आत्माराम परब
‘दुनिया गोल है !’ असे म्हटले जाते. परंतु हा गोल सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरचा असतो. सामान्य माणूस या दुनियेत फिरताना शक्यतो या गोलाच्या व्यासावरून सुरक्षितपणे फिरण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याच्या परिघावरून फिरणारा माणूस म्हणजे आत्माराम परब! पर्यटन म्हणजे व्यवसाय नसून छंद समजणाऱ्या, प्रचंड आत्मविश्वास असणाऱ्या पर्यटन क्षेत्रातील ‘ईशा टूर’च्या आत्माराम परब यांना आपण आजच्या झेप सदरात भेटणार आहोत. वेगळ्या क्षेत्रात जाऊन ‘आयकॉन’, ‘पायोनियर’ बनणे हा प्रवास इतका सोपा नव्हता. तो आपण या मुलाखतीतून जाणून घेऊया.
त्यांनी तयार ठेवलेला सोप्या पायवाटेवरून जाताना, या मुलाखतीतून कोणताही सुज्ञ योग्य ती प्रेरणा नक्कीच घेणार ! कोणत्याही क्षेत्रातली व्यक्ती असो, त्यांनी स्वतःची वेगळी पायवाट शोधण्याचा संकल्प जरी केला तरी या मुलाखतीचा मूळ उद्देश सार्थ होईल असे वाटते !
प्रतिभा सराफ : आपण शिक्षण घेताना किंवा शिक्षण झाल्यावर ठरवतो की कोणत्या प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय आपल्याला करायचा आहे ते. तुम्ही नेमकं कोणत्या क्षणी पर्यटनाच्या व्यवसायात वाटचाल करायचे ठरवले ?
आत्माराम परब : सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मुंबई कस्टममध्ये माझी सुखासीन नोकरी चालू होती. खूपच छान चाललं होतं पण मन रमत नव्हतं. काम करता करता असं वाटत होतं की आपण असं काहीतरी करायला हवं ज्याच्यात आपलं मन रमेल! मला खूप आधीपासून ट्रेकिंग आणि माऊंटिंगचं वेड होतं. क्रिकेटमुळे भारतभर फिरत होतो. फोटोग्राफी आणि ट्रेकिंग-माउंटिंगच्या दरम्यान वेगवेगळ्या भागात फिरत होतो. ‘भटकंती’चा हा वसा मला तेव्हापासून लाभला. हे करता करता माझ्या लक्षात आलं की मला हे आवडतंय, हेच आपण पुढे करायला हवं ! परंतु ऑफिसमधून भटकंतीसाठी अशा किती सुट्ट्या मिळणार आणि आपण या भटकंतीसाठी किती खर्च करणार ? नोकरी आणि फोटोग्राफी हे दोन्ही चालू असतानाही अचानक मला एका क्षणी वाटलं की आता आपणच यापुढे ‘पर्यटन’ या व्यवसायात उतरायला हवं ! जेणेकरून आपल्यालाही भटकंतीचा आनंद मिळेल आणि त्यानिमित्ताने अनेक पर्यटकांनाही आपण भ्रमंती घडवून आणू शकतो.
२००३ ते २००६ या काळात नोकरी सांभाळून मी ही सुरुवात केली. काही सहलींनंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे मला असं वाटलं की मी पूर्ण वेळ व्यवसायाला देऊ शकतो ! परंतु पर्यटन व्यवसायातील कोणतेही शिक्षण नसल्यामुळे पर्यटन व्यवसाय कसा करतात, याची पूर्ण कल्पना माझ्याकडे नसल्यामुळे, माझ्यापाशी असलेल्या थोड्याफार ज्ञानामुळे मी हे करत होतो पण माझ्या लक्षात आलं की ‘व्यवसाय’ म्हणून हे काम करायचं असेल तर अजून त्याचे व्यवस्थित ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि ते ज्ञान प्रत्यक्ष घेण्यासाठी अनेक प्रतिष्ठित टूर कंपन्यांबरोबर मी ‘पर्यटक’ म्हणून फिरायला सुरुवात केली. याचा मला असा फायदा झाला की टूरमध्ये काय करायला हवं याचबरोबर काय करायला नको, या सगळ्यांची चांगली जाणीव झाली. खऱ्या अर्थाने पर्यटन व्यवसायातील माझे शिक्षण सुरू झाले !
या प्रतिष्ठित टूर कंपन्यांमधील ही सगळी मंडळी या क्षेत्रात माहीर होती. परंतु टूर आयोजित करताना किंवा टूरमध्ये असताना ते जे नियम किंवा अटी लादतात किंवा चाकोरीबद्ध अशा सहली आखतात त्याला थोडासा फाटा देऊन, आपली वेगळी ओळख निर्माण करता येऊ शकेल या विचाराने ईशा टूर्सच्या ‘ऑफबीट टूर’चा जन्म झाला म्हणायला हरकत नाही.

मी २००३ केलेली पहिली टूर ही मनालीची होती. सर्वसामान्य व्यवसायिक जसं अतिशय सेफ व्यवसाय करतात त्याप्रमाणे पर्यटन व्यवसायामधील सर्वात सेफ ठिकाण म्हणजे मनाली. या ठिकाणाला सर्वात जास्त पर्यटकांकडून पसंती मिळते. कुलू- मनाली- शिमला ट्रीप जेव्हा आखली तेव्हा मला आत्मविश्वास होता की पन्नास एक पर्यटक तरी जरूर येतील! परंतु दोन-तीन महिन्याच्या प्रयत्नानंतर केवळ दहा पर्यटकांचे बुकिंग झाले. पन्नास लोकांच्या प्लॅनिंगने केलेली टूर दहा माणसांच्या वर येते तेव्हा आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मला ही टूर कॅन्सल करावी लागेल, असे नम्रपणे मी पर्यटकांना कळवले तर त्यांनी त्यावर मला सांगितले की आम्हीसुद्धा सुट्ट्या घेतलेल्या आहेत, तिकीटं काढलेली आहेत त्यामुळे ही टूर कॅन्सल केलीत तर आमचे आर्थिक नुकसान होईल. त्याप्रमाणे मानसिक नुकसानपण होईल ! म्हणजे मी माझ्याच पद्धतीने याचा विचार करत होतो पण जेव्हा पर्यटकांची व्यथा जाणवली तेव्हा माझ्या लक्षात आले की काहीही झाले तरी ही टूर पूर्ण करायला हवी. त्याच निर्धाराने ती पूर्ण केली. ती टूर अतिशय उत्तम झाली. त्या टूरमधील ही सगळी दहाच्या दहा मंडळी आजही माझ्या संपर्कात आहेत.
या टूरमधून मी दोन गोष्टी शिकलो एक- कोणत्याही परिस्थितीत टूर कॅन्सल करायची नाही. दुसरी – आपण या प्रचलित टूर न करता काहीतरी वेगळं करायला हवं जेणेकरून आपली एक वेगळी ओळख निर्माण होईल !
१९९५ साली मी मोटर सायकलवरून लडाखला गेलो होतो. जबरदस्त डेस्टिनेशन म्हणून माझा त्याविषयीचा अभ्यास झालेला होता. पंच्यान्नव सालानंतर २००३ सालापर्यंत अनेक वेळा मी तिथे गेलो होतो तोपर्यंत ‘लडाख’ हे ठिकाण फक्त माउंटिंग, ट्रेकिंग, फोटोग्राफी आणि अॅडव्हेंचरसाठी आहे, असेच मला वाटत होते. परंतु लडाखला टूर न्यायची तर त्या टूर फॅमिलीसाठी करायला हव्यात, हे लक्षात आले. फॅमिलीच्या अनुषंगाने या टूरची आखणी केली आणि सत्तावीस जणांना त्या टूरला घेऊन गेलो. हे सगळे माझ्या जवळचे वा मित्रमैत्रिणी होते.
ही पहिली २००३ साली लडाखची कौटुंबिक टूर केली त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर असं ठरवलं की सगळ्या एक्साॅक्टीक, ऑफबीट टूर करायच्या जिथे सर्वसामान्य माणसं कमीत कमी जातात. अशा तऱ्हेने माझा प्रवास सुरू झाला.
प्रतिभा : तुमच्यासोबत प्रवास करताना प्रत्येक प्रवासी अनुभवतो की तुम्हीसुद्धा तो प्रवास त्यांच्याइतकाच एन्जॉय करता. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर दुसऱ्यांदा त्या ठिकाणी जाणे टाळतो परंतु आपल्या या व्यवसायामुळे आपल्याला परत परत त्याच त्या ठिकाणी अनेकदा जावं लागतं. असं असूनही तुम्ही प्रत्येक वेळेस ते ठिकाण एन्जॉय करता या मागचे कारण काय ?
आत्माराम : मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की मी आधी एक पर्यटक आहे आणि त्यानंतर टूर ऑपरेटर ! त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अनेक वेळा जरी गेलो तरीसुद्धा मला एकच ठिकाण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगळे असल्याचे जाणवते. एकच ठिकाण ऊन, ढग, धुकं असेल तर वेगळे दिसते. प्रत्येक वेळेची एक वेगळी मजा असते एक वेगळा आनंद असतो आणि तो ‘पर्यटक’ म्हणूनसुद्धा मी स्वतः एन्जॉय करतो आणि त्यामुळेच मला कोणत्याही सहलीवर कित्येक वेळा गेलो तरीसुद्धा कंटाळा येत नाही. मी स्वतः पर्यटनप्रेमी आणि निसर्गप्रेमी असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी नेहमीच आनंदी असतो. मी पर्यटकांसारखाच तर कधी पर्यटकांपेक्षा जास्त ती सहल एन्जॉय करत असतो !

प्रतिभा : एखाद्या टूरमध्ये अनपेक्षित समस्या निर्माण झाल्यास तुम्ही ती कशी हाताळाल ? (उदा. रद्द झालेली फ्लाईट, हरवलेले पासपोर्ट, हॉटेलमध्ये समस्या इ.)
अचानक उद्भवलेल्या समस्यांना हे प्रवासी कसा प्रतिसाद देतात ? चिडतात ? रागवतात? समजून घेतात की अपप्रचार करतात ? पैसे परत मागतात ? की आणखी काही ?
आत्माराम : आम्ही अतिशय एक्झॉटिक, ऑफबीट टूर आयोजित करतो. भारतामधल्या दुर्गम भागामध्ये जसे की लडाख, मेघालय, नागालँड, मिझोराम, स्पिती व्हॅली, उत्तराखंड, ऑफबीट हिमाचल येथील सगळ्या सहली आयोजित करताना आधी त्या दुर्गम भागांमधील व्यवस्था पाहणे तयारी करणे हे अतिशय कठीण काम आम्हाला आधीच करावे लागते. मी आतापर्यंत ज्या ज्या पर्यटकांना अशा दुर्गम भागात सहलींना घेऊन गेलोय, जिथे पुरेशा सोयी- सवलती नव्हत्या, रस्ते किंवा हॉटेल व्यवस्था चांगली नव्हती, जेवणाच्या सोयी चांगल्या नव्हत्या, त्या काळातही इतक्या असुविधा असूनही लोकांनी जो काही प्रचंड प्रतिसाद दिला, मला नेहमी पाठिंबा दिला, काहीतरी वेगळं करतोय म्हणून मला लोकांनी प्रेमाने हे सगळं समजून घेतलं त्याला तोड नाही. त्यामुळेच मी नेहमी म्हणतो की सुरुवातीच्या काळात २००३ ते २०१०-११ पर्यंत जेवढ्या पर्यटकांनी विश्वास- प्रेम -आपुलकी दाखवली त्या प्रेमाच्या बळावरच मी नवनवीन प्रयोग करायची हिम्मत करू शकलो !

आम्हाला वाईट अनुभव आले नाहीत, असे नाही. लडाख आणि अरुणाचलसारखे अति उंच भागातील काही प्रदेश, डोंगराळ भागातील प्रदेश, हिमाच्छादित असलेले प्रदेश येथे खूप वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. काश्मीरमध्ये अचानक होणारे बंद, नियमित लागणारे कर्फ्यू, तिथे आलेला खूप मोठा पूर, अचानकपणे ३७० कलम लागू झालं त्यावेळी निर्माण झालेली परिस्थिती असे अनेक अनुभव आमच्या पाठीशी आहेत. या सगळ्यांमध्ये सोबतीच्या पर्यटकांनी प्रचंड साथ दिली, हे मी अत्यंत अभिमानाने सांगू शकतो की हीच आमची ताकद आहे! तशा अनेक टूर मॅनेजरच्या काही कंप्लेंट्स असतात की पर्यटक खूप त्रास देतात, आरडाओरड करतात, ‘आम्ही पैसे दिले आहे त्याचा आम्हाला मोबदला मिळालाच पाहिजे!’ असे सांगतात. टूर मॅनेजर म्हणून मी पण हे सगळं जाणतो आणि ते खरे आहे असेही मानतो परंतु अचानक उद्भवलेल्या परिस्थितीची आणि आम्ही घेतलेल्या मेहनतीची जाणीव असते तेव्हा सोबतीची हीच माणसे स्वतःहून साथ देतात. अचानक उद्भवलेल्या संकटामध्ये आमच्या बरोबरीने उभे राहतात. माझ्या सोबतीच्या पर्यटकांनी अशा कितीतरी समस्या धीराने समजून घेतल्या आणि त्या समस्यांना अगदी प्रेमाने माझ्यासोबत सामोरे गेले, त्यातून चांगले पर्याय आणि मार्ग शोधले, त्यामुळे हे संपूर्ण क्रेडिट आमच्या हौशी तसेच समंजस पर्यटकांचे आहे !
प्रतिभा : तुमच्याबरोबर एकदा प्रवास केलेला प्रवासी परत परत तुमच्याबरोबर प्रवास करण्यास उत्सुक असतो, याचे कारण काय ?
आत्माराम : एकदा आमच्यासोबत पर्यटक आले की त्यांना पुन्हा आमच्याबरोबर पुढची सहल करावीसी वाटते इतकंच नाही तर जवळजवळ दहा-पंधरा सहली आमच्यासोबत केलेले पर्यटकही आहेत. ते पुन्हा पुन्हा का येतात याच्या मागचं खरं उत्तर मला वाटतं की आम्ही ज्या पद्धतीने आमच्या पर्यटकांशी वागतो, त्यांना आपलंसं करतो किंवा त्यांना आमच्याच कुटुंबाचा एक भाग मानतो, हे आहे. आमच्याकडे आलेला कोणताही पर्यटक कोणत्याही वयाचा असो तो आमच्या सहलीचा जेव्हा एक भाग होतो तेव्हा आमच्याच घरातील एखादा कुटुंबीय सोबत असल्यासारखीच आम्ही त्याला वागणूक देतो. माझे स्वतःचे आईवडील सोबत आहे असे समजून मी वडीलधाऱ्यांची काळजी घेतो.
पर्यटक आपल्याकडे येताना, त्यांनी त्याचा बहुमोल वेळ आपल्याला दिलेला आहे, त्यासाठी त्याने आपले पैसे खर्च केलेले आहेत हे आम्हाला ठाऊक असते. त्यामुळे ज्या विश्वासाने त्याने आम्हाला वेळ आणि पैसा दिला त्याचा योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न निश्चितपणे आम्ही करतो.
अगदी सुरुवातीपासूनच आम्ही आमच्या पर्यटकांना कधीही कस्टमर किंवा मग ग्राहक संबोधत नाही तर त्यांना ‘गेस्ट’ म्हणजेच पाहुणे असे संबोधतो. आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांची आपण जशी खातरदारी करतो, काळजी घेतो तशीच आम्ही त्यांची घेतो. या आमच्या प्रेमळ वागणुकीमुळे आणि काळजीवाहू वृत्तीमुळे आमच्या सहलींना जोडल्या गेलेले पर्यटकांकडून उत्तम सहकार्य मिळते.

प्रतिभा: अलीकडे ‘टूर्स कंपन्याची चलती आहे’, असे म्हटले जाते म्हणजे पूर्वी घर घेताना किंवा लग्नकार्यासारख्या मोठ्या कार्यक्रमात कर्ज वगैरे घेतले जायचे परंतु अलीकडे विदेशातील प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतात. यावर भाष्य करा.
आत्माराम: पर्यटकांना जशी उत्तम सहल आयोजित करणाऱ्या टूर कंपन्यांची गरज आहे तशीच गरज टूर कंपन्यांना पर्यटकांची आहे ! नाण्याला दोन बाजू असतात त्यामुळे एखादी टूर कंपनी जर पर्यटकांना चांगल्या सोयी उपलब्ध करून देत असतील तर त्यांना त्याचे चांगले अनुभव येतात आणि मग ते चांगले अनुभव परत परत मिळवण्यासाठी ते त्या टूर कंपनीबरोबर आणखीही सहली करतात. आता नेमाने सहली करताना मोठ्या प्रमाणात पैशाची तरतूद करावी लागते हे स्वाभाविकच आहे. परंतु आत्तापर्यंत ईशाच्या पर्यटकांपैकी कोणीही कर्ज घेऊन सहल केल्याची माझ्याकडे नोंद नाही.
मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय त्याचप्रमाणे उच्च वर्गातील पर्यटकच आत्तापर्यंत आमच्यासोबत आलेले आहेत. देशाविदेशातील कोणत्याही सहलीसाठी कोणत्याही पर्यटकांनी कर्ज काढलेले नाही. त्यामुळे टूर कंपन्यांची चलती आहे हे खरे आहे कारण आजच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटकांना प्रवास करायला आवडते याचा फायदा टूर कंपन्यांना निश्चितपणे मिळतो. पर्यटनासाठी ‘कर्ज सुविधा’ उपलब्ध आहेत हेही खरे आहे आणि चांगलेही आहे परंतु आमच्याकडे असे पर्यटक नाहीत.
प्रतिभा : पर्यटनात ‘ट्रेण्डसेटर’ होण्याचा बहुमान आपल्याला एकदा नाही तर अनेकदा मिळाला. तर अशा कोणत्या नवीन कल्पना आपण राबवल्या ?
आत्माराम : तुम्हाला सांगायला आवडेल की नुकताच ‘नवलाई’ या मासिकामध्ये ‘ट्रेण्डसेटर’ म्हणून माझाही उल्लेख खूप मोठ्या दिग्गज पर्यटन व्यावसायिकांच्या बरोबरीने केलेला आहे. त्यामध्ये ‘आराधना ट्रॅव्हल्स’चे शरद किराणे आहेत. ‘राजाराणी ट्रॅव्हल्स’चे राजा पाटील आहेत. ‘केसरी टूर्स’चे केसरी पाटील आहेत. ‘वीणा वर्ल्ड’च्या वीणा पाटील आहेत. माझ्यावर ‘नवलाई मासिका’मध्ये लेख लिहिला गेलाय. मला ‘ट्रेण्डसेटर’ याबद्दल सांगायला आवडेल ! काहीतरी वेगळा ट्रेण्ड सेट करणारा असा व्यक्ती. मी काही ठरवून ट्रेण्ड सेट गेलेला नाही.

मी लडाखसारख्या ठिकाणी निव्वळ अॅडव्हेंचर म्हणून पर्यटकांना सहलीला घेऊन गेलो पण त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही सहल करावीशी वाटली मग मी या सहलीचा फॉर्म बदलून कौटुंबिक सहली आयोजित केल्या. या सहलींना प्रचंड प्रतिसाद मिळाला. याचा फायदा असा झाला की २००९ मध्ये ‘पायोनियर इन फॅमिली टुरिझम’ असा किताब मला दिला गेला. त्यानंतर मी अनेक वेगवेगळे प्रयोग केले. मला भारतीय सैन्याविषयी प्रचंड आदर, आकर्षण आहे. मी जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा लडाखच्या टूरवर असताना या सैनिकांशी संवाद साधतो. परंतु टूर दरम्यान त्यांच्याशी संवाद साधणे थोडे कठीणच जाते. त्यामुळे ‘देशभक्तीपर टुरिझम’च्या (हे नाव आमच्यासोबतच्या एका पर्यटकांने दिलेले आहे) अंतर्गत लडाख सहली आयोजित केल्या. त्यामुळेच २६ जुलैला ‘कारगिल दिवस’ लडाख मध्ये साजरा केला त्यानिमित्ताने या सैनिकांना भेटता आले आणि त्याचबरोबर त्यांच्याशी उत्तम संवाद साधता आला. या सहलीला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर भारतातल्या सर्वात उंच ठिकाणी म्हणजे पोलो मैदानात १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो, तिथे पर्यटक घेऊन गेलो. त्यानंतर प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला पण पर्यटकांना घेऊन जायला लागलो. ईशा टूरतर्फे जवानांबरोबर रक्षाबंधन कार्यक्रम केला आणि मग लक्षात यायला लागलं की नवीन ट्रेण्ड सेट केलाय !
अशा इथे सुरुवातीला अशा सहली कोणीच आयोजित करत नव्हते परंतु त्यानंतर आता बऱ्याच टूर कंपन्या या सहली करतात. मी या सहलींचा ट्रेण्डसेटर ठरलो ! आजही माझ्या आणि इतर टूर कंपनीच्या सहली या भागात या काळात चालू आहेत.
‘लडाख’मध्ये वेगवेगळ्या ऋतूंमधील सहली आयोजित केल्या. शरद ऋतुच्या काळात बहुरंगांची उधळण असते ती पाहण्यासाठी सहली काढल्या तर हिवाळ्यात तापमान मायनस पाच ते मायनस पंचवीस-तीस डिग्री असतं तेव्हाही सहली आयोजित केल्या. वेगवेगळ्या ऋतूत लडाख कसे दिसते, हे पाहण्याची मला स्वतःलाच उत्सुकता होती त्यामुळे मी २००५ साली स्वतः तिथे गेलो होतो. मला ते खूप आवडलं त्यामुळेच मी तिथे पर्यटकांना घेऊन जाऊ शकलो आणि त्यांनाही ते आवडले होतं तिथेच ‘चादर ट्रेक’ / ‘चद्दर ट्रेक’ नावाचा प्रकार असतो तो सुद्धा खूप सुपरहिट झाला. एप्रिल महिन्यामध्ये तो फार कमी लोकांना माहीत होता अगदी टुरिझम डिपार्टमेंटला सुद्धा माहीत नव्हता. हा ऋतूसुद्धा आपण प्रमोट करायला हवा, अशी टुरिझम डिपार्टमेंटबरोबर चर्चा केली परंतु त्यांनी काही फारसे लक्ष दिले नाही. मी सहा-सात वर्ष त्या सहली आयोजित करत गेलो. २०२२ मध्ये एप्रिकॉट ब्लॉसम हा जेव्हा सरकारी पातळीवर साजरा केला गेला तेव्हा त्यांनी त्याला नाव दिलं Abgrigat Festival. जेव्हा या फेस्टिवलचे आयोजन केले गेले होते तेव्हा ‘पायोनियर’ म्हणून मला सन्मानित करण्यात आले होते, असे वेगळे वेगळे ट्रेण्ड सेट केलेत.
याप्रमाणे नॉर्थ ईस्ट इंडियालाही आराधना टूर कंपनी तेवीस किंवा सत्तावीस दिवसांची टूर आयोजित करायचे. एवढा वेळ आणि एवढी एनर्जी तसेच पैसेही लोकांकडे नसतात त्यामुळे तिथे दहा- दहा दिवसांच्या दोन टूर आम्ही आयोजित केल्या. आसाम -मेघालय- अरुणाचल आणि नागालँड- मिझोराम- मणिपूर अशा दोन टूर वेगवेगळ्या केल्या त्यामुळे त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. नागालँडमध्ये ‘हॉनबिल’ या नावाचा एक चांगला फेस्टिवल असतो त्याला खऱ्या अर्थाने ‘फेस्टिवलचा फेस्टिवल’ म्हणता येईल, असा तो सुंदर फेस्टिवल आहे. भारतातील हे असे राज्य आहे जिथे सतरा प्रकारचे आदिवासी एकत्र येऊन हा फेस्टिवल साजरा करतात, त्याला ‘हॉर्नबिल फेस्टिवल’ म्हणतात. या फेस्टिवलसाठी पहिल्यांदा पर्यटक घेऊन जाण्याचे काम ईशा टूर्सने केले. त्यामुळे आम्हाला याही सहलीसाठी ट्रेण्ड सेटर म्हणून लोक ओळखायला लागले !

प्रतिभा : तुमच्यासाठी या क्षेत्रातील सर्वात मोठे आव्हान काय आहे ?
आत्माराम : व्यवसाय म्हटलं की त्याच्यासोबतच आव्हाने येतातच ! त्यामुळे आमचा व्यवसाय असा आहे की काही सुधारणा कराव्यात तर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि तिथे फार वावसुद्धा नसतो. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे निर्दोष काम करायला लागतं. कमीत कमी चुका होतील, याचा अभ्यास करून सहली आयोजित कराव्या लागतात. सहलीला जाण्याच्या आधीच आम्ही पर्यटकांकडून पैसे घेतो आणि त्या आगाऊ घेतलेल्या पैशामुळेच त्या ठिकाणी पोहोचण्याचे बस- गाडी- विमानाचे बुकिंग करू शकतो, हॉटेल बुकिंग करू शकतो, तुम्ही तिथे ज्या गाड्यांनी त्या भागात फिरणार आहात त्या गाड्यांचे बुकिंग करू शकतो, रस्त्यात कुठे खाणेपिणे घेणार असाल तर त्या रेस्टॉरंटनांसुद्धा आधीच पैसे पाठवावे लागतात. सर्व सुविधांचा विचार करून आम्हाला हव्या तशा आम्ही या सगळ्या गोष्टी बुक करतो परंतु त्या तशाच मिळतील याची कधीकधी शाश्वती नसते. त्यामुळे बुक करण्याआधी, बुक केल्यावर, प्रवासादरम्यान अनेकदा त्यांच्याशी संवाद साधावा लागतो, मैत्र वाढवावे लागते. आमच्याकडून पर्यटकांना, ‘या सुविधा मिळतील’, असे वचन दिलेले असते त्याची पूर्तता होणे आवश्यक असते. नव्याण्णव टक्के वेळा हे उत्तमरीत्या साध्य होते परंतु क्वचित ते होत नाही.

मला यासाठी एक उत्तम उदाहरण द्यायला आवडेल की अलीकडे पर्यटकांना विमान प्रवास आवडतो आणि त्यासाठी ते तसे पैसेही मोजतात परंतु कधी अचानक विमान प्रवासाचे दर वाढतात. गेल्या दहा वर्षांमध्ये तीन मोठ्या विमान कंपन्या अचानक बंद पडल्या. त्यामुळे आलेली आव्हाने वेगळीच होती. कोरोना काळातील लॉकडाऊनमधील आव्हाने तर त्यापेक्षा वेगळी होती. त्यातूनही आम्ही सहीसलामत बाहेर पडलो. हे खरंतर आमच्यासाठी इतके सोपे नव्हते परंतु आमच्याबरोबर प्रवास करणाऱ्या पर्यटकांनी आम्हाला निव्वळ तोंडी आश्वासने दिली नाहीत तर अक्षरशःआर्थिक मदतीचा हातसुद्धा पुढे केला. तुम्हाला आता खऱ्या अर्थाने पैशाची गरज आहे तर तुम्ही आमच्याकडून पैसे घ्या आणि जेव्हा तुम्ही कोणतीही पुढची सहल आखाल तेव्हा ही दिलेली रक्कम त्याआर्थिक मदतीच्या बदल्यात आम्हाला द्या, असेही सांगितले.
पर्यटकांनी इतकी जबरदस्त आश्वासने दिली की त्या बळावरच आम्हाला फार मोठा आत्मविश्वास मिळाला. आपल्यासोबत अशीही खूप माणसे आहेत की ती आपल्याकडे टूर ऑपरेटर म्हणून पाहत नाहीत तर त्यांच्यातलाच एक असल्यासारखे मानतात, ही गोष्ट खूपच समाधान देऊन गेली. अगदी आपल्या मुलासारखं किंवा भावासारखं समजून कशी मदत करता येईल याचा त्यांनी केलेला विचार आम्हाला मानसिक ताकद देऊन गेला. त्यामुळे लॉकडाउनच्या संकटातून आम्ही बाहेर पडू शकलो. विस्कळीत झालेला व्यवसाय सुरळीत होण्यासाठी साधारण दीड- दोन वर्षाचा काळ गेला. तो आर्थिक फटका इतका जबरदस्त होता की ईशा टूर्सला शून्यातून सामान्य परिस्थितीपर्यंत यायलाच आणखी पुढची दोन वर्षे गेली. हे आव्हान जबरदस्त होते, ज्यातून आम्ही सुखरूपपणे बाहेर पडलो.
प्रतिभा : तुमचे इतर छंद आणि त्याला कसा वेळ देता किंवा न्याय देता ?
आत्माराम : ‘पर्यटन’ हा माझा पहिला आणि शेवटचाही छंद ! त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त मला वेगळे छंद जोपासायची काय गरजच वाटली नाही. फोटोग्राफी हा मी तसा वेगळा छंद जोपासलेला होताच! पर्यटन आणि फोटोग्राफी हे खरंतर हातात हात घालून जाणारे छंद आहेत त्यामुळे पर्यटनाबरोबर फोटोग्राफीचा आनंद मी घेतच होतो! एवढं जगभर फिरतोय की फोटोग्राफीपेक्षा पर्यटनाचे पारडे जास्त झुकलेले मलाच दिसत आहे !
प्रतिभा : तुमची मुलगी ‘ईशा’ पर्यटन व्यवसायाकडे वळत आहे, याविषयी तुम्ही समाधानी आहात का ?
आत्माराम : सर्वसामान्यपणे कोणताही माणूस व्यवसायाकडे वळतो तेव्हा तो आपले सर्वस्व पणाला लावून तो व्यवसाय एका उंचीवर नेतो. जो खरोखरी मेहनतीने काम करतो त्याला ‘उंची गाठणे’ तसे कठीण काम नसते परंतु ती उंची गाठल्यावर ती उंची कायम राखणे, हे मात्र खरोखरी अत्यंत कठीण काम आहे. ते काम ईशा टूर करू शकली यामागचे कारण म्हणजे ईशाची संपूर्ण टीम आणि पर्यटक यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम!एकदा आपण एखाद्या व्यवसायात उंची गाठली तरी केव्हातरी आपल्याला तिथून निवृत्त होण्याची वेळ येते. अशा वेळेस जर आपल्या पहिल्या पिढीने चालवलेल्या व्यवसाय पुढच्या पिढीतील कोणी जबाबदारीने आपल्या खांद्यावर घ्यायला तयार नसतात, ही मात्र त्या व्यवसायिकांची खंत असते. मग कधी कोणाकडे तो व्यवसाय त्यांना सोपवावा लागतो तर कधी तो व्यवसाय बंदही करावा लागतो. माझ्या बाबतीत बोलायचं म्हणजे मी खरोखरी समाधानी आणि भाग्यवान आहे कारण माझी मुलगी ‘ईशा’ ही या ‘ईशा टूर’ला पुढे नेत आहे.
ईशाने ‘टूर्स अँड टुरिझम’ मध्ये पदवी संपादन केली आहे. तिचे शिक्षण चालू असताना ‘कोरोना आणि लॉकडाऊन’चा भयावह काळ अनुभवल्यावर तिने ठरवलं की पदव्युत्तर पदवी ही एका वेगळ्या क्षेत्रात करायची म्हणजे आणखी काही पर्याय उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे अगदी विचारपूर्वक फ्रान्सला जाऊन तिने ‘इंटरनॅशनल इव्हेंट मॅनेजमेंट’ मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. जसं तिने आधी ठरवलं होतं त्याप्रमाणे ती भारतात परत आली आणि तिने ‘ईशा टूर्स’ हा तिच्या नावाने असलेल्या व्यवसायाची जबाबदारी आनंदाने आपल्या खांद्यावर पेलली. या वर्षभरात तिने विदेशातील पाच सहली अत्यंत समर्थपणे स्वतः आयोजित केल्या आणि यशस्वी करून दाखवल्या आहेत. मी ज्या आपुलकीने सहलीमध्ये कौटुंबिक वातावरण निर्माण करतो अगदी माझा तोच वसा तिने उचलला आहे, याचा मला आनंद वाटतो. ईशा ही माझ्या व्यवसायातील दुसरी पिढी ‘ईशा टूर्स’ हा पर्यटनाचा व्यवसाय निश्चितपणे आणखी उंचीवर घेऊन जाईल यात काही शंका नाही.
प्रतिभा : आयुष्यात हा व्यवसाय जर केला नसता तर कोणता व्यवसाय किंवा नोकरी केली असती असे वाटते ?
आत्माराम : सरकारी नोकरी करत असताना फोटोग्राफीसुद्धा करत होतो आणि मला नेहमीच वाटत होतं की आपण नोकरीपेक्षा व्यवसाय करावा कारण व्यवसायामध्ये आपल्याला कोणी डायरेक्टर नसतो, कोणी बॉस नसतो, कोणी आपल्यावरती आवाज चढवणारा नसतो त्यामुळे नक्कीच मला व्यवसायाकडेच वळायचे होते. माझ्याकडे कोणतेही इतर कौशल्य किंवा क्षमता नसती तर मी नोकरीतच टिकून राहिलो असतो कारण नोकरीशिवाय मला दुसऱ्या पर्यायाचा विचार करता आला नसता. तसे फोटोग्राफीचे कौशल्य माझ्याकडे होतेच! फोटोग्राफीच्या व्यवसायात मी बऱ्यापैकी जम बसवलेला होता. त्यामुळे जर पर्यटनाकडे वळलो नसतो तर कदाचित मी पूर्णवेळ फोटोग्राफीचाच व्यवसाय केला असता !
प्रतिभा : आपण इतके वर्ष ‘ईशा टूर्स’ या संस्थेच्या स्थापनेपासून व्यवसायात वाढ केली आहे. त्याचा प्रगतीचा आलेख उंचावणारा आहे. तर या पर्यटन व्यवसायाबद्दल अधिकारवाणीने भाष्य करावे आणि नव्याने व्यवसाय करू पाहणाऱ्याला सल्ले द्यावेत.
आत्माराम : मी सल्ले देण्याएवढा मोठा व्यवसायिक नाही पण माझ्या अनुभवावरून मी सांगू शकतो की कोणत्याही कामात तुम्हाला संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. थोडा वाट बघावी लागते. आपण इथे साधे उदाहरण शेतकऱ्याचे घेऊया. जेव्हा शेतकरी जमिनीत धान्य पेरतो तेव्हा ते लगेच उगवत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो आणि बऱ्याच काळानंतर धान्य हाती लागते. व्यवसायाचेही काहीसे तसेच असते. व्यवसायाचा विकास किंवा वाढ ही उभी आणि आडवी अशा दोन पद्धतीने होत असते. व्यवसायामध्ये जेव्हा आडवी वाढ होत असते तेव्हा ती वाढ खूप कमी वेगाने होत असते परंतु ती सशक्त वाढ असते. व्यवसायामध्ये जेव्हा उभी वाढ होते तेव्हा आपण फार लवकर त्या व्यवसायामध्ये एक उंची गाठतो परंतु जेव्हा या व्यवसायामध्ये काही समस्या निर्माण होतात, व्यवसाय ढासळण्याची वेळ येते तेव्हा ज्या वेगाने आपण व्यवसाय वाढवलेला असतो त्याच वेगाने आपला व्यवसाय ढासळून जाण्याची शक्यता असते. परंतु व्यवसायाची आडवी वाढ किंवा प्रगती होते तेव्हा त्या व्यवसायात पुढे काही अडचणी आल्या तर त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्याकडे असते त्यामुळे कोणत्याही व्यवसायाचा विकास हा हाॅरिझोंटल असायला हवा असे मला वाटते आणि त्याच प्रकारच्या विकासावर मी जास्त विश्वास ठेवून वाटचाल केलेली आहे.
मी टप्प्याटप्प्याने एक एक सहल आयोजित करत करत गेलो. त्याचा पुरेसा अभ्यास केला आणि त्यानंतर माझे जे सहकारी आहेत, त्यांच्यावर ती सहल सोपवत गेलो. आता पन्नासपेक्षा जास्त देशांमध्ये ईशा टूर्स सहली आयोजित करते आणि यशस्वी ही करून दाखवते.कोणत्याही व्यवसायामध्ये स्पर्धा असतेच. त्यामुळे निराश न होता प्रयत्नपूर्वक आपला व्यवसाय वाढवता आला पाहिजे. ज्या व्यवसायात प्रचंड स्पर्धा असल्यामुळे काहीतरी नाविन्यपूर्व उपक्रम राबवले तर पर्यटक त्याकडे वळू शकतात. त्यामुळे काहीतरी हटके असेल तर पर्यटक निश्चितपणे आपल्या सहलीचा पर्याय निवडतात. आज जेव्हा पर्यटक सहलीसाठी चार-पाच लाख माझ्याकडे गुंतवतात, तेव्हा त्यांनी दाखवलेला विश्वास मला तडीस न्यावा लागतो. त्यामुळेच पुढच्या सहलींना उत्तम प्रतिसाद मिळतो.
प्रतिभा: पर्यटन या व्यवसायाच्या निमित्ताने आपण खूप प्रवास करता. आयुष्य हा सुद्धा खूप सुंदर प्रवास आहे तर या प्रवासाविषयीही आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.
आत्माराम: शाळेच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त मिळालेला ‘आदर्श विद्यार्थी पुरस्कार’, सचिन तेंडुलकरसाठी आणि त्याच्या मित्रमंडळी आणि कुटुंबासाठी सहल आयोजित करण्याची मिळालेली संधी, दलाई लामा यांच्याकडून झालेला सन्मान आणि ‘गौरव आयकॉन ऑफ ठाणे’, यासारखे पर्यटन क्षेत्रातील कामासाठी मिळालेले अनेक वेगवेगळे पुरस्कार आहेत ज्याची यादी खूप मोठी आहे.
प्रतिभा : मागे वळून पाहताना काय वाटतंय ?
आत्माराम : मागे वळून बघताना मला सगळं हे स्वप्नवत वाटतंय कारण मी ज्या ठिकाणी मी उभा आहे, त्याचा मी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता. काहीतरी माझ्या आयुष्यात होईल की ज्या शाळेमध्ये अतिशय सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी होतो त्या शाळेच्या पन्नासाव्या वर्धापनदिनाला ‘आदर्श उद्योजक’ हा त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला पुरस्कार मला लाभेल ! अनेक ठिकाणी माझ्या मुलाखती झाल्यात. टीव्हीवर किंवा वेगवेगळ्या व्याख्यानमालांमध्ये ज्यामुळे आज लाखो लोक मला नावाने आणि व्यवसायाने ओळखतात ! हे केवळ माझ्या पर्यटनाला प्रेमाने पाठिंबा देणाऱ्या मित्रमंडळींमुळे आणि कुटुंबीयांमुळे शक्य झाले. आतापर्यंत सत्यान्नव देशांमध्ये फिरलोय. येत्या डिसेंबरमध्ये माझ्या प्रवास केलेल्या देशांची मी शंभरी पार करणार आहे.
‘लडाख आणि आत्माराम’ हे जणू समीकरण झालेले आहे. २०२३ सालापर्यंत आत्माराम परब दोन-चार वेळा नाहीतर १५० वेळा एकटेच नाहीतर पन्नास हजारांच्यावर पर्यटकांना घेऊन लडाखला गेलेत. ‘ईशा टूर्स’ च्या या योगदानामुळे आत्माराम परब यांना ‘ट्रू फ्रेंड ऑफ लडाख’ या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. एखादा माणूस जसा आपल्या जवळचा असतो त्याला आपण मित्र संबोधतो त्याप्रमाणे आत्माराम परब हे लडाखला ‘मित्र’ संबोधतात, यातच खूप काही आले आहे !
जिंदगी एक सफर है सुहाना
यहा कल क्या हो किसने जाना…!
त्यामुळे चला प्रवासाला निघू या ! कमीत कमी एक तरी सहल ईशा टूर्स च्या ‘ईशा आत्माराम परब’ यांच्यासोबत निश्चितपणे करूया ! देशात फिरा. देशापासून दूर विदेशामधील देशांत फिरा, कितीही फिरा परंतु आपल्या देशात, आपल्या मातीची परत या !

— लेखन : प्रा. प्रतिभा सराफ. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
