गेला. लगेचच इ सी टी व्ही या कंपनीत आठ रुपये रोजंदारीवर त्याला नोकरी मिळाली. अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट करून याच नोकरीत पदोन्नती मिळवून तो फोरमन झाला. याच कालावधीत आयकर विभागात लिपीक म्हणून त्याला नोकरी मिळाली अन् स्वतःच्या कर्तृत्वावर आयकर अधिकारी झाला. इमाने इतबारे निवृत्त होईपर्यंत त्याने आयकर खात्यात नोकरी केली.

निवृत्तीनंतर स्वतःचा काहीतरी व्यवसाय असला पाहिजे या ध्येयाने दिलीपने “कु कू च कु” या नांवाने पोल्ट्री फार्म सुरू केला. केवळ स्वतःचा पोल्ट्री फार्म उभा करून न थांबता, त्याने शेकडो जणांना पोल्ट्री फार्म सुरू करायला प्रोत्साहन व मदत केली. कोंबड्यांना खाद्य लागते आता हीच योग्य वेळ आहे आपणच पोल्ट्री फीडचा कारखाना का सुरू करू नये ? हा विचार त्याच्या मनांत घोळायला लागला. त्याच्या सासरकडच्या मंडळीने जागेचा प्रश्न सोडवला अन् उभा राहिला “कु कू च कू” पोल्ट्री फीडचा भव्य कारखाना. आजमितीला या कारखान्याने वर्षाला सुमारे शंभर कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या कारखान्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

हे सर्व करत असताना समाज कार्यात अग्रेसर असणारा दिलीप वैश्य सहकारी बँक, अलिबागचा अध्यक्ष झाला. तो अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधित्व करू लागला.
एक प्रतिथयश व्यक्तिमत्व म्हणून त्याला आज समाजात मानसन्मान मिळत आहे.

नाते गावातून गरिबीची झळ सोसून बाहेर पडलेल्या दिलीपने अलिबाग जवळ स्वतःचा अलिशान बंगला बांधला आहे. ड्रायवर असलेल्या कारमधून तो फिरतो. त्याने स्वतःच्या ओंकार व कुणाल या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन “कु कू च कू” या कारखान्यात सामावून घेतले. आपल्या पुढच्या पिढीला यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी पथदर्शक म्हणून जबाबदारीने कार्य केले. गरिबीची जाण गरीबालाच जास्त असते याचे भान राखून अडल्यानडल्या गरिबांना मदत करण्याचे औदार्य त्याने मनापासून जपले आहे. अत्यंत मितभाषी असणारा दिलीप “कमी बोला, जास्त काम करा” या उक्ती प्रमाणे कार्यरत असतो हेच त्याचे स्वभाव वैशिष्ठ आणि यशाचे गमक आहे.
उंच झेप घेणाऱ्या गरुड पक्षाला आकाश ठेंगणे वाटते. दिलीप ही त्याच्या आयुष्यात अजून उत्तुंग भरारी मारत असे आहे हेच खुप कौतुकास्पद आहे. त्यामुळे मला दिलीपचा खूप अभिमान वाटतो. दिलीपने आणि त्याच्या परिवाराने सतत उंच उंच झेप घेत राहावी, यासाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा.

— लेखन : सुनील चिटणीस.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
